कष्टाच्या कामात होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची मानसिकता ही ठेवायलाच हवी. ही मानसिकतचा आपणाला यशाकडे नेते. साधनेसाठीही अशीच मानसिकता ठेवायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसा कर्मे क्लेशाकारें । म्हणोनि न न्यावी अव्हेरें ।
कां अन्न लाभे अरुवारें । रांधातिये उणे ।। १४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत, म्हणून त्यांचा त्याग करतां कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशा शिवाया सुंदर अन्नाचा लाभ होईल का ?
कोणतेही कष्टाचे अवघड काम करताना त्रास हा असणारच, पण यातून चांगले होणार असेल तर त्याचा त्रास हा सहन करायलाच हवा. त्रासदायक आहे म्हणून काम सोडून देणे योग्य नाही. चांगले काम करताना दुर्जनांचा त्रास हा असतोच. हे लोक आपल्या अंगावर शिंतोडे हे उडवतातच. त्यांचा स्वभावच मुळी तसा असतो. यातून आपण त्रास करून न घेतलेले कधीही बरे. आपण आपले काम करत राहून दुर्जनांच्याकडे दुर्लक्ष करून आपला कार्यभाग साधन राहाणे हा शहाणपणा आहे. यातच आपले यश आहे.
दुधासाठी गायीचे संगोपन करताना शेणात हात घालावाच लागणार. घाण आहे म्हणून काम केले नाही तर दुधाचा लाभ कसा होईल ? गोठ्याची स्वच्छता ही करावीच लागणार. हे काम करताना कपडे खराब होतात. अंगाला घाण लागते. काही लोक नावे ठेवतात म्हणून काम सोडून चालणारे आहे का ? मातीच्या वस्तू तयार करताना मातीच्या चिखलात हात हा घालावाच लागतो. हाताला घाण लागते म्हणून काम सोडले तर आपल्या हातून चांगल्या मुर्ती, कलाकृती कशा घडतील ?
चांगल्या गोष्टीसाठी त्रास सहन करण्याची मानसिकता ही असायलाच हवी. मनात तसा विचार नसेल तर मन त्यामध्ये गुंतणार नाही. मनापासून केलेले कोणतेही काम हे चांगलेच होते. चांगल्या कामासाठी कष्ट करण्याची तयारी ही हवीच. सकारात्मक विचारातूनच मनाला धैर्य येते अन् मनाची तयारी होते. अशी मानसिकता लढण्यासाठी आवश्यक असते.
पोहायला शिकायचे आहे मग पाण्यात तर उतरावेच लागेल. पाण्यात न उतरता पोहायला शिकता कसे येईल ? पाणी थंड आहे म्हणून पाण्याजवळ बसून पोहायला शिकता येत नाही. पाण्यात उडी मारल्यानंतर कानात, तोंडात पाणी हे जाणारच. थोडा त्रास हा होणारच. म्हणून पाण्यातच उतरायचे नाही ही मानसिकता असेल तर प्रगती ही कधीच होणार नाही. पाण्यात उतरण्याचे धाडसच केले नाही तर, मग आपणास पोहायला कसे येणार. पोहायला शिकायचे असेल तर कठोर मनाने धाडस करून पाण्यात उडी मारायला हवी. पाण्यात पडल्यावर हातपाय हलवायला हवेत. बुडणार नाही या आत्मविश्वासाने कर्म करायला हवे. असे कर्मच आपणास पोहायचे कसे ते शिकवते. पोहायला शिकल्यानंतर पुन्हा पुन्हा आनंदाने पाण्यात उड्या मारण्याची इच्छा होते.
म्हणजेच कष्टाच्या कामात होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची मानसिकता ही ठेवायलाच हवी. ही मानसिकतचा आपणाला यशाकडे नेते. साधनेसाठीही अशीच मानसिकता ठेवायला हवी. अंग दुखते, हातपाय जड होतात, अंगात मुंग्या येतात हे असे त्रास होतात म्हणून साधनेचे कर्म सोडून देणे योग्य आहे का ? साधनेचे लाभ मिळवण्यासाठी हे सर्व त्रास सहन करण्याची मानसिकता ही ठेवायलाच हवी. या त्रासाकडे दुर्लक्ष करून साधनेवर मन केंद्रित केल्यास आत्मज्ञानाची कवाडे ही निश्चितच उघडतात. सुंदर ध्यानाचा लाभ मिळवण्यासाठी साधनेत होणारे त्रास हे सहन करायलाच हवेत. चांगल्या कामात संघर्ष हा अटळच असतो. कष्टाची भाकरीच मनाला आनंद देते. समाधान देते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.