September 12, 2024
Teachers Day Special article by Manisha Shirtavale
Home » खरा शिक्षक तोच जो फक्त…
विशेष संपादकीय

खरा शिक्षक तोच जो फक्त…

शिक्षक दिनाच्या निमित्ताने…..
माझ्या मते खरा शिक्षक तोच जो फक्त शब्दांतून न शिकवता आचरणातून, विचारातून अन प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतो, उर्मी निर्माण करतो. आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्यात असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देतो आणि त्यांना कमाल पातळीवर,उंचीवर पोचवण्यासाठी संधी निर्माण करून देण्यासाठी सजग राहतो, पाठपुरावा करतो.

गुरू हाच खरा मार्गदर्शक

भारतीय परंपरेत गुरू हाच ब्रह्म (निर्माण कर्ता), विष्णू (सृष्टी चालविणारा) आणि महेश्वर (करुणेचा प्रवाह)आहे असे मानले जाते. गुरूला मानवी आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे आजच्या शिक्षकदिनी आपल्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याची जाणीव ज्या विद्यार्थ्यांना होते तोच विद्यार्थी ज्ञानाची कास धरत भविष्यात मोठा बनतो.

आईवडिलांच्या नंतर प्रथमच गुरुच्या मायेच्या तर कधी आदरयुक्त धाकाच्या सावलीत बहरणारे अनेक विद्यार्थी जीवनाचे धडे घेत मोठे होत जातात. विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानाचे धडे न गिरवता जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान, नैतिक मूल्ये, कौशल्ये गुरूच्या मार्गदर्शनाखाली आत्मसात करतात. पूर्वीच्या काळी ज्ञान देणारे गुरु पुढे गुरुजी आणि आता शिक्षक म्हणून संबोधले जातात. शिक्षक म्हणजे शिकविणारे असा सरळ, सोपा अर्थ काढला जातो. शिक्षण देणारे शिस्तप्रिय, क्षमाशील अन कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षक. यामध्येच जीवनाचे सार असणारा खूप मोठा गहन अर्थ दडलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका दीपस्तंभ मार्गदर्शकाची असते. कुटुंबात प्रेम,माया देणारे, काळजी घेणारे आई-वडील, आजी आजोबा, भावंडे, नातलग आपल्या पाल्याच्या मनात सुरक्षितपणाची भावना निर्माण करतात, आत्मविश्वास वाढवतात. शाळेत शिक्षक आणि मित्र परिवाराच्या सोबतीत मुले मोठी होतात.

याच संवेदनाक्षम वयात जी बिजे पेरली जातात, तीचं भविष्यात विकसनशील वृक्षाचे रूप धारण करतात. त्यामुळे शाळेत जाणीवपूर्वक अशा शैक्षणिक अनुभूतींचे आयोजन शिक्षकांनी केलेच पाहिजे, केलेही जाते. या वयात संगतीचे दूरागामी परिणाम होतात, त्यामुळे आई वडील आणि शिक्षक यांची जबाबदारी वाढते. आपल्या मुलाच्या किंवा विद्यार्थ्याच्या वर्तनावर, हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध कायम ठेवत संवाद वाढवत गेले पाहिजे. माझ्या मते खरा शिक्षक तोच जो फक्त शब्दांतून न शिकवता आचरणातून, विचारातून अन प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतो, उर्मी निर्माण करतो. आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्यात असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देतो आणि त्यांना कमाल पातळीवर,उंचीवर पोचवण्यासाठी संधी निर्माण करून देण्यासाठी सजग राहतो, पाठपुरावा करतो.

शिक्षकाने फक्त गुणांचा फुगवटा वाढवण्यासाठी कार्य न करता विद्यार्थ्यांच्या भावभावनांचा सकारात्मक विकास होईल, यासाठी प्रयत्नशील असावे. त्यांच्या कर्मेंद्रियांचा उपयोग योग्य दिशेने होण्यासाठी विविध कृती कौशल्यांचे शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा रुजण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. शिक्षकाने समाजाचा घटक होणाऱ्या या भावी पिढीला प्रत्यक्षात सामाजिक समस्या निदर्शनास आणून उपाय सुचवण्यासाठी विचार प्रवृत्त करावे. आवर्जून सामाजिक भान निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करावे.

सद्यस्थितीत प्लास्टिक निर्मूलन, ओला किंवा सुका कचरा संकलन, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक जागांची सफाई ,ऐतिहासिक वारसा जतन करणे अशा अनेकविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा निर्माण कराव्यात. आपला विद्यार्थी भविष्यात फक्त स्वतःचे जीवन यशस्वी, समृद्ध, आनंदी करण्यासाठी न झटता संपूर्ण समाजहिताचे कल्याण कसे होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी झटला पाहिजे, ही भावना त्यांच्यात रुजवली गेली पाहिजे.

ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी कायम नाळ जोडून राहिले पाहिजे. राष्ट्रहितार्थ मातृभूमीसाठी आयुष्यभर जगण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे,असा ठाम विश्वास निर्माण करता आला पाहिजे. सध्याच्या अध:पतनाकडे नेणाऱ्या समाजातील भ्रष्टाचार, फसवणूक करणाऱ्या गोष्टींना बळी न पडता ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान यासोबत कष्टाची व सत्याची कास धरणारे निर्भीड युवक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आजची राजकीय वलयात भरकटणारी तरुण पिढी ही सामाजिक स्तर उंचविण्यासाठी पुढे यावी यासाठी शेती, उद्योग क्षेत्राशी निगडित प्राथमिक कौशल्यांचे कृतियुक्त ज्ञान शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावयास हवा. उद्याच्या महासत्ताक भारत, विकसित, प्रगतशील भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी या घडीला ‘शिक्षक’ हा एकमेव पर्याय असेल. हे लक्षात घेतले पाहिजे!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पुन्हा एकदा..

विषमतेचे गगन भेदत घेतलेली उंच झेप…

परिवर्तनाच्या चळवळीत वंचित घटकांना आंबेडकरवाद्यांनीच जवळ केले : दिशा पिंकी शेख

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading