शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या संशोधन कामाची दखल
कोल्हापूर : कृषी धोरणातील युवा संशोधक तसेच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेले विनायक हेगाणा यांना सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वित्झर्लंड येथील डंस्टर बिझनेस स्कूल या जागतिक नामांकित विद्यापीठाकडून सार्वजनिक आरोग्य विषयातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या गौरवासाठी निवड होणारे ते देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी संशोधनाधारित ‘पिरॅमिड मॉडेल’ विकसित करून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेती, मानसिक आरोग्य आणि सामाजिक परिवर्तन या तिन्ही घटकांवर आधारित परिवर्तन मॉडेलचे ते जनक मानले जातात.
ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठेच्या ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ पुरस्कारानेही यापूर्वी हेगाणा यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. (अॅग्री) ही पदवी प्राप्त केली असून ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड गावचे आहेत.
कृषी पदवीधर असलेल्या हेगाणा यांनी पाणी व कृषी धोरणांचा सखोल अभ्यास केला. जिल्हास्तरावरील धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. पुढे शेतकरी आत्महत्येच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करत त्यांनी या विषयावर प्रत्यक्ष कार्य सुरू केले. यासाठी त्यांनी ‘शिवार संसद’ नावाची युवा चळवळ उभी केली. तसेच ‘शिवार हेल्पलाइन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन व सहाय्याचे कार्य सुरू केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठीही त्यांनी विविध उपक्रम राबवले. आतापर्यंत २,४९८ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रभर या विषयावर कार्यरत असलेल्या हेगाणा यांचे ‘शेतकरी आत्महत्या : शोध आणि बोध’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, त्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, आयआयटी मुंबई तसेच नीती आयोग यांसारख्या संस्थांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास केला आहे.
या कार्याची दखल घेत २०२२ मध्ये त्यांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी युनायटेड किंगडमच्या विशेष सल्लागारपदी त्यांची निवड करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी धोरणनिर्मिती व सल्ला देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या सन्मानामुळे जगभरातील शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी महत्वाची ठरेल. या कामाची दखल भारतात ही अधोरेखित होईल ज्यामुळे भारतातील शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक परिपूर्ण काम उभे राहू शकेल अशी आशा वाटते.
डॉ.विनायक हेगाणा,
शेतकरी मानसिक आरोग्यच्या पिरॅमिड मॉडेलचे जनक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
