July 27, 2024
Spiritual teacher as Path Guide Rajendra Ghorpade article
Home » अध्यात्मिक प्रवासात सद्गुरु हे वाटाड्या
विश्वाचे आर्त

अध्यात्मिक प्रवासात सद्गुरु हे वाटाड्या

तहान भूक विसरून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतो. रात्र असो की दिवस आपण चालतच राहातो. या मार्गावर आता ध्येयाचीच फक्त आठवण होत असते. इतके आपण त्यात गुरफटूण जातो. अध्यात्मातही असेच आहे. आध्यात्मिक प्रवासात सद्गुरू मार्ग दाखवतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गाची आपणास पारख झाल्यानंतर आपलीही अवस्था अशीच होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।
रात्रिदिवसु नेणिजे । वाट इये ।। 157 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ – या मार्गाची ओळख झाली असता, तहानभूकेची आठवण राहात नाही, या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही.

पूर्वीच्याकाळी दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. एका गावातून दुसऱ्या गावात पायीच जावे लागे. दूरच्या गावास जायचे असेल तर रस्ता माहित असणे गरजेचे असायचे. रस्ता चुकला तर तो शोधणेही कठीण जात होते. विशेषतः वनांच्या परिसरातून जाताना वाटाड्या सोबत घेतला जायचा. म्हणजेच मार्ग दाखवणारे कोणी तरी असावे लागते.

सद्गुरू हे असेच वाटाड्या आहेत. ते एकदा मार्ग दाखवतात. एकदा आपणास या मार्गाची ओळख झाली की हा मार्ग आपणच चालायचा असतो. सध्याच्या काळात मार्ग शोधणे खूपच सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आपण जंगलात कोणत्या ठिकाणी आहोत याचीही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्या जंगलातून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवला जातो. इतके सोपे झाले आहे. पण मार्ग दाखवणारे मोबाईल अ‍ॅप जवळ असणे गरजेचे आहे. मोबाईल अ‍ॅप हा आपला वाटाड्या आहे.

सद्गुरूही या मोबाईल अ‍ॅपसारखे आपल्या सदैव सोबत असतात. सदैव आपणास मार्गदर्शन करत असतात. आपणाला रस्त्याची ओळख करून देतात. एकदा रस्त्याची ओळख झाली की पुढचा रस्ता हा आपला आपणास चालायचा आहे. आपणही काही आपले कौशल्य दाखवण्याची गरज आहे. मार्ग सापडल्यानंतर मात्र आपली अवस्था खूप बदलते. मार्गाची ओळख झाल्यानंतर पाच तासात कापले जाणारे अंतर तीन तासात का कापले जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो. एरवी सहा तास लागत असतील तर रस्त्याची ओळख झाल्यानंतर त्यापेक्षा कमी कालावधीत हा मार्ग पूर्ण केला जातो. कारण त्या रस्त्यातील खाच खळग्यांची आपणाला माहिती असते. कोठे थांबायचे, कोठे वळण घ्यायचे याची पारख आपणास झालेली असते.

त्यामुळे तहान भूक विसरून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतो. रात्र असो की दिवस आपण चालतच राहातो. या मार्गावर आता ध्येयाचीच फक्त आठवण होत असते. इतके आपण त्यात गुरफटूण जातो. अध्यात्मातही असेच आहे. आध्यात्मिक प्रवासात सद्गुरू मार्ग दाखवतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गाची आपणास पारख झाल्यानंतर आपलीही अवस्था अशीच होते. त्यात येणारे अडथळे आपणास माहित झाल्यानंतर ते कसे चुकवायचे याचाही सराव आपणास होतो. त्यातून सहज मार्ग निघत जाऊन समोर फक्त ध्येय दिसत राहाते.

ध्येय गाठणे इतकेच आपणास माहित असते. सोऽहमच्या नादात आपण गुंग होऊन जातो. मनात, रक्तात, शरीरात फक्त सोऽहमच्याच लहरी उमटत असतात. या लहरीच्या आनंदात आपण वावरत असतो. बाकीच्या गोष्टींचे ध्यानही आपणास राहात नाही. इतके आपण त्यात गर्क होऊन जातो. यातूनच मग आत्मज्ञानाच्या लहरी सहजरित्या उत्पन्न होतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

घाटकुळ:- एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर…

लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading