October 16, 2024
A dive that highlights the humanity of people Shradha Belsare
Home » Privacy Policy » माणसांचे माणूसपण अधोरेखित करणारा गोतावळा
सत्ता संघर्ष

माणसांचे माणूसपण अधोरेखित करणारा गोतावळा

माणसांच्या आयुष्याची समृध्दता नेमकी कशात आहे..? माणसं श्रीमंत असतात ते कशाने ? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकजन वेगवेगळे स्वरूपात देईल. मात्र आपला भोवताल जितका माणसांनी भरलेला असेल तितका माणूस श्रीमंत मानला जात असतो. माणसं जीवनभर संपत्ती कमावत असतात..पण पैशापेक्षाही माणसं मिळवत गेलो तरच जीवनाची श्रीमंती वाढत जाते. आपल्या जीवनातही माणसं येतात पण त्या माणसांकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी असते.माणस जपण्यासाठीचे हृदय असली की माणसांचा गोतावळा आपोआप उंचावत जातो. काही माणसं प्रशासनात कार्यरत राहूनही ती आपल्यातील माणूसपण कायम ठेवत भोवतालची सामान्य माणसांपासून तर उच्चपदापर्यंत कार्यरत असलेली माणसं टिपत असतात. त्या माणसांचे मोठेपणाबरोबर माणूसपणाची उंची वाचकांच्या समोर दर्शित करण्याचे काम जेव्हा घडत जाते, तेव्हा ती माणसंही वाचकांचीच होऊन जातात..अनेकदा माणसं वयाने, श्रीमंतीने, पदाने मोठी असतात पण काही तर अगदी सामान्य माणसं असली तरी त्यांच्यातील भाव आणि दृष्टीने ते अधिक उंच वाटू लागतात.

काही माणसं सत्तेच्या खुर्चीवर असतात, राजकारणात असतात तेव्हा त्यांच्या प्रतिमा मतदार म्हणून मनाच्या कोपऱ्यात माध्यमांनी कोरलेल्या असतात. जेव्हा त्यांच्या सोबत कार्यरत असणारी माणसं त्या माणसांचे माणूसपण अधोरेखित करत जातात तेव्हा ती गोतावळयातील माणसं ही वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करतात. श्रध्दा बेलसरे यांनी प्रशासकीय उच्च पदावर कार्यरत असताना देखील आपल्या भोवतालमधील निवडक माणसांचा ‘गोतावळा’ शब्दबध्द करत त्या माणसांचे शब्दांनी चित्र रेखाटत. वाचकांच्या हृदयावर कोरण्याचे काम केले आहे. श्रध्दा बेलसरे यांनी शब्दबध्द केलेला गोतावळा वाचकांच्या मनात घर करत जातो. त्याचवेळी ही माणसं वाचत जाताना आपल्या भोवतलामधील अशा माणसांचा शोध घेण्यास वाचक सहजतेने प्रवृत्त होतात.

गोतावळा पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3KnRqb5

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदावर नुकतेच कार्यरत झाले होते. त्याच दरम्यान नागपूर अधिवेशन सुरू होते. अधिवेशनात पत्रकांरांच्या विषयीचा एक प्रश्न चर्चेला आला होता. त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती त्यांनी हवी होती. त्यामुळे लेखिका स्वतः त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. परिचय करून दिल्यानंतर माहिती सांगण्यास सुरूवात झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर प्रशासकीय अधिकारी उभे राहून बोलत होते. चार पाच वाक्ये झाली आणि मुख्यमंत्री चव्हाण त्यांना म्हणाले ‘अहो बसा ना, उभे का ?’ खरेतर राज्याचा प्रमुख आणि समोर प्रशासकीय अधिकारी असून देखील त्यांच्या प्रति असलेली माणूसपणाची भावना अधिक महत्त्वाची होती. अनेकदा सत्ता आल्यावर लोक बिघडतात, त्यांच्या लेखी स्वतःची प्रतिष्ठा, अधिकार अधिक महत्त्वाचे वाटत असतात पण ही माणसं सत्तेच्या सर्वोच्चस्थानी असताना देखील किती माणूसपणाने समोरच्यांना वागवतात हे अधोरेखित होत जाते.

खरेतर हे माणूसपणाच्या आणि प्रश्न समजून घेत त्याचे निराकरण करण्यासाठी ही माणसं नेमके किती सामान्यपणे जगत असतात असे अनेक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. मंत्री म्हणून राहिलेल्या यशोमती ठाकूरांचे चित्रण तर अधिक भावत जाते. एक मंत्री असलेल्या महिला बेलसरे यांच्यात आई पाहते आणि “मी तुम्हाला आई म्हणू का ?” असे विचारते..हा सारा भाव जाणून घेताना बेलसरे यांच्यातील मातृत्व, वात्सल्य आणि स्नेहाचे वर्तनच अधोरेखित करत जाते. त्यांच्या सहवासातील गप्पा वाचत असताना त्या दोघींमधील नाते अधिकारी आणि मंत्री असे न राहता मायलेकीचे होऊन जाते. ते अनुभव हृदयाला अधिक ओलावे देणारे वाटतात. अनेक ठिकाणी ठाकूर यांच्या समाजाप्रति असलेला दृष्टीकोन आणि काम करण्याची धडपड अधोरेखित करताना ठाकूरांचे माणूसपण जितके अधोरेखित होते तितकेच लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील नात्यातील ओलावा देखील वाचायला मिळतो. लेखिका मंत्र्यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या..त्यावेळी चालत असताना चप्पलेतून पाय सटकला होता..ही बातमी ठाकूर यांनी समजली. दिवसभराचे कामकाज सुरू होते. सायंकाळी जनता दरबार भरला होता..अखेर सर्व आवरल्यावर त्या म्हणाला, “चल आपल्याला बाहेर जायचे आहे ” आणि लेखिकेला घेऊन त्या चप्पलच्या दुकानात घेऊन घेल्या आणि चार चप्पल जोड घेतले. त्यापूर्वी स्वतःची चप्पल घालून बघ असा केलेला आग्रह देखील झाला. हे सारे माणूसपणाच्या उंचीवरचेच म्हणायला हवे.

आपल्या सर्व व्यवधानात नाते जपणे किती महत्वाचे आहे आणि ते कसे जपले जाते हे वाचताना पुन्हा पुन्हा जाणवत राहते. विलासराव देशमुख यांच्या आठवणी तर भरभरून नोंदवल्या गेल्या आहेत. खरंतर मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या माणसांच्या मनावर अधिराज्य करत आले आहेत. त्यांची भाषणे म्हणजे एक प्रकारचे मेजवानी असायची. विषय कोणताही असला तरी त्याची मांडणी ते अत्यंत सुंदर रितीने करत असायचे. त्यांच्या भाषणात कोटया सातत्याने डोकावत असत. अत्यंत हजरजबाबीपणाचे उत्तम उदाहरण म्हणून विलासरावांकडे आजही बोट दाखवले जाते. लेखिका एकदा आपले काम आटपून घरी निघाल्या होत्या. रस्त्यात गाडी बंद पडली. थोडासा पाऊस सुरू होता..त्यामुळे चालकाला सांगून त्या पर्यायी गाडीने जाण्यासाठी रस्त्यात वाहनाची प्रतिक्षा करत होत्या. दरम्यान त्या रस्त्याने मुख्यमंत्री जात होते. त्यांनी एवढ्या वाहनाच्या ताफ्यातून बेलसरे यांना त्यांनी पाहिले आणि आपल्या व्यवस्थेमार्फत त्या का थांबल्या आहेत ? याची विचारणा करून त्यांना त्यांच्या निसास्थानी पोहचवण्याची व्यवस्था करायला सांगितली. ताफा जिथे जाणार आहे तिथे घेऊन न जाता त्यांना त्यांच्या निवासस्थानी सोडून पुन्हा पोहचवले की नाही याचा निरोपही संबधित अधिकाऱ्यास देण्यास सांगितले.

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रति असलेला स्नेहभाव किती असावा याचे उत्तम उदाहरण म्हणायला हवे. विलासराव कार्यक्रमाचे औचित्य साधून किती सुंदर भाव व्यक्त करायचे हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. एकदा गीतकार जगदीश खेबुडकरांच्या संकेतस्थळाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ खेबुडकर तुमचे गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. संकेतस्थळ म्हणजे काय हे तुम्हा आम्हाला सांगितलेत. त्यांने आणि तिने एकांतात भेटावे आणि ते स्थळ कुणाला माहित नसावे अशी भाबडी समजूत तुम्ही करून दिली. आम्ही तेच प्रमाण धरून चालत आलो आणि आज मात्र संकेतस्थळ जग जाहीर करत आहात, आता आम्ही काय करायचे..? ” एका शब्दावरून केलेली मल्लीनाथी टाळ्या मिळून जातात. पण देशमुखांचे मोठेपणही अधोरेखित करू जाते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा सामनामध्ये अग्रलेख प्रकाशित करण्यात आला होता.. “ चिमण्यानो परत फिरा रे..” तेव्हा देशमुख साहेब म्हणाले होते की, वाघाच्या चिमण्या कधी झाल्या ? असे अनेक नर्मविनोदांनी भरलेले देशमुख यांचे भाषण आणि माणूसपणाची उंचीचे अनेक अनुभव वाचायला मिळतात.

मराठी नाटयसृष्टीतील चंद्रकात कुलकर्णींसारखा द्रष्टा दिग्दर्शकाबदलचे अनुभव तर जगण्याला उमेद देणारे ठरतात. औरंगाबादच्या कार्यक्रमाला येताना हा माणूस साध्या रिक्षातून प्रवास करत कार्यक्रम स्थळी आला. मुळात जमिनीवर पाय असले तरच माणसं मोठी होतात..आणि जी मोठी होतात त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात असे कितीतरी अनुभवांनी हे पुस्तक भरलेले आहे. नवाकाळ हा अग्रलेखाचा बादशहा ठरवला तो सामान्य वाचकांनी. अनेक पुरस्कार निळूभाऊ खाडीलकरांना मिळाले पणहा सामान्य वाचकांने दिलेला पुरस्कार म्हणजे जणू सर्वोच्च पुरस्कार होता. त्यांच्या विषयीच्या या लेखात खाडीलकरांच्या विषयीची वैशिष्टय सहजतेने वाचायला मिळतात. त्यामुळे माणूस समजून घेण्यास मदत होते. पत्रकार हा राजकारण्यासारखा राज्य करू शकत नाही पण तो चाणक्य असतो आणि सल्ला देऊ शकतो..राज आणि उध्दव यांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी दिलेला सल्ला वाचायला मिळतो..खाडीलकर द्रष्टेचे होते कारण आजही समाजमनात हिच भावना कायम आहे. मुंबई दंगली प्रकरणात त्यांनी श्रीकृष्ण आयोगाने दिलेल्या अहवालावर त्यांनी अग्रलेख लिहिला.जस्टीस श्रीकृष्ण यांचे डोके ठिकाणावर आहे का ? त्या अग्रलेखावर हक्कभंग दाखल झाला. त्याबददल त्यांनी माफी न मागता शिक्षा स्वीकारली. अर्थात वयाचा विचार करता ती शिक्षा त्यांची मुलगी रोहिनी खाडीलकर यांनी भोगली. खाडीलकरांचे स्वभाव वैशिष्टयांच्या नोंदी या लेखात वाचायला मिळतात.

जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या आणि नंतर मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मनिषा म्हैसकर यांच्या विषयीचे अनुभव जगण्याला समृध्दतेची दिशा दाखवणारे आहेत. कामात सौंदर्यदृष्टी असेल तर कामाचा बोजा वाटत नाही. काम करताना सकारात्मकता किती महत्वाची असते हे वाचताना सहज जाणवत राहते. जयश्री खाडीलकरासारखी आपल्या पेशावर प्रेम करता करता सामाजिक भान जोपासणी संपादक म्हणून त्यांचा परिचय या लेखात होतो. अनेक मोठे सामाजिक कामे करूनही त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात देखील त्याची बातमी छापून न आणणे. संपादक हा किती प्रसिध्दीपासून दूर असू शकतो हे वाचायला मिळते. संपादकाची दृष्टी राजकीय सभांवर असली तरी खाडीलकर मात्र सामान्यांच्या प्रश्नातच रमतात. त्यासाठी त्या भटकंती करतात पण त्यात सामान्यांच्या प्रश्नांचाच विचार असतो. उज्ज्वला हावरे या महिला बिल्डर क्षेत्रात उतरल्या..मात्र त्यांनी आपल्यावर संकट कोसळ्यावर ज्या पध्दतीने सामोरे जाण्याची हिम्मत दाखवली ते वाचल्यावर वाचकांना देखील जगण्याची हिम्मत मिळत जाते. त्यांनी मुंबई सारख्या महागड्या शहरात केवळ एका साध्या फोनमुळे अस्वस्थ होऊन ६४ खोल्यांची इमारत कॅन्सरवर उपचारासाठी आलेल्या रूग्नांच्या नातेवाईकांची सोय व्हावी म्हणून विनामूल्य गाडगेबाबा मिशनच्या हातात देणे..ही सहदयता म्हणजे सारीच माणसं पैशाच्या मागे नसतात हे अधोरेखित करणारी आहेत.

यातील सारीच माणसं माणूसपणाने भरलेली आहेत हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जाते. सुमती लांडे या शब्दालय प्रकाशनाच्या प्रमुख. त्यांचा संघर्ष अधोरेखित करताना माणसाने सारे वैभव दाराशी असताना देखील कसे जगायला हवे याचा वस्तूपाठ घालून देते. त्यांचा आरंभीचा सारा संघर्ष नेमकेपणाने वाचायला मिळतो.

गोतावळा या पुस्तकात चौवीस व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ती केवळ व्यक्तिचित्रे आहेत असे नाही तर ती व्यक्तिची भावचित्रे आहेत. त्यांच्यातील माणूसपणाची उंची त्यांनी अधोरेखित केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, यशोमती ठाकूर, गिरीश गोखले, निळूभाऊ खाडीलकर, रोहिनी खाडीलकर-पांडे, पदमजा फेणाणी जोगळेकर, चंद्रकांत कुलकर्णी, भारती लव्हेकर, मनिषा म्हैसकर, भास्कर मामा, सुमती लांडे, सुलभाताई भानगावकर, उज्वला हावरे,पोर्णिमा मेहता, विद्या आठले, अरविंद रेड्डी, उत्तम दगडू, आशा पैठणे, भगवान दातार, अरूणा खारकर, डॉ. राजन वेळूकर, अतुल कुलकर्णी, सूर्यकांता पाटील अशी काही माणसांची त्यांनी शब्दचित्र रेखाटली आहे. त्यांच्या सहवासातील आलेली अनुभवाची मांडणी करताना त्या माणसांचे मोठेपण नेमकेपणाने मांडण्यात आले आहे.

अत्यंत सोप्या शब्दात ही माणसं उभी करण्यात आली आहे. साध्या सोप्या प्रसंगातून त्यांचे मोठेपण अधोरेखित करण्यात आले आहे. खरंतरं असं काही नोंदवताना असणारा दृष्टीकोन हा लेखक म्हणून बेलसरे यांचे सामाजिक भान अधोरेखित करतोच पण नेमके माणूसपण कशात आहे हे पण सांगतो. त्या अर्थाने हे पुस्तक वाचताना कोठेच कंटाळा येत नाही. यातील अनेक माणसं समाजातील सर्व स्तरातील सर्वांना माहित आहे. पण ही माणसं किती नम्रतेने आणि सामान्य माणसांसारखे जगतात हे वाचताना सहजतेने मोठयांचे मोठेपण हे त्यांच्या सामान्य असण्यात आहे, हे अधोरेखित होत जाणारे आहे हे वाचक म्हणून सहजतेने जाणवत राहते. त्यामुळे ही माणसं आपली वाटावीत इतक्या सुंदर रितीने केलेले वर्णन वाचकांना पुस्तक खाली ठेऊ देत नाही.

संदीप वाकचौरे

पुस्तकाचे नाव – गोतावळा
लेखक – श्रध्दा बेलसरे-खारकर
प्रकाशक – शब्दालय प्रकाशन
पाने –114
किंमत – 220 रुपये

गोतावळा पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3KnRqb5


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading