February 1, 2023
Book Review of Akasharlipi Chandrakant Potdar
Home » अक्षरलिपी : काव्यसमीक्षेतील अक्षरधन
मुक्त संवाद

अक्षरलिपी : काव्यसमीक्षेतील अक्षरधन

डॉ. पोतदार कवी असल्याने त्यांचा आणि कवितेचा आणि त्याबरोबरच समीक्षेचा जुळलेला सूर अक्षरलिपीच्या पानापानावर आपल्याला भेटतो. त्या सुरावटीत आपण तल्लीन होऊन जातो. त्यांची जीवनमूल्यांची जाण, संशोधकाची वृत्ती , रसिकता तसेच त्यांचे समाजभान अक्षरलिपीत ओतप्रोत भरलेले दिसते.

डॉ. योगिता राजकर,
वाई
मो.9890845210

‘अक्षरलिपी’ हा डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी लिहिलेला काव्यसमीक्षा ग्रंथ ललित पब्लिकेशनने प्रकाशित केलेला आहे. प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची अभ्यासपूर्ण आणि आत्मियतेनं लिहिलेली प्रस्तावना या ग्रंथास लाभली आहे. रवींद्र दामोदर लाखे यांची पाठराखण नेटकी असून अक्षरलिपी या ग्रंथाचं मर्म उलगडणारी आहे. आपल्या अनोख्या चित्रशैलीने चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी मुखपृष्ठ सजवले असून अक्षरलिपी या अक्षरांचे कोरीवकाम व वैशिष्ट्यपूर्ण मांडणी नजरेत भरते.

‘कविता इलाज नहीं करती,
लेकिन पीडा और शौक के दिनों में
लडने की
सकारात्मक शक्ती जरूर देती है’

गीत चतुर्वेदी यांच्या कवितेच्या संदर्भातील ओळींनी ग्रंथाची सुरुवात होते. ग्रंथाची विभागणी दोन भागात केली असून पहिल्या भागात मराठी वाड्मयविश्वातील निवडक साहित्यकृतींचा डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी रसिकतेने आस्वाद घेतला आहे. संत तुकाराम, ग. दि. माडगूळकर, इंदिरा संत, कृ. ब. निकुंब, ग्रेस , वसंत केशव पाटील, रवींद्र लाखे , कल्पना दुधाळ तसेच गिरीश कर्नाड यांच्या साहित्यकृतींचा सखोल अभ्यास करून त्यांनी ही समीक्षा लिहिली आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत संत तुकारामांच्या अभंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची कविता मराठी साहित्यात, मराठी संतपरंपरेत अजरामर ठरली आहे. त्यांचे जीवन सर्वसामान्यांसारखे होते. मात्र त्यांची विद्वत्ता उच्च कोटीतील होती. त्यांच्या अभंगातून व्यक्त होणारी प्रापंचिकता, वैचारिकता, तात्विकता, भक्तीकल्पना, आध्यात्मिकता , पारमार्थिकता, प्रबोधन आणि या सर्वांतून सिद्ध होणारे त्यांचे संतत्व, सर्वसामान्य व्यक्तीची होणारी फरफट याबाबत चिकित्सक मांडणी ‘संत तुकाराम यांची कविता’ या लेखात पोतदार यांनी केली आहे.

तसेच मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिभावंत कवी ग. दि. माडगूळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय थोडक्यात करून देऊन त्यांच्या कवितेतील सामाजिकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
‘इंदिरा संत: दुःखांचा खोपा विणणारी कवयित्री’ हे लेखाचे शीर्षक बोलके असून खूप काही सांगून जाते. आपल्या तरल भावविश्वाला कवितेत गुंफून विशुद्ध भावकविता लिहिणाऱ्या इंदिरा संत यांनी मराठी वाड्मयाला भावसंपन्न कविता दिल्या आहेत. शेला, मेंदी, मृगजळ आणि गर्भरेशीम या काव्यसंग्रहातून सजग काळाचे भान, जगण्यातील संघर्ष, जगण्यातील परिपूर्णता , कुरुपतेतील सौंदर्याचा शोध, मनातल्या भावनांचे हिंदोळे व्यक्त झालेले दिसून येतात. त्यांच्या कवितेतील कलात्मकता, सौंदर्य, अनुभवाचे प्रामाणिक रेखाटन, तरलता या काव्यातील गुणवैशिष्ट्यांना पोतदार यांनी अलवार टिपले आहे.

कवी कृ. ब.निकुंब यांनी हळुवारतेची संपन्न कविता लिहिली. त्यांच्या कवितेतील भावसंपन्नता , नवनव्या शब्दजाणीवा , शब्दश्रीमंती यावरून त्यांची संपन्न काव्यात्मकता, प्रतिभेची विस्तृतता , सूचक सौंदर्य दृष्टी, जीवनविषयक चिंतनविचार याबाबतची मांडणी “कृ.ब.निकुंब यांची कविता: निवळ शंख समजावणीचे जाणते शब्द’ या लेखात केली आहे.

ग्रेस यांच्या कवितेतील कलात्मकता, वाड्मयीन श्रेष्ठत्व अधोरेखित केली आहे.अनुभवांची व्यापक मांडणी, अंतस्थ व्याकुळता, संवेदनशीलता, परात्मता आणि या सर्वांना स्पर्श करणारी दुःखाची स्पर्शिका याशिवाय ग्रेस यांची कविता असूच शकत नाही. ग्रेस यांच्या कवितेतील व्यक्तिरेखा, प्रतिमा, त्यांचे ललितलेखनाची वैशिष्ट्ये व्यक्त केली आहेत. ‘ग्रेस:दुःखवैभवाची लिपी मांडणारा कवी’या लेखाच्या शीर्षकातून ग्रेस यांच्या लेखनाची जातकुळी स्पष्ट होते.

वसंत केशव पाटील यांच्या कवितेचं वेगळेपण टिपताना त्यांच्या कवितेची गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. चिंतनाची सखोलता, वास्तव टिपण्याची क्षमता, सामन्य माणसाच्या अंतर्मनातील सल पाटील यांच्या कवितेत व्यक्त होते. त्यांच्या कवितेतील ग्रामजीवन, आध्यात्मिकता ,प्रतिमांची व्यापकता याबाबत सखोल चर्चा पोतदार यांनी केली आहे.

‘रवींद्र लाखे:वर्तमान चिंतन आणि काळोख भिडले प्रश्न मांडणारा कवी ‘ अशी शीर्षकातच कवीची व कवितेची ओळख होते. रवींद्र लाखे यांच्या ‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’ आणि ‘अवस्थांतराच्या कविता’ या दोन काव्यसंग्रहाच्या संदर्भात लेखकाने चिंतनविचार मांडले आहेत. त्यांच्या कवितेला असणारी चिंतनाची डूब, आशयसंपृक्तता,वर्तमानातील जीवनवास्तव, वैश्विकता ,स्वतंत्र शैली या बाबींची उकल केली आहे. सामाजिक बांधिलकी, कवितेचे भाषिक सौंदर्य, कवितेचा काळ कवीने अधोरेखित केला आहे. आयुष्यातील क्षुद्रता आणि माणसाच्या जीवनाचे शोकात्म भान याचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. वैचारिक, भावनिक आणि संघर्षमय जीवन, समाजभान अशा अनेक पातळीवर त्यांची कविता व्यक्त होते. त्यांच्या कवितेची गुणवैशिष्ट्ये पोतदार यांनी टिपली आहेत.

कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेची बलस्थाने शोधताना त्यांच्या कवितेची व्यापकता, कवितेचा आवाका, आशय, भाषाशैली , मांडणी , अर्थ, विषय, ग्राम्यता, स्त्रीच्या जगण्याचे पडसाद, प्रतिमाविश्व या सगळ्यातून व्यक्त होणाऱ्या काव्याजाणीवा याबाबत सखोल चिंतन पोतदार यांनी मांडले आहे. ‘कल्पना दुधाळ:माती आणि माणसाचे आत्मबळ मांडणारी कवयित्री ‘ या लेखाच्या शीर्षकात कवितेचे आणि कवयित्रीचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. कृषीसंस्कृतीशी नाळ जोडत त्यांची कविता कृषिजीवनाशी, सृजनशीलतेशी संवाद साधते. त्यांच्या कवितेचा वेगळा बाज पोतदार यांनी आपल्या अनोख्या भाषाशैलीत उलगडला आहे.

काव्यसमीक्षेसोबतच नाट्यसमीक्षेचा विचार पोतदार यांनी केला आहे. सुप्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांच्या नाट्यलेखनाचा परामर्श त्यांनी घेतला आहे. गिरीश कर्नाड यांच्या वाड्मयीन व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देऊन त्यांच्या नागमंडल,अग्नी आणि पाऊस या दोन नाटकांची आशयसुत्रे पोतदार यांनी उलगडली आहेत. पुराणकथा, मिथककथा, लोककथा अशा मूळ कथांचा संदर्भ कर्नाड यांच्या नाटकामागे असल्याचे निरीक्षण पोतदार यांनी नोंदवले आहे.

अक्षरलिपी या समीक्षाग्रंथाच्या दुसऱ्या भागात वेगवेगळ्या काळातील कविताविश्वाची स्पंदने टिपली आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर मराठी कविता आणि जागतिकीकरण, ग्रामीण कवितेतील स्त्रीचित्रण, मराठी दलित कवितेतील मातृप्रेमाचे चित्रण, मराठी कविता आणि ग्रामीण वास्तव, मराठी कवितेतील श्रमिक शेतकरी चित्रण या संदर्भात विचार मांडले आहेत.

डॉ. पोतदार कवी असल्याने त्यांचा आणि कवितेचा आणि त्याबरोबरच समीक्षेचा जुळलेला सूर अक्षरलिपीच्या पानापानावर आपल्याला भेटतो. त्या सुरावटीत आपण तल्लीन होऊन जातो. त्यांची जीवनमूल्यांची जाण, संशोधकाची वृत्ती , रसिकता तसेच त्यांचे समाजभान अक्षरलिपीत ओतप्रोत भरलेले दिसते. मराठी वाड्मयसृष्टीत ‘अक्षरलिपी’ चा अनमोल ठेवा डॉ. पोतदार यांनी अभ्यासक, वाचक, रसिकांसाठी तन्मयतेने उपलब्ध करून दिला आहे.

Related posts

Saloni Art : घरीच बनवा सुंदर की होल्डर…

‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे

लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

Leave a Comment