जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा
स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर किंवा झोपडीत सुंदर तरुण बाई राहणं म्हणजे संकटच. कधी, केव्हा तिच्यावर घाला घातला जाईल ते सांगता येत नाही. ती सुरक्षित, पवित्र राहूच शकत नाही. हुंड्यासाठी तिचा छळ, सासरच्या मंडळींकडून मारहाण किंवा हाकलून देणे ह्या गोष्टी नेहमीच्याच आहेत. लग्न होऊन वर्ष झालं तरी हिला मूल होत नाही हा एक मोठा मुद्दा तिच्या छळाला कारणीभूत होतो. एकूण स्त्री, आदिवासी, भटके विमुक्तांचे जीवन अशा भोगवट्यात होरपळून निघत आहे. हे लेखकाने अगतिक किंवा प्रक्षोभकरित्या न मांडता संयत पध्दतीने मांडलेले आहे.
योगीराज वाघमारे
सोलापूर
‘भोगवटा’ म्हणजे नशिबात जे असेल ते घडणार. त्याला आपण काही करू शकत नाही. पूर्वजन्मी केलेल्या पापाचं फळ म्हणजे सध्या तुम्हाला प्राप्त झालेलं जीवन. तेव्हा त्यातून सुटका नाही. मुकाट सहन करा. तरच तुम्हाला पुढील जन्म चांगला मिळेल. किती बिनतोड युक्तीवाद. सटवीने जसं लिहिलं तसंच घडणार! पण ही सटवी कोण ? तिने आमच्या बाबतीत असे कां लिहावे? गावात घरं नाही. शेतही नाही. सारखी भटकंती आम्ही करायची. स्थिर जीवन कुठेच नाही. गाढवं, डुकरं, कुत्री, मांजरी हीच संपत्ती. उन्हापावसात, थंडीवाऱ्यात राहायचं, फिरायचं, नासकं कुजलं खायचं. दुसऱ्याला दृष्टीस पडू नये म्हणून रात्रीचा संचार. त्यांना आमचा स्पर्श वर्ज्य. आमची दृष्टी सतत खाली. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही. धनसंपत्ती मिळवायची नाही. हे असे का? हजारो वर्षापासून सहन करीत आहोत. पिढ्यानं पिढ्या बर्बाद झाल्या. याला जबाबदार कोण ? सटवीला विचारलं तर आमच्या जिव्हा छाटल्या जायच्या. प्रश्न विचारायचा नाही असं धर्मानं सांगितलं. कोणता धर्म ? तुम्ही सांगताय तो धर्म? आमच्यावर का लादताय. हजारो वर्षापासून छळ चालवलाय तुम्ही. गुलाम केलंय तुमच्या धर्माने. भोगवटा लावलाय मागे आमच्या. पण अत्याचाराला परिसिमा असते. शोषणाला मर्यादा असते. केव्हातरी स्फोट होतोच.
येथील काही समाजसुधारक महापुरुषांनी वंचित, भटक्या विमुक्त गावकुसाबाहेरील विश्वात नव्या विचारांची ठिणगी टाकली. व्यवस्थेला धक्का दिला. मुक्या समाजाला वाचा फोडली. आज सगळे वंचित, दबलेले आणि दाबलेले जातीघटक बोलू लागले. वाचू लागले. लिहू लागले. ठिणगीगत अभिव्यक्त होऊ लागले. धर्माने आणि व्यवस्थेने त्यांच्या गळ्यात बांधलेल्या गुलामीच्या बेड्या तोडू लागले. ते क्रांती सन्मुख झाले. नव्या विचाराने प्रभावित झाले. आता माणूस म्हणून त्यांच्या जगण्याला नवा आयाम प्राप्त झाला आहे. अशा जगण्याची काव्य झाले. महाकाव्ये झाले. नाट्य झाले. महानाट्य झाले. अनेक हात लिहित झाले. निर्मिती करू लागले. सुंदर आणि अजोड साहित्य निर्माण करू लागले. या देशाच्या भव्य आणि दिव्य अजोड वास्तू, कलाकृती ह्याच गावकुसा बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. देशाला पवित्र आणि सुंदर बनविण्यात यांचा हात आहे. आज त्या घटकांना आपल्या पूर्व सामर्थ्याची ओळख झाली आहे. लेखणीचं सामर्थ्य त्यांना कळून चुकले आहे. अनेक लिहित्या हातात प्रा. डॉ. अनंता सूर याचा एक हात आहे. त्यांनी ‘वाताहत’ नंतर ‘भोगवटा’ साहित्य विश्वात सादर केला आहे. अस्थिर समाजाचा ‘भोगवटा’ सांगत असतांनाच ते त्यांच्या जीवनात नवा उन्नतीचा विचारही पेरतात हे उल्लेखनिय आहे.
भटके लोक एका गावावरून दुसऱ्या गावाला कुटुंबकबिला घेऊन जातात. घोड्यावर सर्व सामान लादायचं. मजल दरमजल करीत वाट काढायची. गावाच्या कडेला हागणदारीला नाही तर स्मशानभूमीत बिऱ्हाडं थाटायची. दोन नाही तर तीन दिवस राहायचं. आलं तसं उठायचं. लेकरंबाळं घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचं. गाव त्यांना नसतेच. या देशाचे रहिवाशी असूनही त्यांच्या नावाने कुठेच इंचभर जागा नाही. मग कोणत्या गावचे म्हणून सांगायचे ? गावाचा अभिमान का म्हणून बाळगायचा. ‘हा माझा देश आहे’ हे त्यांनी कसं म्हणायचं. एक नाही अशा हजारो जाती हजारो वर्षापासून भटकंती करतात. स्थिर कुठेच नाहीत. वाटेवरच जन्माचं वाटेवरच मरायचं. मुडदा मातीआड करायचा अन् पुढं निघायचं. हे त्यांच जिणं. संस्कृतीरक्षकांना त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. ‘नियती’ कथेतला नायक शामा आपल्या बापाला म्हणतो.
‘आता इथंच राहू. पुरं झालं फिरणं. कामधंदा बघू’
त्यांच्या तोंडून आलेले उद्गार हजारो वर्षाचं दुखणं, अगतिकता व्यक्त करतात. ज्या अर्थी आपण या भूमीत जन्मलो त्या अर्थी आपल्या वाडवडिलांची स्थावर मालमत्ता असेल ना! ती इथल्या धनदांडग्यानी लुबाडली. असे नकळत आर्य अनार्यांच्या लढाईचा संदर्भ येऊन जातो. मूळ रहिवाश्यांना हरवून त्यांचं सर्वस्व लुबाडून त्यांना असं भटकायलं, बेघर, बिना घराचे जिणं दिलेलं आहे. बिन चेहऱ्याचा हा जातसमूह आहे. त्यांना बेदखल केलं आहे. आणि धर्मबुडवीचे पापाचे फळ असे सपशेल खोटे बोलून त्यांना नागविलं जात आहे. येथे जर ते स्थिर झाले तर आपली या देशात नागरिक म्हणून नोंद होईल. जातीचे धंदे सोडून इतर व्यवसाय करता येईल. व्यवसाय केला तर हाती पैसा येईल, आर्थिक विवंचना दूर होईल म्हणजेच माणसाच्या मुलभूत गरजा, निवारा, अन्न, कपडा, पाणी भागविल्या जातील. असा सूचित मतितार्थ नायकाच्या तोंडून येतो. लेखक मोठ्या कुशलतेने भोगवटा कशामुळे निर्माण झाला त्याचं विश्लेषण करतात. परंतु गंमत अशी आहे की, स्वातंत्र्य मिळून ७०-७५ वर्षे झाली तरी भटक्यांना स्थिर केलेलं नाही. त्यांना रेशनकार्ड नाही. मतदानाचा हक्क तर दूरच. वंचित, भटके विमुक्त किती लाभार्थी आहेत हे समजून येत नाही. त्यांची गणना नाही.
नायक अजून एक गोष्ट सांगतात ‘या पुढे पोरांना शाळेत घालू.’ त्यांची एक वेदना आहे. शाळा शिकत असताना बापाने मधून मला शाळा सोडायला लावलं अन् फिरती लावली. या पुढे पोरांचं तसं होऊ नये म्हणून त्यांना तरी शिकू द्या.’ शिक्षण घेतल्याने काय होईल हे त्यांला पूर्णपणे माहित नसलं तरी शिक्षण नवा विचार देतं. आपल्या वाईट स्थिती बद्दल ज्ञान देतं. मन बंड करून उठेल ! संस्कृती, धर्म आणि व्यवस्थेला प्रश्न विचारेल. एवढं बळ शिक्षणात साठवलेलं आहे. म्हणून तो बोलून जातो. लेखक महापुरुषांचे विचार आपल्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यातून नक्कीच जन्माचा भोगवटा दूर होणार आहे. लेखक, कवी, कलावंत आपल्या कलाकृतीतून समाजाला अशी नव्या ताकदीती उर्जा देत असतात.
भटक्या लोकांबद्दल समाजात गैरसमजूत पसरून ठेवलेली आहे. त्यांचा काफीला गावगुजरीला उतरला म्हणजे ‘आज नक्कीच गावात चोरी होणार’ म्हणून आधी त्यांना विचारलं जातं. ‘दोन दिवस राहायचं तिसऱ्या दिवशी हलायचं. चोरी करायची नाही. नाहीतर फुकांफुकी मरून जाल!’ पोलिसांचा तर वहिम असतो. कुठं चोरी झाली की आधी भडक्यांना पकडून नेतात. बेदम मारहाण करतात. पोलिस कोठडीत टाकतात. खोट्या खटल्यामध्ये अडकवतात. कोठडीतचं मारहाणीमुळे मृत्यू ओढवतात. त्याची दाद ना फिर्याद. चित्रगुप्ताच्या दप्तरी जेवढी मृत्यूची नोंद नाही त्यापेक्षा पोलिसांनी मारलेल्या पारध्यांची संख्या जास्त असावी. पण आजपर्यंत त्यांच्या मृत्यूंचे कारण सरकारने कधीच विचारले नाही.
गावकरी आणि पोलिस भटक्यांना ‘दे माय धरणी ठाय’ करतात म्हणून ते कुठेच स्थायिक झालेले नाहीत. यासाठी लेखक म्हणतो, ‘एका ठिकाणी कुठं तरी स्थायिक होऊ.’ इथे आत्मशोध घेण्याचा प्रयत्न आहे. सतत भटकंती असल्याने हाताला काम नाही. जे असतं तेही पोलिसांनी जप्त केलेलं असतं. मग कसला विकास ? त्यांना जागा नाही, घर नाही, अन्न नाही, पाणी नाही, अंगावर कपडा नाही. पोरांना शाळा नाही. ओळखपत्र, रेशनकार्ड, मतदानकार्ड नाही. मग त्यांना आपल्या देशाचे रहिवाशी कसे म्हणायचे? ‘नियती’ कथेत एका गुत्तेदाराचा तप्त डांबर अंगावर पडून मृत्यू होतो. तेव्हा पारधी मजूर काम सोडून मुंबईला जातात. तेव्हा मिडीया खरं न शोधता ‘मजुरांनी गुत्तेदाराचा खून केला’ असं धडधडीत खोटं सांगतात… परंतु पारध्यांची बाजू कोण समजून घेणार? शतकानुशतके सुधारलेला उच्चभ्रू समाज भटक्यांच्या विरोधात उभा आहे. हे वास्तव लेखकाने कथेतून मांडलेले आहे.
‘कापूसकोंडी’ कथा वाचताना माणूस सुन्न होतो. कापसाला पांढरं सोन म्हणतात. विदर्भ म्हणजे पांढऱ्या सोन्याची खाण. कापूस नगदी पिक. तसेच इतर भागात द्राक्ष, ऊस ही सुद्धा नगदी पिके आहेत. शेतकऱ्यांचा नगदी पिकं घेण्याकडे कल असतो. पण पाऊस आणि आवर्षणाचा फटका बसला की, शेतकरी पार कोलमडून जातो. आधीच साव आणि बँकांच्या कर्जात बुडालेला शेतकरी, त्यात पुन्हा निसर्गाचा कोप आणि कवडीमोल भाव त्यामुळे तो वैतागून जातो. आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नसतो. सखाराम शेतकऱ्याचा भोगवटा सदर कथेत मांडलेला आहे. सखारामने पावसाचा अंदाज घेत पाच एकरामध्ये पऱ्हाटी लावली. दिवाळीच्या सणाला पोरं-पोरी, जावई, नातू सारे आले. दिवाळसण खाऊन परत गेले. चाळीस क्विंटल कापूस झाला. भाव येईल म्हणून घरात ठेवला. विकावं म्हटलं तर भाव नाही. तशात लॉकडाऊन आला. सगळं ठप्पं झालं. कापसावर चांगले दिवस येतील. बाळगलेलं स्वप्न बिरघळून गेलं. आता कसं करायचं म्हणून चिंता लागली. कापूस बाजार समितीत आणला तर भाव पाडून खरेदी सुरू झाली. शेतकऱ्यांच्या पायाखालची जमिन सरकली. जीव वैतागला. मरणाशिवाय यातून सुटका नाही असं वाटू लागलं आणि सखारामने ग्रेडरसमोर औषधीचा डब्बा फोडला अन् तोंडाला लावला. तेव्हा ग्रेडर घाबरला अन् ग्रेडरने सरसकट भाव वाढवून दिला.
जणू मरणाची परीक्षा दिल्याशिवाय शेतकऱ्याला काहीच द्यायचं नाही काय ? त्यामुळेच आजवर हजारो लाखो शेतकऱ्यांचे जीव गेले. हा भोगवटा कृषीप्रधान देशात कधी बंद होणार? असा सवाल ही कथा करते आहे. संसदेने तीन कृषी कायदे केले. ते रद्द व्हावेत म्हणून पंजाब-हरियाणा प्रांतातले शेतकरी दिल्ली बॉर्डरवर वर्षे झाले धरणे धरून बसलेत. सरकारच्या दडपशाहीत कित्येकांचे प्राण गेले आहेत. स्वातंत्र्यातही बळीराजा नागविला जात आहे ही वस्तुस्थिती आहे. कापूसकोंडीने शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे.
‘लॉकडाऊन’ ही कथा चक्रावून टाकते. कोरोना महामारीने सारं जग हादरलं. मृत्यूचे भय दाटले. सारे व्यवहार थांबले. धंदे थांबले. कारखाने, रेल्वे, मोटारी, विमानं थबकली. हाताला काम नाही. पोरांला काय घालायचं? सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. घरातच राहा. सुरक्षित अंतर ठेवा. मास्क वापरा. औषधपाणी करा म्हणून आवाहन केलं. जे धनदांडगे श्रीमंत होते. त्यांनी आपल्या माणसांची चिंता केली. पण ज्यांचं काहीच नव्हतं त्यांनी काय करायचे? कामधंदा, रोजगार नाही म्हणून तडफडत मेले. त्यात भटक्या जातीचे हाल तर विचारायलाच नको. असाच एक फिरस्त्यांचा समूह पोलिसांनी अडवला. बाहेर हिंडायचं नाही म्हणून डांबून ठेवला. प्रत्येकाला आपल्या जीवनाची चिंता. भटक्यांची कोण चिंता करणार? डोळ्यांदेखत भुकेने व्याकूळ होऊन तडफडणारे जीव बघणं होईना. त्यात पोलिसांना ससेमिरा. त्यांच्याकडून पैशांची वसुली सुरू झाली. अन्यथा जेलमध्ये डांबण्याची धमकी. निसर्गाच्या, नियतीच्या संकटापेक्षा माणसाने दिलेल्या यातना ह्या लॉकडाऊन काळात कुणाचा कर्दनकाळ ठरल्या असतील तर ह्या पारधी, कैकाडी तथा फिरस्त्यांच्या पण जगाला त्यांची खबर ना बात. स्वतः दुःख उगाळण्यातच जग मश्गुल होते. असे वास्तव लेखकाने संयमी भाषेत मांडलेले आहे. राग कुणावर काढायचा? त्यापेक्षा भोगवटा सोसणेच चांगले. त्याचबरोबर लेखकाने आपल्या संघर्षमय आयुष्यातील विशेषतः महाविद्यालयीन जीवनातील, पीएच.डी करतांना आलेले अनुभव, विना अनुदान कॉलेजमध्ये साठ हजार रूपये कर्जाने काढून संस्था चालकाला दिले तरी त्याने कायम न केल्याचा अनुभव असे अनेक प्रसंग त्यांनी मांडलेले आहेत. तो सुद्धा सुक्षिक्षित विद्याविभुषीतांच्या आयुष्याचा भोगवटाच आहे.
यातून एक गोष्ट नमूद केली पाहिजे. स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर किंवा झोपडीत सुंदर तरुण बाई राहणं म्हणजे संकटच. कधी, केव्हा तिच्यावर घाला घातला जाईल ते सांगता येत नाही. ती सुरक्षित, पवित्र राहूच शकत नाही. हुंड्यासाठी तिचा छळ, सासरच्या मंडळींकडून मारहाण किंवा हाकलून देणे ह्या गोष्टी नेहमीच्याच आहेत. लग्न होऊन वर्ष झालं तरी हिला मूल होत नाही हा एक मोठा मुद्दा तिच्या छळाला कारणीभूत होतो. एकूण स्त्री, आदिवासी, भटके विमुक्तांचे जीवन अशा भोगवट्यात होरपळून निघत आहे. हे लेखकाने अगतिक किंवा प्रक्षोभकरित्या न मांडता संयत पध्दतीने मांडलेले आहे. रूढ म्हणी आणि वाक्प्रचारांचा साज हे ही या कथासंग्रहाचे वैशिष्ट्ये आहे.
पुस्तकाचे नाव – भोगवाटा
लेखक – अनंता सूर (भ्र.९४२१७७५४८८) गणेशपूर, ता – वणी, जि – यवतमाळ पिन-४४५३०४
प्रकाशक: समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर