कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. यजुर्वेदात कारीरी इष्टिनामक यज्ञ सांगितला आहे. पुरातनकाळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे. याला शास्त्रीय आधारही आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ।।135।। अध्याय 3 रा
ओवीचा अर्थ – तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचें मूळ आहे.
शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो. पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही तर शेती ओस पडेल. कुपोषणाची समस्या उभी राहील. दुष्काळामुळे जनावरांचेही हाल होतील. ती कशी जगवायची? की कत्तलखान्यात पाठवायची असे अनेक प्रश्न उभे राहतात. वर्षात दोन ते अडीच महिने पडणारा पाऊस कमी झाला तरी समस्या, अधिक झाला तरीही समस्या. पावसाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. बऱ्याचदा पेरणी होते पीक उगवून येते आणि पाऊस दडी मारतो. पेरणी वाया जाते. मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्यानंतर पावसासंदर्भातील अनेक अंधश्रद्धांना ऊत येतो.
भोळाभाबडा शेतकरी अशा या अंधश्रद्धांना बळीही पडतो. पाऊस पडण्यासाठी कोण गाढवांची लग्ने लावतो, तर कोण बेडकांची लग्ने लावतो. काही ठिकाणी कौल लावण्याचीही पद्धत आहे. काळ्या घोड्याला किंवा मेंढीला गावातून हाकतात. ते पळत असताना जर त्यांनी मूत्र विसर्जन केले तर पाऊस पडतो असे मानले जाते. अशा अनेक प्रथा आजही प्रचलित आहेत. कारण पावसाचा अनियमितपणा सर्वांनाच भेडसावतो आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेली व्यक्ती मग अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. यामुळे खरंच पाऊस पडतो का याला काहीही शास्त्रीय आधार नाही. अशा अनेक अंधश्रद्धा ग्रामीण भागात पाहायला मिळतात. यात अनेकांचे बळीही जातात.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. यजुर्वेदात कारीरी इष्टिनामक यज्ञ सांगितला आहे. पुरातनकाळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे. याला शास्त्रीय आधारही आहे. यज्ञामध्ये आंबा, वड, पळस, पिंपळ, जांभूळ, उंबर अशी चिक निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या वापरल्या जात. यामध्ये मीठ, नवसागर टाकले जायचे. याला पर्जन्ययाग असे म्हटले जाते. यामुळे पाऊस पडतो.
काही वर्षांपूर्वी डॉ. राजा मराठे यांनी वरुणयंत्राचा प्रयोग याच शास्त्रीय आधारावर महाराष्ट्रात राबविला होता. ढगाळ वातावरणाच्या काळात हा यज्ञ करून पाऊस पाडण्यात आला. साधे मीठ 804 अंश सेल्सिअसला वितळते. तर 1475 अंश सेल्सिअसला उकळते. यज्ञामध्ये मीठ टाकल्यानंतर ते वितळते. वितळलेले हे बाष्पीभूत मीठ तीव्र ज्वालामुळे आकाशात जाते. वातावरणात या आयनिक मिठाचा मुक्त संचार होतो. उष्ण ढगापर्यंत हे आयन पोहोचल्यानंतर त्या ढगांचे पाण्यात रूपांतर होते व पाऊस पडतो. असे हे रासायनिक समिकरण आहे.
पूर्वीच्या काळातील यज्ञ हे अशाच रासायनिक अभ्यासावर आधारलेले होते. यज्ञामुळे पाऊस पडतो, याला असा शास्त्रीय आधार आहे. चीनमध्ये डॉपलर रडारचा वापर करून कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. सध्या असे अनेक प्रयोग विकसित केले जात आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.