२२ मार्च २०२३ जागतिक जल दिनानिमित्त…
प्रत्येकाचा नदीवर तितकाच अधिकार आहे, आपणास जसे स्वच्छ पाणी मिळते आपण वापरतो, तसे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि वापरता आले पाहिजे, हा विचार जेव्हा रूजेल तेव्हा खऱ्या अर्थाने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडेल.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
अन्न, पाणी आणि हवा या सजीवांच्या मूलभूत गरजा. मात्र, अन्न, वस्त्र आणि निवारा मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे शिकवले जाते. त्यातही, सजीव सृष्टीची सुरुवात पाण्यातून झाली. त्यामुळेच पाण्याला ‘जीवन’ हे नाव मिळाले. मानवासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वाचे. मानवाला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, पाणी हवे असते. म्हणूनच मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठी झाला. नद्यांचे महत्त्व जाणून त्यांना ‘जीवनदायिनी’ अशी ओळख मिळाली.
यातील अन्न, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी निसर्ग पुरवतो. अन्न मिळवण्यासाठी जसे आपणास कष्ट घ्यावे लागतात, तसे कष्ट पाणी आणि हवा मिळवण्यासाठी घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांचे मोल किंवा महत्त्व लक्षात येत नाही. हवा आणि पाण्याचा वापर मानवाकडून इच्छेनुसार आणि गरजेपेक्षा जास्त केला जातो. एकिकडे पाण्याचा वापर वाढत गेला आणि दुसरीकडे पाणी वापरणारी मानवी लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे पाण्याची टंचाई अनेक भागात जाणवू लागली. हे लागणारे पाणी मुलत: पावसापासून मिळते.
पाऊस काही भागात जास्त पडतो, तर काही भागात कमी. त्यामुळे वाढलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी नद्या आणि पाण्याच्या स्रोताला अडवून कृत्रिम जलसाठे बनवले. येथेच निसर्गात मानवाचा हस्तक्षेप सुरू झाला. मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, नद्यांतील वाळू उपसा, नद्याच्या उगमस्थानाजवळील डोंगररांगांची तोडफोड, या सर्व गोष्टीनी पाण्याच्या उपलब्धतेत अडथळे येऊ लागले. त्यातच नागरी वस्त्या, कारखाने, उद्योग व्यवसायात वापरले गेलेले पाणी स्वच्छ पाण्याच्या साठ्यात मिसळू लागले. याचा परिणाम म्हणून पाण्याची उपलब्धता आणखी कमी झाली. पूर्वी नदीतील पाणी थेट पिण्यासाठी वापरत. आता बाटलीतील पाणी पितानाही मन साशंक होते. ही सर्व परिस्थिती उद्भवली कारण आजही सर्वसामान्यांमध्ये जलसाक्षरता नसणे हे आहे.
हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांचे संयुग म्हणजे पाणी. यातील हायड्रोजन तीव्र ज्वालाग्राही मूलद्रव्य; तर, ऑक्सिजन ज्वलनासाठी अत्यावश्यक घटक. हायड्रोजन जळतो आणि पाणी तयार होते. ते रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी असते. असे पाणी मानवी शरीराला उपयुक्त नसते. त्यात काही क्षार मिसळतात आणि ते पिण्यास योग्य बनते. मात्र बाह्यघटक मानवी शरीराला आवश्यक ते आणि योग्य प्रमाणात असावे लागतात.
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणत उपलब्ध होत असते. मात्र पाण्याचा अमर्याद वापर आणि स्वच्छ पाण्यात घाण किंवा वापरलेले पाणी मिसळण्याचे वाढते प्रमाण यातून पाण्याची टंचाई निर्माण होते. ज्या पंचगंगेचे पाणी कोल्हापूर वापरते, त्याच नदीचे पाणी अवघ्या वीस-पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या इचलकरंजीमध्ये वापरण्यास अयोग्य बनते. म्हणूनच पाण्याच्या प्रश्नाकडे डोळस नजरेने पाहण्याची गरज आहे.
मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून, शेती, उद्योग, व्यवसाय, स्वच्छतेच्या सवयींमुळे पाण्याच्या वापरात मोठी वाढ झाली. या वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. या गोष्टींचा साकल्याने विचार करायला हवा. मानवी देहात मोठ्या प्रमाणात पाणी असते. लहान बालकांमध्ये ७५ टक्के, पुरूषांमध्ये ६० टक्के, स्त्रियांमध्ये ५५ टक्के पाणी असते. मानवी मेंदू आणि हृदयामध्ये ७३ टक्के, स्नायू आणि मूत्रपिंडामध्ये ९८ टक्के पाणी असते. हाडातही ३१ टक्के पाणी असते. प्रतिमाणसी केवळ १३० लिटर पाण्यामध्ये स्नानासह सर्व कार्ये सुरळीत पार पडतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवतात. शुद्ध प्रक्रिया केलेले पाणी बागांसाठी, गाड्या धुणे, परिसर स्वच्छतेसाठी वापरले जाते. नागरी वस्तीसाठी जितके पाणी वापरले जाते, जवळपास तितकेच वापरलेले पाणी तयार होते. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करायला हवी. अनेक गावे आणि शहरे याची कोणतीही व्यवस्था न करता नाल्यातून, नदीपात्रात मिसळू देतात. हळूहळू प्रदूषणाचे प्रमाण वाढते आणि नदीपात्रातील शुद्ध पाणी वापरण्यायोग्य राहात नाही ?
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातील बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. समुद्रातील पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही सरोवरातील आणि भागातील पाण्याचे साठे खाऱ्या पाण्याचे आहेत. तेही वापरता येत नाहीत. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच पडतो. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते.
बेजबाबदार पाणी वापराबरोबर इतरही कारणे आहेत. महाराष्ट्र भूमीत खाली बेसॉल्ट खडक आहे. यातून जमिनीत पाणी फारच कमी पाझरते. एकूण पडणाऱ्या पावसाच्या पाण्यातील केवळ १० टक्के पाणी पाझरते. १७ टक्के पाण्याची वाफ होते. त्यातील केवळ सहा टक्के पाणी तलावात आणि जलसाठ्यात साठवले जाते. तर ६७ टक्के पाणी नदीपात्रातून वाहून समुद्राला जाऊन मिळते. युरोप आणि अमेरिकेत २५० टक्के पाणी साठवण्याची क्षमता आहे. भारतात आणि महाराष्ट्रात हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. जे पाणी उपलब्ध आहे, त्यातील केवळ ११ टक्के पाणी नागरी वस्तीसाठी, १९ टक्के पाणी उद्योग-व्यवसायासाठी, तर ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. या सत्तर टक्के पाण्यातील बहुतांश पाणी हे विहिरी आणि कुपनलिकांतून म्हणजेच भूगर्भातून उपसले जाते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी घटते. त्याचा परिणाम वृक्षराजीवर होतो. दुसरे म्हणजे हे पाणी शेकडो वर्षांपूर्वी तेथे पोहोचलेले आहे. उपसलेल्या पाण्याचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे जमीन शुष्क होते.
आपण जे अन्न खातो, त्याचाही विचार करण्याची गरज आहे. एक किलोग्रॅम चॉकलेट तयार होताना १७१९६ लिटर पाणी लागते. बीफ तयार होताना १५४१५ लिटर पाणी लागते. बकऱ्याचे एक किलो मटण तयार होताना १०४१२ लिटर पाणी लागते. एक किलोग्रॅम चिकन तयार होण्यासाठी ४३२५ लिटर पाणी लागते. एक किलोग्रॅम तांदूळ पिकवण्यासाठी २४९७ लिटर पाणी लागते. ११ अंड्यांसाठी ९६ लिटर पाणी लागते. एक लिटर बीअर बनवण्यासाठी २९६ लिटर पाणी लागते. तर एक किलोग्रॅम साखर बनवण्यासाठी २५०० लिटर पाणी लागते. मुबलक पाण्यामुळे ऊस लावतात. उसासाठी कारखाने. या कारखान्यातून बाहेर पडणारे मळीयुक्त पाणी पुन्हा नदीपात्रात मिसळते. शेतीमध्ये खते, तणनाशके, किटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यातील केवळ अकरा टक्के भाग पिकांच्या उपयोगी पडतो. उर्वरित भाग पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातो. त्यामुळे नद्यांतील पाण्याचे प्रदूषण वाढते.
कारखान्यातून बाहेर पडणारे, नागरी वस्त्यातील वापरलेले पाणी, प्लॅस्टिक आणि घरगुती कचरा, रसायने पाण्यात मिसळल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते. नद्यांतील पाणी पुढील गावांना वापरण्यास अयोग्य बनते. आपल्या पाण्याची काळजी आपणच घेत नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. नदीच्या खालच्या बाजूला आपलेच बांधव राहतात. नदीवर त्यांचाही अधिकार आहे आणि त्यांनाही स्वच्छ पाणी मिळायला हवे, याचा विचार नदीपात्राच्या वरच्या बाजूला राहणारी मंडळी करत नाहीत. प्रत्येकाचा नदीवर तितकाच अधिकार आहे, आपणास जसे स्वच्छ पाणी मिळते आपण वापरतो, तसे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि वापरता आले पाहिजे, हा विचार जेव्हा रूजेल तेव्हा खऱ्या अर्थाने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडेल.
पाणी साठवणे, जिरवणे, मुरवणे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. गावाला हे शक्य आहे. प्रत्येकाला जलसंधारणाचे कार्य करण्याची संधी मिळेलच, असे नाही. मात्र पाण्याचा वापर काळजीपूर्वक करून आपणही पाण्याच्या कार्यात सहभागी व्हायला हवे. आपण दररोज ब्रश करतो. ब्रश सुरुवातीला भिजवण्यासाठी सुरू केल्यानंतर, शेवटी चूळ भरेपर्यंत तसाच सुरू ठेवला, तर दहा लिटरपर्यंत पाणी वाया जाते. दाढी करताना ब्रश ओला करण्यासाठी नळ सुरू केल्यानंतर, शेवटी खोरे धुवेपर्यंत नळ सुरू राहिला, तर, तीस लिटरपर्यंत पाणी वाया जाते. अनेकांना ग्लास भरून पाणी घेण्याची, त्यातील दोन घोट पिऊन उरलेले पाणी टाकून देण्याची सवय असते. दिवसभर असे करत राहणारी माणसे लिटर-दोन लिटर पाणी सहज वाया घालवतात. आपण घरात आवश्यकतेनुसार पाणी वापरायला हवे. एवढे जरी करू शकलो, तरी आपण जलसाक्षर झालो, असे मानता येईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.