एका अयोग्य कर्मातून अनेक अयोग्य कर्मे पुढे होत राहातात याचे भानही त्यांना राहात नाही. पदाचा गैरवापर करून लाभासाठी इतरांना त्रास देत, अन्याय करून मिळवलेले मान हे क्षणिक असतात याचे भानही त्यांना नसते. अशा या कर्माचे फळही क्षणिक असते. पदरी दुःख अन् निराशा देणारे असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपवर नुरवित ।
कर्म होय ते निश्चित । तामस जाण ।। ६२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परके याचा विचार न करतां, जें कर्म होते, तें खरोखर तामस कर्म आहे, असे समज.
योग्य काय आहे ? अयोग्य काय आहे ? या दोन्हीही गोष्टींचा विचार न करता कर्म केले जात असल्याने पदरी अपयश पडते. स्वतःच्या पदाचा वापर अन् स्वार्थीवृत्तीतून अयोग्य कर्मही योग्य असल्याचे भासवून जनतेची फसवणूक करतात. पण जनतेच्या हे लक्षात येते. फक्त कशाला या भानगडी पडायचे म्हणून याकडे जनता दुर्लक्ष करते. नेमके हेच त्यांना फावते अन् ते अशी कामे, कृती करत राहातात. हे जेंव्हा मर्यादे पलिकडे जाते तेंव्हा मात्र सर्वच वाया गेल्याचे लक्षात येते. तेंव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.
उच्चपदस्थ व्यक्तींकडून अशी अनेक गैरकामे होत आहेत. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, असे पटवून देत स्वतःची पोळी भाजण्यातच हे गुंतलेले असतात. कोट्यावधीची माया गोळा करूनही समाधान मात्र नसते. एका अयोग्य कर्मातून अनेक अयोग्य कर्मे पुढे होत राहातात याचे भानही त्यांना राहात नाही. पदाचा गैरवापर करून लाभासाठी इतरांना त्रास देत, अन्याय करून मिळवलेले मान हे क्षणिक असतात याचे भानही त्यांना नसते. अशा या कर्माचे फळही क्षणिक असते. पदरी दुःख अन् निराशा देणारे असते.
उच्चपदावर पोहोचल्यानंतर थोडीच कामे करीन पण ती योग्य प्रकारची असतील असे त्यांना कधीही वाटत नाही. चांगल्या, योग्य कर्मातून मिळालेला मान, मिळालेले सुख व आनंद हे चिरकाल टिकणारे असते. हे समजून घेऊन प्राप्त परिस्थितीत चांगल्या कर्मांना प्राधान्य द्यायला हवे पण तसे होताना आज फारच कमी पाहायला मिळते. अशा या कृतीमुळेच अनेक नामवंत कंपन्या, मोठ मोठाले उद्योग आज तोट्यात चालले आहेत. विश्वासाहर्ता गमावून बसले आहेत. हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच कंपन्यांतील उच्चपदस्त व्यक्ती ही योग्य अन् चांगल्या कर्माने पछाडलेली असायला हवी.
आत्ता लाभ मिळतोय ना, मग करून टाका काम. उद्याचे उद्या बघू. असे म्हणत कामाचा निफटारा करणारे अन् केवळ उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय ठेवलेल्या व्यक्तींनी कंपनीची भरभराट झाली आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात खरा ताळेबंद समोर येतो तेंव्हा मात्र पायाखालची वाळूच सरकते अशी अवस्था होते. उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेल्या अयोग्य कृतीतून क्षणिक लाभ होतो खरा, पण असे कर्म केंव्हा रसातळाला पोहोचवते हेच लक्षात येत नाही. उद्दिष्ट गाठले म्हणजे विजयी झालो, असे होत नसते. ते उद्दिष्ट कसे गाठले यावर खरे यश अवलंबून असते. क्षणिक यशाच्या हव्यासापोटी सुरु असलेला आटापिटा क्षणिक आनंदच देतो. अन् भलेमोठे दुःख देऊन जातो. याचे भान ठेवायला हवे.
लोकशाहीच्या व्यवस्थेत सर्वांना सोबत घेऊन जावे लागते हे जरे खरे असले, तरी चांगले कर्म करण्यास अन् चांगल्या कर्मास प्राधान्य हे द्यायलाच हवे. तरच शाश्वत विकासाची स्वप्ने आपण साकार करू शकतो. चांगल्या कर्मातूनच स्वराज्य सुराज्य होते. स्वतःच्या स्वार्थासाठी उभे केलेले स्वराज्य हे सुराज्य कधीच असू शकत नाही. यासाठी स्वराज्य हे लोकशाहीतूनच उभे राहायला हवे. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी उभे केलेले राज्य हे कोणत्या जातीचे नसून कोणत्या धर्माचे नसून ते लोकांचेच आहे हा विश्वास लोकांमध्ये जेंव्हा उभा राहातो तेंव्हाच ते सुराज्य होते. यासाठी चांगल्या कर्माची अन् कृतीची जोड ही आवश्यक असते.
साधनेच्या बाबतीतही हेच आहे. योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून साधना करायला हवी तरच अपेक्षीत उद्दिष्ट गाठता येते. साधनेपासून उचित लाभ मिळवायचे असतील तर योग्य कर्माला, योग्य कृतीची जोड द्यायला हवी. साधनेच्या कर्मात अडथळा ठरणारे कर्मे ही दूर सारायला हवीत. जबरदस्ती करून कधी साधना केली जात नाही. अशी साधना कधीही फलदायी ठरत नाही. यासाठी मनात साधनेची गोडी निर्माण होईल अशा कर्मास प्राधान्य द्यायला हवे. असे केल्यासच साधनेचे लाभ मिळत राहातील. त्यासाठीच योग्य कर्माला प्राधान्य द्यायला हवे.