July 27, 2024
Sanjeevan Samadhi of the Guru is only through the Raja Yoga of the disciple
Home » शिष्याच्या राजयोगातूनच गुरुंची संजीवन समाधी ii
विश्वाचे आर्त

शिष्याच्या राजयोगातूनच गुरुंची संजीवन समाधी ii

ऐसी वैराग्याची अंगी । बाणूनिया वज्रांगी ।
राजयोग तुरंगी । आरुढला ।। १०४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात निटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला.

गुरुंच्या नित्य बोधाने साधक हळूहळू अध्यात्माच्या पायऱ्या चढत असतो. सद्गुरूंच्या कृपेने त्याला तो राजयोग जागा करत असतो. या प्रवासात साधक बऱ्याचदा भरकटतो, थकतो. यातून त्याला काम, क्रोध, वासनेचे विकारही नित्य त्रास देत राहातात. पण सद्गुरुंच्या बोधामृती चिलखताने साधकाचे नित्य संरक्षण होत असते. सद्गुरू हे बोधामृती ज्ञान देऊन त्याला नित्य जागे करत असतात. मग पुन्हा तो साधक पायऱ्या चढण्यासाठी उत्साही होतो. अंतिम ध्येय गाठल्यावर प्राप्त होणारा राजयोग, शाश्वत सुख त्या साधकाला प्रेरित करत राहाते. सद्गुरु साधकाला या नित्य सुखाची अनुभुती देऊन त्याची प्रगती साधत असतात.

सद्गुरु समाधीस्त झाले तरी ते साधकाला नित्य बोध देत असतात. म्हणूनच गुरू-शिष्य परंपरेतील या संताची समाधी ही संजिवन समाधी असे म्हटले जाते. या नित्य बोधानेच साधक ही पंरपरा पुढे नेण्यासाठी समर्थ होत असतो. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात समाधी घेतली. त्यानंतर पंधराव्या शतकात देवनाथ महाराज यांनी आळंदीत साधना करून गुरु-शिष्य परंपरेची एक नवी शाखा पुढे सुरु केली. या शाखेत देगलुरकर, औसेकर, तिकोटेकर, रुकडीकर, सांगवडेकर, पावसचे स्वरुपानंद असे अनेक संत झाले. देवनाथांना बोधातूनच ज्ञानेश्वरांचा अनुग्रह झाला. अशा अनेक घटनांमुळेच ज्ञानेश्वरांची समाधी ही संजिवन समाधी असे म्हटले जाते.

संत समाधीस्त झाले तरी त्यांच्यातून बोधामृताचा नित्य झरा ओसंडून वाहात असतो. साधकाने या बोधामृताच्या नित्य झऱ्याचा आस्वाद घ्यायला हवा. या बोधामृतामुळे साधक सावध होऊन नित्य साधनेने अंतिम ध्येय गाठण्यासाठी समर्थ होत असतो. प्रवासात येणारे काम, क्रोध, वासनेचे अडथळे बोधामुळे दूर होत असतात. विकारात न अडकता साधक पुन्हा जोमाने प्रवासाला लागत असतो. सद्गुरूच्या भक्तीने मग तो सद्गुरुपदी आरूढ होऊन सेवेतून समाधीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.

बाळ रडत असेल तर आई त्याला गप्प करण्यासाठी त्याचे मन इतरत्र वळवत असते. नित्य आपण त्याच्या सहवासात असल्याचा बोध ती बाळकाला देत असते. त्यामुळे ते बाळ आई नसली तरी रडत नाही. ते त्याच्या आनंदात बागडत राहाते. आई दूर गेली तरी त्याला ती नित्य आपल्या सहवाासात असल्याचा बोध होतो. सद्गुरु सुद्धा असेच आईसारखे असतात. ते दूर गेले तरी ते नित्य साधकाला बोधामृत पाजून जवळ असल्याची अनुभुती देत असतात. या बोधामृतानेच शिष्याची प्रगती ते साधत असतात. शिष्याला राजयोग रुपी घोड्यावर बसवून पराक्रम करण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. शिष्याची ही प्रगतीच त्यांची समाधी संजिवन करत असते. शिष्याच्या प्रगतीमध्येत त्यांच्या संजिवन समाधीचे सुख दडलेले असते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक

Neettu Talks : तरुण दिसण्यासाठी हे करा बदल…

नागपूरचा इशारा गांभिर्याने घेण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading