June 7, 2023
Mind pollution article by Sunetra Joshi
Home » पुर्वग्रह दुषित..
मुक्त संवाद

पुर्वग्रह दुषित..

कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

आम्ही या सोसायटीत रहायला आलो. साने बाईंनी लगेचच गार पाणी आणि थर्मास भरून चहा आणून दिला. आणि सामान लावताना काही लागले तर सांगा. मी शेजारच्या ब्लॉकमधेच राहते. असे सांगून गेल्या. मी पण मग कुठे खिळा ठोकायला हातोडी तर स्क्रू फीट करायला पाना वगैरे घेतले. मिस्टर दुसरेच दिवशी कामावर गेले. फिरतीची नोकरी असल्याने मी घरात एकटीच. तीन चार दिवसात सगळे लावून झाले माझी त्यांच्याशी छान ओळख झाली आणि आमचे छान जमले.

असेच चार पाच दिवस गेल्यावर खालच्या मजल्यावर असलेल्या सुनंदा बाई आल्या. नवीन आलात वाटते. काही लागले तर सांगा. तसेच जाता जाता तुमच्या शेजारच्या साने बाईशी जरा जपून आणि दुरूनच ठेवा हो. महा खत्रूड आणि माणुसघाणी आहे ती हे ही वर सांगून गेल्या..

त्या गेल्या आणि मला वाटल खरचं ही सुनंदा बाई मला आधी भेटली असती तर सानेकाकुंशी माझी जवळिक झाली असती का ? की मी त्याच नजरेने त्यांच्याशी वागले असते ? आणि विचारचक्र सुरू झाले. आपण नेहमीच कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कुणाच्या अनुभवावरून आपले मत बनवत असतो. पण ते किती चुकीचे आहे ना ?

आता अगदी घरातूनच बघायचे म्हटले तरी आपल्याकडे सगळ्यात जास्त सासुसुनेचे नाते अतिशय पुर्वग्रह दुषित आहे. आपण आपल्या आईकडून आजीकडून किंवा आत्या आणि मावशीकडून सासुच्या छळाच्या खूप कथा ऐकल्या असतात. मग आपल्या मनात तिच प्रतिमा असते आणि मग सासु जवळ नकोच बाबा असे मत होते.

पुर्वी ते थोड्याफार प्रमाणात खरेही होते. कारण मुली शिकत नसत. कुठे बाहेर जाणे येणे नाही. घरात बहुतेक पुरुषांचे वर्चस्व. मग आपल्याला वर्चस्व गाजवायचे तर सुन तावडीत सापडायची. शिवाय सगळे घरकाम एकटीवर पडायचे त्यात तेव्हा मुली लग्न होतांना वयाने लहान असायच्या. मग घरचे वळण रितभात शिकवणे कामे करायला लागणे वगैरे आलेच. याला मग छळाचे नाव पडले. मोठी जाऊ पण लहान जावेवर रुबाब गाजवणार वगैरे. पण आता तसे नाही. आता सासु पण नोकरीचा अनुभव घेतलेली आहे आणि घरातल्या कामाची आणि नोकरीतली ओढाताण तिला माहित आहे. शिवाय आता बहुतेक घरात धुणीभांडी करायला लागत नाहीत. त्यामुळे परिस्थिती बदललेली आहे.

आता एकतर सासु छळणार नाही आणि दुसरे म्हणजे सुन छळून घेणार पण नाही. ती सुद्धा परिस्थिती प्रमाणे बदलली आहे. पण तो पुर्वग्रह दुषित दृष्टीकोन मात्र दुर्दैवाने अजुनही तसाच आहे. पण आधी एकत्र राहून बघा. तुमचा स्वतःचा अनुभव घ्या आणि मग ठरवा की. कारण अनुभव हीच खात्री असते.

एखादी व्यक्ती काही कारणपरत्वे दुसर्‍याशी वाईट वागली असेल म्हणजे लगेच ती तशीच आहे आपल्याशी पण तशीच वागेल असे मत करू नका. त्या वागण्यामागे काही कारण असते जे आपल्याला माहीत नसते. आपल्याला आपले मत बनवण्याचा किंवा मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच पण.. पण ते आपल्या अनुभवातून आलेले असावे.

हे नुसते सासुसुनेपर्यंतच मर्यादित नाही तर सगळ्याच ठिकाणी लागू होते. कामाच्या ठिकाणी कार्यालयात सुध्दा एखादा कामचुकार असतो. त्याला साहेब रागावतात ओरडतात. मग तो सांगतो जाम खत्रूड आहे. स्वतःला शहाणा समजतो वगैरे. पण तोच साहेब चांगले काम करणाऱ्याशी आदराने नीट बोलत असतो. त्याला साहेब छान वाटतात. तर कधी कधी आपल्या वागण्यावर सुध्दा समोरच्या माणसाचे वागणे आणि चांगले वाईट असणे अवलंबून असते.

त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका. अगदी निवडणूक असेल तेव्हा प्रत्येक उमेदवार आपल्याकडे मत मागायला येतो. तेव्हा आपण त्याचा आधीच्या कामाचा अनुभव बघुनच मत देतो ना ? नाहीतर इतर सांगत असतातच की त्यांचा उमेदवार कसा चांगला आहे.. तर हे सगळ्या ठिकाणी लागू होते. तेव्हा कुठलेही मत बनवण्याची घाई करू नका. अनुभवातून चांगली माणसे भेटतील. चांगले संबंध निर्माण होतील आणि त्यातून आनंद मिळेल जो आयुष्यात हवा असतो…

Related posts

Saloni Arts : असे रेखाटा खरेखूरे ओठ…

भूत म्हणजे काय ?

हृषीकेश: द सेलिब्रिटी

Leave a Comment