July 27, 2024
Lokshahir Pharande Memory
Home » सत्यधर्मी लोकशाहीर : महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे
मुक्त संवाद

सत्यधर्मी लोकशाहीर : महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे

आज सहा ऑगस्ट. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांची पुण्यतिथी… त्यानिमित्ताने….

प्रा. निरंजन फरांदे,
आनेवाडी, सातारा मो.8600656447

महाराष्ट्र संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे शाहिरी वाड्:मय. याच शाहिरी परंपरेने मराठी मनांचे भरणपोषण केले आहे. कधी पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण, तर कधी वर्तमानातील विसंगतीवर आसुड, कधी लोकरंजनातून प्रबोधनाचा प्रयत्न अशी समाज जागा ठेवण्याची मोठी कामगिरी शाहिरी परंपरेने केली आहे.

शिवपूर्व कालखंडापासून ते आजपर्यंत शाहिरांची एक संपन्न परंपरा मराठी मातीने अनुभवली आहे.
आपला सातारा जिल्हा तर साक्षात नररत्नांची खाण. राजकारण, साहित्य, संस्कृती, कला, पराक्रम अशा सर्वच क्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व या साताऱ्याच्या मातीने देशाला दिली आहेत. लोकशाहीर महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे हे याच परंपरेतील एक महत्वाचं नाव. आज ६ ऑगस्ट. शाहिरांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा.

लोकशाहीर पुंडलिक फरांदे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे, राष्ट्रीय चळवळीच्या भारलेल्या काळाचे महत्त्वाचे साक्षीदार. प्रखर देशभक्त, हाडाचे सत्यशोधक विचारवंत, समाज परिवर्तनासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यप्रवण राहणारे कार्यकर्ते, लोकशिक्षक, ऐतिहासिक पोवाड्यांच्या जोडीला असंख्य लोकगीतांची रचना करणारे प्रतिभावंत रचनाकार अशा अनेक विशेषणांनी नव्या पिढीला शाहिरांची ओळख करून द्यावी लागेल.

भारतीय प्रबोधनाचे अग्रणी महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कर्त्या सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये शाहिरांचा समावेश होतो. सत्यशोधक समाजाचे वर्ग चालवून समाज जागृतीची मोठी चळवळ उभी करणाऱ्या सत्यशोधक विचारवंत केशवराव विचारे गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला.त्यातूनच आपल्या शाहिरी कलेचा वापर करून परिवर्तनवादी विचारांची पेरणी करण्यासाठी शाहिरांनी महाराष्ट्र पालथा घातला.कोणत्याही स्वरूपाच्या अर्थप्राप्तीची अपेक्षा न बाळगता त्यांनी हजारोंच्या संख्येने कार्यक्रम केल्याची नोंद इतिहासात आहे.

शाहिरी ही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी स्वतःच्या प्रतिभेला अभ्यासाची, चिंतनाची आणि समाज निरीक्षणाची जोड द्यावी लागते. शाहीर फरांदे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर पोवाडे रचले आहेत. त्यासाठी मोठी ज्ञानसाधना त्यांना करावी लागली. प्रतापसिंह महाराजांवर पोवाडा रचताना त्यांनी आज दुर्मिळ असलेले रघुनाथराव राणे यांनी लिहिलेले प्रतापसिंह चरित्र तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे दैवाचा सातारा हे प्रतापसिंह महाराजांवरील पुस्तक इत्यादी बरेच साहित्य जमवून अभ्यासले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन करताना –

क्रांतीचा डोंब पेटला | देश उठला | नेहरू आघाडीला
गांधीजींनी धुरा घेतली हाती | आझाद हिंद सेना जोर करती तेव्हा स्वराज्या झाली पूर्ती |’

अशा अनेक रचना शाहिरांनी केल्या.
शाहिरांनी लिहिलेल्या धनगर गीताला त्या काळातील प्रसिद्ध तमाशा कलावंत लक्ष्मी मंजुळा कोल्हापूरकर यांनी त्यांच्या संगीत बारीमध्ये घेतले होते. तेव्हा ते गीत इतके गाजले होते की त्याकाळी तब्बल एक लाख रुपये दौलत मराठी रसिकाने या गाण्यावर जादा केली होती.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह यशवंतराव मोहिते, शिवाजीराव पाटील यांच्यासारख्या राजकीय रथी-महारथींच्या बरोबरीने शाहिरांनी काँग्रेसची विचारधारा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यावेळचे नेते परिवर्तनवादी विचार परंपरेचे पाईक होते. लोकशाही समाजवादाच्या स्वप्नाकडे समाजाला घेऊन जाण्याची धडपड ते करत होते.काळाबरोबर या सर्वच गोष्टी मागे पडत गेल्याची खंत शाहिरांना होती.

ज्या काळात महात्मा फुले यांचे साहित्य अगदीच दुर्मीळ झाले होते. त्या काळात शाहिरांनी गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या दोन पुस्तकांच्या मूळ प्रती मिळवण्यासाठी महाराष्ट्र पालथा घातला. या पुस्तकांची दुर्मिळता आणि उपयुक्तता ध्यानात घेऊन शाहिरांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडे ही पुस्तके छापण्यासाठी तगादा लावला. थोर चरित्रकार धनंजय कीर यांना घेऊन शाहीर बाळासाहेब देसाई यांच्याकडे गेले होते. पुढे या कामाला व्यापकत्व प्राप्त झाले.
सातारा भागातील वैदू, कोल्हाटी, जोशी बागडी अशा भटक्या समाजाच्या विकासासाठी शाहिरांनी हयात खर्ची घातली. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अघोरी प्रथा, उच्चनीचता यांवर प्रहार करणारे पोवाडे शाहिरांनी लिहिले.अक्षर ओळख नसलेल्या या समाजाला सुधारण्याचा उपाय म्हणून त्यांनी लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मार्ग काढला. त्यासाठी असंख्य कार्यक्रम केले.

ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.आ. ह. साळुंखे शाहिरांच्या लोकगीत संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात,’ शंभर व्याख्यानांनी जो प्रभाव साधला नसता तो शाहीर पुंडलीक फरांदे यांच्या एका कार्यक्रमाने साधत होता.’ साताऱ्यातील ज्येष्ठ स्तंभलेखक आणि चरित्रकार जयवंत गुजर यांनी ‘शाहीर फरांदे एक वादळ’ या नावाने शाहिरांचे चरित्र लिहिले आहे.

त्या चरित्रात ते म्हणतात, ‘महाराष्ट्र भूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे हे असे एक शाहीर आहेत ज्यांची तुलना फक्त त्यांच्या स्वतःचीच होऊ शकते. आवाजातील मधाळ गोडवा, तालसुरांचा सुरेख समन्वय, यापेक्षाही काही खास वेगळेपण त्यांच्याकडे होते. ते वेगळेपण म्हणजे गोरगरिबांविषयीचा कळवळा. समाज जागरणाची मनस्वी ओढ आणि सत्यशोधकीय तत्वज्ञान हाच त्यांच्या शाहिरीचा आत्मा होता.

त्यांच्या कवनात अक्षरांची धुळवड नाही तर ते सामाजिक आक्रंदन आहे. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ते शेवटचे सत्यशोधक होते. समाज दर्शन घडविण्याची अभूतपूर्व ताकद त्यांच्याकडे असल्याने त्यांनी कधी बाजारी मार्केटिंग केले नाही. लोकरंजन व लोकशिक्षणासाठी त्यांची लोकगीते होती. जी शतकानुशतके आळवली जातील.’

अर्धशतकाहून अधिक काळ लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांनी मराठी जनमानसाचे मनोरंजन आणि प्रबोधन केले. शाहिरी क्षेत्रातील अत्यंत मानाचा शाहीर अमर शेख पुरस्कार देऊन शाहिरांचा गौरव करण्यात आला. २५ जून १९६९ या दिवशी मुंबई येथील ज्या सायन मांडवी कोळीवाडा सभागृहात जेथे पूर्वी ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण करण्यात आली, त्याच ठिकाणी महात्मा फुले यांच्या या सच्च्या अनुयायाला, लोकशाहीराला मुंबईच्या माथाडी कामगारांनी व महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी एकत्र येऊन उस्फूर्तपणे ‘महाराष्ट्र भूषण’ही पदवी अर्पण केली.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते आणि पद्मभूषण सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हजारो लोकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेताना लिहिले होते, महाराष्ट्रभरातून आलेल्या लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या चाहत्यांनी आणलेल्या हार तुऱ्यांनी एक ट्रॉली भरली असती. एवढे प्रचंड प्रेम महाराष्ट्रानेही शाहिरांवर केले. मराठी समाजाने उस्फूर्तपणे निवडलेला हा पहिला आणि बहुदा शेवटचाच महाराष्ट्र भूषण होता.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मलबार पालक अष्टपैलू पालेभाजी

साधना का करायची ?

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading