February 29, 2024
Spirituality is the science of eternal happiness
Home » अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र
विश्वाचे आर्त

अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।
श्रीगुरुकृपालब्धि – । काळी पावे ।। ९८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरूष, सद्गुरूकृपेचा नाश होण्याच्यावेळी ही आत्मसिद्धि पावतो.

प्रत्येक साधकाची आत्मज्ञानी होण्याची, आत्मसिद्धि मिळवण्याचीच इच्छा असते. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात. पण हे भाग्य सर्वानाच मिळते असे नाही. सद्गुरू हे सर्वांना आत्मज्ञानी करण्यासाठी नित्य प्रयत्नशिल असतात. विविध अनुभव देऊन साधकाला ते जागे करत असतात. सावध करत असतात. या आत्मज्ञानाची अनुभुती साधक घेऊनही तो विषयांमुळे अतिम ध्येयापर्यंत जाण्यास वारंवार अपयशी ठरत असतो. असे असले तरी सद्गुरुंच्याकृपेने त्यांच्या आशिर्वादाने अन् मार्गदर्शनाने साधक अपेक्षित ध्येय गाठतोच.

सद्गुरु हे कृपेने उपदेश करत असतात. त्यांची कृपा होऊनही साधक सावध नसतो. पण सद्गुरु हे इच्छा सोडीत नाहीत. त्यांचे प्रयत्न हे सुरूच राहातात. कारण साधकांच्या सिद्धतेतच त्यांची सिद्धी असते. साधकाचे दृढसंकल्प वारंवार ढळत असतात. वारंवार साधक अपयशी ठरत असतो. तरीही त्याला ते प्रोत्साहित करत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे सांगून ते वारंवार साधकाला यशाच्या वाटेवर ओढीत असतात. यशाचा डोंगर चढणे अवघड असले तरी साधकाला प्रवासात येणारे सर्व अडथळे सद्गुरु दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

साधनेमध्ये दृढसंकल्प, दृढनिश्चय महत्त्वाचा असतो. ध्येय गाठायचे असेल तर मनाचा दृढनिश्चय हवा. शांत बुद्धीने कार्यभाग साधायला हवा. क्रोधामुळे किंवा मनाला सुटलेली हाव, लोभ यामुळे लक्ष्य विचलित होते. अभ्यासात एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे. एकाग्रतेने केलेला अभ्यास लक्षात राहातो. अन् यशाचा मार्ग सोपा होतो. यासाठीच मनाला चांगल्या विचारात गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाला तशी सवय लावायला हवी. विषय, वासना उत्पन्न होतच राहातात. जगतर अशा मोहमायेने भरलेले आहे. प्रत्येकाला त्याची हाव सुटली आहे, असे नसते तर इतके प्रदुषण कधीच झाले नसते. माणसाच्या गरजा विचारात घेऊन माणसाने जगायचे ठरवले असते तर तो खूपच सुखी झाला असता. पण तसे होत नाही. विकास ज्याला म्हणतो तो विकास नसून मोठा विकार आहे, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. पण अशानेच त्यांचे जीवन हे धकाधकीचे, धावपळीचे झाले आहे. क्षणिक सुखाला तो शाश्वत सुख समजू लागला आहे. असेच चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. पण यात राहायचे तर आपणासही बदलत्या काळानुसार, जगानुसार बदलत राहावे लागणार आहे. पण हे शाश्वत नाही, हे न विसरता शाश्वत सुखाच्या शोधात आपण नित्य असायला हवे. अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र आहे.

जीवनशैली बदलत्याकाळानुसार बदल होत आहेत. ते बदल स्वीकारत आपणास वाटचाल करावी लागणार आहे. क्षणिक सुखाच्या मोहात मानव अधिकच गुरफटला आहे. त्याच्या डोळ्यांना अन् मनाला याची धुंदी चढली आहे. यातून तो जागे होणे तितके साधे नाही. पण सद्गुरु त्याला या शाश्वत सुख देणारे अध्यात्म समजावत आहेत. यातून जो जागा होतो, सावध होतो तोच आत्मसिद्धी मिळवतो. यासाठी जागे होऊन शाश्वत सुखाचे धनी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Related posts

नवदुर्गाः धर्मांचा अभ्यास करून सुधारणांसाठी जनजागरण करणाऱ्या रझिया सुलताना

कडाक्याच्या थंडीत रोमॅन्टिक गाण्याच्या चित्रिकरणाचा अभिनय सावंतने सांगितलेला अनुभव

अद्भूत अन् वास्तव अशा संमिश्र जगाची सफर घडवून आणणारी कादंबरी 

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More