जागर..!
मराठी माणसाचे अस्तित्व या कष्टकऱ्यांच्यामुळे टिकली आहे. राजे महाराजे सारखे येऊन भाषणे करणाऱ्या राज आणि उद्धव मुळे नव्हे..! तुम्ही अनेक चुका केल्या. कसेही वागलात. मराठी माणसाच्या श्रमावर उभे राहिलेल्या गिरण्या संपवल्या तरी तो (मराठी माणूस )श्रम करीत तुमच्या भाषणावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतच राहिला. तुम्ही काही तरी कराल अशी त्याला अपेक्षा होती. आता तर महाराष्ट्र मातीत जातो आहे. अशावेळी तुम्हाला जाग येणार आहे की नाही..?वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक
मराठी माणूस लिफ्ट मध्ये किंवा वॉशरूम साफ करताना आपणास भेटेल त्याला विचारावे कुठून आला आहेस समृद्धी महामार्गाने की शक्तीपीठ महामार्गावरून…? आमच्यातील वाद, भांडणं या गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येणे कठीण नाही”. इति राज ठाकरे, संस्थापक महाराष्ट्र नवनिर्माण सेना…! महाराष्ट्र खूपच मोठा आहे. त्याच्यापुढे तुम्ही किरकोळ, चिल्लर आहात. हे स्वतःच म्हणता ते बरे झाले. कारण ते कोणालाही काहीही म्हणू शकतात. त्यांना कोणी काही म्हटलेले आवडत नाही.
महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांचा ठेका यांनाच पूर्वाश्रमीच्या काँग्रेसने दिला आहे. भाजपला सोबत घेऊन हे ठेकेदार रात्री – अपरात्री काँग्रेसवाल्यांच्या वाड्यांचे दरवाजे वाजवून झोप उडवू लागले. तेव्हा काँग्रेसवाले अस्वस्थ झाले, जागे झाले. पण तोवर वेळ निघून गेली होती. दोन वसंतरावांच्या कर्तृत्वाविषयी महाराष्ट्राला आदर असला तरी त्यांनीच या पोरांचे लाड केले आहेत. पुढे ही पोरं ठेकेदार कधी झाली हे महाराष्ट्रालाही समजले नाही.
बाळ ठाकरे यांची जडणघडण होत असताना प्रबोधनकार ठाकरे यांची थोडीफार तरी सावली पडलेली असणारच आहे. आत्ताचे दोघे ठाकरे आणि त्यांची मुलं ही महाराष्ट्राने आपल्या पालख्या वाहिल्याच पाहिजेत, असे सांगत असतात. काँग्रेसच्या घराण्यासमोर उभे करून न घेतलेली बेरोजगार तरुण या पालख्यांचे भोई होण्यास तयारच असतात. आता शिवसेना चोरीस गेली आणि मनसेचे बोन्साय झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो.
महाराष्ट्र मोठा आहे. त्याच्यापुढे आमची भांडणे किरकोळ आहेत, असे सुविचार राज ठाकरे यांना मांडले आहेत. महाराष्ट्राचे आता काय राहिले आहे ? पूर्वजांच्या श्रमातून उभे राहिलेला महाराष्ट्राचा पाया मजबूत आहे म्हणून तो ढासळत नाही. विद्यमान राज्यकर्ते त्याला महाराष्ट्राला मातीत घालायला निघाले आहेत. तरी अजून जर तरची भाषा करीत राज ठाकरे म्हणतात.
मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्रातून मराठी माणूस हद्दपार होत आहे. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळवून लावण्याचे उद्योग गुजरातचे भाजपवाले करीत आहेत. तरी तुमचे डोळे उघडत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी प्रथम महाराष्ट्राचे सत्ता आसन स्वीकारण्याचे एका विशिष्ट परिस्थितीत मान्य केले. अन्यथा २०१९ मध्येच एकनाथ शिंदे या आणखीन एका शिवसैनिकास महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसण्याचा पराक्रम करता आला असता. महाराष्ट्राचे ते तिसरे शिवसैनिक असते या पदावर जाणारे… सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांच्या भावकीतून पोट भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्यांचा हा पोर आहे. ( ते कसे वागले हे थोडे बाजूला ठेवू या ) कोण होते एकनाथ शिंदे…? ते पहिल्यांदा मुंबईला गेले असतील तेव्हा दरे या गावापासून महाबळेश्वरला मुंबईची एसटी गाडी पकडण्यासाठी २५ किलोमीटर दऱ्या खोऱ्यातून चालत आले असणार आहेत. महाराष्ट्रातील तळ कोकणातील आणि सह्याद्रीच्या कड्या कपारातील तसेच पठारावरील दुष्काळाने करपलेली माणसंच मुंबईत जात होती. ती आली म्हणून मुंबई महाराष्ट्राची राहिली… ती आली, ती लढली, त्यांनी गोळ्या झेलल्या म्हणून मराठी माणसाची मुंबई राहिली. ती आली नसती तर मुंबईवर बिगर मराठी भाषिकांनी कधीच कब्जा केला असता.
मराठी माणसाचे अस्तित्व या कष्टकऱ्यांच्यामुळे टिकली आहे. राजे महाराजे सारखे येऊन भाषणे करणाऱ्या राज आणि उद्धव मुळे नव्हे..! तुम्ही अनेक चुका केल्या. कसेही वागलात. मराठी माणसाच्या श्रमावर उभे राहिलेल्या गिरण्या संपवल्या तरी तो (मराठी माणूस )श्रम करीत तुमच्या भाषणावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतच राहिला. तुम्ही काही तरी कराल अशी त्याला अपेक्षा होती. आता तर महाराष्ट्र मातीत जातो आहे. अशावेळी तुम्हाला जाग येणार आहे की नाही..? हा कळीचा मुद्दा मराठी माणसांच्या समोर आहे. नवे महाबळेश्वर आणि शक्तिपीठ महामार्ग ही दोन ठळक उदाहरणे आहेत. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करून मराठी माणसाचे यातून कसे भले होणार आहे? हे एकदा महाराष्ट्राला पटवून देण्याचा प्रयत्न करून बघा..!
नव्या महाबळेश्वराने खेड्यांना करण्यात ५२९ खेड्यांना घेरले जाणार आहे. हीच ती खेडी आहेत. याच गावची (ज्यांचे तेरावे वंशज) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर जीव तळहातावर घेऊन लढत होते. इतिहास संशोधक राजे महाराजांचा इतिहास मांडतात. त्यांच्या कहाण्या सांगून स्वतःची पोट देखील भरून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडील हजारो मावळ्यांची घरे असतीलच ना..? त्यांची गावे ही त्या काळात असतील ना..? त्यांचेही आई-वडील मागे वाट पाहत असतील ना…? त्यांची पुढची पिढी पुन्हा लढण्यास तयार होत असतील ना..? त्या सैनिकांची (मावळ्यांची) आता तेरावी वंशावळ असणार आहे. कारण महाराजांचे तेरावे वंशज म्हणून गौरव आणि ज्यांचा उल्लेख होतो. त्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या पिढीच्या राजा बरोबर कोण कोण होते..? ते आता कसे जगतात..? याचा कधीतरी आपण विचार केला आहे का? घरदार सोडून त्यांना लालबागच्या परिसरातील दहा बाय दहाच्या खोलीत दाटीवाटीने कसे जगायचे याचा घोर लागलेला होता. ते संघटित होऊन जगण्याची धडपड करीत होते. तेव्हाचे काँग्रेसवाले कोणाची बाजू घेत होते..? त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचे (शिवसेना) आत्ताचे कार्य काय असायला हवे होते..?
आमची भांडणे असा जेव्हा उल्लेख राज ठाकरे अधिकारवाणीने करतात. तेव्हा ते कोणाच्या जीवावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपेक्षित ही राहिलेली माणसं फाटकी चड्डी घालून मुंबई- ठाण्यात झोपडपड्यांचा आश्रय घेतलेली याच मराठी माणसांच्या मनगटाच्या जोरावर शिवसेना उभी राहिली. मराठी माणसाला पडलेले ते एक स्वप्न होते. एक नवा राजकीय पर्याय होता समोर मार्ग सापडल्याचा आनंद दुमदुमत होता.
सोविएत रशियाच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर भारावलेल्या मुंबई महानगरीतील श्रमिक वर्गातून नवा अंकुर फुलला होता. तो अंकुर स्वतःच्या हाताने मारून टाकून मराठी माणूस नव्या अशाने शिवसेनेच्या झेंड्यासाठी धावला. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज कडील एका गिरणी कामगाराची माय मुंबईच्या कामगार वस्तीत खानावळ चालवून नवऱ्याच्या तुटपूजा उत्पन्नात भर घालत होती. खानावळीत येणाऱ्यांसाठी रोज दोन अडीचशे भाकऱ्या थापत होती. गिरण्या बंद पडल्या. ही सर्व मंडळी गावाकडे आली तेव्हा जगण्याची पुन्हा धडपड सुरू झाली. त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. खरे तर ते जेवणाचेच निमंत्रण होते. पण ते निमंत्रण कसे स्वीकारावे असे वाटले. जे हात इतके थकले असतील त्या माऊलीच्या हाताला आमच्यासाठी पुन्हा भाकऱ्या थापायला सांगायचे का..? असा मनात थरकाप उडून देणारा सवाल उपस्थित झाला होता.
महाराष्ट्रातील अशा उपेक्षित भागातून आलेल्या मराठी माणसासाठी महाराष्ट्र सरकार काय करते? मग तो तळ कोकणातला माणूस असो, पश्चिम घाटातील दऱ्याखोऱ्यातील माणूस असो, किंवा पश्चिम महाराष्ट्र तसेच पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यामधील दुष्काळाने करपलेला माणूस असेल. तसेच डहाणू परिसरातील किंवा नाशिकच्या सुरगाणा मधील किंवा पूर्व विदर्भातल्या गडचिरोली मधील किंवा अमरावतीच्या मेळघाट मधील आदिवासी माणूस असेल. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करते..? लाखो कोटीची गुंतवणूक करून रस्ते उभारले जात आहेत. ते कोणासाठी आहेत? त्यातून कोणाचा विकास होणार आहे ?
नवे महाबळेश्वर उभे करत असताना तेथे चार खोल्यांचे घर मेळघाटमधील आदिवासीला मिळणार आहे का..? का मराठवाड्यातील दलित कुटुंबाला मिळणार आहे किंवा सांगोल्यातील थेंब थेंब पाणी घालून डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार आहे..? याचे सविस्तर उत्तर महाराष्ट्राचा अभिमान सांगून राजकारण करणाऱ्यांनी दिले पाहिजे. सत्तेचे राजकारण बाजूला ठेवले तरी बाळासाहेब ठाकरे सत्तेला कधी भीक सुद्धा घालत नव्हते. फाटक्या माणसाला आमदार – खासदार- मंत्री केले. काँग्रेसच्या घराणेशाहीने ज्यांना सर्वार्थाने नाकारले होते. त्यांना सत्तेवर येण्याचा मार्ग दाखवला.
छत्रपती संभाजी नगरच्या चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या बुरुड समाजातील तरुणाला सत्तेचे सोपान भेटले. अन्यथा स्वातंत्र्य दिनाची शंभरी साजरी केली जात असताना देखील अशी माणसे सत्य पर्यंत पोहोचू शकली नसती. याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. काँग्रेसने हे सुद्धा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आता ही माणसे कोठे आहेत…? त्यांच्यावर कोणती वेळ आली आहे…? ” माझा जमिनीचा तुकडा घ्या महामार्ग करा तेव्हा कुठे मला चार पैशाचे दर्शन होईल शेतात राबून काही हाती लागणार नाही” यावर आता ज्यांचा विश्वास बसू लागलेला आहे ते जमिनी द्यायला तयार आहेत असे अभिमानाने राज्यकर्ते सांगताहेत.
मुंबईत साध्या झिरो स्टार असलेल्या हातगाडीवर ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये लोक पोटभर खात असतात. स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या जोडल्या जात असतात. खाद्यपदार्थांची रेलचेल असते. हे सर्व या मराठी माणसामुळेच ना..? ती आता शक्तीपीठ मार्गासाठी २७ हजार हेक्टर जमीन देऊन दारोदारी भटकणार आहेत. कृष्णा – कोयना नद्यांच्या खोऱ्यातील ५२९ गावांची दोन लाख नऊ हजार हेक्टर वरील हक्क गमावून बसणार आहेत. एकेकाळी चड्डी घालून मुंबई गाठणारा माणूस आता मुंबईवरून हनुमानासारखे उड्डाण करीत या खोऱ्यात येतो आहे. त्याला गावच्या माणसासाठी एसटी गाडी धावते आहे की नाही याची काळजी करावी असेही आता वाटत नसावे.
पैसा एवढा आहे की, राष्ट्रपती भवनातील ट्युलिप गार्डन सारखी सजलेली शेती करण्याचा मनसोक्त आनंद मिळवता येत आहे. आता पुण्या – मुंबईपासून थेट दिल्लीपर्यंतचा पैसेवाला माणूस शुद्ध हवा खाण्यासाठी नव्या महाबळेश्वरमध्ये अवतरणार आहे. मावळ्यांच्या तेराव्या चौदाव्या वंशजा माणूस गेट उडायला पुढे सरसावणार आहे. स्वयंपाक करायला मावळ्यांच्या वंशातील मायलेक येणार आहे. तिच्याकडूनच झाडू पोचा मारून घेतला जाणार आहे. जसे भुर्रकन उडत येतील आणि असे भुर्रकन निघूनही जातील. बंगल्याला कुलूप ठोकले जाणार आहे. तेव्हा या ५२९ गावातील मावळ्यांच्या चौदाव्या वंशजाची तरुणाई काय करीत असणार आहे..? ती आता मुंबईला परळ किंवा लालबागेत सुद्धा जाऊ शकणार नाही. कारण ते पूर्वीचे मराठी माणसांचे लालबाग आता राहिलेले नाही. तेथे कार्पोरेट कंपन्यानी गर्दी केली आहे. तेथे मराठी माणूस लिफ्टमध्ये किंवा वॉशरूम साफ करताना आपणास भेटेल. त्याला विचारावे कुठून आला आहेस..? समृद्धी महामार्गाने की, शक्तीपीठ महामार्गावरून आला आहेस..? गावी गेलास तर नव्या महाबळेश्वरमधील किती नंबरच्या व्हीलामध्ये राहतोस आणि स्वच्छ की हवा खातोस का..? असे प्रश्न विचारावेत. अरे, मराठी माणसं राहतात तो महाराष्ट्र मातीत गाडला जात असतानाही तुम्हाला किरकोळ भांडणे महत्त्वाची वाटतात….? असे वाटतं की, ही अवस्था पाहून मराठी माणूस असण्याची लाज वाटते आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.