September 7, 2024
The Space Station and Sunita Williams
Home » अंतराळ स्थानक आणि सुनिता विल्यम्स !
संशोधन आणि तंत्रज्ञान

अंतराळ स्थानक आणि सुनिता विल्यम्स !

अंतराळात यान पाठवणे, त्यात अंतराळ वीर पाठवणे यामध्ये नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येक महिन्यात अवकाश मोहिमाबाबत काही ना काही बातमी येत असते. अमेरिका, रशिया आणि भारत यामध्ये आघाडीवर आहेत. चीनही यामध्ये मागे नाही. चीनच्या बातम्या फारशा बाहेर येत नाहीत. मात्र अवकाश मोहिमेच्या बातम्या आपल्या अंतराळ क्षमतेची कल्पना जगाला यावी यासाठी जाणिवपूर्वक प्रसिद्ध केल्या जात असाव्यात. सध्या हे क्षेत्र चर्चेत आले आहे, ते सुनिता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार अवकाशातून परत येत नसल्याने.

सुनिता विल्यम्स यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेतील युक्लिड ओहिओ येथे झाला. त्यांचे वडील दिपक पंड्या हे भारतीय तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन या होत्या. त्यांना चार वर्षांनी मोठा भाऊ जय आणि तीन वर्षांनी मोठी बहीण डीना आहेत. त्यांनी अमेरिकन नेव्हल अकादमीमधून बी.एस. पदवी भौतिकशास्त्र विषयातून प्राप्त केली. त्यानंतर फलोरिडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजीमधून अभियांत्रिकीमधून एम.एस. पदवी प्राप्त केली. वडिलांच्यामुळे त्यांना आपण भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स म्हणून ओळखतो. एम. एस. पदवी प्राप्त करताच १९८७ मध्ये त्यांनी अमेरिकन नौदलात नोकरीस सुरुवात केली. नेव्हल कोस्टल सिस्टिम कंमांडमध्ये सहा महिने काम केल्यानंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. अँड्रूयू आणि मायामी चक्रीवादळामध्ये त्यांनी बचावकार्यात मोठे कार्य केले. त्यांची १९९८ मध्ये अंतराळ मोहिमेसाठी प्रथम निवड झाली.

नासाच्या अंतराळ मोहिमेशी त्या अंतराळवीर म्हणून जोडल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४व्या आणि १५व्या मोहिमेवर त्यांना पाठविण्यात आले. अंतराळात त्या सातवेळा चालल्या आहेत. त्यांचा अंतराळात चालण्याचा कालावधी हा ५० तास ४० मिनिटे इतका आहे. एक महिला म्हणून त्यांच्या नावावर हे दोन्ही विक्रम आहेत. २०१२ मध्ये ३२व्या मोहिमेच्या त्या फ्लाईट इंजिनिअर होत्या. तर ३३व्या मोहिमेच्या त्या कमांडर होत्या.

दिनांक ५ जून २०२४ रोजी स्टारलयानरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे गेले होते. अंतराळात प्रयोग करून ते १३ जून रोजी परतणार होते. नियोजनाप्रमाणे ते ७ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये दाखल झाले. मोहिम संपताच त्याच यानाने पृथ्वीवर येणे अपेक्षित होते. मात्र अवकाश यानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलियमची गळती सुरू झाली. हा दोष अद्याप दूर होऊ शकला नाही आणि सुनिता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर दोघेही सध्या अंतराळात स्टारलाईनर स्पेसक्राफटमध्ये आहेत. आतापर्यंत चार वेळा त्यांच्या परतण्याच्या नव्या तारखा जाहीर झाल्या. मात्र त्यांना परत आणणे अद्याप शक्य झालेले नाही. स्टारलाईनर बोईंग कंपनीने बनवलेले आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएस हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. १९९८ साली सोळा देशांनी एकत्र येऊन याचे बांधकाम सुरू केले. २०११ मध्ये ते पूर्णत: कार्यान्वीत झाले. अंतराळातील हे सर्वात मोठे स्थानक फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचे आहे. पृथ्वीच्या भूभागापासून ३५० किलोमीटरवर ते असून ताशी २७,७२४ किलोमीटर वेगाने ९१ मिनिटात पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालते. हे स्थानक एखाद्या कृत्रीम उपग्रहासारखेच आहे. याची लांबी २४० फूट आणि रुंदी ३३६ फूट आहे. एकावेळी या स्थानकात सहा व्यक्ती राहू शकतात. हे अंतराळ स्थानक २०२४ पर्यंत कार्यरत राहील. या स्थानकाला सौर ऊर्जेपासून ऊर्जा मिळते. सौर ऊर्जा पॅनेल अंतराळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला असून वरचा भाग थेट सौर किरणांचा वापर करून तर खालचा भाग पृथ्वीकडून परावर्तीत होणाऱ्या प्रारणांचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करत राहतात. रशिया आणि अमेरिका या दोन देशांनी बनवलेल्या सोलार पॅनेलचा उपयोग केला आहे. सौर पॅनेल कायम उन्हामध्ये राहात नसल्याने निकेल-हायड्रोजन घटांचा वापर ऊर्जा साठवण्यासाठी करण्यात येतो. घटांचे आयुष्य केवळ साडेसहा वर्षांचे असून, ते क्रमाक्रमाने बदलण्यात येतात.

रेडिओ संचार हे संवादाचे प्रमुख साधन आहे. माहितीची देवाणघेवाण या स्वंयचलित प्रक्षेपण यंत्रणेतून होते. ही यंत्रणा स्थानकाच्या विविध भागात आणि पृथ्वीवर संवाद साधण्याचे कार्य करते. हे स्थानक अद्ययावात संगणक प्रणालीने सुसज्ज आहे. हे संगणक सेकंदाला ३ मेगाबाईट वेगाने पृथ्वीवर माहिती पाठवते. स्थानकांतर्गत ही देवाणघेवाण १० मेगाबाईट वेगाने माहितीची देवाणघेवाण करते. स्थानकावर जगण्यासाठीची यंत्रणाही अस्तित्वात आहे. पाणी पुरवठा, अन्न पुरवठा, स्वच्छता उपकरणे, आगीचा शोध घेणारी आणि विझवणारी यंत्रणा सर्व काही बसवण्यात आली आहे. आयएसएसमध्ये वातावरण पृथ्वीवरील वातावरणाप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. तेथे हवेचा दाब १०१.३ किलोपास्कल आहे. तेथील ऑक्सिजन पुरवठा पृथ्वीवरील हवेपेक्षाही स्वच्छ आहे. स्थानकावरील अन्न निर्वात पोकळी सिलबंद पिशव्यातून मिळते. अन्नाला चविष्ट बनवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मसाले वापरतात. अंतराळात राहणारे अंतराळवीर पृथ्वीवरून येणाऱ्या यानाची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. आलेले अन्न तेथे शिजवून खाता येते. या स्थानकावर व्यायामाच्याही सर्व सुविधा आहेत.

अशा या स्थानकावर प्रयोग करण्यासाठी सुनिता विल्यम्स त्यांच्या साथीदारासह गेल्या होत्या. त्यांना परत घेऊन येणाऱ्या यानामध्ये बिघाड झाला आणि त्यांना तेथेच अडकून रहावे लागले आहे. यांनातील हेलियम ज्वलन करणाऱ्या यंत्रणेला सहाय्य करते. या मोहिमेला, अंतराळात गेल्यानंतरही अनेक संकटाना सामोरे जावे लागले. एक जुना सॅटेलाईट फुटला आणि त्याचे अवशेष अंतराळात सर्वत्र पसरले आहेत. या तुकड्यासोबत स्टारलायनरची धडक होण्याची शक्यता होती. त्यातून ते सुखरूप बचावले मात्र स्टारलायनरमध्ये त्यांना आसरा घ्यावी लागली आणि ते आजही आतच आहेत.

खरेतर बोईंग कंपनीच्या या यानामध्ये सुरुवातीपासून अनेक बिघाड येत होते. त्यामुळे ही मोहीम अनेकदा पुढे ढकलण्यात आली. अखेर ही मोहीम पाच जूनला सुरू झाली मात्र हेलियम गळतीमुळे अनिश्चित काळाची बनली आहे. अंतराळात हे यान दुरूस्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या दोन अंतराळवीरांना परत न आणल्यास बोईंग कंपनीच्या लौकिकास बाधा येणार आहे. त्यामुळे बोईंग कंपनी आणि नासा त्यांचे सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश निश्चित मिळेल.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

मन हा मोगरा !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading