देशातील तीर्थस्थानांना भेट देण्याची ज्या भाविकांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आणि तीर्थस्थळाचे वेगळेपण जाणून घेणाऱ्यासांठी हे पुस्तक रंजक माहिती देणारे आहे.
अशोक बेंडखळे
आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा देदीप्यमान असा इतिहास आहे. बहुतेक समाज धार्मिक प्रकृतीचा असल्यामुळे देशात अनेक तीर्थस्थाने निर्माण झाली. विशेषत: काशी म्हणजेच वाराणशीला जाऊन श्री विश्वेश्वराचे एकदा दर्शन घेण्याची अनेक वृद्ध मंडळीची इच्छा असते. भारत देशात असलेल्या तीर्थस्थानांपैकी ३२ तीर्थस्थानांची रंजक माहिती ‘यात्रेकरूंचा देश या पुस्तकात करून देण्यात आली आहे. वैदिक युगापासून म्हणजे तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या तीर्थक्षेत्रांची माहिती या पुस्तकात आहे. देवदत्त पट्टनायक यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी नेटका अनुवाद केला आहे.
तीर्थक्षेत्रांची ही सफर वैदिक युगापासून सुरू होते. शब्दमर्यादेमुळे इथे निवडक १५ स्थानांविषयी लिहिणे भाग आहे. गंगाकाठच्या वारासणीचं स्थान आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण ती देवनगरी आहे. या नगरीविषयी खूप वेगळी माहिती इथे मिळते. काशी ही हिंदू, बौध्द, जैनांसाठी पवित्र नगरी आहे. तसेच सुफी ‘मुस्लिमांसाठीही पवित्र आहे. हिंदूंसाठी पवित्र कारण इथं शिव, शक्तीदेवी आणि विष्णू वास करतो. बौध्दांना सारनाथच्या जवळ म्हणून प्रिय, तर जैनांना पवित्र वाटते कारण त्यांचे चार तीर्थकार या नगरीत जन्मले.
जम्मूच्या डोंगरातील वैष्णोदेवी हे यात्रेकरूंचे लोकप्रिय स्थळ आहे. ही देवता शाकाहारी देवी म्हणून पूजली जाते. पौराणिक परंपरांनुसार देवीस रक्ताचा नैवेद्य दाखवून पूजा करायला हवी, कारण नवरात्र वगैरे सणांच्या वेळी देवी दैत्यांशी लढते, तेव्हा तिला बकरी-कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे; परंतु वैष्णोदेवीच्या ठिकाणी असं ‘काही घडत नाही, वैष्णोदेवी ही दक्षिण भारतातली राजकन्या होती, तिला राजाशी विवाह करण्याची इच्छा होती. प्रभू राम एकपत्नी. त्यांनी नकार दिल्यामुळे ती पर्वतावर गेली आणि संन्यस्त जीवन जगू लागली. शिवपूजक रावणाने तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने चितेत उडी घेतली आणि वैष्णोदेवी म्हणून तिचा पुनर्जन्म झाला, अशी आख्यायिका आहे. कृष्णाची द्वारका, जी मोक्ष आणि स्वर्ग ही द्वारे उघडते म्हणून गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात मोक्षद्वार आणि स्वर्गद्वार अशी दोन द्वारे आहेत.
कृष्णाला द्वारकाधीश म्हटलं जात असलं, तरी तो द्वारकेचा राजा नाही तर रक्षणकर्ता होता, कारण यादवांचा ‘राजा’ या कल्पनेवर विश्वास नव्हता. द्वारकेचा कृष्णाला रणछोडदास म्हणजे युद्धातून पळून गेलेला असंही म्हटलं जातं. इथल्या कुठल्याही मंदिरात कृष्णाचे नाव राधेशी जोडत नाहीत. राधेची लोकप्रियता गंगेच्या मैदानी प्रदेशात, बंगाल आणि ओडिशा इथेच आहे, अशी महत्त्वाची माहिती लेखक देतो.
यानंतर आपण २,५०० वर्षांपासून पुढच्या अश्म युगात येतो. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळे हे महत्त्वाचे तीर्थस्थान. विंध्यागिरी या टेकडीवर उघड्यावर उभी अशी जगातील सर्वात उंच म्हणजे ५७ फूट उंचीची बाहुबलीची मूर्ती इथे आहे. त्याची कथा अशी- बाहुबलीने राज्यासाठी आपला ज्येष्ठ भाऊ भरताशी युद्ध पुकारलं. पुढे त्याला उपरती होऊन तो तपश्चर्येस बसला. त्याला प्रचंड ज्ञान मिळालं. त्यानं अहंकाराचाही त्याग केला आणि जैन धर्मामधील अत्यंत आदरणीय मुनी बनला.
त्यानंतर येते पाटणा शहरापासून १०० किमी अंतरावरील बौद्ध धर्मीयासाठी पवित्र असलेले ठिकाण म्हणजे बोधगया. बोधगयेतील बौद्ध मंदिराचे व्यवस्थापन सर्व जगभरातील बौद्ध धर्मीयांचे आहे आणि युनेस्कोने बोधगयेस जागतिक वारशाचे स्थळ म्हणून घोषित केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतातील कुणालाच बौद्ध धर्माची कल्पना नव्हती, विशेष म्हणजे, बुद्ध हा श्री विष्णूचा अवतार होता. पुराणात तसा उल्लेखही आहे. ब्रिटिश इतिहासकार आणि उत्खननतज्ज्ञांनी बौद्ध धर्माच्या पुनर्शोधात महत्त्वाची भूमिका निभावली, अशी दुर्मीळ माहिती लेखक देतो.
पुढचा पौराणिक काळ १५०० वर्षांपासूनचा. मदुराईचे मीनाक्षी मंदिर हे महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. दक्षिणेतल्या मदुराई येथून उत्तरेस कैलास पर्वताकडे पतीच्या शोधासाठी निघालेल्या मीनाक्षी राणीची कथा इथे वाचायला मिळते. मीनाक्षी मंदिर तामिळनाडूतील भव्य मंदिरांपैकी एक असून ते १४ एकरांवर वसलेलं आहे. त्यात १४ गोपुरे आहेत. सध्या मंदिर ५०० वर्षाहून अधिक जुने असून ते नायक राजांनी बांधले. मंदिरातील मार्गिकामध्ये आणि मनोऱ्यात ३३ हजारांहून अधिक मूर्ती आहेत. मंदिरात एक हजार स्तंभाचा दिवाणखाना आहे, असे हे मीनाक्षी अम्माचं भव्य मंदिर.
ओडिशातील पुरी येथील जगन्नाधाचं मंदिर अनेक भाविकांसाठी महत्त्वाचं आहे. इथल्या दैवतांचा कृष्णाशी संबंध असला तरी स्थानिकांसाठी तो विष्णू म्हणजे जगाचा पोषणकर्ता आहे. शाक्त, शैव, बौद्ध आणि जैन असे वेगवेगळ्या पंथांचे लोक देवाकडे वेगवेगळ्या रूपात पाहतात, ऐहिक जगावर दिलेला भर हे या मंदिराचे लक्षवेधी वैशिष्ट्य आहे. इथला हा देव जलयात्रेसाठी आणि रथयात्रेसाठी जातो, पत्नीशी भांडतो, एका विधीत माता- ‘पित्याचं श्राद्ध घालतो. त्यामुळे जगाचा हा जगन्नाथ आहे. याचं स्मरण आपल्याला इथं होतं. याच काळातलं तिरुपती हे महत्त्वाचं तीर्थस्थळ, तिरुपती म्हणजे लक्ष्मी – विष्णू होय. लक्ष्मीशी मतभेद होऊन विष्णू वैकुंठ सोडून पृथ्वीवर आले. त्यांनी आंध्रप्रदेशातील जिल्ह्यातील सात टेकड्यांचा परिसर राहण्यासाठी निवडला आणि सातव्या टेकडीवर वस्ती केली. सातव्या टेकडीचं नाव वेंकटाचलम आहे म्हणून त्यास वेंकटेश्वर असंही म्हटलं जातं. भक्त तिरुपतीच्या चरणी मोठी संपत्ती अर्पण करतात त्यामुळे हे देवस्थान अती श्रीमंत हिंदू मंदिरापैकी एक बनलं. मात्र, ऋण फेडायचं राहून जातं आणि विष्णू देव पृथ्वीवर तसेच अडकून पडतात, अशी ही कथा आहे.
पुढे तांत्रिक युगातील (१००० वर्षांपासून पुढे) तीर्थस्थान येतात. यात देवी केंद्रस्थानी आहे. यातले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे हिरापूरचे वर्तुळाकार मंदिर, भारतात इस्लामचं आगमन होण्यापूर्वी पूर्णत: स्त्रीत्वास वाहिलेली मंदिरे होती. ती म्हणजे योगिनींची वर्तुळाकार मंदिरे. अशी पाच मंदिरे आजमितीस टिकून आहेत. दोन ओडिशात (हिरापूर आणि राणीपूर) तर तीन मध्यप्रदेशात आहेत. वर्तुळाकार मंदिराचं प्रवेशद्वार विहिरीसारखं असते आणि तिथल्या देवी सर्व दिशांना तोंड करून उभ्या असतात. हिरापूर येथील मूर्तीमध्ये विविध भावमुद्रांतील स्त्रिया दाखवल्या आहेत.
इस्लामी (८०० वर्षांपासून) अमृतसर हे. महत्त्वाचं आहे. इथल्या मानवनिर्मित तळ्याच्या मध्यभागी हरमंदिर (सुर्वणमंदिराचं औपचारिक नाव) हे शाश्वत स्थान आहे, तळं म्हणजे सरोवर किंवा सर आणि त्यातलं पाणी मानवाला अमरत्व देणार अमृत आहे. देशाच्या सीमारेषापाशी उदय पावलेल्या शीख धर्मावर हिंदू-मुस्लीम हा दोन्ही धर्माचा प्रभाव आहे. शीख धर्माने कायम गृहस्थाश्रमी जीवनास संन्यस्थ जीवनापेक्षा सरस मानलं. तसेच लिंगसमानतेबाबत विचार मांडले, अशी माहिती लेखक इथे देतो.
भक्तियुगात (७०० वर्षांपासून) पंढरपूर आणि बद्रिनाथ ही महत्त्वाची तीर्थस्थाने आहेत. ८०० वर्षांपासून सुरू झालेल्या भक्तिमार्ग चळवळीचे पंढरपूर हे केंद्र. इथे कृष्णापुढे म्हणजेच स्थानिक स्तरावर पांडुरंग वा विठ्ठल नावाच्या देवापुढे नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक येतात. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती गूढ आहे. विठ् हा विष्णूचा अपभ्रंश आहे की, विटेवर उभा म्हणून विठ्ठल महटलं आहे, काहीसे गोंधळात टाकणारे आहे.
बद्रिनाथ आणि केदारनाथ ही उत्तराखंडातील दोन्ही स्थळं आद्य शंकराचार्यांशी संबंधित आहेत. त्यांनी बौद्ध-हिंदू धर्माची (ज्ञानमार्गाची) सांगड भावनिक हिंदू धर्माशी (भक्तिमार्गाशी) घातली आणि गंगोत्री-यमुनोत्री आणि बद्रिनाथ-केदारनाथ अशी छोटी चार धामयात्रा आखली. बद्रिनाथ आणि केदारनाथ ही ठिकाणे महाभारताशी जोडली गेली आहेत.
युरोपियन युगातील (४०० वर्षांपासून ) लोटस टॅपल म्हणजे बहाई पंथाचं तीर्थस्थान आहे. इथल्या इमारतीला नऊ पायऱ्यांची तीन वर्तुळे आहेत आणि एकच देव (निर्माता) एकच वैश्विक धर्म आणि एक मानवता यांच्याशी संबंधित आहेत. बहाई धर्माचा प्रसार २०० देशांत झाला असून, भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा आठ देशांत त्यांची प्रार्थनास्थळे आहेत. दिल्लीमध्ये १९८६ साली बांधण्यात आलेले लोटस टेंपल वास्तुकलेचा देखणा नमुना असून तो लाखो पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.
त्यानंतर येतो वर्तमानकाळ. त्यात आग्र्याचा ताजमहाल आणि शबरीमला ही महत्त्वाची तीर्थस्थळं आहेत. कबरी उभारण्याची प्रथा पर्शियन साम्राज्यात होती. मोगल सम्राट शाहजहान याने पत्नी मुमताज महलची कबर ठेवण्यासाठी ताजमहाल बांधला आणि तो जगविख्यात झाला. इस्लामच्या आगमनानंतरच भारतात कबरस्ताने, समाध्या बांधण्यात येऊ लागल्या. केरळातील शबरीमला म्हणजे टेकडीच्या शिखरावरील आय¬प्पाचं मंदिर. हे मंदिर बांधून आदिवासी, सर्वसामान्य, शाक्त, वैष्णव, शैव, वेदान्त तंत्र अणि इस्लाम अशा विविध पंथाना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी खूप मौखिक माहिती या लेखांमधून लेखक काही पुराणकथांसह देतो.
देशातील तीर्थस्थानांना भेट देण्याची ज्या भाविकांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आणि तीर्थस्थळाचे वेगळेपण जाणून घेणाऱ्यासांठी हे पुस्तक रंजक माहिती देणारे आहे.
पुस्तकाचे नाव – यात्रेकरूंचा देश भारतवर्षाची निर्मिती
मूळ लेखक – देवदत्त पट्टनाईक – मराठी अनुवाद – सविता दामले
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे – २२८ , मूल्य – २९९ रुपये
पुस्तकासाठी संपर्क – मोबाईल ९९३०३११५४६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.