February 1, 2023
Non Violence in Mind needed article by Rajendra Ghorpade
Home » आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव
विश्वाचे आर्त

आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव

कितीही कोणी खिजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडेपणा सोडून देऊन प्रेमाने, मधुर वाणीने तो इतरांवर आपली माया पसरवू शकतो, पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आता बाळाचां हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य ।
तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।। ११३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – आतां स्तनातील दूध जसे लहान मुलाचे हित करणारे असते. अथवा भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते. त्याप्रमाणें प्राणीमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा, तें आर्जव होय.

माणसांची मानसिकता ढळत चालली आहे. तो चिडचिडा होताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे गोंगाटामुळे तो शांतीच्या शोधात जरूर आहे. अशा वेळी त्याला योग्य मार्ग, दिशा सापडणे गरजेचे आहे. अन्यथा तो भरकटेल. त्याच्यातील माणुसकी नष्ट होईल, ही भीती आहे. कारण शेवटी मनुष्य हा माकड कुळातीलच आहे. यामुळे माणसांत माकड कृत्ये जागृत होण्यास फारसा वेळ लागत नाही; पण माणूस आणि माकडात फरक आहे, हेही विसरता कामा नये.

लहान मुलाला सुद्धा भुक लागल्यानंतर आई त्याला स्तनातील दुध पाजवते. हे दुध त्याच्यासाठी उपकारक असते. त्याने त्याला तृप्ती येते. दुध पाजवण्यास वेळ झाला तर त्या मुलाचा अक्रोश हा न पाहण्याजोगा असतो. जो पर्यंत त्याच्या पोटातील भुक शांत होणार नाही तोपर्यंत तो ओरडत राहाणार. आपण त्याला खेळवण्याचा प्रयत्न केला तरीही ते आपल्याकडे दुर्लक्ष करते. पण त्याची आई त्याला दिसल्यानंतर मात्र ते शांत होते. कारण त्याची आई त्याला भरवणार असते. त्याला तृप्त करणार असते. क्षणात हा बदल त्याच्यामध्ये होतो. जर त्या बाळाला दुध मिळाले नाही तर ते चिडखोर होते. भावीकाळात ते गुन्हेगार प्रवृत्तीचेही ते होऊ शकते. कारण माणसाला त्याची भूकच गुन्हेगार बनवते. पोट शांत तर मन शांत हे विचारात घ्यायला हवे.

माणसाला मन आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात अडचणी आल्या की, त्याची मानसिकता ढळते. मनासारखे घडत नसेल तर तो निराश होतो. या नैराश्येतूनच त्याच्या मनाचा समतोल ढळतो. काही जण अशा या त्याच्या वृत्तीचा फायदा उठवतात व त्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला चढवतात. अशाने त्याचा समतोल ढळतो, पण या वृत्तीचा सामना करण्याचे सामर्थ तो त्याच्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो. कितीही कोणी खिजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडेपणा सोडून देऊन प्रेमाने, मधुर वाणीने तो इतरांवर आपली माया पसरवू शकतो, पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते.

अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदुता यायला हवी. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे. या प्रेमाने जग जिंकता येते. सध्याच्या धकाधकीच्या युगात अशा विचारांची, प्रेमाची गरज माणसाला अधिक वाटणार आहे. जैन धर्मामध्ये क्षमा व मार्दवा पूजाचे आर्जव तत्त्व हे सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देते. जणू काही तोच धर्माचा पाया आहे. व्यक्तीने आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद आणि वाणीत मधुरता आणली पाहिजे.

Related posts

ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्या अज्ञानी लक्षणे

देवाच्या भजनास तोच योग्य

अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?

Leave a Comment