ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे म्हणजे काव्याच्या संदर्भातील नवीन भाषाच शिकणे असते, याचा बोध ह्या पुस्तकातून वाचकांना नक्कीच होईल.
डॉ. रमेश वरखेडे
संत तुकोबाराय हे महाराष्ट्राचे संस्कृतीपुरुष म्हणून ओळखले जातात. महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, रा. गो. भांडारकर, वा. ब. पटवर्धन, सदानंद मोरे यांच्यापर्यंत आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक धुरिणांचा तुकोबांच्या अभंगवाणीवर पिंड पोसला गेला आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक टेहळणीचा बुरूज अशा शब्दांत राम बापट यांनी तुकोबांच्या कार्याचे यथार्थ वर्णन केले आहे. दिलीप चित्रे यांनी तर इंग्रजी वाङ्मयात जे स्थान शेक्सपीअरला तेच स्थान मराठी साहित्यात तुकोबारायांना असल्याचे म्हटले आहे.
संत वाङ्मयाच्या सामाजिक फलश्रुतीविषयी मराठीत बराच विचारविमर्श झाला आहे; परंतु काही थोडे अपवाद वगळले तर त्यांच्या अभंगांची काव्यकेंद्री समीक्षा फारशी झालेली नाही. दिलीप धोंडगे यांनी तुकोबारायांच्या अभंगवाणीची • विस्ताराने शैलीमीमांसा करून ही तूट भरून काढली आहे. डॉ. नंदकुमार मोरे यांनी ह्या शैलीमीमांसेविषयी समकालीन समीक्षकांचे चिकित्सक अभिप्राय मागवून फोडिले भांडार ह्या शीर्षकाने संपादन केले आहे. या विविध अभिप्रायांतून तुकोबांच्या अभंगवाणीच्या अनुषंगाने दोनशे वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या विचारविश्वात जे बौद्धिक दोहन सुरू होते, त्या बौद्धिक परंपरेचे सम्यक दर्शन घडते. या ग्रंथाची ही सर्वात मोठी फलश्रुती आहे.
दिलीप धोंडगे यांनी उर्ध्वगामी पद्धतीने ब्लूमफील्ड, रोमान याकोबसन, मुकॉराव्हस्की, सिंक्लेअर, जॉफरी लीच, सॅम्युअल लेविन, जे. पी. थोर्न इत्यादींना वाट पुसत वाङ्मयीन शैलीमीमांसेची तत्त्वचर्चा करीत तुकोबांच्या भाषिक रचनाबंधांचे सूक्ष्म वाचन केले आहे. ओवी आणि अभंग या लोकछंदांची चर्चा, तुकोबांच्या अभंगवाणीतील कथनपरता, भाषिक समांतरन्यासाचे खेळ, खेळांची रूपके, चिद्विलासवादी तत्त्वज्ञानातून साकारलेली वारकरी शैलीची संप्रदायविशिष्ट पृथगात्मता अशा अनेक अंगांनी तुकोबांच्या अभंगवाणीचे काव्यशास्त्र या समीक्षालेखांतून रूपबद्ध झाले आहे.
ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे म्हणजे काव्याच्या संदर्भातील नवीन भाषाच शिकणे असते, याचा बोध ह्या पुस्तकातून वाचकांना नक्कीच होईल.
पुस्तकाचे नाव – फोडिले भांडार
संपादक : नंदकुमार मोरे
प्रकाशक – भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
मूल्य : ₹ ४००/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.