October 6, 2024
Hailing Sri Gurudev in the form of air
Home » Privacy Policy » वायुरुपी श्री गुरुदेवाचा जयजयकार
विश्वाचे आर्त

वायुरुपी श्री गुरुदेवाचा जयजयकार

वायू रुपी गुरु अर्थात आपला श्वास, आपला प्राणवायू ऑक्सिजन. जो शरीरात जातो अन् अशुद्ध वायू अर्थात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो. ही क्रिया सुरु असताना उत्पन्न होणारा स्वर अर्थात सोहम

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।
जन्मजरा जलदजाळ । प्रभंजन ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म आणि म्हातारपणरूपी मेघांच्या फळीची धूळधाण करणाऱ्या हे वायुरुपी श्री गुरुदेवा, तुमचा जयजयकार असो.

आकाशात ढग जमा होतात. मुसळधार पाऊस कोसळणार अशी स्थिती उत्पन्न होते. पण काही क्षणातच वारा सुटतो, अन् हे सर्व ढग विखुरले जातात. पावसाचा थेंबही पडत नाही. असे बऱ्याचदा घडते. वारा अर्थात वायूरुपी शक्ती, वायूरुपी गुरु जो माणसाच्या मनात उत्पन्न झालेले अज्ञानाचे ढग, संशयाचे ढग क्षणात दूर करतो. मनाचे आकाश निरभ्र, स्वच्छ करतो. साधनेसाठी मनाची स्वच्छता ही गरजेची असते. अज्ञानाचे, संशयाचे ढगही साधनेत अडथळा ठरतात. हे अज्ञान दूर करण्याचे काम गुरु करतात.

वायू रुपी गुरु अर्थात आपला श्वास, आपला प्राणवायू ऑक्सिजन. जो शरीरात जातो अन् अशुद्ध वायू अर्थात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो. ही क्रिया सुरु असताना उत्पन्न होणारा स्वर अर्थात सोहम. आपल्या जन्मापासून सुरु असतो. म्हातारपणीही तो सोबत असतो. अन् मृत्यू बरोबर थांबतो. अर्थात शरीरातून तो निघून जातो. ही वायूरुपी शक्ती अर्थात आत्मा, ब्रह्म. याला जाणणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे. आत्मज्ञानी होणे. हा सोहमचा स्वर अर्थात वायूचा स्वर आपण जाणतो, तेव्हा आपले अज्ञान दूर होते. मनातील शंका, कुशंकाचे ढग नाहीसे होतात अन् स्वच्छ ज्ञान प्रकट होते. यासाठी या वायुरूपी गुरुची साधना करायला हवी. दृढनिश्चयाने अन् मनपूर्वक करायला हवी.

पृथ्वीच्या वातावरणात ७८ टक्के नायट्रोजन अन् २१ टक्के ऑक्सिजन अर्थात प्राणवायू आहे. सूर्यमंडलामध्ये पृथ्वी व्यतिरिक्त केवळ बुध या ग्रहावरच ऑक्सिजन आहे. तेथे तो ४२ टक्के आहे. पृथ्वी व्यतिरिक्त अन्य ग्रहावर सजिवसृष्टी आहे का याचा शोध संशोधक घेत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन शिवाय आपण जगूच शकत नाही. जीवंतच राहू शकत नाही. एखाद्या हवाबंद खोलीत आपणास कोंडून ठेवले तर आपला गुदमरुन मृत्यू होतो. कारण जो पर्यंत त्या खोलीत ऑक्सिजन आहे तोपर्यंतच आपण जीवंत राहातो. ऑक्सिजन आपण आत घेतो अन् कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडतो. खोलीत कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने आपला गुदमुरून मृत्यू होतो. यामुळेच आपण अन्य ग्रहावर जीवंत राहू शकत नाही. त्यामुळे तेथे मनुष्यवस्ती, सजीवसृष्टी असण्याची शक्यता खूपच कमी आहे.

वातावरणामध्ये मंगळावर ९५ टक्के तर शुक्रावर ९६ टक्के कार्बनडाय ऑक्साईड आहे. येथे सजीवसृष्टी नाही. अन्य कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही हे विचारात घेऊन पृथ्वीवरील हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी आपण जागरूक व्हायला हवे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणार नाही व अन्य विषारी वायूंचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. ऑक्सिजन या प्राणवायूरुपी गुरुची सेवा आपण करायला हवी. तरच सेवकांचे कल्याण हा वायूरुपी गुरु करेल. हे विचारात घेऊन मानवाने जागृत होणे गरजेचे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading