July 27, 2024
try-to-make-life-beautiful
Home » जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न हवा
विश्वाचे आर्त

जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न हवा

चैतन्याचा ठायी । इयें शरीरांतरे जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोह दुःख ।। ११० ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात असे जो जाणतो, त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीही होत नाही.

असो सार्वभौम राजा चक्रवर्ती ।
चुके चिना अंती काळ-पाश ।। १ ।। स्वामी स्वरुपानंद, पावस
जरी सार्वभौम राजा असला तरी त्याला मरण हे असतेच. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावतोच. त्याचा शेवट हा ठरलेला आहे. यासाठी जे हे थोडेसे जीवन लाभले आहे ते सुंदर कसे करता येईल याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. हे सुंदर जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तसा बदल हा जगण्यात करायला हवा. पण मनुष्य इतका व्यस्थ आहे की त्याला याचा विचारच करायला वेळ नाही. संसारात गुरफटल्याने त्याला शांतपणे विचार करण्याची संधीच भेटत नाही. अशानेच त्याने शाश्वत सुख सोडून दुःखालाच कवटाळले आहे.

जीवनात चढउतार हे येतच असतात. सुख-दुःखेही येतात. राग, द्वेष, मत्सर या विकारांनी मन अस्वस्थ होते. मनाची शांतीही भंग पावते. रोजच्या कटकटी या नित्याच्याच असतात. सदैव स्वतःचा स्वार्थ आपण पाहात असतो. स्वार्थापायी आपण इतरांना त्रासही देत राहातो. पण हा स्वार्थ कधीकधी जीवन सुंदर करण्यासाठीही असतो. नियोजनबद्ध जीवन जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. यासाठीच मग उतारवयासाठी आपण काही नियोजन करतो. बचत करतो. अडीअडचणीच्या काळात ही संपत्ती निश्चितच उपयोगी ठरते. कारण उतारवयात आपलीच मुले आपणास सांभाळतील की नाही याची शाश्वती नसते. अशा घटनांनी आपले मन व्यथीत होते. म्हणूनच जीवनचा खरा अर्थ समजून घेऊन जीवन सुंदर करायला हवे.

कोण अधिक कमावतो. कोण पोटापुरतेच कमावतो. कोण काहीच कमवत नाही. तरीही तो जीवन जगत असतो. अधिक कमवणाऱ्यालाही दुःख होते. पोटापुरते कमवणाऱ्यालाही दुःख होत असते. काहीच कमवत नाही त्याचे तर जीवनच दुःखी असते. तरीही या सर्वांच्या आयुष्यात समाधान अन् सुख असते. म्हणूनच त्यांचे जीवन सुंदर होत असते. या दुःखातूनच जीवनाचा खरा अर्थ अवगत होत असतो. हे जीवन आपणाला का मिळाले आहे याचा विचार आपण कधी करतच नाही. असा विचार करणे म्हणजे सध्याच्या युगात जीवन जगणेच कठीण आहे. बदलत्या काळानुसार बदलत राहाल तरच जीवनात यशस्वी व्हाल असे सांगितले जाते अन् आपण बदलत राहातो. जीवन जगत राहातो. यात आपण आपले खरे जीवनच गमावून बसतो. उतार वयात मग याची आठवण होते. मग काही नाही म्हणून देवधर्म सुचतो. तेंव्हा तरी जीवनाची आपण विचार करतो का ? जो याचा करतो तोच जीवन सुंदर करतो.

स्वामी म्हणे एक जगी आत्मज्ञानी ।
मृत्यूतें मारुनी राहिलासे ।। ५ ।। संजीवनी गाथा २२३ स्वामी स्वरुपानंद

जीवन हे आत्मज्ञानी होण्यासाठी आहे हेच समजून घ्यायला हवे. जो हे ओळखतो तो या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. यासाठीच हे समजून घेऊन जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सतविचार अन् आचरण हाच विकारांवर उपाय

 नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी

भटकंती श्रीलंकेची…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading