September 16, 2024
admission entrace exam challenge and scope article by Dr V N Shinde
Home » प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!

सर्व केंद्रिय विद्यापीठांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा होणार असल्याचे जाहीर झाले आहे. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हान जसे असणार , तशीच ती महत्त्वाची संधी असणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यास केंद्रिय विद्यापीठाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे…
डॉ. व्ही. एन. शिंदे

उपकुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतर शिक्षणाचा सर्वदूर प्रसार हे धोरण निश्चित करण्यात आले. त्यासाठी शिक्षणाचे विकेंद्रिकरण करून दहावी आणि बारावीसाठी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र मंडळ आणि मोठ्या राज्यांसाठी अनेक मंडळे असणारी पद्धती स्विकारली गेली. या मंडळांना त्यांचा अभ्यासक्रम ठरवण्याचे आणि त्यावर आधारीत परीक्षा घेण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार या मंडळांचे कार्य व्यवस्थित सुरू होते. मात्र काही नवे प्रयोग करत असताना परिणामांचा विचार न करता त्या पद्धतीमध्ये अनेक बदल करण्यात आले. मंडळांनी आपले अभ्यासक्रम बनवताना एकसूत्रीपणा ठेवला नाही. तसेच परीक्षा पद्धती आणि परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळी समान नसे. आपल्या मंडळाचा निकाल चांगला लागावा अशी जणू शर्यत लागत असे. त्यातच मंडळांच्या परीक्षांचे तंत्र निर्माण करण्यात खाजगी शिकवणी घेणारी मंडळी यशस्वी झाली. त्यांच्या शिकवणी वर्गाना प्रचंड मागणी असे. त्यातून त्यांनी अनेक शहरात आपल्या शाखाही काढल्या. पुढे काही महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांनी ते आत्मसात केले.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाना बारावीच्या परीक्षेतील गुणांवर प्रवेश देण्यात येत असे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावेसे वाटत असल्याने अशा महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. यातून मंडळाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी निर्माण होऊ लागले. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा तंत्र चांगले आत्मसात करून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, हे मात्र निश्चित. पुढील शिक्षणांसाठी प्रवेश देताना याचा मोठा परिणाम दिसू लागला. एकाच गुणाचे अनेक विद्यार्थी असल्यांमुळे अनेकदा अशैक्षणिक मुद्द्यांचा विचार करून गुणवत्ता ठरू लागली. जसे की विद्यार्थ्याची जन्मतारीख. त्यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रीकी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना निव्वळ मंडळाच्या परीक्षांचे गुण विचारत घेणे अडचणीचे ठरू लागले. पर्यायाने शेवटी अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. मात्र इतर अव्यासायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश मंडळाच्या परीक्षेत प्राप्त् केलेल्या गुणांवर देण्यात येत होते. त्यामध्येही काही वर्षांतच अडचणी येऊ लागल्या.

उदाहरणार्थ दिल्ली विद्यापीठामध्ये विज्ञान विद्याशाखेत मंडळाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकत नव्हते. त्यासाठी अशा विद्यापीठांनी स्वत:ची प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यांनंतर परीक्षेचा खर्च कमी करण्याच्या हेतूने काही विद्यापीठे एकत्र येऊन अशा परीक्षा घेऊ लागले आणि २१ मार्च रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीशकुमार यांनी देशातील ५४ विद्यापीठांमध्ये बारावीनंतर सर्व वैद्यकीय आणि अभ्यासक्रम वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी एकच सामाईक परीक्षा होणार असल्याचे सांगितले.

देशभरात 54 केंद्रिय विद्यापीठे

देशभरामध्ये असणाऱ्या ५४ केंद्रिय विद्यापीठांपैकी केवळ एक केंद्रिय विद्यापीठ महाराष्ट्रात आहे. तेही वर्धा येथे असणारे महात्मा गांधी आंतरराष्ट्रिय हिंदी विद्यापीठ. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला जर केंद्रिय विद्यापीठात शिक्षण घ्यावयाचे असेल तर परराज्यात जावे लागते. महाराष्ट्राप्रमाणेच अरूणाचल प्रदेश, छत्तिसगड, गुजरात, हरयाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मिझोराम, मेघालय, नागालँड, ओरिसा, पाँडेचरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, त्रिपूरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात एक विद्यापीठ आहे. आसाम, जम्मू आणि काश्मिर, मध्यप्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे आहेत. आंध्रप्रदेश, मणीपूर, आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी तीन विद्यापीठे आहेत. याखेरीज बिहारमध्ये चार, उत्तरप्रदेशमध्ये सहा आणि दिल्लीमध्ये सात विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांची संचलीत महाविद्यालये विविध विद्याशाखांचे पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण देतात. केंद्रिय विद्यापीठांना निधी मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे चांगल्या भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत.

शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली आणि भरण्यात आली. त्यामुळे बहुतांश केंद्रिय विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण देशभरातील विद्यार्थ्यांना आवडणारे आहे. दिल्लीमध्ये राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणे सोपे जाते म्हणूनही अनेक विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र मंडळांच्या गुणभिन्नतेमुळे असे प्रवेश देण जिकीरीचे बनले होते. त्यावर उपाय म्हणून बीए, बीकॉम, बीएस्सी अशा सर्व अभ्यासक्रमांना बारावीनंतर केंद्रिय विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर ही ‘कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट’ (Common University Entrance Test – CUET) देणे २०२२ पासून बंधनकारक असणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएमार्फत ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या प्रवेशासाठी बारावीच्या मंडळाच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाचा कसलाही विचार करण्यात येणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २०२२-२३साठीची प्रवेश परीक्षा प्रस्तावित आहे. बारावीसाठी नॅशनल कौंसिल ऑफ एज्यूकेशनल र्टेनिंग अँड रिसर्च यांनी निर्धारीत केलेला अभ्यासक्रम या प्रवेश परीक्षेसाठी असणार आहे. ही परीक्षा पूर्णत: ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रीका असेल. प्रत्येक एका गुणाचे शंभर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतील.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ मिळणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नांची रचना दोन भागात असेल. पहिला भाग पंचेवीस प्रश्नांचा असेल. यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता, विश्लेषण क्षमतांच्या पडताळणीच्या अनुषंगाने प्रश्न असतील. हा सर्वांना समान असेल. तर दुसऱ्या भागामध्ये ७५ प्रश्न विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन आणि ज्ञान यावर आधारीत असतील. यासाठी विद्यार्थ्यांने चार विषयांची निवड करावयाची आहे. बारावी परीक्षेसाठी उपलब्ध असणारे विषय येथे उपलब्ध असतील. बीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी येथे भारतीय भाषांबरोबर केंद्रिय विद्यापीठांमध्ये शिक्षण सुविधा असणाऱ्या फ्रेंच, अरेबीक, जर्मन इत्यादी भाषा दुसऱ्या भागांमध्ये निवडू शकतात. प्रश्नांच्या प्रत्येक बरोबर उत्तरास एक गुण मिळणार आहे. तर चूकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा होतील. विद्यार्थ्यांना ही परीक्षा तेरा इंग्रजीसह हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, असामी, बेंगॉली, पंजाबी या भाषांमधून देण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार विद्यार्थी प्रवेशीत होतील.

विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देण्यापासून या सामाईक परीक्षेमुळे सूटका होणार आहे. त्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि धावपळ कमी होणार आहे.२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून पदवी अभ्यासाक्रमांप्रमाणेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा व्यापक आणि दोन सत्रात घेतली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांला पहिल्या सत्रासाठी एक भाषा, सामान्य ज्ञान आणि दोन त्याच्या अभ्यासाचे विषय घ्यावे लागतील. तर दुसऱ्या सत्रातील प्रश्न हे त्याच्या उर्वरित चार विषयांवर आधारित असतील. देशविदेशातील मुलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. तसेच राज्य विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठेही या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार आहेत. अर्थात हे ऐच्छिक आहे. मात्र कालौघात हे सक्तीचे होणार हे ओळखून विद्यार्थ्यंनी तयारीला लागणे सुज्ञपणाचे ठरेल.

या प्रवेश परीक्षांची माहिती एनटीएच्या संकेतस्थळावर (https://nta.ac.in/) उपलब्घ करून दिली जाणार आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात माहिती उपलब्ध होईल. तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्यासाठी लिंक उपलब्ध होईल. सर्व केंद्रिय विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर https://www.ugc.ac.in/centraluniversity.aspx उपलब्ध आहे. तसेच या विद्यापीठांच्या वैयक्तिक संकेतस्थळास भेट दिल्यानंतर त्या विद्यापीठात सुरू असणारे अभ्यासक्रम पाहता येतील आणि त्यानुसार आपले पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पसंतीक्रम निश्चित करणे सोईचे होते. या प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना एकत्रित स्वरूपात सर्व माहिती उपलब्घ होणे, एकाच परीक्षेत अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर बारावीच्या अभ्यासक्रमातील बदलांमुळे आव्हानही असणार आहे. या आव्हानाला संधी मानून विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि देशातील आपल्या आवडीच्या विद्यापीठाचा पदवीधर व्हावे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रिय विद्यापीठे, त्यातील अभ्यासक्रम आणि त्यांच्या प्रवेशाचे द्वार खऱ्या अर्थाने उघडले आहे !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

देईल गुरुसेवा…

आंब्याच्या विविध जाती…

2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading