July 27, 2024
Sant Tukaram Abhang Tuka Mhane Karuni Davi
Home » तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं
मुक्त संवाद

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

बोल बोलता वाटे सोपे। करणी करता टीर कांपे ॥ १ ॥
नव्हे वैराग्य सोपार | मज बोलता न वाटे खरे ॥२॥
विष खावे ग्रासो ग्रासी । धन्य तोचि एक सोसी ॥ ३ ॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥४ ॥
(३२७)

तुकारामांना पोकळ वाचाळता हे नेहमीच निरर्थक वाटते. बोलणं फार सोपे, पण त्याप्रमाणे करणे किती तरी अवघड अशी स्थिती त्यांनी जाणली आहे. समाजातील अनेक व्यक्तींचे वागणे त्यांच्या नजरेतून सुटलेले नाही. तीव्र बुद्धी, उपजत निरीक्षण शक्ती आणि कार्यकारणमीमांसा करण्याचा तल्लखपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आपल्या अभंगातून करतात.

बोलेल तो करील काय आणि गर्जेल तो पडेल काय? अशी प्रवृत्ती या अभंगात मांडली आहे. जे शौर्याच्या वल्गना करतात, त्यांना वेळ आली की रणांगणावर भीतीने थरथरायला होते. कारण शौर्य व पराक्रम गाजविणे यासाठी धाडस हवे. केवळ बोलणे नव्हे. कल्पना करणे म्हणजे कर्तृत्व नव्हे. तुकारामांच्या या उक्तीचे दाखले इतिहासात सापडतात. विराट राजाचा पुत्र उत्तर हा कौरव सेनेशी असा लढेन, तसा लढेन, असे गर्वाने बडबडत असे. पण जेव्हा त्याने रथात बसून विराट सैन्य मला आवरत नाही. याच्यापुढे माझा टिकाव काय लागणार? त्याचे शरीर थरथर कापू लागले. त्यावेळी बृहन्नडा बनून अर्जुनाने कौरव सेनेचा पराभव केला ही गोष्ट या अभंगातील प्रतिपादनांचे सूत्र लक्षात आणून देते.

ज्याप्रमाणे भक्तीच्या क्षेत्रात असलेले काही वैरागी मला कशाचीही आसक्ती नाही असे बोलून आपले वैरागत्व सिद्ध करू पाहतात, त्या आधारे मोठेपणा मिळवू इच्छितात. पण मोहाचे क्षण आले की त्यांना मन आवरता येत नाही. मला कशाचीही आसक्ती नाही, असे म्हणणारे प्रत्यक्षात लोभापासून दूर राहू शकत नाहीत. लोक बोलतात फार, पण त्याप्रमाणे वर्तन करायची वेळ आली की मागे हटतात. उक्ती आणि कृती यामध्ये फरक करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

तुकाराम म्हणतात – साधू वा वैरागी यांना बोलणं, बढाया मारणं सोपं वाटत. पण प्रत्येक घासाला विष भक्षण करणे अशक्यप्राय आहे, तसे कडक वैराग्य या मंडळींना अवघड नव्हे, अशक्य आहे. सहज वैराग्य स्थितीत राहता येईल, इतके ते सोपे नाही. कोणाही भोंदू साधूने उठावे आणि वैराग्यांच्या बाता माराव्यात अशा परिस्थितीचा अनुभव घेऊन तुकारामांनी हे मत मांडले.

जसे कोणी वैराग्यशील आहोत म्हणून बढाया मारू लागले व तसे वैराग्य वृत्ती अंगी यावी म्हणून प्रयत्नाला लागले तर त्यांना विष प्राशन समान दुःख व ते पचविणे अगदी शक्य होत नाही म्हणून तुकाराम म्हणतात, वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यासारख्या षड्रिपूंवर विजय मिळवावा लागतो. बरे ते राहू द्या, निदान जसे बोलले त्याप्रमाणे वागावे लागते. वैराग्य ही मानसिकता आहे. ती दुर्गण, दुराचार आणि दुटप्पी नीतीपासून स्वत:ला दूर ठेवते. तेवढेही करणे न जमणारे, मग वैराग्याच्या फुकटच्या गप्पा कशाला माराव्यात? त्यांच्या भूलथापांना इतरजणांनीही बळी पडू नये. कारण नुसते चकाकणारे सोने हे पितळ म्हणून उघडे पडण्यास कितीसा वेळ लागणार ?

जो कोणी विरागी असेल तो वंदनीय होय, असे तुकाराम महाराज म्हणतात. विश्वामित्रासारख्या ऋषींना काम आवरता आला नाही. अर्थात रामदास शुक शिव हे खरे विरक्त या अभंगात तुकारामांनी निरर्थक बोलणं सर्वस्वी अनुचित असेच मत मांडले. आधी करावे मग बोलावे असे ते वैरागी मंडळींना सल्ला देतात. जो खरोखर वैराग्य स्थितीत राहून दाखवील त्याचे पाय मी चित्तात ठेवू असे तुकाराम जाणवून देतात. म्हणजे ‘जैसे बोलावे तैसे चालावे । त्याची वंदावी पाऊले ।। असेच जीवन व्यवहारातील वर्तन सूत्र तुकारामांनी या अभंगात सांगितले. वैराग्य ही दुर्गम चढण आहे.

तुकारामांच्या अभंगातील या तत्त्वाचा विसर पडलेली अनेक मंडळी आज समाजात आढळतात. विद्वान, तज्ज्ञ आणि मान्यवर म्हणवून घेणाऱ्यांचे बोलणे अगदी तत्त्वनिष्ठ व शास्त्राला अनुसरून पण प्रत्यक्ष कृती वा खासगी जीवन त्यांच्या विरुद्ध आढळते. पर्यावरण, विज्ञानवृत्तीबद्दलच्या चर्चेत अगदी हिरीरीने बोलणारे प्रत्यक्षात प्रदूषणास हातभार लावणारे वर्तन करीत असतात हे लक्षात येते तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. हुंडा विरोधी गर्जना करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे प्रत्यक्षात मुलाचे लग्न हे मानपान, सोने नाणे आणि आतून हुंडासदृश भौतिक वस्तूचा स्वीकार करतात तेव्हा त्यांच्या बोलण्या-वागण्यातील तफावत प्रकर्षाने जाणवते.

स्त्री – पुरुष समानतेचा नारा एकीकडे तर दुसरीकडे पत्नीला कवडी किंमत देणारे, मोलकरणींना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चात अग्रभागी व घोषणा घसा ताणून देणारे, घरात मोलकरीण म्हणजे हीन व तशाच पद्धतीने तिला वागणूक, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणाऱ्यांमध्ये अनेकजण अंधश्रद्धेविरोधी बोलत असतात. पण खासगी जीवन ते अनेक रूढी परंपरा व भ्रम यातच गुरफटलेले, मला आता निवडणूक लढवायची नाही, युवकांना संधी द्यायला हवी, असे म्हणणारे नेते निवडणुका जवळ येताच कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तिकीट मागत आहे, असे म्हणतात. कारण सत्ता सोडवत नाही. मोह आवरत नाही. फक्त ‘अगं अगं म्हशी..’ अशा वृत्तीस साजेल असेल त्यांचे वागणे.

मला प्रसिद्धीची हाव नाही म्हणणारे अनेक साहित्यिक व लेखक पुरस्कार मिळावा म्हणून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. कंपू वृत्ती ही स्वार्थी मंडळींची प्रवृत्ती आहे. तसेच लेखक वा अन्य क्षेत्रातील ‘ग्रुप’ ‘गट’ यांच्या युक्त्या, क्लृप्त्या व कारवाया पाहिल्या, ऐकल्या की तुकारामांच्या तत्त्वज्ञानाची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा खासगीत त्याची पायमल्ली करताना आढळतात. कारण उक्ती सोपी पण कृती अवघड असते हेच खरे.

तरीही आपल्या समाजात काही संशोधक, वैज्ञानिक, पर्यावरणात कार्यरत असणारे, भ्रष्टाचार निर्मूलन कामातून माहितीचा अधिकार मिळवून देणारे, आदिवासीच्या आरोग्य राहणी सुधारण्यासाठी अहोरात्र कष्टणारे, कुष्ठरोग्यांना जवळ करून त्यांचे अवघे आयुष्य आनंददायी करून नंदनवन फुलविणारे, उद्योग – व्यवसाय आणि कार्पोरेट क्षेत्रात मान्यता व पैसा मिळवून तो अनेक समाजोपयोगी कार्यासाठी सढळ हाताने मदत करणारी, महान व्यक्तित्वे वंदनीय आहेत, संख्येने कमी असली तरी.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

गुलाबी बोंडअळीचे असे करा नियंत्रण…

डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading