मराठी बोली साहित्य संघ नागपूरच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सात संमेलने पार पडली. आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन हे वऱ्हाड प्रांतातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या दानापूरला होत आहे.
तुळशिदास खिरोडकार
अकोला
मोबाईल – 9970276582
महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी बारा कोसावर मराठी भाषा वेगवेगळ्या रूपात बोलली जाते. तीच त्या विभागाची बोलीभाषा म्हणून सर्वत्र परिचित असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यामध्ये शब्द उच्चारण, शब्दांवरचे आघात, वाक्प्रचार ती बोलण्याची वेगळीच लयबद्धता ऐकताना गोडवा निर्माण होत असतो. अशा या महाराष्ट्रातील बोली भाषांच्या द्वारे मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्य लेखकांचे आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनात १२ डिसेंबर २०२१ ला सातपुड्याच्या पायथ्याशी व वान नदीच्या काठावर वसलेल्या दानापूरला मराठी बोलीभाषेचा जागर होणार आहे.
मराठी बोलीचे कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी असे अनेकविध प्रकार कानांवर पडतात.भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खान्देशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात. या सर्व बोलीभाषांमध्ये महाराष्ट्रातील आणि त्या त्या परिसरातील साहित्य लिहिणाऱ्या लेखक, कवींनी या आपापल्या बोलीभाषेत मोठे साहित्य लिहिलेले आहे.
मराठी बोली साहित्य संघ नागपूरच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सात संमेलने पार पडली. आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन हे वऱ्हाड प्रांतातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या दानापूरला होत आहे. तेल्हारा तालुक्यात येणारे दानापूर हे स्वातंत्र्यपूर्व काळात महत्त्वपूर्ण योगदान देणारे गाव आहे. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक बापूसाहेब ढाकरे या कवीचे गाव म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रात दानापूरची ओळख आहे.
वऱ्हाडी बोली भाषेत असलेला नाद माधुर्याचा जन्मजात गोडवा अकोला जिल्ह्यातील अनेक साहित्य लेखकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जपला आहे. वऱ्हाडी बोली भाषेला दानापूर गावाचे शीव भाऊ असलेले गाव हिंगणी येथील कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी ‘काया मातीत मातीत तिफन चालते’ असं म्हणत जगभर पोहोचवलं. काळ्या सुपीक मातीत जन्माला आलेला वाघ माणूस वऱ्हाडी बोलीचा विठ्ठल म्हणून तर आपले आजोबा बापूसाहेब ढाकरे यांच्याकडून साहित्याचा संस्कार झालेल्या डॉ. प्रतिमा इंगोले आपल्या वऱ्हाडी लेखन साहित्याच्या चौफेर लेखनाने सर्वत्र वऱ्हाडी बोलीच्या रुखमाई म्हणून ओळखल्या जातात. यासोबतच ज्येष्ठ लेखक बापूराव झटाले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, अनंत खेळकर, नरेंद्र इंगळे, विजय इंगळे, प्रा. रावसाहेब काळे, किशोर बळी, राजू चिमणकर, श्याम ठक, का. रा. चव्हाण, विठ्ठल कुलट, गजानन मते, मिर्झा रफी अहमद बेग, रवींद्र महल्ले, मीराताई ठाकरे, प्रा. गजानन टवरे, झिंगूबाई बोलके, श्रीधर राजनकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. रमेश थोरात, प्रा. प्रभाकर कौलखेडे ही साहित्यिक मंडळी वारकरी म्हणून वऱ्हाडी बोलीत लेखन करून बोलीला गौरव मिळवून देत असतात.
येत्या रविवारी १२ डिसेंबर २०२१ ला खोडे प्रतिष्ठान, दानापूर च्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या आठव्या राज्यस्तरीय मराठी बोलीभाषा साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील सर्वच बोलीभाषांचा जागर होणार आहे. वऱ्हाड प्रांतातील वऱ्हाडी बोलीभाषिक जनांना सर्व बोलीभाषांचा साहित्य आनंद या निमित्ताने लुटता येणार आहे. हे साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ‘इये मराठीचिये नगरी’ चे संपादक राजेंद्र घोरपडे, संपादक पुरुषोत्तम आवारे, सुधाकर खुमकर, गजानन काकड उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल गावंडे यांच्यासह मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अजय विखे, संयोजक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्यासह वऱ्हाड प्रांतातील वऱ्हाडी बोली भाषिक जन या साहित्य संमेलनाला येणार्या महाराष्ट्रातील सर्वच बोलीभाषिक साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.