अनेक विषयांवरची वेगवेगळी मतं जाणून घेऊन त्यावर आपलं मत काय आहे, काय असू शकतं याचं विचारमंथन होण्यासाठी ही सर्व व्याख्याने प्रत्येकाने विशेषतः साहित्यिकांनी अवश्य वाचायला हवीत. यातील प्रत्येक वक्ता हा मातब्बर असून त्यांचे विचार गेल्या शतकाचा मागोवा घेण्यासाठी आणि भविष्याचं किंवा भवितव्याचं चिंतन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील.
मधु नेने
वाई
आज एकदम वेगळ्या प्रकारच्या ग्रंथाचा परिचय करून देत आहे. ग्रंथाचे नाव, ५१ गाजलेली भाषणे असे आहे. अशोक बेंडखळे हे साहित्यिक आणि मराठी भाषेचे अभ्यासक – संशोधक आहेत. संपादनाचाही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. प्रत्यही काही माहितीपर लेखन करणे, विविध माहिती संकलित आणि संपादित करून ती पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवून त्यांना संदर्भ पुरवणे हा त्यांचा जवळजवळ छंदच आहे. आजचा ग्रंथ याच प्रकारात मोडतो. त्यांची अशी सात संपादित, पंधरा स्वतंत्र, आणि एक अनुवादित अशी पुस्तके/ग्रंथ ऑक्टोबर २०१५ पर्यंत प्रसिद्ध झाली आहेत.
व्याख्याने किंवा भाषणे हा प्रकार महाराष्ट्रात अव्वल ब्रिटिश सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर पुढे आला आणि तो मराठी माणसांनी फार लवकर चांगल्या पद्धतीने आत्मसात करून वृद्धिंगत केला. त्यापूर्वी मराठीत व्याख्यानाऐवजी कीर्तने, प्रवचने अशा माध्यमांतून समाज-प्रबोधन होत असे. नंतर व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन आणि शिक्षण दोन्ही प्रकारे हे काम होत असे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यवीर सावरकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, विनोबा भावे आदींची भाषणे गाजली. समाजप्रबोधनात आणि राजकारणात तर अशी खूप नावे आहेत. त्यातील अगदी प्रातिनिधिक पाचसहा नावे न्या. म. गो. रानडे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साने गुरुजी, गोविंदराव पानसरे आदींची घेता येतील. इतिहासातीलही अनेक तज्ज्ञांचे यात योगदान आहे. साहित्यिक, राजकारणी, विद्वान यांची संख्या तर वक्ते म्हणून खूप मोठी आहे.
तोंडी भाषणं हा खरं तर साहित्याचाच एक प्रकार मानला पाहिजे. आता असे काही भाषणांचे काही संग्रह प्रसिद्ध होऊ लागले आहेत. तोही साहित्याचा एक स्वतंत्र आकृतिबंध मानला गेला पाहिजे असे काहीजण म्हणतात. एका भाषणामागे किमान पंधरा-वीस पुस्तकांचे संचित असते, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत ते अगदी खरे आहे. असो.
प्रस्तुत ग्रंथात ज्या एक्कावन्न वक्त्यांची निवड केली आहे, ते सर्वच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चांगले वाचन केलेले विद्वान लोक आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी याची कल्पना येते. त्यांचे विषयही वेगवेगळे असून ते साहित्य, शिक्षण, अध्यात्म, संतसाहित्य, इतिहास, सहकारी चळवळ, भाषावार प्रांतरचना, सामाजिक समस्या, शेतकरी-कष्टकरी यांच्या व्यथा-वेदना, मराठी भाषेवरील संकट, लोकसंख्येची समस्या, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी असून त्या-त्या क्षेत्रातील सर्वांना ते मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांत नेतृत्व करणारे नेते, प्राध्यापक, शिक्षक, राजकारणी, इत्यादी सर्वांच्या हा ग्रंथ एकदा तरी नजरेखालून गेला पाहिजे असे माझे मत आहे.
पहिलं व्याख्यान १९०८ चं लोकमान्य टिळक यांचे असून शेवटचे व्याख्यान मेधा पाटकर यांचे २०१३ सालचे आहे. म्हणजे एकशे पाच वर्षांतील अनेक प्रकारची स्थित्यंतरं यात नोंदवली गेली असून ती एकोणीस, वीस आणि एकवीस या तीन शतकांतील भारतीय विचार प्रतिपादन करणारी आहेत.
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांची भाषणे शैक्षणिक धोरणासंबंधित आहेत. अर्थात हे स्वातंत्र्यपूर्व काळातील विचार आहेत हे संदर्भाच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टिळक राष्ट्रीय शिक्षण आणि लोकांचे कर्तव्य या विषयावर आपली मते व्यक्त करतात तर, स्वराज्य आणि शिक्षण हा शाहू महाराजांचा विषय आहे.
टिळक म्हणतात, “राष्ट्रीय बाण्याचे शिक्षण स्वतंत्रपणेच अधिक चांगले देता येईल. परावलंबनाच्या शिक्षणक्रमातून तरूण पिढी कच्ची व नाउमेद अशीच निघावयाची ! राष्ट्रीय शाळांतून शिक्षणाचा दर्जा कमी करावयाचा आहे असे मुळीच नाही. राष्ट्रात विद्वान लोक निपजतील तितके हवे आहेत. राष्ट्रात विद्वान नसणे म्हणजे ती पिढी बुडाली असे समजावे”
राजर्षी शाहू महाराज म्हणतात, “हल्लीच्या स्थितीत आमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे कर्तव्य आम्हाला करावयाचे ते आमचा समाज सुशिक्षित करणे व त्याची मने तयार करणे हे होय. ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा करण्याचा (शिक्षण) हा फक्त एकच मार्ग आहे, म्हणूनच प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील लोकांना शिक्षण देण्याची मी काळजीने अनुसरित आहे आणि माझ्या आयुष्याच्या पुढील कालात तीच पद्धत सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे. ” या दोन्ही मान्यवरांचे हे विचार आजही पथदर्शक ठरतील असे आहेत.
साहित्यविषयक भाषणांत तेवीस संमेलनाध्यक्ष आणि इतरही काही आहेत, म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के भाषणं साहित्यविषयक आहेत म्हणून साहित्यप्रेमींनी, मराठीतून लेखन करणाऱ्या लेखक-कवींनी ही भाषणे आवर्जून वाचली पाहिजेत.
वाङ्मयाचा हेतू काय ? या विषयावरील भाषणांत न. चि. केळकर म्हणतात, ” हल्लीच्या युगात कालिदास किंवा ज्ञानेश्वर असते तर त्यांच्याही काव्यात आधुनिक शास्त्रज्ञानाचा उपयोग उपमा, उत्प्रेक्षा, रूपक वगैरेकरिता केला गेला असता हे सांगावयाला कशाला पाहिजे ? इंद्रियापेक्षा मन हे केव्हांही मोठे असणार, म्हणूनच वाङ्मय हे भौतिकशास्त्रापेक्षा केव्हाही श्रेष्ठ ठरेल.”
सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत लेखणी मोडा, बंदुका उचला अशा दिलेल्या संदेशाला काळाच्या परिप्रेक्ष्यात पहायला हवे ! दुर्गाबाई भागवत १९७५ च्या गाजलेल्या भाषणात ललित लेखनाची निर्मिती या विषयावर बोलताना, भाषणाच्या समारोपात म्हणाल्या, “… लेखकाची निर्मिती किती खोलवरून येते, ती बाहेर पडायला काय कष्ट पडतात आणि ती बाहेर आल्यावर वाचक आपली भर टाकून तिला पुरता आकार कसा देतो-हीच साहित्यनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय अन्य बाह्य संबंध व बंधनं ही केवळ साहित्यबाह्य असं नव्हे, तर ती संपूर्णपणे गैरलागूही आहेत.”
अशा प्रकारे अनेक विषयांवरची वेगवेगळी मतं जाणून घेऊन त्यावर आपलं मत काय आहे, काय असू शकतं याचं विचारमंथन होण्यासाठी ही सर्व व्याख्याने प्रत्येकाने विशेषतः साहित्यिकांनी अवश्य वाचायला हवीत असं मला वाटतं. सर्व नावं देणं इथं शक्य नाही, मी एवढेच पुन्हा सांगू शकतो की, यातील प्रत्येक वक्ता हा मातब्बर असून त्यांचे विचार गेल्या शतकाचा मागोवा घेण्यासाठी आणि भविष्याचं किंवा भवितव्याचं चिंतन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास व्यक्त करून उद्याही अशाच एखाद्या वेगळ्या पुस्तकाच्या परिचयासह आपण भेटू !
जयजयकार वाचनसंस्कृतीचा !
पुस्तकाचे नाव – ५१ गाजलेली भाषणे
संपादन- अशोक बेंडखळे
पृष्ठे – २९६.
प्रकाशक – मैत्रेय प्रकाशन, विलेपार्ले पू. दूरध्वनी- ०२२/२६८३८५८५
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.