July 16, 2024
peradventure of fight-for-spiritual-knowledge article by Rajendra Ghorpade
Home » आत्मज्ञानाची लढाई हा योगायोगच
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाची लढाई हा योगायोगच

सूर्य मालेतील विविध गृह-तारेही त्याने शोधले आहेत. दररोज नवा शोध समोर येतो आहे. पण याला काही मर्यादा आहेत. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा तो स्वतःचा शोध घेण्यामागे लागतो. मी कोण आहे? हे शोधण्याची त्याला आठवण होते. तोपर्यंत तो सर्वत्र भटकत राहातो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

ना तरी जांभया पसरे मुख । तेथें अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख ।पातला असे ।।195।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ – अथवा, जांभई देण्यासाठी तोंड उघडले असतां अकस्मात अमृत येऊन त्यांत पडावे, त्याप्रमाणे हे (धर्म) युद्ध (अनायासे) आलेले आहे असे समज.

आळस आला म्हणून तोंड उघडले पण त्याचवेळी तोंडात अमृत पडले. किती हा योगायोग ? हा योग जुळून यावा लागतो. तो सहजपणे आला आहे. आत्मज्ञानासाठीची ही लढाईही योगायोगाने आली आहे. सद्गुरू भेटीसाठी धावा करावा लागतो. पण आपणास सद्गुरु सहजपणे भेटले आहेत. भक्तीच्या या वाटेवर आपण कसे आलो याचा अभ्यास करायला हवा. कशी याची गोडी लागली ? कसे यात रमलो ? कसे यातून जीवन सुकर झाले ? दुःखाच्या क्षणातही या मार्गावरील काटे कधी पायाला टोचले नाहीत. कधीही मन खचले नाही. ताठपणे उभे राहण्याचे सामर्थ्य या मार्गाने दिले. मनाला मोहात टाकणाèया घटना घडत राहिल्या पण त्यातून आपण कसे सावरत गेलो. हे कसे घडले ? मनोधैर्य देणारी ही शक्ती आहे तरी कशी ? हे जाणून घेण्याचा हा योग आहे. हा केवळ योगायोग आहे.

जगात नवेनवे शोध दररोज लागत आहेत. जग आता आपणास जवळ वाटत आहे. सातासमुद्रापारची माहितीही आता क्षणात घर बसल्या सहजपणे उपलब्ध होऊ शकते. जगही आपणास आता लहान वाटू लागले आहे. त्यामुळे आता इतर ग्रहावर मानव डोकावू लागला आहे. सूर्य मालेतील विविध गृह-तारेही त्याने शोधले आहेत. दररोज नवा शोध समोर येतो आहे. पण याला काही मर्यादा आहेत. हे जेव्हा तो जाणतो तेव्हा तो स्वतःचा शोध घेण्यामागे लागतो. मी कोण आहे? हे शोधण्याची त्याला आठवण होते. तोपर्यंत तो सर्वत्र भटकत राहातो. तिन्ही लोकांमध्येही त्याला रस वाटत नाही. तो जेव्हा कंटाळतो तेव्हा आळसाच्याक्षणी त्याला संजीवनी अगदी सहजपणे त्याला मिळते. त्याने तो तृप्त होतो.

भीती पोटी कोणताही भक्त आत्मज्ञानाच्या वाटेवर येत नाही. दुःख झाले म्हणून तो येथे येत नाही. ते एक निमित्त असते या वाटेवर येण्याचे. अनायासे तो या मार्गावर येतो. मन बळकट करणारा हा मार्ग आहे. मनाला धीर देणारा हा मार्ग आहे. पण या मार्गावर आपण सहजपणे आलो आहोत. जीवनाची ही वाट सहजपणे आपणास पार करायची आहे. जीवनाच्या या प्रवासात विविध उद्योग आपण करत असतो. यात प्रत्येकवेळी आपणास नफा होईल असे नाही. कितीही मोठा उद्योजक असला तरी नुकसानीचे चटके त्याला सोसावेच लागतात. म्हणून खचायचे नसते. नुकसान का झाले यावर उपाय योजायचे असतात. बळकट मनाने त्याला सामोरे जायचे असते. भरपूर मिळाले म्हणूनही हर्ष करायचा नसतो. सुख-दुःखात मनाला स्थिर ठेवायचे असते. आत्मज्ञानाच्या या लढाईत स्थिरतेला अधिक महत्त्व आहे. तरच ही लढाई जिंकता येते. अनायासे आपण ही लढाई लढत आहोत तेव्हा मनाची स्थिरता ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

अन् पारगड पुन्हा सजला…

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading