February 19, 2025
Even though the people reject it, the chant of traitors and frauds continues
Home » जनतेने नाकारले तरी गद्दार, दगाबाज जप चालूच…
सत्ता संघर्ष

जनतेने नाकारले तरी गद्दार, दगाबाज जप चालूच…

विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ८० मतदारसंघांत निवडणूक लढवली व ६० आमदार विजयी झाले. ठाकरे यांच्या पक्षाने ९७ मतदारसंघांत निवडणूक लढवली व २० आमदार निवडून आले. जनता कोणाबरोबर आहे, हे निवडणुकीने दाखवून दिले. गद्दार, सूड, दगाबाज, अब्दाली या भोवतीच उबाठा सेनेचे नेतृत्व गोल गोल फिरत आहे. आजही उबाठा सेनेवर फुटीची टांगती तलवार आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

शिवसेनाप्रमुखांचा २३ जानेवारीला जन्मदिवस साजरा करणारे मुंबईत दोन मोठे मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांच्या उबाठा सेनेचा अंधेरीच्या क्रीडा संकुलात, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बीकेसीच्या मैदानावर संपन्न झाला. दोन्ही मेळाव्यात भगवे झेंडे फडकत होते. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सच्चे वारस आम्हीच आहोत असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले, तर आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार बजावले.

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीनंतर पक्षाची दोन शकले पडली. पक्ष दुभंगला गेला. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र स्वत: मुख्यमंत्री असताना पक्षात मोठा उठाव झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही दिले. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाचे जनतेने ६० आमदार निवडून देऊन त्यांच्या नेतृत्वावर व त्यांच्या पक्षावर विश्वास दाखवला.

उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यांदेखत व दिवसाढवळ्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर कब्जा मिळवला. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी शिंदे यांच्या पक्षावर शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. जून २०२२ मध्ये पक्षात झालेल्या उठावानंतर महाआघाडी सरकारने बहुमत गमावल्याने उद्धव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. मुळात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी स्वत: सत्तेचे पद स्वीकारलेच कशाला ? शिवसेनाप्रमुखांनी स्वत: कोणतेही सत्तेचे पद आयुष्यात घेतले नाही, पक्षातील इतरांना नेहमी मोठे केले. त्यांनी मनोहर जोशी व नारायण राणे हे दोन मुख्यमंत्री दिले, राज्यात व केंद्रात तीन-चार डझन मंत्री केले, लोकसभेचे प्रतिष्ठेचे अध्यक्षपद पक्षातील नेत्याला म्हणजे मनोहर जोशींना दिले. त्यांनी नेहमी आपले सहकारी व सामान्य शिवसैनिकांना मोठे केले म्हणूनच त्यांचे मोठेपण कायम राहिले.

शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला राजकीय शत्रू नंबर १ मानले होते. एकवेळ शिवसेना बंद करीन पण काँग्रेसबरोबर जाणार नाही, असे ठणकावून म्हटले होते. मग उद्धव यांनी सन २०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद स्वीकारलेच कशाला? लोकसभा निवडणुकीत सात ते आठ खासदार निवडून आले म्हणून पुन्हा आपण सत्तेवर येणार या भ्रमात ठाकरे परिवार होता. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत या भ्रमाचा भोपळा फुटला आणि पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) बरोबर फरफटत जाण्याची पाळी उबाठा सेनेवर आली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला जनतेने का नाकारले याचे खरे तर उबाठा सेनेने आत्मचिंतन करायला हवे. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात आत्मचिंतन होईल अशी अपेक्षा होती.

शिवसैनिकांना संघटनेचा कार्यक्रम दिला जाईल असे वाटले होते. डळमळीत झालेली संघटना बांधणीविषयी उद्धव बोलतील असे वाटले होते. प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेण्यातच पक्षप्रमुखांचा भाषणातून भर दिसला. अमित शहांचा आपण समाचार घेणार, त्यांना सोडणार नाही, अशी निर्वाणीची भाषा वापरून पक्षाला काय लाभ होणार आहे? यापुढे सूड सूड आणि सूड घ्यायचा आहे असे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बजावले. एक तू तरी राहशील किंवा मी राहीन, अशी धमकी देणारे आव्हान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी दिले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात अशी भाषा कोणी वापरली नव्हती. त्यातून उद्धव व त्यांच्या पक्षाला काय साध्य झाले? लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला महायुतीपेक्षा जास्त यश मिळाले तेव्हा सर्व ईव्हीएमसह सर्व काही व्यवस्थित व सुरळीत होते, विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला व भाजपला भरोघोस यश मिळाले म्हणून त्यांना अमित शहा एकदम कट्टर शत्रू वाटू लागले.

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत हे विसरून त्यांचा अहम्मद शहा अब्दाली म्हणून वारंवार उल्लेख करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभते का? अंगावर आलात तर वळ घेऊन दिल्लीला परत जाल या धमकीचा अर्थ काय होतो? ही धमकी ऐकून अमित शहा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ते शांत बसतील असे वाटते काय? ठाकरे यांनी आपण हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चिता कॅम्पमध्ये झालेल्या प्रचारसभेचे उदाहरण दिले, याची मोठी गंमत वाटली.

उबाठा सेनेचे उमेदवार अनिल देसाई हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या विजयात मुस्लीम व्होट बँकेचा मोठा वाटा होता. निवडणूक प्रचारात चिता कॅम्पमध्ये ठाकरेंची सभा झाली. सभेला गर्दी मोठी होती व त्यात ९० टक्के मुस्लीम होते, असे स्वत: ठाकरेंनी सांगितले. ठाकरे यांनी सभेत विचारले, मी हिंदुत्व सोडले आहे असे तुम्हाला वाटते का? यावर सभेतून नकारार्थी उत्तर मिळाले. नंतर त्यांनी विचारले, माझे हिंदुत्व आपल्याला मान्य आहे का, याच सभेतील गर्दीने उत्तर होकारार्थी दिले. हे उदाहरण सांगून ठाकरे आपण हिंदुत्ववादी आहोत व त्यावर मुस्लीम मतदारांनी शिक्कामोर्तब केले असे सांगत आहेत.

हिंदूंपेक्षा मुस्लीम मतदार त्यांना साक्षीदार म्हणून अधिक जवळचे वाटू लागले आहेत का? एकनाथ शिंदे यांच्याविषयी ठाकरे यांचा राग कायम आहे. शिंदेंनी शिवसेना पळवली हे विसरू शकत नाहीत. सरकार स्थापनेच्या वेळी, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी किंवा पालकमंत्री ठरवले जात असताना एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या दरे गावी निघून गेले होते. नव्या सरकारच्या स्थापनेत शिंदे यांच्या मनासारखे घडले नाही म्हणून ते गावी निघून गेले अशा बातम्याही झळकल्या. त्यावर ठाकरे यांनी रुसू बाई रुसू, (कोपऱ्यात बसू) गावी जाऊन बसू अशी टिंगल उडवली. बाबरी मशीद पडल्यानंतर १९९२-९३ मध्ये जे घडले त्याबद्दल आपण कधीही माफी मागितली नाही, उलट तेव्हा भाजपने आम्ही नाही त्यातले, अशी भूमिका घेतली होती, असाही ठाकरे यांनी सूर आळवला.

भाजपपेक्षा आपण हिंदुत्ववादी आहोत हेच त्यांना ठसवायचे असावे. जखमी वाघ काय असतो व त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल, ते (शिंदे गट) म्हणजे राजकारणातले बाटगे आहेत, त्यांच्या हाती चाबूक देऊन ते महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करायला निघालेत, विकली गेली ती विष्ठा, निष्ठा माझ्यासोबत आहे. पक्षप्रमुखांच्या तोंडी तीच तीच भाषा गेली अडीच वर्षे ऐकायला मिळत आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो व भगिनींनो व मातांनो अशी पक्षप्रमुखांनी भाषणाला सुरुवात केली पण निवडणूक काळात आपण देशभक्त बांधवांनो व भगिनींनो असे म्हणत होतो, याचीही कबुली दिली.

मोदींच्या अश्वमेधाला गाढव म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पण ठाकरे यांना सत्ता गमावून घरी बसण्याची पाळी आली व मोदींनी विजयाची व पंतप्रधानपदाची हॅटट्रीक केली, तसेच पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून दरवर्षी विजयादशमीला शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत होऊ लागले आहेत. दोन्हीकडे फलकांवर आणि व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा असते. शिंदे यांच्या फलकांवर धर्मवीर आनंद दिघेही दिसतात. आता शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनालाही शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे मुंबईत होऊ लागले आहेत. ठाकरे यांच्या भाषणात संताप व चिडचिड दिसते, तर शिंदे यांचे भाषण संयमी व शांत असते. शिंदेंच्या भाषणात त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा असतो व मोदी-शहांच्या नेतृत्वाविषयी आदर व्यक्त होताना दिसतो, तर ठाकरेंच्या भाषणात भाजपा, मोदी, शहा यांच्यावर संताप व्यक्त होताना दिसतो.

शिवसेनाप्रमुखांचा विचार आपण जपला म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला, अडीच वर्षांपूर्वी केलेल्या उठावानंतर मिळालेला विजय अभिमानास्पद आहे असे सांगताना शिंदे हे खुल्या मनाने कार्यकर्त्यांना श्रेय देतात. मायबाप जनतेपुढे नतमस्तक होतात. आज शिवसेनाप्रमुख असते, तर त्यांनी आपली पाठ थोपटली असती असे आवर्जून सांगतात. आज आपण डीसीएम (डेप्युटी सीएम) आहोत म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असे ते नम्रपणे सांगतात. शिंदे यांनी शिवसैनिकांना ग्रामसभा ते महापालिका हे लक्ष्य असल्याचा कार्यक्रम दिला आहे. तुम्ही आमदार, खासदार, मंत्री कितीही मोठे झालात तरी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, हे कधी विसरू नका, असा सल्ला देताना आपली बांधिलकीही शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी आहे हे ठामपणे सांगतात. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ८० मतदारसंघांत निवडणूक लढवली व ६० आमदार विजयी झाले. ठाकरे यांच्या पक्षाने ९७ मतदारसंघांत निवडणूक लढवली व २० आमदार निवडून आले. जनता कोणाबरोबर आहे, हे निवडणुकीने दाखवून दिले. गद्दार, सूड, दगाबाज, अब्दाली या भोवतीच उबाठा सेनेचे नेतृत्व गोल गोल फिरत आहे. आजही उबाठा सेनेवर फुटीची टांगती तलवार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading