शेअर बाजार साप्ताहिक समालोचन
अंबुजा सिमेंट्स कंपनीचा भाव 4.01 टक्क्यांनी खाली घसरून 548.85 रुपये पातळीवर बंद झाला. गेल्या सप्ताहामध्ये या कंपनीमध्ये संघी इंडस्ट्रीज व पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. त्यानंतरही शेअरची घसरण कायम राहिली.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संपलेला सप्ताह भारतीय शेअर बाजारांसाठी खूपच प्रतिकूल राहिला. या सप्ताहातील प्रत्येक सत्रामध्ये दररोज सर्व प्रमुख निर्देशांक सातत्याने खाली कोसळत राहिले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेचे अनाकलनीय पतधोरण, भारतीय रुपयाची झालेली मोठी घसरण व परदेशी वित्त संस्थांनी सप्ताहभर सातत्याने केलेला विक्रीचा मारा या सर्वांचा संयुक्त परिणाम होऊन भारतीय शेअर बाजारांवर दाणादाण उडालेली होती. त्यामुळे मुंबई शेअर निर्देशांक, मिडकॅप, स्मॉल कॅप निर्देशांक व राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टी यांच्यात सर्वाधिक घसरण या सप्ताहात झाली. गेल्या चार सलग सप्ताहांमध्ये असलेले अनुकूल वातावरण या सप्ताहात केवळ प्रतिकूल झाले नाही तर सर्व प्रमुख कंपन्यांची जोरदार घसरण पहावयास मिळाली.
गेल्या सप्ताहात मुंबई शेअर निर्देशांकामध्ये 4 हजार 91.53 अंशांची किंवा 4.98 टक्क्यांची मोठी घसरण होऊन तो अखेरीस 78 हजार 41.59 अंश पातळीवर बंद झालेला होता. तसेच मिडकॅप निर्देशांकात 3.24 टक्क्यांची तर स्मॉल कॅप निर्देशांकात 3.17 टक्क्यांची मोठी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजारावरील 50 प्रमुख कंपन्यांवर आधारलेला निफ्टी गेल्या सप्ताहात 1180.8 अंशांनी किंवा 4.77 टक्क्यांनी खाली घसरून 23 हजार 587.50 अंश पातळीवर स्थिरावलेला होता.
गेल्या सप्ताहाचा धावता आढावा घ्यायचा झाला तर सोमवार दिनांक 16 डिसेंबरच्या पहिल्याच सत्रामध्ये वातावरण प्रतिकूल राहिल्याने मुंबई शेअर निर्देशांकात 385 अंशांची तर निफ्टी मध्ये 100 अंशांची घसरण झाली. मंगळवार दिनांक 17 डिसेंबरच्या सत्रामध्ये हेच वातावरण कायम राहिली मात्र निर्देशांकांची घसरण जोरदार झालेली आढळली. या सत्रात मुंबई शेअर निर्देशांकामध्ये 1064 अंशांची तर निफ्टी मध्ये 332 अशांची मोठी घसरण नोंदवली गेली. बुधवार दिनांक 18 डिसेंबरच्या सत्रामध्येही वातावरण तसेच राहिल्याने मुंबई शेअर निर्देशांक 502 अंशानी तर निफ्टी 137 अंशांनी खाली घसरलेला होता. गुरुवार दिनांक 19 डिसेंबरच्या सत्रामध्ये जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरणापोटी आणखी भर पडली व मुंबई शेअर निर्देशांक 964 अंशांनी तर निफ्टी 287 अंशांनी खाली घसरलेला होता. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबरचे सप्ताहाचे अखेरचे सत्र खूपच प्रतिकूल राहिल्याने मुंबई शेअर निर्देशांक तब्बल 1176 अंशांनी तर निफ्टी 364 अंशांनी खाली कोसळलेले होते. एकंदरीत सलग पाच सत्रांमध्ये निर्देशांकांची मोठी घसरण नोंदवली गेली.
यामध्ये अनेक प्रमुख कंपन्यांची भाव पातळी जोरदार खाली गेलेली होती. जे एस डब्ल्यू एनर्जी या कंपनीचा भाव 1.23 टक्क्यांनी खाली घसरून 670.10 रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प मिळाल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतरही बाजाराची ही प्रतिकूल प्रतिक्रिया होती. एचडीएफसी बँक याचा भाव गेल्या सप्ताहात 4.97 टक्क्यांनी खाली घसरला व 1772.05 रुपयांवर बंद झाला. या बँकेचे वरिष्ठ अधिकारी अरविंद कपिल यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात सेबीने काही पत्र पाठवल्याच्या वृत्तापोटी घसरणीला जास्त बळ मिळाले होते. टाटा मोटर्स चा भाव गेल्या सप्ताहात 8.42 टक्क्यांनी खाली कोसळून 724 रुपयांवर बंद झाला.
उत्तर प्रदेश सरकारकडून या कंपनीला 3500 पेक्षा जास्त बसेसची मागणी नव्याने नोंदवूनही बाजाराची ही प्रतिकूल प्रतिक्रिया होती. अंबुजा सिमेंट्स कंपनीचा भाव 4.01 टक्क्यांनी खाली घसरून 548.85 रुपये पातळीवर बंद झाला. गेल्या सप्ताहामध्ये या कंपनीमध्ये संघी इंडस्ट्रीज व पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. त्यानंतरही शेअरची घसरण कायम राहिली. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा भाव गेल्या सप्ताहात 5.46 टक्क्यांनी घसरला व 315.75 रुपये पातळीवर बंद झालेला होता.स्पाइस जेट या कंपनीत विमान विमान सेवा कंपनीचा भावही गेल्या सप्ताहात 1.28 टक्क्यांनी खाली घसरला व 57.84 रुपयांवर बंद झाला. स्टील एक्सचेंज इंडिया याच्या भावातही 4.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 10.58 रुपयांवर बंद झाला. कंपनीने बाजारातून 600 कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्याचे जाहीर केल्यानंतरही घसरण झाली. एशियन पेंट्स या कंपनीचा भावही गेल्या सप्ताहात 5.15 टक्क्यांनी घसरला व 2283.05 रुपये पातळीवर बंद झाला. या कंपनीच्या श्याम स्वामी व विष्णू गोयल या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर बाजाराची ही प्रतिक्रिया होती.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.