सेवा हा धर्म मानून सेवा करायला हवी. बदलत्या काळात सेवा हा शब्दच वेगळ्या अर्थाने घेतला जातो. सेवा म्हणजे शोषण नव्हे. शोषणाचा हेतू ठेवून सेवा देण्याचे प्रकार समाजात रुढ झाले आहेत. सेवेच्या नावाखाली सुरु असणारे शोषण सेवा देणाऱ्याला व घेणाऱ्यालाही घातक ठरते हे मात्र नंतर कळते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसे मनौनि धनवरी । विद्यमाने आल्या अवसरीं ।
श्रांतांचिये मनोहारी । उपयोगा जाणे ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें मनापासून धनापर्यंत, जें काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगानें प्रसंगानुसार (पीडेने) श्रमलेल्यांच्या मनाला आनंद होईल अशाप्रकारे उपयोगास येणे.
उन्हात चालत असताना वाटेत एखादे झाड आल्यानंतर त्या झाडाच्या सावलीत उभे राहण्याचा मोह आवरत नाही. थोडावेळ तरी त्या झाडाखाली तो थांबतोच. झाडाखालच्या गारव्याने त्याचा थकवा दूर होतो. चालून चालून थकलेल्या शरीराला झाडाची सावली अन् गारवा निश्चितच उपयुक्त ठरतो. यातून मनाला आनंद मिळतो. सुख मिळते. झाड मात्र कोणतीही आशा न ठेवता तुम्हाला सेवा देत उभे असते. सेवेचे हे कार्य निरपेक्ष भावनेने अखंड सुरु असते. सेवा देताना ते भेदभावही करत नाही. भुकेलेल्याला फळ देऊन ते झाड तृप्तही करते. एकंदरीत श्रमलेल्या मनाला ते आनंद देते. मनुष्याने झाडाचा हा सेवाधर्म समजून घेऊन त्याचा हा गुण आत्मसात करायला हवा.
सेवा हा धर्म मानून सेवा करायला हवी. बदलत्या काळात सेवा हा शब्दच वेगळ्या अर्थाने घेतला जातो. सेवा म्हणजे शोषण नव्हे. शोषणाचा हेतू ठेवून सेवा देण्याचे प्रकार समाजात रुढ झाले आहेत. सेवेच्या नावाखाली सुरु असणारे शोषण सेवा देणाऱ्याला व घेणाऱ्यालाही घातक ठरते. हे मात्र नंतर कळते. जेव्हा कळते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेक आश्रमात सेवेच्या नावाखाली अशीच लुट सुरु आहे. लोकही भावनिक होऊन मदत देतात. सेवेचा अर्थ बदलला आहे असे समजून सेवा देतात. अशा आश्रमांचे अस्तित्व, धार्मिक संस्थांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. चालतयं की म्हणतं हे सर्व राजरोस सुरु आहे. चालतयं की या शब्दातच ते किती काळ चालणार हे समजते. कायम चालणारं आपणाला निर्माण करायचे आहे. चालतयं तो पर्यंत चालवा म्हणजे ते बंद पडणार हे लक्षात घ्यायला हवं. कधीही बंद न पडणारी सेवा आपणाला खरा आनंद, सुख, समाधान देत असते. यासाठी अशीच सेवा देण्याचा आपला प्रयत्न असायला हवा.
झाड जोपर्यंत मोडत नाही, मरत नाही किंवा ते तोडले जात नाही तोपर्यंत त्याचे कार्य हे अखंड सुरु असते. म्हणजेच मरेपर्यंत त्याची निरपेक्ष भावनेने अखंड सेवा सुरु असते. अशा झाडांचे संवर्धन करण्याचाही विचार आपल्या मनात डोकावत नाही. अशी झाडे वाचवायला हवीत असे म्हणतो पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा मात्र एक झाडं आहे तोडल तर काय होतयं. असा विचार करतो. असे म्हणत रस्त्याच्या कडेची झाडे तोडून टाकतो. निरपेक्ष भावनेने सेवा देणारे हे वृक्ष वाढण्यासाठी किती कालावधी लागला याचा साधा विचारही आपण करत नाही. नवी झाडे लावू असे म्हणून ती तोडतो, पण नवे झाड वाढण्यासाठी लागणारा कालावधी पाहायला नको का ? आत्ता सावली देणारा वृक्ष पुन्हा तशी सेवा देण्यास २०-२५ वर्षांचा कालावधी लागणार हे विचारातच आपण घेत नाही. यात झालेले नुकसान हे मोठे आहे याचा विचार आपण करायला हवा.
यासाठीच मनापासून धनापर्यंत आपणाला प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करायला हवा. सेवेसाठी सेवा देण्यात खरे सुख प्राप्त होते हे समजून घ्यायला हवे. त्यांनी दिलेली सेवा आपण देण्याचाही प्रयत्न करायला हवा. सेवा हा धर्म मानून कार्य केल्यास सर्वचजण सुखी होतील. दुसऱ्याच्या श्रमलेल्या मनात आनंद निर्माण करण्यात खरा आनंद मिळतो. अशी सेवा देत राहील्यास यातून मिळणारे सुख, समाधान हे आपले जीवनच सुखी व समाधानी करते. नुसते बोलून उपयोगाचे नाही तर कृतीतून हे दिसायला हवे. प्रात्यक्षिकातून मिळणारा आनंद हा चिरकाळ टिकतो. नुसता मांडलेला विचार काही क्षण समाधान देतो पण हे जेव्हा कृतीत उतरते तेंव्हा ते कायमस्वरुपी समाधानी करते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.