गाव आणि शहरातील जीवनात असलेला भेद एका छोट्या मुलाच्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे गणेश हेगडे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला कानडी चित्रपट ‘निली हक्की’…
“टु बी ऑर नॉट टु बी” हाच तो मानवी अस्तित्वाचा चिरंतन प्रश्न, जो शेक्सपियरच्या हॅम्लेट ला पडला होता, आणि तोच आता सतावतो आहे सिद्दा या एका १० वर्षांच्या मुलाला. परंतु त्या प्रश्नाचे स्वरूप थोडेसे बदललेले आहे …. आपल्या छोट्याश्या टुमदार आणि निसर्गरम्य गावाचा निरोप घेऊन सिद्दाला शहरात येण्यास भाग पडले आहे. आपल्या कुटुंबाने केलेले हे स्थलांतर स्वीकारताना त्याच्या चिमुकल्या बालमनाची उलघाल चालली आहे. त्याच्या मनाला एकीकडे गावातील स्वच्छंद आणि शांत जीवन खुणावते आहे आणि दुसरीकडे शहरातील धावपळ, गर्दी, ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.ही त्याच्या मनातील खळबळ चित्रित करताना दिग्दर्शकाने त्याला जीवनातील वेदनादायी सत्याचा सामना कसा करावा लागतो आहे, हेही दाखवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या चित्रणातून दिग्दर्शकाने जीवनाची शाश्वत मूल्ये आणि शहरीकरण यांच्यातील अंतर्विरोध दाखवायचाही प्रयत्न केला आहे.
कानडी चित्रपट निली हक्की मधून दिग्दर्शक गणेश हेगडे यांनी 52 व्या इफ्फी मधील प्रतिनिधींना सिद्दाच्या अंतर्मनातील गोंधळ उलगडून सांगताना आपल्या वर्तमान आणि भविष्यकाळाशी जोडलेले अनेक मूलभूत प्रश्न उभे केले आहेत . हा चित्रपट इफ्फी च्या भारतीय पॅनोरमामध्ये फिचर फिल्म विभागात सादर झाला आहे.
आपल्या चित्रपटाचे भारतातील पहिले सादरीकरण इफ्फी मध्ये करताना आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी काल झालेल्या एका वार्ताहर परिषदेत सांगितले. “या चित्रपटाचे जागतिक प्रीमियर या वर्षीच्या न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात झाले होते. मेलबर्न चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे. भारताच्या दक्षिणेकडील दुर्गम भागातील एका स्वतंत्र चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून पसंतीची मिळालेली पावती पाहून आम्हाला याहून चांगले काम करण्यासाठी नवा आत्मविश्वास मिळत आहे.” असेही ते पुढे म्हणाले.
अतिशय कमी कलाकारांसह बनवलेला हा चित्रपट दिग्दर्शकाच्या गावाच्या आसपासच्या भागात चित्रित झाला आहे. “प्रसिद्ध दक्षिण भारतीय कलाकार विजय सेतुपती यांच्या पाठिंब्यातूनच हा चित्रपट उभा राहिला आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराने आमच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते.”
ओ टी टी मंच आणि स्वतंत्र कलाकार यांच्या एकत्र येण्याबद्दल हेगडे यांनी यावेळी आपले विचार मांडले. “ काही वर्षांपूर्वी जेव्हा ओ टी टी मंच उदयाला आले तेव्हा आमच्या सारख्या स्वतंत्र आणि छोट्या निर्मात्यांना त्यांच्या मदतीची अपेक्षा होती, परंतु आजवर त्या मंचांनी मोठमोठ्या निर्मात्यांचेच चित्रपट पुढे आणलेले दिसतात. आम्ही अजूनही आमच्या चित्रपटांना व्यासपीठ मिळण्याच्या शोधात आहोत. प्रादेशिक भाषेतील आणि महोत्सवात सामील झालेल्या आमच्या चित्रपटांवर केवळ ‘महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट’ असा शिक्का बसतो, त्यामुळे आमच्या चित्रपटांकडे मोठ्या मंचाचे दुर्लक्ष होते, स्वतंत्र चित्रपट किंवा कमी कालावधीचे चित्रपट हे फक्त महोत्सवांसाठी नाहीत, तर सर्वांसाठी आहेत.”
ओ टी टी मंचांनी असे चित्रपट जनतेपर्यंत पोचवावेत अशी विनंती त्यांनी यावेळी केली. “चित्रपटांनी स्थल आणि काळाच्या सीमा ओलांडून जाण्यासाठी ओ टी टी मंच फायदेशीर ठरू शकतात. मनोरंजन उद्योग कसा चालतो, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही हे चित्रपट केवळ आमच्यासाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी बनवत असतो. माझ्यासारखा दिग्दर्शक आपल्या कलेचे प्रदर्शन चित्रपटाद्वारे करत असतो. आम्हाला आशा आहे कि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी ओ टी टी मंचांकडून आम्हाला यापुढे काही मदत मिळेल. महोत्सव केवळ काही दिवसांचा असतो, पण ओ टी टी मंचांवरील चित्रपट प्रेक्षक कधीही आणि कुठेही पाहू शकतो हा मोठा फायदा आहे.”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.