राम नाईक यांच्या हस्ते २८ ला वितरण
जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ डिसेंबरला सांगलीच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या दुसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात या पुरस्काराचे उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डा. वसंतराव जुगळे व संमेलनाध्यक्ष विनया खडपेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
यावेळी आमदार रामहरी रूपनवर, आमदार गोपीचंद पडळकर विशेष पाहुणे आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि एमएसईबीचे कार्यकारी संचालक मुरहरी केळ्ये आहेत. माजी ग्रामीण विकासमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह दहा जणांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. ही माहिती संमेलनाचे संयोजक आनंदा टकले यांनी दिली..
उज्ज्वला पुजारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी (चरित्र), आपली शेती-आपले सण ही पुस्तके लिहिली आहेत. तेजस पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था त्या गेली अनेक वर्षे चालवितात. तसेच तमदलगे येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असेही श्री. टकले यांनी सांगितले.
सौ. पुजारी यांच्याबरोबरच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना समाजभूषण पुरस्कार, मुरहरी केळ्ये यांना साहित्यभूषण पुरस्कार, कवी धनंजय सोलणकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
साहित्य संमेलनाचे सकाळी ९ वाजता उदघाटन ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डा. वसंतराव जुगळे यांच्या ह्स्ते होईल. पहिल्या सत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ः जीवन आणि कार्य या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी कवि धनंजय सोलणकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी चार वाजता उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
