केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते? एका संवेदनशील लेखकाच्या मनातील हे कल्पनाचित्र म्हणजे ही कादंबरी आहे.
अशोक बेंडखळे
सर्वसाधारणपणे कादंबरीला एक कथानक असते आणि त्यातील पात्रांच्या अनुषंगाने त्यातील कथानक पुढे जात असते. शेवटी काय होणार याचीही वाचकांना उत्सुकता असते. मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण या मकरंद साठे लिखित कादंबरीला पारंपरिक अर्थाने कथानक नाही. कादंबरीला संदर्भ आहे तो तमिळ लेखक पेरूमल मुरुगन याने जानेवारी २०१५ मध्ये आपण लेखक म्हणून मेलो, असं जाहीर केलं त्याचा. मग लेखकाच्या कल्पनेतून निघते की, २३ जून २०१९ रोजी केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते? एका संवेदनशील लेखकाच्या मनातील हे कल्पनाचित्र म्हणजे ही कादंबरी आहे. सर्व लेखकांना एकत्र आणून त्यांची उलटतपासणी केली जाते. त्यांना १० दिवस वेगवेगळ्या गावात नेऊन स्वतःविषयी प्रश्न विचारले जातात. हे सगळे वाचत असताना विचारी वाचकाच्या लक्षात येते की, या सगळ्याला आपण आजूबाजूच्या घटनांचे संदर्भ आहेत आणि तो त्यात गुंतून जातो.
आता काय होते, आता होते काय एकदम १३७ लेखकांनी आपण मेलो, असे जाहीर केले. त्यातून काही प्रशासकीय तेढ उद्भवू नयेत म्हणून सरकार त्यांना अटक करते आणि एका मुक्त चिंतन शिबिरात त्यांची रवानगी करते. त्या शिबिरात इतरही काही लोक होते म्हणजे अतिसंतापी, प्रश्न विचारणारे, अर्थात नक्षल इत्यादी. त्यांच्या गळ्यातील पाटीवर त्यांची ‘अबनॉर्मलिटी’ लिहिलेली होती. त्याचप्रमाणे लेखकांच्या गळ्यात स्वतः चा मृत्यू जाहीर केलेले लेखक आणि खाली १०० टक्के ‘अबनॉर्मलिटी’ अशी पाटी टाकण्यात आली. लेखक एकमेकांशी भांडू लागले. मग त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रमुख आला. त्या लेखकांना इंट्राव्हेनस सुईमधून औषध देऊन देण्यात येऊ लागले. औषध चालू झाले की ते उठतील, तर बंद झाले तर झोपी जातील, अशी व्यवस्था होती. अटक करून आपण आणलेल्या १३७ लेखकांचा पहिला दिवस होता. अशा गावात तिथे झुंड वध (मॉब लिंचिंग) देण्याचा प्रघात होता. लेखकांच्या गळ्यातल्या ‘ॲबनॉर्मल’ची पाटी वाचून एवढे बळी द्यायला मिळालेत. याबद्दल गावकरी खूश झाले. लेखक मात्र हादरून गेले. आता मार्शलनी त्यांना गावकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर काढून शिबिरात आणले. त्यांची समुपदेशनात्मक चौकशी सुरू झाली. एका लेखकाला खुर्चीत बसवून समुपदेशकाने काही प्रश्न विचारले. काही प्रश्न होते – मी कोण? जाळणे म्हणजे काय? असे. मात्र, यामधून लेखकांची मी बद्दलची कल्पना त्यांना नीट कळली नाही. त्यामुळे यापुढे समुपदेशन गावातच घेण्याचे ठरले.
यापुढचा लेखकांचा प्रत्येक दिवसाचा प्रवास वेगवेगळ्या गावात होऊ लागला आणि गावची काही वैशिष्ट्ये असायची. दुसरा दिवस उजाडला, त्या गावचे लोक निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घेत नव्हते, तर मिटक्या मारत पाहत होते. त्या लेखकांना खाद्यपदार्थ बशीत दिले गेले. त्यांना माइक आणि स्पीकर्स लावलेले होते. रेस्टॉरंटमध्ये बसलेले लोक त्यांच्याभोवती जमा होतात आणि त्यांना अनेक प्रश्न विचारू लागतात. जसे तुम्हाला पदार्थाची चव कळते का ? हिमालयाचे सौंदर्य दिसते का? इत्यादी. आता एका लेखकाला समुपदेशक खुर्चीत बसतो आणि गावकऱ्यांना वर्तुळात बसवले जाते. लेखकांची चौकशी सुरू होते आणि मग ती मी कसा आहे, किंवा जाणीव आहे का नाही ? किंवा ती आपल्यात कशी निर्माण झाली ? याची तो उत्तरे देऊ लागतो. त्यावर दुसरा लेखकही बोलू लागतो. अनेक लेखक ओरडू लागतात. त्यांचं शिरेत जाणारे औषध बंद होते आणि ते झोपी जातात. आता पहिला लेखक ‘मी’ विषय सांगू लागतो. तो लेखक थकल्यावर समुपदेशक लोकांमध्ये मतदान घेतो. त्यांना मी म्हणजे काय हे कळले का आणि हे लेखक नॉर्मल आहेत का? असे विचारले जाते. जनमताचे उत्तर नाही असे येते आणि लेखक थक्क होतात. मग समुपदेशक लेखकांना आपण मृत्यू जाहीर करणं चुकीचं होतं हे पटलं का ? असं विचारतात. सर्व लेखक नकार देतात. मात्र, त्यांची विचारशक्ती खचून गेलेली असते. असे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावी घडत जाते. ते थोडक्यात पाहू- लेखकांचा तिसरा दिवस उजाडतो. त्या गावातील लोक वेगळेच वागत होते. काही दारू पीत होते, तर काही उघड्यावर हस्तमैथुन करीत होते, दिवसा बलात्कार होत होते. गावात एक प्रकारची उदासीनता होती. येथेही एका लेखकाला समुपदेशक खुर्चीत बसतो आणि प्रश्न विचारतो लेखक मी कोण आणि वास्तव याविषयी विवेचन करू लागतो. आत्मा मरत नसतो तो अपरिवर्तनीय असतो, असं काहीसे विधान करतो आणि इतर लेखकांमध्ये एकच कोलाहल माजतो. त्याचे बोलणे संपल्यानंतर गावकऱ्यांच्या जनमतामध्ये सगळे लेखक अबनॉर्मल आहेत, असंच उत्तर येत आणि समुपदेशक तुमची पुस्तके बॅन करायला तुम्हीच कारणीभूत आहात, असे सुनावतो.
चौथा दिवस उजाडतो, अशा गावात घेतल्या माणसांची बोटं तोडली गेली होती. त्यांच्या स्मरणशक्ती गडबड होती. इथेही एका लेखकाला खुर्चीत बसवून गावकऱ्यांना त्याच्या भोवती जमा केले जाते. कोण तू ? या प्रश्नाचे तो उत्तर देतो. तो म्हणतो मानव हा नैतिक प्राणी आहे आणि तेच त्याला इतर प्राण्यांहून वेगळे बनवतो. संवेदनांची मोळी म्हणजेच मन हे ही तो ठासून सांगतो. प्रत्येक दिवशी एक एक लेखक तत्त्वचिंतनात्मक बोलत असतात.
पाचव्या दिवशीचे गाव जिथे सगळे पुरुष एकसारखे आणि स्त्रिया एक सारख्या होत्या. इथे नवीन लेखकाला तू वेगळा आहे का आणि कशावरून? असा प्रश्न विचारला जातो. मी कोण? या प्रश्नाचा अर्थ मी स्वतःला काय बनवणार आहे हा असून बंडखोर व्यक्तीच जगाला किंमत प्राप्त करून देतात, अशी विधाने तो करतो. इथेही गावकऱ्यांकडून लेखकाला ॲबनॉर्मल ठरविले जाते.
सहाव्या दिवशीही असेच वेगळे गाव लेखकांना दिसते, जिथे फक्त तीनच वृद्ध माणसं राहत होती. तिथे समोर येते एक वेगळेच प्रकरण. गावातल्या एका माणसाने नव्या जीवाला न विचारता जन्म देणे चूक आहे हे त्याने कोर्टात मांडले आणि कोर्टाने ही पुनरुत्पादन अनैतिक आहे, असा त्याच्या बाजूने निकाल दिला. समुपदेशक लेखकांना तुम्ही मृत्यूबद्दल स्वातंत्र्य घेतलंय याची जाणीव करून देतो. त्यावर स्व नावाची गोष्टच नसते, येथवर चर्चा येते. जनमताचा निर्णय तुम्ही अबनॉर्मल आहात, असा येऊनही लेखक हेका सोडायला तयार होत नाहीत.
सातव्या नव्या गावात तिथले लोक स्वतःचा उल्लेख तृतीय पुरुषी करीत होते, त्यांना स्वतःचे फोटो माहीत नव्हते. स्वतःची ओळखपत्रे नव्हती. परत एका लेखकावर समुपदेशक प्रश्नांची सरबत्ती करतो. त्यावर सर्व अस्तित्व अनित्य असते आणि म्हणून मी कोण याचे उत्तर केवळ अनत्त असे देतो. सत्य नेहमीच दोन टोकांच्यामध्ये वसतं असंही विधान करतो. लेखकांच्या आत्महत्यांना इथंही सगळ्यांचा विरोध होता. आठव्या गावी नवा प्रकार तिथले लोक भोंगळ दिसत होते. कारण गावात आरसा नावाचा प्रकारच नव्हता. इथे लेखक बोलतो ते आरसे मानव आणि त्यांची जाणीव यावर त्यातून तत्त्वज्ञान येते. तो म्हणतो, लिखाण हा स्वतःशी संवाद असतो आणि तो थांबला तर एक मोठी पोकळी निर्माण होते.
मार्क्सप्रमाणे जाणीव म्हणजे जाणीव असलेला मानव आणि भाषा म्हणजे खरी आणि व्यावहारिक जाणीव. इथे लेखकांना ॲबनॉर्मल ठरवले जाते आणि तेही मृत्यू जाहीर करण्याचा हेका सोडत नाहीत. नवख्या गावी गावकऱ्यांचे सहा तट झाले होते आणि ते आपापसात भांडत होते. या गावात नवल म्हणजे लेखकाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चालू होती. गावात स्पर्धेसाठी नवे लेखक मिळाले म्हणून गाववाले खूश होते आणि लेखक लेखनासाठी बोलचाल झाली आणि लेखकांचा थरकाप उडाला. भयानक अनुभवातून सावरलेल्या तीन लेखकांना म्हणजे दलित, स्त्री आणि प्रायोगिक लेखक यांना समुपदेशकाने बोलते केले. तिघांचेही म्हणणे ऐकून लेखकांना विकत घेऊ पाहणारे गाववाले चकित झाले आणि ते त्यांनी हे भयानक लेखक म्हणून ॲबनॉर्मल आहेत, असा निर्वाळा दिला.
दहाव्या दिवशीचं गाव नॉर्मल होतं. म्हणून लेखकांना समुपदेशनाचा प्रवास संपत आल्याचे ध्यानात येते. तिथे एक तरुण लेखक मी किंवा जाणीव कशाने तयार होते याची उकल करतो. तो खरं बोलतो. म्हणतो, स्वतःचा मृत्यू जाहीर करूनही निराशेतून उद्भवलेली टोकाची प्रतिक्रिया आहे. आम्ही नॉर्मल आहोत, तुमचे निकष चुकीचे आणि स्वातंत्र्याचा अपलाप करणारे आहेत. इथेही जनमताचे मतदान लेखकांच्या विरुद्ध जाते. मात्र, लेखकांच्या नकार देण्यामध्येही एक ठामपणा आला होता. शेवटी समोर येथे अशाच प्रकारचे लेखकांची समुपदेशन जगभरात झाले होते. काही सरकारांनी लेखकांना मारून टाकले, तर काहींनी झुंडीच्या हातात सोपवले. आपल्या सरकारने मात्र बैठकांमधून विचार मंथन सुरू केले. लेखकाचे काय करावे यावर सार्वमत घेतले जाणार होते. एकूणच लेखकांचे भवितव्य आता बहुमतावर टाकले जाते. आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांवर किंवा घडविण्यात भविष्यात घडल्या जाणाऱ्या विचित्र घटनांवर तिरकस शैलीतून मल्लिनाथी करणारी ही कादंबरी मनोरंजन करत नसली तरी विचार करायला भाग पाडते.
पुस्तकाचे नाव : मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण
लेखक: मकरंद साठे
प्रकाशक: पाप्युलर प्रकाशन
मुखपृष्ठ: संदीप देशपांडे
पृष्ठे : १७८
मूल्य : रु.३००
पुस्तकासाठी संपर्क – 9869008109.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.