या ओवीत आकाश निळे नसल्याचे सांगितले आहे. पण आकाश निळे दिसते. ते का दिसते याचे कारण आपण पाहीले. म्हणजे आपण ज्ञानाने आकाशाचे स्वरुप काय आहे हे जाणले. तसे आपण आपले खरे स्वरुप काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न हा करायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां ।
तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ।। 242 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – आणि नसलेलाच निळेपणा आकाशांत दिसतो. तसा दिसेना का ? तरी तैं दिसणेंहि एका क्षणांत होते व जाते.
आकाश निळे का दिसते हा शोध आपल्या ऋषींनी यापूर्वीच लावलेला होता. हे या ओवीवरून दिसते. पूर्वीचे ऋषी हे विचारी होते. त्यांनी निसर्गातील सर्व बारकावे टिपण्याचा आणि अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. याचे अनेक पुरावे आपणास देता येतील. अनेक मंदिरात होणारा किरणोत्सव हा त्यापैकीच एक आहे. मंदिरातील स्थापत्य केलेतील वैशिष्ट्य हे पिढ्यानी पिढ्या सुरु असलेल्या अभ्यासातूनच कृतीत आलेले आहे. सूर्यापासून निघणाऱ्या किरणांचा अभ्यास त्या काळात केला गेला यातून सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायण हे नोंदविले गेले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकाश निळे का दिसते याबद्दल मत नोंदविणे तितके सोपे नाही. कारण यासाठी किरणांच्या सर्व छटांचा अभ्यास गरजेचा आहे.
पृथ्वी गोल असल्याचा शोधही पृथ्वीच्या बाहेर न जाताही या ऋषींनी लावलेल्या यातून स्पष्ट होते. सांगण्याचा हेतू इतकाच की पूर्वीच्याकाळीही विज्ञान तितकेच अभ्यासले गेले होते. विज्ञानातील उदाहरणे देऊन जगाचे प्रबोधन करण्याचे काम संतांनी केले आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ विज्ञानावर आधारित आहे. विज्ञानातून अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केला आहे. दुधाचे दह्यात अन् ताकात अन् त्यातून निघणारे लोणी या सह अनेक उल्लेख हे महाभारतात आढळतात. म्हणजेच जगात दिसणाऱ्या काही अद्भूत घटना या चमत्कार नसून त्यामागे दडलेले विज्ञानही तितक्याच ताकदीने मांडण्याचा प्रयत्न त्याकाळात केला गेला होता. ज्ञानेश्वरीत अशी अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. पशू, पक्षी यांचेही बारकावे टिपल्याचेही ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्यातून दिसून येते.
सूर्यापासून निघालेला प्रकाश बरेच अंतर कापत निर्वात पोकळीतून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. पृथ्वीच्या वातावरणात वायू व धुलीकण असतात. या वायूचे अणू व कण यांचा आकार प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान आहे. या अणू व कणांमुळे प्रकाश विखरतो. या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश अधिक विखुरतो यामुळे आपणास आकाश निळे दिसते. हे झाले शास्त्रीय कारण पण ज्ञानेश्वरांनी या ओवीत निळे आकाश मुळी निळे नसते असे म्हटले आहे. आकाशाला निळेपणा हा हवेतील कणांमुळे येतो. यातून जो प्रकाश पसरतो हा प्रकाश हा निळा आहे. तो आकाशात पसरल्याने आकाश निळे दिसते.
आजकाल प्रदुषणात वाढ झाली आहे. हवेचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. निळ्या रंगाचे आकाश आता बऱ्याचदा विविध रंगाचे दिसते कारण हवेत वाढलेल्या प्रदुषणामुळे आकाशाचाही रंग आता बदलताना पाहायला मिळत आहे. स्वच्छ निळे आकाश हे हवेचे प्रदुषण कमी असल्याचे संकेत देते. निसर्गातील हे सौंदर्य आपणास कायम ठेवायचे असेल तर प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करून निसर्गाचे संवर्धन करण्याचा विचार जोपासायला हवा.
या ओवीत आकाश निळे नसल्याचे सांगितले आहे. पण आकाश निळे दिसते. ते का दिसते याचे कारण आपण पाहीले. म्हणजे आपण ज्ञानाने आकाशाचे स्वरुप काय आहे हे जाणले. तसे आपण आपले खरे स्वरुप काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न हा करायला हवा. आकाशाच्या विविध छटांच्या सारखेच आपले स्वरुपही विविध प्रकारचे असल्याचे आपणास दिसते, भासते. हा देह हे आपले खरे स्वरुप आहे का ? तर ते खरे स्वरुप नाही. देहात आलेला आत्मा हे आपले खरे स्वरुप आहे. पण आपणाला आत्मा दिसत नसल्याने, त्याला रंग रुप नसल्याने तो आपणास ओळखता येत नाही. त्याची ओळख हे अनुभवाने, अनुभुतीने करून घेऊन ज्ञानी होण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. निसर्गाच्या या चमत्कारातून खरे अध्यात्म आपण ओळखायला शिकले पाहीजे.