September 22, 2023
Home » संक्रांत पर्वणी – तुकोबांच्या नजरेतून.
विश्वाचे आर्त

संक्रांत पर्वणी – तुकोबांच्या नजरेतून.

संक्रांत हा पर्वकाळ समजला जातो. या पर्वकाळात संपूर्ण भारतात अनेक लोक नदीत, विशेषतः समुद्रात स्नान करतात – का तर पाप निघून जाते आणि पदरी पुण्य पडते म्हणून. तसेच संक्रांतीला हलवा, तीळगुळ वाटण्याचीही प्रथा आहे. या सर्व संकल्पना तुकोबा कशा सुरेख रित्या आणि नजाकतीने वापरतात ते पाहण्यासारखे आहे.

शशांक पुरंदरे 

देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला ॥१॥

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥ध्रु.॥

पाप पुण्य गेले । एका स्नानेची  खुंटले ॥२॥

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥३॥

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥

शब्दार्थ:

तिळी – तीळामधे, तिळाच्या रुपाने.

धाला – आनंदला. 

साधला- प्राप्त केला.

पर्वकाळ – पर्वणी, पुण्य मिळवण्याची सुसंधी.

अंतरींचा – मनातला, चित्तातला.

मळ – दोष.

खुंटले – संपले.

संक्रांत हा पर्वकाळ समजला जातो. या पर्वकाळात संपूर्ण भारतात अनेक लोक नदीत, विशेषतः समुद्रात स्नान करतात – का तर पाप निघून जाते आणि पदरी पुण्य पडते म्हणून. तसेच संक्रांतीला हलवा, तीळगुळ वाटण्याचीही प्रथा आहे. या सर्व संकल्पना तुकोबा कशा सुरेख रित्या आणि नजाकतीने वापरतात ते पाहण्यासारखे आहे.

अगदी …देवदर्शन हा तुकोबांना पर्वकाळ वाटतो. ते म्हणतात माझ्या अंतरात देव प्रगटलाय आणि त्यामुळे मी अंतर्बाह्य आनंदरुप झालोय…

देव पहाणे, देव भेटणे, साक्षात्कार याविषयी आपल्या सर्वसामान्यांच्या ज्या कल्पना असतात आणि संतांचा जो निखळ अनुभव असतो यात जमिन-अस्मानाचे अंतर असते. आपली एक कल्पना असते की कोणी मुगुटधारी – पीतांबर नेसलेली व्यक्ति अकस्मात आपल्या समोर येऊन उभी रहाणार आणि त्याने आशीर्वादासारखा हात केला की त्यातून काही किरण बाहेर पडून आपल्या अंतरात ते शिरणार … (टी व्ही वर दाखवतात ना तसे देवदर्शन आपल्याला अपेक्षित असते)

याउलट तुकोबा म्हणतात – देव अंतरात प्रगट होतो – इथे उदाहरण काय अप्रतिम दिले आहे पहा – देव तिळी आला – तिळाभोवती साखर जमा होऊन मग तो ‘हलवा’ दिसायला लागतो. अंतरात जर देव प्रगटला (अनुभूतीला आला) तर तो जीव गोडे गोड होतो म्हणजेच आनंदरुप – सुखरुप – समाधानी होतो – बुवांसारखा, ज्ञानोबांसारखा – कुणाही संतांसारखा … “मग तू अवघाचि सुखरुप” होसी अशाप्रकारे ..

चंदनाचे हात पायही चंदन । – अंतर्बाह्य तो महापुरुष आनंदरुप होऊन रहातो –

सर्व ज्ञानाची लक्षणे त्या महापुरुषाच्या ठायी दिसू लागतात. इथे ज्ञानाची लक्षणे म्हणजे काय हे देखील नीट पहाणे आवश्यक आहे – भगवद्गीतेत सांगितलेली ज्ञानलक्षणे, भक्तलक्षणे, योगीलक्षणे, गुणातीताची लक्षणे, स्थितप्रज्ञलक्षणे ही सगळी लक्षणे जे सांगतात तीच ती लक्षणे – उदाहरणादाखल –

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।

निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥अ. १२, श्लोक १३॥

( कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी

मी माझे न म्हणे सोशी सुख-दु:खे क्षमा बळे ॥ गीताई)

हे कशाने झाले तेदेखील तुकोबा आवर्जून सांगताहेत – गेला अंतरीचा मळ – अंतरंगातले सारेच्या सारे दोष गेले आणि सहाजिकच त्या निर्मळ अंतःकरणात गोपाळ रहायला आला – मन करा रे निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथे ।

सारी अध्यात्म – साधना या एका चरणात सांगितली आहे बुवांनी. येन केन प्रकारेण हे मन निर्मळ झाले रे झाले की तिथेच तो देव प्रकटणार आहे – सगळ्यात मुख्य साधना आहे – संतसंगती.

संतचरणरज लागता सहज । वासनेचे बीज जळूनि जाय ।

मग रामनामी उपजे आवडी । सुख घडोघडी वाढू लागे । तुकोबा।

आणि हाच खरा पर्वकाळ – की जिथे मुख्य मनच निर्मळ होते. संतांना जो पर्वकाळ वाटतो आहे तो आपल्या पर्वकाळापेक्षा फार फार वेगळा आहे – या पर्वकाळात अंतरींचा सर्व मळ, सर्व घाण निघून गेली त्यामुळे संतांना ही पर्वणी वाटते. आपण फक्त बाह्य शुचि (बाहेरील स्वच्छता) ला महत्त्व देतो पण संत मात्र अंतर्शुचिला फार महत्त्व देतात – एऱ्हवीं तरी पंडुसुता । आंत शुद्ध नसतां । बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥ज्ञा. अ. १३ -४६८॥

आत – बाहेर शुचिता ही संतांना अभिप्रेत आहे – म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे । आंग मन जैसें । कापुराचें ॥ज्ञा. अ. १३ -४६२॥ कापूर आत बाहेर एकसारखाच सुगंधी, स्वच्छ असतो तसे.

पापपुण्य गेले । एका स्नानेची खुंटले – बर्‍याचदा परमार्थी लोकांना विचारले की हे सर्व (पूजाअर्चा, तीर्थयात्रा, ध्यानधारणा, इ.) का करता तर उत्तर मिळते पुण्य मिळवण्यासाठी. आणि तुकोबा तर म्हणताहेत – पापपुण्य गेले – भगवंत आंतमधे प्रकटला की पाप-पुण्य दोन्ही गेलेच की  – भगवंत तर “केवल” स्वरुपात असतो – त्याठिकाणी ना पाप ना पुण्य, ना अज्ञान ना ज्ञान, ना सगुण ना निर्गुण – ‘केवल’ स्थिती.

जसे गंगामैयाच्या पाण्यात स्नान केले की सारी पापे नष्ट होतात असे म्हणतात तसे हे पापपुण्य एका स्नानानेच गेले – अंतरातील मळ/दोष जाणे हे एकच स्नान – आत्मदर्शन झाले की अंतर पूर्ण निर्मळ झालेच झाले – म्हणजेच एका स्नानानेच सारे काही झाले…

गंगा न जाऊंजी मैं जमुना न जाऊंजी ना कोई तिरथ जाऊंजी

अडसठ तीरथ हैं घटभीतर वाही मैं मनमल न्हाऊंजी । गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याउंजी । दूजेके संग नही जाऊंजी ॥ श्रीगोरक्षनाथ ॥

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥

अशा महात्म्याचे बोलणे कसे असते तर अतिशय शुद्ध, पवित्र आणि गोड (मन सुखावणारे) – जणू अमृताची धार… ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ज्ञा. अ. १५-१०॥ या ,महापुरुषाची वाणी म्हणजे जणू अमृतसिंधूच…

पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥ज्ञा. अ. १३-२६३॥ 

दृष्टीतूनच प्रेमवर्षाव व्हायचा, शब्द तर नंतर यायचे ….आणि हे शब्द तरी कसे तर – अगदी कमी (मितले) पण शुद्ध, मृदू आणि भावभरले – ऐकणार्‍याला वाटत असेल अरे या तर अमृताच्या लाटा कानावर पडताहेत जणू …

तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ज्ञा. अ. १३-२७०।

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा आत्मज्ञानी पुरुषाला सगळ्या जनामधे, समस्त लोकांमधे जनार्दनच दिसू लागतो. जे जे भेटेल भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥ 

हा त्याचा भाव नसतो तर अनुभूति असते.

हें असो आणिक कांहीं। तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं। जैसें सबाह्य जळ डोहीं। बुडालिया घटा ॥ज्ञा. अ. ७-१३३॥

हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि ॥ज्ञा. अ. ७-१३६॥

तुकोबांना, सार्‍या संतांना जी ही पर्वणी साधली तशी आपल्यालाही साधता यावी यासाठी या संतांच्याच चरणी मनोभावे प्रार्थना….

साैजन्य – http://tukaram.com/marathi/gatha/default.htm

Related posts

तप निष्फळ, अस्थिर न होऊ देण्यासाठी…

आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा

तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का?

Leave a Comment