पैसा कमवताना मात्र पैसेवाल्याशीच मैत्री केली जाते. काहीवेळेला सदाचार, शिष्टाचारही इथे संपतो. केवळ अन् केवळ पैशासाठीच ही लढाई सुरू राहाते. कारण पैसाच आपली किंमत ठरवत असतो. पण हा पैसा चांगल्यामार्गाने, चांगल्या कर्मातून मिळवलेला असेल तरच तो आपल्याला सुख-शांती-समाधान देतो. आत्मिक शांती तेंव्हाच मिळते. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा कधीही शांती देत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
जैसें डोळ्या अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळतें त्यावेळी दृष्टि फांकते आणि मग (भूमिगत) द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना (दृष्टिला) प्रकट होतो.
डोळ्यात अंजन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ चुका दृष्टिस आणून देणे. सद्गुरु शिष्याच्या डोळ्यात अंजन घालतात. शिष्याच्या चुका त्याला त्याच्या नजरेस आणून देतात. त्यामुळेच तर शिष्याच्या मार्गातील अडथळे सहज दूर होतात अन् त्याचा मार्ग सुकर होतो. तसे झाले नसते तर शिष्याला खड्डा न दिसल्याने तो खड्ड्यात अडकून पडण्याचा धोका असतो. साहजिकच त्याच्या प्रवासात बाधा येऊन वेळेत पोहोचण्यात तो अयशस्वी होतो. सद्गुरु यासाठीच शिष्याच्या डोळ्यात अंजन घालून त्याचा हा प्रवास विनाअडथळा पार करण्यासाठी व वेळेत पोहोचण्यास मदत करतात. सद्गुरु केवळ डोळ्यात अंजन घालतात, बाकीची क्रिया ही शिष्यालाच करायची असते. येणाऱ्या अडथळ्यावर शिष्यालाच मात करायची असते. हे विशेष लक्षात घ्यायला हवे. घास तोंडापर्यंत देण्याचे काम माऊली करते, पण घास तोंडात घेऊन तो चावून खाण्याची क्रिया ही मुलालाच करावी लागते. तसेच घास तोंडात घेण्यासाठी मुलालाच तोंड उघडे करावे लागते. अन्यथा तो घास तोंडात जाणारच नाही हे सुद्धा विचारात घ्यायला हवे.
पैसा कोणाला नको असतो ? सर्वांनाच पैसा हा हवा हवासा असतो. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळच सर्वजण जातात. त्याचेच सर्व मित्र होतात. श्रीमंताचीच सर्व स्तुती करतात. त्यालाच सर्व मान देतात. त्यालाच सर्वजण नमस्कार करतात. गरज पडली तर पांडित्य नसूनही त्याला पंडित करतात. विद्वताही पैशापुढे फिकी पडते. व्यवहाराचा हा नियमच झाला आहे. पैसा नसेल तर आपणाजवळ कोणच येणार नाही. आपली वाहवा कोणच करणार नाही. पैसा आहे तर सर्वच आपले आहेत. दुसऱ्याकडे असणारा पैसा पाहून आपणालाही त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा कमवावा अशी हाव सुटते. हे स्वाभाविक आहे. माझा पैसा दुप्पट आहे तो तिप्पट कसा होईल हा विचार सर्वांच्याच मनात येतो. एकंदरीत पैशाची ही लढाई प्रत्येकजण आपापल्यापरीने लढतच असतो. हे करताना अनेकदा नितीमुल्यांचा ऱ्हास होतो. याकडे पाहायला मात्र कोणीच तयार नसते. कारण पैसा असेल तरच किंमत आहे. संन्यासाला कोणीच विचारत नाही. खरी विद्वत्ता त्याच्याकडे असूनही त्याला कोणी जवळ करत नाही. कारण त्याच्याजवळ फाटकी झोळी असते. त्यात काहीच पैसा राहात नाही.
पैसा कमवताना मात्र पैसेवाल्याशीच मैत्री केली जाते. काहीवेळेला सदाचार, शिष्टाचारही इथे संपतो. केवळ अन् केवळ पैशासाठीच ही लढाई सुरू राहाते. कारण पैसाच आपली किंमत ठरवत असतो. पण हा पैसा चांगल्यामार्गाने, चांगल्या कर्मातून मिळवलेला असेल तरच तो आपल्याला सुख-शांती-समाधान देतो. आत्मिक शांती तेंव्हाच मिळते. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा कधीही शांती देत नाही. मनात नित्य अस्वस्थता निर्माण करतो. मनाची शांती टिकवायची असेल तर चांगल्या कर्माने, चांगल्या मार्गाने पैसा कमविण्याचा उद्देश ठेवायला हवा. चांगला उद्देश ठेवून पैसा कमवायला हवा. भलेही मग तो थोडा कमी का मिळेना, पण उद्देश शुद्ध हवा.
पूर्वीच्याकाळी स्वातंत्र्यसैनिकांनी शाळा उभारण्यासाठी मठामध्ये चोरी केली. चांगल्या उद्देशासाठी मठात पडून असलेली संपत्ती वापरात आणली. काळाची गरज ओळखून केलेले हे कर्म होते. चांगल्या उद्देशाने केलेली ही कृती आहे. त्यामागे शुद्ध विचार आहे. त्यामुळे हे कर्म बाधत नाही. यातून सुख-समाधान हे निश्चित मिळते. हे लक्षात घ्यायला हवे. सद्गुरु हे याचेच अंजन शिष्याच्या डोळ्यात घालतात. शिष्याची आत्मिक शांती ढळणार नाही याची काळजी, दक्षता सद्गुरु घेत असतात. शिष्याला योग्य मार्गदर्शनाने ते मार्ग दाखवत असतात. यामुळेच शिष्याला योग्यप्रकारे धनाची प्राप्ती होते अन् आत्मिक शांतीही मिळते. यासाठीच गुरु दाविलिया वाटेने चालत राहावे. गुरूंचा उपदेश यासाठीच महत्त्वाचा आहे. यातच खरा आत्मिक आनंद असतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.