देहात नैसर्गिकरित्या तेज वाढवणारी रसायनांची निर्मिती होत असताना कृत्रिम रसायनांचा वापर का करायचा ? क्षणिक आनंद आणि कायमस्वरुपी टिकणारा आनंद ओळखूण योग्य मार्ग निवडायला हवा. नैसर्गिक प्रेम हे कायमस्वरुपी टिकणारे असते. कृत्रिम प्रेम हे काही कालावधीपुरते असते. त्यात दुरावा येऊ शकतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडे पाहिजे उपमा ।
तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ।। 485 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा
ओवीचा अर्थ – त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय.
आपण प्रेम कशावर करायला हवे ? देहावर कि आत्म्यावर. आपण मुख्यतः जीवनभर देहावरच प्रेम करतो असे लक्षात येईल. आत्म्याची आपणाला ओळखच होत नाही. देहाच्या प्रेमामुळे आत्म्याचा आपणाला विसर पडला आहे. देह सुंदर दिसावा यासाठी आपण नट्टापट्टा करतो. नेहमी आपण तरूण दिसावे असा आपला प्रयत्न असतो. यासाठी आपल्या अनेक खटपटी सुरु असतात. चेहरा तजेल, उजळलेला दिसावा हा प्रयत्न असतो. त्यात तसे गैर काहीच नाही. हे स्वाभाविक आहे. पण त्यातले क्षणिकत्व आपण जाणत नाही. कृत्रिम आणि नैसर्गिकपणा आपणास ओळखता येत नाही. देहाच्या प्रेमात पडल्यामुळे असे होते.
जन्म झाला की वयोमानानुसार वृद्धत्व हे येणारच. पण देहाचा हा बदल आपल्या लक्षात कसा येत नाही. जे नाशवंत आहे त्यावरच आपण प्रेम का करत राहातो ? अविनाशी असा आत्मा याची आपण ओळख त्यामुळे विसरतो. आपले प्रेम कोणावर हवे. नाशवंत वस्तुवर की अमर वस्तूवर हे आपण विचारात घ्यायला हवे. आत्मा अमर आहे हे जाणून आपण आत्मरुप व्हायला हवे. आत्म्याशी आपण एकनिष्ठ व्हायला हवे. देह आणि आत्मा वेगळा आहे हे जाणून घेऊन आपण आत्म्यावर प्रेम करायला हवे.
आत्म्यावर प्रेम केल्यास देहाचेही सौंदर्य वाढते. साधनेने चेहऱ्यावर तजेलपणा येतो. वृद्धत्वाच्या काळातही ते तेज काम राहाते. चेहऱ्यावरील हा उत्साह स्पष्टपणे इतरांनाही जाणवतो. आत्मरुपाशी साधनेने एकरुप झाल्यास त्या प्रेमाने सकारात्मक रसायनांची वाढ होते. त्यामुळे येणारा तेजस्वीपणा चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतो. यासाठी आपण आत्म तत्त्वाशी एकरुप व्हायला शिकले पाहीजे. प्रेमातील रसाने मानसिक आनंद प्राप्त होतो. या आनंदामुळे सात्विक रसांची वृद्धी होते. सात्विक विचारांमुळे मनाला सुख-शांती प्राप्त होते. अखेर आपण आत्मस्वरुप होऊन जातो. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी प्रेम कोणावर करायला हवे हे आपण ठरवायला हवे.
देहाची योग्य निगा आपण राखायलाच हवी. पण ही निगा नैसर्गिक पद्धतीने राखता येत असेल तर कृत्रिमपणावर जोर देणे किती योग्य आहे. देहात नैसर्गिकरित्या तेज वाढवणारी रसायनांची निर्मिती होत असताना कृत्रिम रसायनांचा वापर का करायचा ? क्षणिक आनंद आणि कायमस्वरुपी टिकणारा आनंद ओळखूण योग्य मार्ग निवडायला हवा. नैसर्गिक प्रेम हे कायमस्वरुपी टिकणारे असते. कृत्रिम प्रेम हे काही कालावधीपुरते असते. त्यात दुरावा येऊ शकतो. हे सर्व जाणून देह आणि आत्म्यातील फरक जाणायला हवा. अमर आत्म्याशी एकरूप होऊन आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. हे ज्ञान नैसर्गिक तर असतेच तसेच ते आपणास अमरत्वही प्राप्त करून देते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.