November 21, 2024
teaching from Microsoft issue
Home » मायक्रो‘सॉफ्ट’चा झटका !
संशोधन आणि तंत्रज्ञान

मायक्रो‘सॉफ्ट’चा झटका !

तंत्रज्ञानाचा वापर मानवाने केला पाहिजे, तो अत्यावश्यकही आहे. मात्र आता हे तंत्रज्ञानावरील असणारे मानवाचे अवलंबत्व टोकाला गेले आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानवी हाताना काम हवे आहे.

संदेशवहन, गणन, लेखन, छायाचित्रण, कार्यालयीन कामकाज अशा सर्व कार्यासाठी संगणकाचा वापर सर्वत्र सुरू आहे. गरीब देशातही संगणक प्रणाली पोहोचल्या आहेत. या संगणकामध्ये विविध प्रणाली वापरण्यात येतात. संगणकामध्ये सर्वाधिक प्रमाणात मायक्रोसॉफ्ट कंपनीची प्रणाली वापरण्यात येते. ही प्रणाली नियमीत अद्ययावत करण्यात येते. आधुनिक प्रणाली, ज्या-ज्या संगणकात अधिकृत प्रणाली प्रस्थापित करण्यात आलेली आहे, अशा सर्व संगणकांना ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येते. अर्थात मायक्रोसॉफ्ट प्रणालीमध्ये अनेक घटक संच प्रणाली आहेत. त्या संच प्रणालीमध्ये परत उपघटक आहेत.

प्रामुख्याने कार्यालयीन कामकाजासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरण्यात येते. या संच प्रणालीमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, मायक्रोसॉफ्ट आउटलूक, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, मायक्रोसॉफ्ट पब्लिशर अशा अनेक उपघटक प्रणाली आहेत. याचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी करण्यात येतो. यामध्ये पत्र व्यवहार, टंकलेखन, स्तंभलेखन, पत्रांची देवाणघेवाण, लेखे तयार करणे इत्यादी कामासाठी करण्यात येतो. पॉवर पॉईंटचा वापर माहितीच्या सादरीकरणासाठी करण्यात येतो. वर्डमधील डॉक प्रणाली इतकी लोकप्रिय झाली आहे की लेखन दस्तऐवजामध्ये ती सर्वाधिक वापरण्यात येते.

मायक्रोसॉफ्टकडून अशाच एका प्रणालीमध्ये करण्यात येणारा बदल पाठवला आणि मायक्रोसॉफ्ट प्रणाली बंद पडली. जगभरातील अनेक देशातील बहुतांश सेवा शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी बंद पडल्या. बँकांचे काम थांबले. शेअर मार्केट बंद झाले. विमानसेवा विस्कळीत झाली. अनेक विमान कंपन्याची उड्डाणे रद्द करावी लागली. भारतातील इंडिगो या एका कंपनीची आठशे उड्डाणे रद्द करावी लागली. अनेक कंपन्यांनी मनुष्यबळाचा वापर करून सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न केला. जगभरात सर्वात मोठी संगणक सेवा पुरवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा सर्वर बिघडला. जगभरातील संगणक आणि लॅपटॉपवर असणाऱ्या विंडोज प्रणालीच्या संगणकावर निळा पडदा (ब्ल्यू स्क्रिन) दिसू लागला. मायक्रोसॉफ्ट प्रणालीमधील ॲझ्युअर (Azure) प्रणालीमध्ये काही बदल केले होते. ते बदल इंस्टॉल करताना ही समस्या उद्भवली आणि जगभरात हाहाकार माजला.

अर्थात या समस्येतून बाहेर पडण्यासाठी लगेचच वापरकर्त्यांसाठी मायक्रोसॉफ्टने सूचना जाहीर केल्या. विंडोज सुरक्ष‍ित मोड किंवा विंडोज रिकवरी इन्व्हॉयरमेंटमध्ये बूट करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर क्राउड स्ट्राईक डिरेक्टरीवर जाऊन सी-०००००२९१ ही फाईल शोधून हटवणे आवश्यक होते. त्यानंतर संगणक पुन्हा सुरू केल्यानंतर ते संगणक पूर्ववत सुरू झाले होते. मात्र हे करेपर्यंत सेकंद ना सेकंद महत्त्वाचा मानणाऱ्या जगात हाहाकार माजला.

अर्थात सी-०००००२९१ ही एक फाईल या सर्व गोंधळाला जबाबदार होती. खरे तर ही प्रणाली सायबर हल्ल्यापासून आपल्या संगणकाला वाचवण्यासाठी बनवण्यात आले आहे. वर्कलोड काँफिगरेशनमध्ये बदल करताना राहिलेल्या त्रुटीमुळे हा गोंधळ झाला. ज्यामुळे स्टोरेज आणि संगणक संसाधनामध्ये अडथळा निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळा निर्माण झाला. एका फाईलमुळे जगाला काही अंशी का होईना ठप्प केले. या घटनेचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला. अमेरिकेतील एकूण ९११ सेवा बंद पडल्या होत्या. अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आणि जर्मनीतील बँका, मोबाईलसह संदेशवहन सेवा, दूरचित्रवाहिन्या, विमान वाहतूक, रेल्वे आरक्षण, शेअर बाजार, आरोग्य, अशा अनेक सेवांवर पडला. मायक्रोसॉफ्ट कंपनीला परिणामी सोळा अब्ज डॉलर्सचा फटका बसला. कंपनीचे क्राऊडस्ट्राईकचे शेअर्स एका दिवसात २१ टक्क्यांनी घसरण झाली.

मायक्रोसॉफ्टचे जे काही नुकसान व्हायचे ते झाले. ते होणे स्वाभाविक होते. मात्र या निमित्ताने मानवाची हतबलता समोर आली. आपण तंत्रज्ञानाच्या मागे लागत मानवाचे कष्ट कमी करत जात आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दिवसेंदिवस मानवाचे कष्ट कमी होत आहेत, यात शंका नाही. मात्र आपण तंत्रज्ञानाच्या हातचे बाहुले बनत चाललो आहोत. आजवर खाणीतून खनिजे काढणे, उच्च तापमानाच्या भट्टीमध्ये धोकादायक वातावरणात मनुष्यबळ कार्यरत असायचे. आजही अनेक फाउंड्रीमध्ये कामगार काम करतात. मात्र या मनुष्यबळाची जागा आता यंत्रमानव घेत आहे. या यंत्रमानवाचे नियंत्रण पूर्णत: संगणक प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येते. वाहनातून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी आता चालकाची गरज राहणार नाही कारण स्वंयचलित आणि स्वंयनियंत्रीत वाहने बाजारात येत आहेत. अशा सर्व वाहनांमध्ये कार्यरत असते ती संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्टप्रमाणेच बाधीत झाली तर काय होऊ शकते, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बाजारातून ताजी मेथी किंवा शेपूच्या दोन पेंड्या आणण्यासाठी दोन किंवा चार चाकी वाहन वापरायचे. त्यासाठी इंधन जाळायचे. जागतिक तापमान वाढ करणारी प्रदूषके वातावरणात सोडायची आणि नंतर तंदुरुस्त राहण्यासाठी घरात इलेक्ट्रिकवर चालणारी सायकल आणून व्यायाम करायचा. त्यासाठी लागणारी वीज निर्माण करण्यासाठी पुन्हा कोठेतरी इंधन जाळायचे, प्रदूषण करायचे. असे इतरही अनेक ठिकाणी चाललेले आहे. मानवी जीवन, आपला प्रवास कसा सुखकर होईल, याचाच अहर्निश विचार करत मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती सुरू ठेवली आहे. याचा निसर्गावर काय परिणाम होतो, त्याचा जैवविविधतेवर, पर्यावरणावर काय परिणाम होईल, हे तंत्रज्ञानच शस्त्र म्हणून आपल्यावर उलट आघात करणार नाही ना, याचा विचार कधीच केला जात नाही. असा एखादा प्रसंग घडतो आणि तेव्हा जाणीव होते की आपण किती तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत.

तंत्रज्ञानाचा वापर मानवाने केला पाहिजे, तो अत्यावश्यकही आहे. मात्र आता हे तंत्रज्ञानावरील असणारे मानवाचे अवलंबत्व टोकाला गेले आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानवी हाताना काम हवे आहे. भारतासारख्या देशात तर कोटीने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आहे. दुसरीकडे आपण तंत्रज्ञान वापरून आधिकाधिक कष्टाची कामे कमी करत आहोत. यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, मात्र त्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक बनते. काहीही झाले तरी तंत्रज्ञानाचा वापर करताना पूर्वीपासून सुरू असलेल्या मनुष्यामार्फत काम करत असताना वापरल्या जाणाऱ्या पद्धती विसरल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी. अन्यथा, मायक्रोसॉफ्ट प्रणालीप्रमाणे बंद पडली, तसे एक दिवस तंत्रज्ञान बिघडले तर जगणे अवघड होईल!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading