उसाला कणसे आल्यावरच गाळप होणार असेल तर पर्याय शोधायलाच हवेत. शेतकऱ्यांनीच आता राजकारण सोडून फायद्या-तोट्याच्या गोष्टी ओळखून पावले उचलायला हवीत. शेती हा व्यवसाय आहे. त्याकडे व्यवसाय म्हणूनच पाहायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
नाना उंसाचीं कणसें । कां नपुंसके माणुसें ।
वन लागलें जैसें । साबरीचें ।। 576 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – अथवा उसाची कणसे अथवा नपुंसक माणसें अथवा सावरीची झाडें ही जशी व्यर्थ असतात.
उसाच्या रसापासून साखर किंवा गूळ तयार केला जातो. पण याचे अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी उसाचे गाळप योग्यवेळी करावे लागते. योग्य वयाचा ऊस अधिक गोड रस देतो. उसाचे वय जसे वाढेल, तसे त्यातील रसाचे प्रमाण कमी होत जाते. साखरेचे प्रमाणही कमी होते. अधिक वयाचा ऊस निरुपयोगीही ठरतो. कारण त्यामध्ये रस जरी असला तरी त्यात साखर नसते.
उसाला शेंडे फुटले, कणसे लागली की समजायचे तो ऊस जून झाला आहे. अशा उसामध्ये रस अधिक नसतो. सध्या साखर कारखाने उसाचे गाळप करताना हेच विचारात घेत नाहीत. उसाला शेंडे फुटायला लागले की ऊस नेतात. अशाने साखरेचे उत्पादन घटते. सहकारी साखर कारखान्यात राजकारण शिरल्याने उसाला शेंडे लागल्यावरच ऊस नेला जातो. अशा या गोष्टींनी त्या शेतकऱ्यांचे नुकसान होतेच, पण त्याबरोबरच साखर कारखान्याचेही नुकसान होते. गाळप कमी झाल्याने तोटा हा साखर कारखान्याचाच होतो.
खासगी साखर कारखाने याचा विचार करून उसाचे गाळप योग्य वेळी करत आहेत. खासगी कारखाने फायद्यात आहेत आणि सहकारी कारखाने तोट्यात. काही तांत्रिक गोष्टी विचारात घेतल्या तर नुकसान टाळता येऊ शकते. पण कारखान्यात राजकारण शिरल्याने कारखाने चालवणे कठीण झाले आहे. स्पर्धा जरूर असावी. पण त्यात खिलाडूपणा असावा. राजकारणात हा खिलाडूपणा आता राहिलेला नाही. खिलाडूवृत्ती खेळात असते, तशी ती राजकारणातही असायला हवी. कुस्तीत डाव करून पाडायचे असते. राजकारणातही असेच डाव असतात. पण येथे खिलाडूपणा नसल्याने हा खेळ न राहता युद्धभूमी झाली आहे. युद्धामध्ये प्रतिस्पर्ध्याचा शेवट झाला, तरी नुकसान दोघांचेही होते. सत्तेच्या स्पर्धेत खिलाडूपणा हवा. ती रणभूमी नाही. अशा या रणभूमीमुळेच शेतकरी नुकसानीत चालला आहे.
दरासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. सहकार आता उरलेला नाही. खासगी कारखाने झपाट्याने वाढू लागले आहेत. काही वर्षात पुन्हा सावकारी बळावण्याचा धोका वाढला आहे. खासगी दर देत असतील तर शेतकरी तिकडे वळतील. शेवटी फायदा हा शेतकऱ्यांनी पाहायलाच हवा. उसाला कणसे आल्यावरच गाळप होणार असेल तर पर्याय शोधायलाच हवेत. शेतकऱ्यांनीच आता राजकारण सोडून फायद्या-तोट्याच्या गोष्टी ओळखून पावले उचलायला हवीत. उसाची कणसे ही काही खाण्यायोग्य नसतात. ना त्याला दाणे येतात. उलट या कालावधीत उसातील साखरेचे प्रमाण घटते. म्हणजेच असा ऊस गोडीलाही नसतो. शेतकऱ्यांनी अशा निरुपयोगी गोष्टी, अशा व्यर्थ गोष्टी ओळखून शेती करायला हवी. तरच शेती फायद्यात राहील.
शेती हा व्यवसाय आहे. त्याकडे व्यवसाय म्हणूनच पाहायला हवे. अध्यात्म हेसुद्धा शेतच आहे. या शेतात आत्मज्ञानाचे पीक साधक घेतो. उसाला शेंडे फुटल्यावर गाळप करून योग्य प्रमाणात साखर मिळत नाही, तसे उतारवयात या शेतात आत्मज्ञानाचे पीक योग्य प्रमाणात मिळत नाही. यासाठी बालवयातच नांगर धरायला हवा. तरच आत्मज्ञानाची अमाप साखर मिळू शकेल.