निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून जीवनातील आनंद वृध्दिंगत होईल हा दृढ विश्वास प्रत्येक वाचकांमध्ये निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करील यात शंका नाही.
डॉ. वैशाली श्रीकांत गुंजेकर
स्टेथोस्कोप हे वैद्यकीय उपकरण शरीरांतर्गत ध्वनीचे निरीक्षण करून आजाराचे निर्देशक करते, हे सर्व ज्ञात आहे. परंतु डॉ. शैलजा भन्साळी यांनी केवळ शरीरांतर्गतच नव्हे, तर मनांतर्गत निर्माण होणाऱ्या लहरींचे संकलन स्मृतीकोषामध्ये बंदिस्त केलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेदरम्यान शरीरशास्त्राच्या उपचाराबरोबर मानवी मनोव्यापाराचा प्रवास ‘स्टेथोस्कोपच्या पलीकडे’ या पुस्तकात नोंदविलेला आहे. हे पुस्तक दोन पर्वामध्ये विभागलेले असून, पहिले पर्व ‘वैद्यकीय जीवन प्रवास’ आणि दुसरे पर्व ‘माहिती विविध आजारांविषयी’ असे आहेत.
पहिल्या पर्वात मानवी जीवनातील अनेक कंगोरे उलगडून जीवन प्रवासातील ‘स्वार्थ आणि परमार्थ’ यांचा संगम पानोपानी पहावयास मिळतो. डॉ. शैलजा यांच्या व्यक्तिमत्त्वाची छबी मनात घर करून जाते. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणापासून जनरल प्रॅक्टिसपर्यंतच्या कार्यकाळातील अनुभवांचा पैस हे पुस्तक उलगडून दाखवते.
उपचारादरम्यान भेटलेल्या लोकसंग्रहातील गरिबीने दबलेल्या, पिचलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन डॉ. शैलजा यांनी वैद्यकीय सेवेतील समाजभिमुखता जपलेली आहे. तसेच अनेक महिलांना आधार देण्याचे काम केलेले आहे. जेन, नीता लोखंडवाला, झिझेला डॉड, जागृती शहा, देवयानी यांच्या वैवाहिक जीवनाची दुरावस्था मांडून त्यांना लढण्याचे बळ डॉ. शैलोजा भन्साळी यांनी दिले आहे. परंतु स्वतः स्त्री म्हणून निभावत असलेली भूमिका मांडताना नोकरी आणि संसार या दोंन्हीमध्ये होत असलेली ससेहोलपट त्या नोंदविता.
एम. डी. चे शिक्षण थांबवून दवाखाना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या डॉ. शैलाजा या देखील परंपरागत समाजव्यवस्थेला बळी पडलेल्या दिसतात. तरीही ना उमेद न होता लढत राहिले पाहिजे हा विश्वास त्या रुजवतात. जीवन प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे आहे हे अनेक प्रसंगातून अधोरेखित करतात.
प्रॅक्टिसच्या कार्यकाळात मुलगी जुई हिला सांभाळणारे अंकल बेन आणि अंटी रुबी, पियानोमेकर असलेले किशोर मेस्त्री, कॅन्सरने ग्रस्त असलेली चंपा भाभी, पेशंट म्हणून आलेले महाडिक कुटुंब, शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊन उच्चशिक्षित झालेला विकास सावंत आणि ध्यानचंद यांसारख्या व्यक्तिदर्शनातून डॉ. शैलाजा आयुष्यातील हातबलतेवर दृढ विश्वासाने मात करता येते याची जाणीव सातत्याने करून देतात. शारीरिक अपंगत्व औषधोपचाराने कमी करता येते. परंतु मानसिक अपंगत्वाचे काय ? असा प्रश्न विचारून मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्याइतकेच खूप महत्त्वाचे असल्याचा निर्वाळा हे पुस्तक करून देत आहे.
नायर जातीतील एम. कॉम. झालेल्या पण पायाने व्यंग असलेल्या विवाहित स्त्रीचे नोकरीच्या ठिकाणी झालेले मानसिक खच्चीकरण आणि त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी केलेली मदत अवर्णनीय आहे. अशा कित्येक महिलांच्या नोकरी संदर्भातल्या समस्यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम वाचताना मन हेलावून जाते. महिलांच्या शारीरिक व मानसिक दुरावस्थेची व्यथा हे पुस्तक मांडताना दिसते.
प्रॅक्टिस दरम्यान आलेले अनेक अनुभव डॉ. शैलजा सहज, सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडतात. महिलांच्या ‘मासिक पाळी’ संदर्भातील अनेक गैरसमजुती, प्रथा, परंपरा आणि शरीराबद्दलचे अज्ञान दूर करण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. एका आजीचा मासिक पाळी संदर्भातला चुकीचा विचार खोडून ‘विटाळ’ या शब्दाला बगल दिलेली आहे. बायकाच बायकांना त्रास देतात हे सांगताना त्या म्हणतात,’ जुन्या बेड्यांमध्ये स्वतः तर बांधून घेतात आणि नव्या पिढीलाही त्रासदायक करतात’ आजही मासिक पाळी हा विषय शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर संकुचित स्वरूपाचाच राहिलेला आहे. हा संकुचित दृष्टिकोन नष्ट करण्यासाठी प्रथम मुलींच्या आईची, आजीची मानसिकता आणि वैचारिकता बदलली पाहिजे असा निर्वाळा डॉ. शैलजा देतात. त्या आपल्या आईचा मासिक पाळी विषयीचा प्रगल्भ विचार मांडतात. त्यामुळे हे पुस्तक वाचणाऱ्या अनेक महिलांचा मासिक पाळी विषयीचा गैरसमज दूर होऊ शकतो.
४० वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कितीतरी कुटुंब, लोक जवळून अनुभवताना अनेक आनंदाचे, सुखाचे, भावनिकतेचे, दुःखाचे, तडफडीचे, तगमगीचे, व्यथिततेचे अनेक प्रसंग या पुस्तकात नमूद केलेले आहेत. त्यातून नमुनेदार माणसांची वैचारिकता आणि स्वभाव वैशिष्ट्ये अभ्यासता येतात.
दुसऱ्या पर्वामध्ये विविध आजारांविषयीची इंतभूत माहिती सांगितलेली आहे. आजारांच्या लक्षणापासून तो होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी विविध प्रसंगानुभवातून डॉ. शैलजा पटवून देतात. शरीरशास्त्राविषयीच्या सखोल ज्ञानाचा दस्तऐवज म्हणजे ‘स्टेथोस्कोपच्या पलीकडे’ हे पुस्तक आहे. शरीरशास्त्र आणि मानसिक शास्त्र यांचा उहापोह करणारे हे पुस्तक स्वास्थ्यपूर्ण निरोगी आरोग्याचा मंत्र वाचकांच्या मनात रुजविणारे आहे.
डॉ. शैलजा यांचे अनुभव कथन करणारे हे पहिलं पुस्तक वैद्यकीय सेवेदरम्यानचे स्वानुभव डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्याचे बंध उलगडून दाखवते. दवाखाना, औषध, लसीकरण आणि रक्तचाचण्याविषयी डॉक्टरांची नैतिकता कशी असायला पाहिजे याचे उत्तम उदाहरण डॉ. शैलजा या आहेत. एखादा रोग किंवा आजार बरा होण्यासाठी प्रथम पेशंटमध्ये डॉक्टरांविषयी विश्वास असायला पाहिजे, हा विश्वास डॉ. शैलजा यांनी संपादन केल्याची नोंद हे पुस्तक करून देत आहे.
निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून जीवनातील आनंद वृध्दिंगत होईल हा दृढ विश्वास प्रत्येक वाचकांमध्ये निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करील यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव : स्टेथोस्कोपच्या पलीकडे
लेखिका : डॉ. शैलजा भन्साळी
प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठ संख्या : १६६
मूल्य : २८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
