सरळ वाढणाऱ्या झाडाचा शेंडा तोडला तर त्यास अनेक फांद्या फुटतात. शेंडा तोडला म्हणून झाड मरत नाही, उलट त्याचा विस्तार वाढतो. त्याची वाढ अधिक जोमाने होते. अनेक शाखा त्याला फुटतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406
जैसी वरीवरी पालवी खुडिजे। आणि मुळीं उदक घालिजें ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।305।। अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले, तर त्या झाडाचा नाश कसा होणार ?
द्राक्षाचे भरघोस उत्पादन येण्यासाठी ऑक्टोबर आणि मार्च-एप्रिलमध्ये छाटणी करावी लागते. छाटणी केल्याने वेलीची, घडांची वाढ योग्य प्रकारे होते. वेलवर्गीय पिकांमध्ये छाटणी ही आवश्यकच असते. छाटणीमुळे फुटवे अनेक फुटतात. वेल वाढण्यास, पसरण्यास मदत होते. वृक्षांची वाढही योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्याही फांद्याची छाटणी योग्यवेळी व योग्य प्रकारे करण्याची गरज असते.
गणपतीस दुर्वा वाहिल्या जातात. या दुर्वा म्हणजे नेमके काय? हे विचारात घेण्याची गरज आहे. गवताचे शेंडे खुडतो. त्यास दुर्वा म्हणतात. शेंडे खुडल्यानंतर या गवतास अनेक ठिकाणी फुटवे फुटतात. साहजिकच ते गवत सर्व बाजूंना पसरते. त्याची भरघोस वाढ होते. गवत हे आजकाल तण समजले जाते. पण गवत वाढावे असा विचार पूर्वीर्च्याकाळी का रुजवला गेला असावा? यालाही शास्त्रोक्त कारण आहे. गवतामुळे जमिनीची धूप थांबते. गवत जितके पसरेल तेथील जमिनीचे संवर्धन होते. थोडसे पाणी जरी त्याच्या मुळांना मिळाले तर त्याची वाढ जोमाने होते. दुर्वा गणपतीला वाहण्यामागे गवताची वाढ होऊन पडीक जमिनीवरील मातीचे संवर्धन व्हावे. जमिनीची धूप थांबावी हा त्यामागचा उद्देश आहे.
सरळ वाढणाऱ्या झाडाचा शेंडा तोडला तर त्यास अनेक फांद्या फुटतात. शेंडा तोडला म्हणून झाड मरत नाही, उलट त्याचा विस्तार वाढतो. त्याची वाढ अधिक जोमाने होते. अनेक शाखा त्याला फुटतात. शेंडा तोडल्यानंतर मुळांची जमिनीतील पकड अधिक मजबूत होते. अशा काळात मुळांना पाणी मिळाले किंवा दिले तर त्या झाडास अधिक फुटवे फुटतात. वाढ जोमाने होते. पण यामागचे अध्यात्म समजून घेण्याची गरज आहे.
पूजा-पाठामध्ये करण्यात येणाऱ्या कृती यांना शास्त्रीय आधार आहे. त्यामागे पर्यावरण, निसर्गाचे संवर्धन असे विचार सांगितले गेले आहेत. लोकांमध्ये कृतीतून याची जाणीव व्हावी. आपोआपच त्याच्याकडून संवर्धन केले जावे; तसेच अध्यात्माचे विचारही त्यातून समजले जावेत हा त्यामागचा उद्देश आहे. परब्रह्माच्या वाटेवर असणाऱ्या साधकाने विषयांचा शेंडा तोडला, तर परब्रह्माचा विकास अधिक जोमाने होतो. हा विचार यातून सांगण्यात आला आहे.
दुर्वा वाहा. म्हणजे विषय वासनेचे शेंडे तोडा असे सांगणे आहे. परब्रह्माच्या बोधाचा श्रीगणेशा व्हावा असे वाटत असेल तर विषयांचा शेंडा हा तोडावाच लागेल. तरच नव्या फांद्यावर आत्मज्ञानाचे फळ जोमाने वाढेल. भरघोस फळे लागतील. यासाठी छाटणी ही महत्त्वाची आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.