April 19, 2024
Stability of mind in old age is the medicine for disease
Home » उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध
विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा

ओवीचा अर्थ – हें पाहा, रोग हटविण्याकरितां औषध तर घ्यावें, पण तें औषध ज्याप्रमाणें, अतिशय रुचकर आणि गोड असावें.

औषध गोड नसते. ते कडू असते, पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. तो मनाला पटतही नाही, पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात मात्र बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो.

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालींध्येही फरक असतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोमानानुसार होतो. तरुणपणी सल्ले मनाला रुचत नाहीत, पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकन् तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही.

कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हे शरीर गुणधर्म आहेत, पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सुरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोके वर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर सर्वात मोठे औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे सर्वात उपयुक्त असे औषध आहे.

Related posts

संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणारी जयश्री मुंजाळ

आमचा अशोक इकडे आलाय का ?

निसर्ग !…

Leave a Comment