जितकी संपत्ती अधिक तितकीच सुख-दुःखे अधिक असतात. संपत्ती सुख देते पण त्याबरोबर त्याचा सांभाळ करताना दुःखही सोसावे लागते. साधनेसाठी मनाची शांती ही महत्त्वाची असते. या सुख-दुःखाच्या कचाट्यात सापडलेल्या मनाला शांती कशी मिळेल. म्हणूनच मनानेच या सर्व कर्मांचा संन्यास करण्याचा निर्णय घेऊन तशी मानसिकता तयार करायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु ।
आदरिजो अव्यंगु । संन्यासु तो ।। ६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – तर आतां कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होवो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो.
कर्माचा त्याग हा संन्यास ठरतो. पूर्वीच्या काळी राजे महाराज, सम्राट पराक्रमी विजयानंतर राज्याभिषेक करून घेत. त्यानंतर सुराज्याची स्थापना करून ते आयुष्याच्या उतारत्या वयात संन्यास घेत. सर्व कर्माचा त्याग, संपत्तीचा त्याग करून ते संन्यास घेत. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला थेट राजगादीवर बसवले जात नसे. सम्राट कसा घडला ? राजांनी स्वराज्य व सुराज्य कसे उभे केले ? कसा पराक्रम गाजवत शुन्यातून महान साम्राज्य स्थापन केले ? तसा पराक्रम गाजवत त्यांच्या पुढच्या पिढीनेही स्वतःचे राज्य स्वतः उभारण्याची संकल्पना मांडावी व कार्यरत राहावे असा नियम केल्याचेही पाहायला मिळते. सुराज्याचा वारसा हा खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने उत्तमरित्या चालू शकतो. असा नियम हा महान साम्राज्य स्थापन करणाऱ्या सम्राटांनी केल्याचेही भारतीय संस्कृतीत पाहायला मिळते. यावर सखोल अभ्यास होण्याची तितकीच गरज आहे. कारण सध्याच्या लोकशाहीची पाळेमुळेही यातच पेरली गेली आहेत.
कर्माचा त्याग इतक्या सहजासहजी मान्य होणे शक्य नसते. हे राज्य मी निर्माण केले. हे साम्राज्य माझे आहे. हा गर्व असतोच तो सुटत नाही. त्यामुळेच अहंकार हा बळावतो. मी पणा गेल्या शिवाय अध्यात्म समजत नाही. हे मी केले नसून हे कर्म माझ्याकडून करवून घेतले गेले. मी मात्र यामध्ये निमित्तमात्र आहे याची अनुभुती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्या कर्माचा त्याग हा घडत नाही. मिळवलेले साम्राज्य हे जनतेच्या सुखासाठी आहे. जनतेच्या रक्षणासाठी आहे. त्यावर जनतेचाच अधिकार असतो. या सर्व कर्मात राजा हा फक्त निमित्तमात्र असतो. ही मुळ संकल्पना आहे म्हणूनच महान साम्राज्य स्थापन केल्यानंतर राजांनी संन्यास घेतल्याचेही पाहायला मिळते. अशा संन्यास हा दोषरहित संन्यास असतो.
सर्व ऐश्वर्य आहे. सर्व काही वेळच्यावेळी उपलब्ध होत आहे. अशावेळी आपणाजवळ साधनेसाठी भरपूर वेळ आहे. त्यासाठी त्याग करण्याची गरज काय ? असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. पण तसे घडत नाही. जितकी संपत्ती अधिक तितकीच सुख-दुःखे अधिक असतात. संपत्ती सुख देते पण त्याबरोबर त्याचा सांभाळ करताना दुःखही सोसावे लागते. साधनेसाठी मनाची शांती ही महत्त्वाची असते. या सुख-दुःखाच्या कचाट्यात सापडलेल्या मनाला शांती कशी मिळेल. म्हणूनच मनानेच या सर्व कर्मांचा संन्यास करण्याचा निर्णय घेऊन तशी मानसिकता तयार करायला हवी. मनातील मीपणा दूर करायला हवा तरच कर्माचा त्याग घडू शकतो. मनाला त्रास होणार नाही. मन विचलित होणार नाही. याची काळजी घेतली तरच मन साधनेत रमू शकते. यासाठीच मनाने त्या कर्मांचा त्याग हा व्हायला हवा. तरच तो संन्यास खऱ्या अर्थाने घडू शकतो.
संन्यास म्हणजे घरदार सोडून वनवासात जाणे असा नाही. मनानेही संन्यास घेता येतो. मनातला मीपणा गेला की साहजिकच संन्यास घडतो. मीपणा जाण्यासाठीच साधनेची आवश्यकता आहे. साधनेतील अनुभुतीतून हा मीपणा दूर होतो. हळूहळू मन साधनेत रमू लागते अन् आत्मज्ञानाचा लाभ होतो.