June 19, 2024
gandhism-and-marathi-drama research article by Ramesh Salunkhe
Home » गांधीवाद आणि मराठी नाटक
संशोधन आणि तंत्रज्ञान

गांधीवाद आणि मराठी नाटक

मराठी रंगभूमीच्या अनुषंगाने मराठी नाटकांच्या इतिहासाकडे पाहिले की, ही रंगभूमी तत्कालीन वास्तवाशी बरीचशी समाजसन्मुख असल्याचे स्पष्ट दिसते. शुकीश नाटके, संगीत नाटके, व्यावसायिक अथवा प्रायोगिक नाटकांचे अवलोकन केले असता तत्कालीन सामाजिक आणि राजकीय जाणीवांचे प्रतिबिंव मा नाटकांमध्ये पडले असत्याचे दिसून येते. तथापि अभिजनवर्गाचा स्वरूप शोध शिस्ती मिशनन्यांचा धर्मप्रसार, छाजी सत्तेषी जुलूमशाही, ब्राह्मणी वर्चस्ववाद अशा सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे समकालीन राजकारण आणि समाजकारण स्वाचतपणे मराठी नाटकांमध्ये चित्रित होण्याला मर्यादा पडल्या. या मर्यादांमधीलच एक महत्त्वाची मर्यादा म्हणून गांधीवादाचे प्रतिबिंब मराठी नाटकांमध्ये अत्यंत क्षीण स्वरूपात दिसते.

गांधीजींच्या राजकारणाचा, विचारसरणीचा आणि कृतीशील उद्यमशीलतेचा प्रभाव केवळ देशातच नव्हे परदेशातही मोठ्या प्रमाणात पडला. समाजमनावर आणि संघटनेच्या पातळीवरही गांधीवादी विचारांचे अनुसरण मोठ्या प्रमाणात झाले. ही विचारसरणी भौतिकापेक्षा अध्यात्माला आणि धार्मिक संकुचिततेपेक्षा मानवतावादी विचाराला प्राधान्य देत होती. सत्ता आणि मत्ता याऐवजी ही विचारसरणी मानवाच्या सत्य, शिव आणि सुंदर अशा शाश्वत मूल्यांना प्राधान्य देत होती. मानव आणि निसर्ग यांच्यात अद्वैताला महत्व देत होती. तथापि उत्तरोतर आपल्या आणि पाश्चात्य देशांनीही जात, धर्म, वंश आणि अर्थकेंद्रित व्यवस्था स्वीकारली आणि चंगळवादी संस्कृतीला उत्तेजन दिले. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य हे असे मूलभूत प्रश्न ना राजकारण्यांना महत्वाचे वाढू लागले ना समाजावस्थेला अर्थात मराठी नाटकांवरही गांधीवादी विचारसरणीच्या प्रभाव क्वचितच पडू लागला. मराठी नाटककारांनी ही विचारसरणी आपल्या नाटकांमधून मोठ्या प्रमाणात आविष्कृत केली नाही.

मुळात गांधीवाद अशी काही विचारसरणी आहे का?

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातही या विचारसरणीला मराठी नाटककारांनी नाट्यविषय बनवले नाही, हे सत्य नाकारता येणार नाही. तथापि असे असले तरी काही नाटककारांनी त्या त्या कालखंडातील सामाजिक-राजकीय आशय आपल्या नाटकांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सदानंद मोरे म्हणतात, “रंगभूमी हे राजकारणाचे एक सार होते. नाटककार, कलाकार व प्रेक्षक नाटकाच्या माध्यमातून राजकारण करीत होते. रंगभूमीने राजकारणाचा प्रचार-प्रसार तर केलाच; पण स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी आर्थिक मदतही केली. स्वातंत्र्यासाठी लढणांऱ्याना आश्रय दिला. वरेरकरांच्या शब्दांत सांगा म्हणजे ‘मराठी रंगभूमी स्वातंत्र्यासाठी खर्ची पडली.’ ब्रेल वगैरे राजकीय नाटककारांचे कौतुक करणाऱ्या आधुनिक अभ्यासकांना मराठी रंगभूमीचा हा अध्याय बहुधा माहित नसावा.” सत्य, अहिंसा, त्याग आणि स्वातंत्र्य या मूलभूत तत्त्वांवर गांधीवादी विचारसरणी केंद्रिभूत झालेली आहे; असे म्हणता येते. मुळात गांधीवाद अशी काही विचारसरणी आहे का? कारण गांधीजींनी हे सारे सूत्रबद्ध असे काही लिहून ठेवलेले नाही. त्यांची उक्ती आणि त्यावरहुकूम त्यांनी केलेली कृती, प्रसंगोपात केलेले लेखन पत्रव्यवहार यातूनच त्यांची जीवन जगण्याची रीत – पर्यायाने विचारसरणी निर्माण झालेली आहे.

मराठी नाटक आणि गांधीवादाचे स्वरूप यातील परस्परसंबंध

साहित्य हे प्रबोधनाचे अत्यंत सशक्त माध्यम असल्याने गांधीवादी विचारसरणी आपल्या कलेत आणि साहित्यात आविष्कृत होणे ही काळाची गरज होती. गांधीवादी विचारांचे मराठीत का आढळत नाही. त्याची काहीएक कारणमीमांसा सुधीर रसाळ यांनीही केली आहे; ते म्हणतात, “बहुतांशी सर्वांचाच ‘गांधीवाद’ फक्त स्वातंत्र्या चळवळी पुरताच मर्यादित होता, हे पंडीत नेहरूंसारख्या गांधीजींचा राजकीय वारस म्हणून समजल्या जाणाऱ्या नेत्याबद्दलही म्हणता येते. नंतरच्या काळातील सर्व राजकीय पुढाऱ्यांची सूतकताई, हा गांधीजयंती आणि पुण्यतिथी यांपुरता असलेला विधी बनला, याचे कारणही हेच आहे. स्वातंप्राप्तीनंतर भारताने अवलंबिलेल्या अर्थनीतीचा आणि एकूण राजकारणाचा गांधीवादाशी सुतराम संबंध नव्हता. केवळ लेखकच नव्हे तर सर्व विचारवंत, बुद्धिमंत स्वातंत्र्यलढ्यातील एकूण अनुयायी किंबहुना सर्व भारतीय जनता कधीच गांधीवादी बनू शकली नाही. तेव्हा गांधीवादाचा सखोल ठसा मराठी साहित्यावर उमटू शकला नसल्यास नवल कसले!””” याचा अर्थ गांधीवादाचे आकलन आणि उपयोजन यात आपला समाज कमी पडला, या दोहोंमध्ये फारकत झाली आणि त्याचा परिणाम साहित्यनिर्मितीवरही झाला. सुधीर रसाळ यांचे उपरोक्त विधान महत्वाचे आहे, कारण गांधीवादाचे आकलन आणि मराठी साहित्य यांचे नेमके स्वरूप सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले आहे. या सर्व गोष्टी जमेस धरून मराठी नाटक आणि गांधीवादाचे स्वरूप यातील परस्परसंबंध शोधता येतो का? याचा काहीएक अदमास आपणास पुढीलप्रमाणे घेता येऊ शकेल.

गांधीवाद आणि मराठी नाटक यासंदर्भात विचार करता खरेतर समाजसुधारणा, धर्मसुधारण पारतंत्र्यातून मुक्तता या गोष्टी विचारवंतांना, साहित्यिकांना महत्वाच्या वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे सामाजिक समस्यांना अनेक साहित्यिकांनी आपल्या कलाकृतींचे विषय बनवले. नाटकही याला अपवाद नव्हते. या नाटकांनी देशात चाललेल्या राजकीय चळवळींना प्रोत्साहन दिले. लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला; असे म्हणता येते. अशा नाटककारांमध्ये मामा वरेरकर यांचा उल्लेख अग्रक्रमाणे करावा लागेल.

राजकीय विषयाला थेट भिडणारे पहिले नाटक

मामा वरेरकर हे जाणीवपूर्वक नव्या प्रकारची नाटके लिहिणारे नाटककार होते. वर्ग-वर्ण संबंधाबाबतची मांडणी, वर्ग संघर्ष, मार्क्स-लेनिन व म.गांधी यांच्या विचारविश्वाचा वेध मामा वरेरकर यांनी सत्तेचे गुलाम (१९२२) ते भूमिकन्या सीता (१९५०) अशा नाटकांच्या माध्यमातून घेतला. सत्तेचे गुलाम हे राजकीय विषयाला थेटपणाने भिडणारे मराठीतील पहिले नाटक समजले जाते. तत्कालीन सामाजिक, राजकीय घडामोडींमागील विचारांच्या प्रकटीकरणार्थ वरेरकरांनी नाट्यलेखन केले. म. ना. टिपणीस हे नाटककारही मामा वरेरकरांचे समकालीन होते. त्यांच्या नाटकांमधूनही गांधीवादी विचारसरणीचा आविष्कार झालेला दिसतो पण तो प्रामुख्याने नाटकाच्या सादरीकरणाच्या अंगाने.

या संदर्भात सदानंद मोरे म्हणतात, “नाटककार मामा वरेरकर आणि य. ना. टिपणीस हे १९२१ च्या निर्णायक नागपुर कॉंग्रेसला गेले होते. त्या दोघांवरही गांधींच्या विचारांचा व्यक्तित्वाचा प्रभाव पडला आणि दोघेही खादीधारी झाले. या अधिवेशनात असहकारितेच्या चळवळीला काँग्रेसची बहुमताने संमती मिळाली. असहकारितेत शाळा-कॉलेज, कोर्ट-कथेच्या आणि कायदा कौन्सिले यांच्यावर बहिष्काराचा समावेश होता. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, वकील आणि विशिष्ट पद्धतीने राजकारण करणारे यांच्या हितसंबंधांना बाधा येणार होते. परंतु देशासाठी एवढा माग करायलाच हवा, असे गांधींचे मत होते.”” या मताबरहुकूम नाटकाच्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न केले ते मामा वरेरकर यांनी.

सत्तेचे गुलाम या नाटकाचा नामक वैकुंठ हा गांधीवादी असून त्याच्या वकिलीची सनद बाजूला ठेवून शेतीत राबत असतो, सूत काढीत नवनवे प्रयोग करीत असतो. केरोपंत हे या नाटकातील खलनायक पात्र. तो वकिली करून मिळविलेला पैसा आणि प्रतिष्ठा सांभाळत राजकीय स्थान प्राप्त करू इच्छितो. त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून मामा वरेरकरांनी वकीलाच आरोपीच्या पिंजयात उभे केले. वऱ्हाड प्रांतातील सुबत्ता पाहून अनेक मध्यमवर्गीय पांढरपेशे लोक शेती करण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने तिथे जात असत. श्रीमंत होत असत. पण भाऊबंदकी आणि जमीनीकरिता परस्परांमध्ये वितुष्ट येत असे. याचा गैरफायदा वकील घेत असत. वऱ्हाडी श्रीमंतांना कोर्ट-कचेऱ्यात गुंतवून वकीलवर्ग खूप पैसा मिळवित असत. मामा वरेकरांनी हे सारे पाहिले होते. हा विषय त्यांनी सत्तेचे गुलाम या नाटकात मांडला.

केरोपंत आणि वैकुंठ यांच्यातील वैचारिक संघर्षाचे चांगले चित्रण या नाटकाच्या माध्यमातून मामा वरेरकर यांनी केले आहे. सदानंद मोरे यांनी या नाटकाचे चांगले विश्लेषण केले आहे; ते म्हणतात, “मामांच्या तीक्ष नजरेने हे सर्व हेरले आणि ‘सत्तेचे गुलाम’ मधून वकिलालाच आरोपीच्या पिंजयात उभे केले; परंतु त्याला त्यांनी गांधीच्या असहकारितेच्या चळवळीची बैठक दिल्यामुळे हे नाटक केरोपंत नावाच्या बदमाश खलनाक वकिलाची कृष्णकृत्ये उजेडात आणणारे नाटक न उरता मराठीतील पाहिले राजकीय नाटक ठरले.’ समकाळाचे पडसाद अशाप्रकारे मराठी नाटकांमध्ये अभावाने का होईना पण पडत होते. अनेक प्रकारच्या घडामोडी भारतात पडत होत्या. उदाहणार्थ इ. स. १९१४ ते १९९८ पहिल्या महायुद्धाचा कालखंड. या महायुद्धातून पसरलेली सार्वत्रिक अशांतता. या अशांततेतून १९१७ मध्ये रशियात क्रांतीनंतर स्थापन झालेले ‘दि रशियन सोशालिस्ट फेडरेटिव्ह सोव्हिएट रिपब्लिक्स’ या संघटनेची स्थापना. यातून पुढे १९२३ मध्ये ‘युनियन ऑफ सोशालिस्ट सोव्हिएट रिपब्लिक्स’ या संघटनेची स्थापना. कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड संघराष्ट्रामुळे इतर देशांमधील दीनदुबळ्या परतंत्र राष्ट्रांचे वेधले गेलेले लक्ष. यातून राष्ट्रीय चळवळींना मिळालेली प्रेरणा, जागतिक आर्थिक मंदी, रौलट अक्ट, पंजाबमधील जालियनवाला बागेत पडलेले जनरल डायर प्रकरण, लोकमान्य टिळकांचा मृत्यू, महात्मा गांधी यांची असहकारितेची देशव्यापी चळवळ, गांधीजींची ‘चले जाव’ आणि सुभाषचंद्र बोस यांची ‘चलो दिल्ली’ या राजकीय चळवळी या सर्वाविषयीच्या क्रिया प्रतिक्रिया देशभर उमटत होत्या. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदु-मुसलमानांचे ऐक्य होणे गरजेचे आहे. या हेतुसाध्यासाठी महात्मा गांधी, मौलाना शौकत अली इत्यादी पुढाऱ्यांनी हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी चळवळ केली. यातूनच ‘मुस्लिम लीग’ आणि ‘हिंदू महासभा’ परस्पर विरोधात उभ्या राहिल्या. स्वातंत्र्य मिळाले पण देशाची फाळणी झाली, निर्वासितांचा प्रश्न देशासमोरील आव्हान ठरला.

अशा अनेकप्रकारच्या महत्वपूर्ण घटना देशात घडत होत्या आणि त्याचा समाजमनावर पर्यायाने व्यक्तिमनावर खोलवर परिणाम होत होता; पण हा सारा अवकाश आपल्या नाटकांमध्ये सामावून घेणारी प्रतिभा आपल्या नाटककारांमध्ये मामा वरेरकर यांच्यासारखा सन्माननीय अपवाद वगळता दिसत नाही. या संदर्भात गो. म. कुलकर्णी म्हणतात, “गांधीपूर्व काळात निदान गांधीवादसदृश्य विचारांचे जेवढे दर्शन तेवढेही प्रत्यक्ष गांधीयुगात पडत नाही. गांधीयुगातील असहकारितेचे बहिष्काराचे पहिलेवहिले आंदोलन, ही अनेक दृष्टीने क्रांतिकारक घटना पांढरपेशा स्त्री-पुरुषांना कृतिशील राजकारणात भाग घ्यावयास लावणाऱ्या समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना त्यागाला उद्युक्त कारणाऱ्या, त्यांना परस्परांच्या जवळ आणणाऱ्या, त्यांना स्वावलंबनाचे पाठ देणाऱ्या या आंदोलनाने भारतीय जीवनात एक नवे तेजस्वी पर्व सुरू केले. या पर्वाच्या प्रभावातूनच मामा वरेरकरांसारख्या समाजप्रवण नाटककाराचे सत्तेचे गुलाम (१९२२) हे नाटक जन्माला आले. व्यावसायिक दृष्ट्या ते यशस्वी ठरले; पण यातून होणारे गांधीवादाचे दर्शन फारच पृष्ठस्पर्शी आहे.’ गो. म. कुलकर्णी यांचे वरील विधान मान्य करूनही आपणास असे म्हणता येईल की, या कालखंडात मामा वरेरकर यांच्यासारख्या नाटककाराचा अपवाद वगळता मराठी नाट्यसृष्टीत गांधी विचारांच्या अनुषंगाने विचार करता केवळ शुकशुकाचे वातावरण दिसून येते.

साम्यवादी क्रांतीच्या प्रभावातून नाटक निर्मिती

सोन्याचा कळस (१९१९) हे मालक मजूर संबंध चित्रित करणारे नाटक मामा वरेरकर यांनी लिहिले. रशियामध्ये यशस्वी झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या प्रभावातून या नाटकाची निर्मिती झाली आहे. मुंबई येथे १९१९ मध्ये मजुरांनी न्याय्य आणि हक्कासाठी जो हरताळ केला त्या पार्श्वभूमीवर या नाट्यकलेची रचना करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींच्या अनत्याचारी असहकारितेचा प्रभाव सर्व पक्षाच्या राजकारणावर पडू लागला होता. त्याचे पडसाद या नाटकात उमटलेले दिसून येतात. साम्यवादी चळवळीला भारतातील तत्कालीन सरकारचा विरोध होता. राष्ट्रीय राजकारणतही तिला महत्त्वाचे स्थान नव्हते. अशा परिस्थितीत मामा वरेरकर यांनी साम्यवादातील मूलभूत सिद्धांताची मांडणी या नाटकाद्वारे करण्याचा प्रयत्न केला.

मामा वरेरकरांनी लिहिलेल्या नाटकांच्या संदर्भात गो. पु. देशपांडे यांनी नोंदविलेला अभिप्रायही महत्वपूर्ण ते लिहितात, “वरेरकरांचा नाट्यसंसार हा अत्रे किंवा रांगणेकर ह्यांच्यापेक्षा व्यापक होता. शिवाय त्यांचे नाट्यलेखन विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच सुरू झाले होते. सत्तेचे गुलाम किंवा सोन्याचा कळस ही नाटके त्यांच्या नाट्यमयतेप्रमाणे ज्या नव्या समस्या व खास मुंबईच्या श्रमिक-शोषितांच्या समस्या त्या नाटकात हाताळण्यात आल्या होत्या, त्या समस्या व ते वातावरण मराठी नाटकाला पूर्णतमा अपरिचित होते. वरेरकरांची राजकीयदृष्टी फार स्वच्छ होती अशातला भाग नाही. काही प्रमाणत मार्क्स आणि काही प्रमाणात गांधी व थोडेसे डांगे अशी त्यांची वैचारिक घडण होती. परिणामी, नाटकातून आजवर मराठी नाटकाला अपरिचित असलेले आवाज ऐकू येऊ लागले आणि अनेकविध तनाव दृष्टीस पडू लागले. याची परिणती भूमिकन्या सीतेचा आवाज बुलंद होण्यात झाली. वरेरकरांचे नाट्यतंत्राकडे दुर्लक्ष झाले असले आणि आशयदृष्ट्या ते परिपूर्ण नसले तरी चित्रपटाच्या आघाडीच्या काळात त्यांनी मराठी नाटकाला सामाजिकतेच्या संदर्भात पुढे नेले. त्यांचे हे योगदान मान्यच करावे लागेल. त्यांच्याही नाटकांमधून गांधीवादी विचारसरणीचा प्रत्यय सतत जाणवत राहतो.

रंगदारा (१९२३) या नाटकात मामा वरेरकरांनी खोट्या समजुती, अनिष्ट रुढी, भेदाभेद चादींच्या तुरुंगात पडल्यामुळे हिंदी लोकांचा उद्धार होत नाही, असे प्रमेय मांडले आहे. तर सिंगापुरातून (१९४४) या नाटकात वरेरकरांनी जपानी लोकांचे भारतातील संभाव्य आक्रमण हा विषय घेतला असून भारतातून परागंदा झालेल्या व सिंगापुरात वसलेल्या काही देशभक्त व्यक्तींनी हे आक्रमण थांबविण्याकरिता आटोकाट प्रयत्न करून आत्मबलिदान कसे दिले ते दाखविले आहे. जिवाशीवाची भेट (१९५०) या नाटकात धार्मिक भांडवलशाहीचे किळसवाणे स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न वरेरकरांनी केला आहे. मामा वरेरकरांच्या नाटकांमधून गांधीवादाला जवळ जाणारी साम्यवादी विचारसरणी अभिव्यक्त होते. तत्कालीन राजकीय वृत्तिप्रवृत्तीचे चित्रण त्यांच्या नाटकांचा विषय झाले आहेत.

नाटकातून तत्कालीन राजकीय वृत्तिप्रवृत्तींचे चित्रण

मामा वरेरकरांच्या नाटकांमधून गांधीवादासोबतच राजकीय साम्यवादी विचारसरणी अभिव्यक्त होते. तत्कालीन राजकीय वृत्तिप्रवृत्तींचे चित्रण त्यांच्या नाटकांचा विषय झाले आहेत. नाट्यनिर्मिती, तत्वतिपादन आणि प्रचलित राजकीय प्रश्नांचे संसूचन वरेरकरांच्या नाटकात आविष्कृत झाले आहे. तरीही न. र. फाटक यांनी वरेरकरांच्या नाटकांसंदर्भात नोंदविलेला आक्षेप खरा वाटतो; ते म्हणतात, “वरेरकरांची नाटके व्यावहारिक गरजेपोटी लिहिली गेली असल्यामुळे व प्रचारात्मक हेतूमुळे कलादृष्ट्या निकृष्ट ठरली आहेत. त्यांना विषय खूप सापडले, पण ते त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेऊ शकले नाहीत. न. र. फाटक यांची वरेरकरांच्या नाटकांवरील ही टीका मान्य करूनही असे म्हणता येते की, तत्कालीन राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचे सखोल चिंतन वरेरकरांच्या ठायी होते व ते चिंतन कलात्मकतेच्या पातळीवर व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मामा वरेरकरांच्या या प्रभावातून लिहित्या झालेल्या अनेक नाटकांमधून तत्कालीन सामाजिक राजकीय समस्या अधोरेखित झाल्या असल्या तरी समाजवादी अथवा साम्यवादी विचारसरणीचे प्राबल्य अधिक दिसते. गांधीविचाराला अथवा गांधीप्रणीत ग्रामवादाला फारसे महत्व दिले असल्याचे जाणवत नाही.

मराठी तरुणाला जागविण्यासाठी नाटक निर्मिती

वि. दा. सावरकर हे म. गांधींचे समकाळातील महत्वाचे नाटककारही होते. गांधीवादाच्या संदर्भात सावरकरांचीही काही मते होती. आणि ती त्यांनी संगीत उ:शाप (१९२७), संन्यस्त खड्ग (१९३१), संगीत उत्तरक्रिया (१९३३) या नाटकाद्वारे व्यक्तही केलेली आहेत. तरीही त्यांना गांधीवादी विचारसरणीचा प्रत्यय देणारे नाटककार म्हणता येत नाही. वि.दा.सावरकर यांनी प्रामुख्याने ‘हिंदुत्ववादी’ विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या हेतूने ‘उ:शाप’ या नाटकाची निर्मिती झाली असून गांधींच्या सत्याच्या राजकारणावर या नाटकात सडकून टीका करण्यात आली आहे. ‘अस्पृश्यता विमोचन’ हे सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे एक अंग होते ‘संगीत उःशाप’ या त्यांच्या नाटकाचा तो विषय आहे. संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये सावरकरांनी अहिंसेच्या तत्वाला विरोध व क्षात्रवृत्तीचा स्वीकार महत्वाचा मानला आहे. सावरकरांचे हे नाटक या खंडममंडणात्मक भूमिकेतून आणि चिंतनशीलतेतून गांधीवादाचा परामर्श घेणारे नाटक मराठीत आढळत नाही. महात्मा गांधींचा भारतीय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर ‘अहिंसा’ या विषयावर सावरकरांचे विचारमंथन सुरू झाले. आत्यंतिक अहिंसा राजकीयदृष्ट्या दुर्गुण आहे आणि त्यामुळे भारताची ऐहिकदृष्ट्या अधोगती झाली आहे. असा आशय ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकात आला आहे. गांधींच्या राजकारणात आत्यंतिक अहिंसा दोषार्ह आहे, म्हणून त्याविरुद्ध मराठी तरुणाला जागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे; या हेतूनेही या नाटकाची निर्मिती झाली आहे. ‘अहिंसेच्या तत्वज्ञानाला मूठमाती दिल्याशिवाय राष्ट्र समर्थ होणार नाही’ अशी अतिरेकी भूमिका असल्यामुळे ही नाटके ‘हिंदुत्ववादी’ विचारसरणीच्या पुरस्काराच्या आग्रह धरतात. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रकटीकरणार्थ, या विचाराचा प्रचार व प्रसाराच्या हेतूने सावरकरांनी आपल्या नाटकांना साधन म्हणून वापरले.

गांधीवाद-मार्क्सवादातील संघर्षाचे दर्शन

गांधीवादी अनुभवविश्वाची मांडणी करणारे नाटककार म्हणून नाना जोग यांच्या नाटकांचा आवर्जुन विचार करता येईल. चित्रशाळा (१९४८) आणि सोन्याचे देव (१९५०) या दोन नाटकांद्वारे नाना जोग यांनी मालक-मजूर यांच्या संघर्षात मजुरांची होणारी होरपळ परिस्थितीच्या दुष्टचक्रात सापडलेली माणसे, सत्ताधान्यांचे स्वार्थी राजकारण, प्रस्थापितता आणि परिवर्तनशीलता यामधील झगडा, राजकारण व अर्थकारण यामधील परस्परसंबंध, उसवतीची आणि कलावंतांची सामाजिक बांधिलकी अशा विविध विषयांच्या अनुषंगाने मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही एखाद्या समाजसापेक्ष विचारसरणीच्या संस्कार पचवून, त्या विधारसरणीची अथवा तत्वप्रणालीची समाजात प्रतिष्ठापना करता येते; हे सूत्र या नाटकांमधून नाना जोग दाखवून देतात. गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन महत्वपूर्ण विचारसरणीमधील संघर्षाचे दर्शन घडवून नाना जोग उघड-उघड मार्क्सवादाची बाजू घेतात. जीवनविषयक विशाल व सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोन ही नाटके जरूर प्रकट करतात. तत्कालीन राजकीय-सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे सखोल संसूचन करून भविष्याबद्दलचा आशावाद आणि मानवतावाद यांचे प्रकटीकरण वरील दोन नाटकांद्वारे नाना जोग यांनी केले आहे. त्यामुळे गांधीवादी विचारसरणीचे स्वायत चित्रण नाना जोग यांच्या नाटकांमध्ये आढळत नाही.

चळवळीची सकारात्मक विचारसरणी रुचविण्यात अपयश

स्वातंत्र्योत्तर कालखंडात गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब मराठी नाटकांमध्ये जोरकसपणे पडावयास हवे होते. कारण स्वातंत्र्यानंतर जे बदलाचे वारे आपल्या समाजात वाहू लागले. जसे की हरितक्रांती, श्वतेक्रांती, शिक्षण, व्यापार, आरोग्य, दळणवळण, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण अशा अनेकविध क्षेत्रात वेगाने बदल होऊ लागले आणि ते अपरिहार्यही होते पण गांधी विचारसरणीमधील विवेकाचे भान, सत्य, शिव, आणि सुंदराला महत्त्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतील परस्परपूरकता, मुल्यभान, भाषाभान हे सारे काही आपल्या समाजमानसात रुजणे महत्त्वाचे होते. तथापि दुर्देवाने आपल्या सगळ्या कला, साहित्यामध्ये पर्यायाने नाटकामधून ही विचारसरणी सकारात्मक अशा चळवळीच्या स्वरूपात रूजविण्यात आपले समकालीन नाटकही अपयशी ठरले. गांधीवादी विचारसरणी आपण टिंगलटवाळीच्या, हेटाळणीच्या, विडंबनाच्या पातळीवर अधिकांशाने स्वीकारली, असे खेदाने म्हणवते.

सूर्यास्त (१९७८), हरी अप् हरी (१९८७) व मी राष्ट्रपती (१९९०) या नाटकांमधून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय समाजात सत्तेचे राजकारण व त्या राजकारणातील भ्रष्टाचार यामुळे होणाऱ्या सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासाचा वेध जयवंत दळवी यांनी कुटुंबनाट्याच्या पातळीवरून घेतला आहे. जयवंत दळवी यांची नाटके तत्कालीन विचारधारांच्या ऐवजी व्यावसायिकतेकडे अधिक झुकताना दिसतात. त्यामुळे गांधीवादी विचारसरणी असलेली पात्रे जरी अशा नाटकांमधून दिसून येत असली तरी गांधीवादी विचारसरणीच्या प्रकटीकरणाकरिता व्यापक स्तरावर वेध घेण्याचा प्रयत्न ही नाटके करीत नाहीत; असेच म्हटले पाहिजे. जयवंत दळवी यांची नाटके नीतिनाट्यापलीकडे जाणारा विचारप्रधान आशय मांडण्यात असमर्थ ठरतात. त्याप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या वंदे भारतम्, मी उभा आहे, या शिवाय पु. ल. देशपांडे यांच्या तुज आहे तुजपाशी अशा नाटकांसंदर्भातही असाच निष्कर्ष काढावा लागेल. ही नाटकेही कमी अधिक प्रमाणात गांधीवादी विचारांचे उथळ क्वचित सवंग दर्शन घडवताना दिसतात. गांधीवादी विचारसरणीची स्वायत्त मांडणी करण्यात ही नाटके घडविण्यात अपयशी ठरतात.

‘गांधीवादी नाटक’ या प्रकारात अत्यल्प निर्मिती

१९७० च्या दशकानंतरचे नंतरचे महत्वाचे नाटककार म्हणून विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, मकरंद साठे, शफाअत खान यादी नाटककारांच्या विचार करता येतो. या नाटककारांनी समकाळाशी सुसंगत असे नवे विषय आणि नव्या आशयाकृती, नकमा आविष्काराच्या पद्धती आपल्या तथापि गांधीवादात अंतर्भूत असलेले शाश्वत विचार स्वायत्तपणे या नाटककारांच्या नाटकांमधून प्रतिबिंबित झाले नाहीत. गो. पु. देशपांडे यांचे एक वाजून गेला आहे, प्रेमानंद गज्वी यांचे गांधी आंबेडकर, अजित दळवी यांचे गांधी विरुद्ध गांधी अशा नाटकांमध्ये गांधीवादी विचारसरणी पुरेशा प्रमाणात प्रतिबिंबित झाली आहे. गांधी विरुद्ध गांधी या नाटकाचा प्रयोग अतिशय नेटका आणि अस्वस्थ करणारा होत असे. तथापि गांधीजींचे विचारवित समग्रपणाने या नाटकात प्रत्ययास न येता, म. गांधी यांची तत्त्वनिष्ठा आणि त्या तत्त्वनिष्ठेपायी कुटुंबाची होत असलेली ससेहोलपट हा आशय गांधीच्या विचारसरणीवर स्वार होत असे. म्हणून या आणि अशाप्रकारच्या नाटकांमधून गांधीविचारविश्वाचा अपरिहार्य भाग म्हणून आशय आणि अभिव्यक्ती प्रकटताना दिसत नाही. अशा नाटकांमध्येही दोन विचारसरणीमधला संघर्ष, कुटुंब कथेत गुदमरलेली विचारसरणी म्हणूनच प्रतिबिंबित झाल्याचे चित्र आपणास दिसते.

वरील विवेचनावरून असे म्हणता येते की, मराठीत ‘गांधीवादी नाटक’ या प्रकारात अत्यल्प नाट्यनिर्मिती झाली आहे. हे असे का व्हावे याचाही अदमास या विषयाच्या अनुषंगाने घेण्याचा प्रयत्न करावयास हरकत नाही. गांधींना जे महात्मपण लाभले त्याचा आवाका थक्क करणारा होता. गांधीचे व्यक्तिमत्त्व जरी शांत वाटत असले तरी ते वादळी व्यक्तिमत्व होते. पण सत्याचा आग्रह धरणारे व्यक्तिमत्व होते. शिवाय गांधींनी केलेले सत्याग्रह, उपोषण, खेड्याकडे चला हा विचार, त्यांचा हरिजनमंदिर प्रवेश, इंग्रजांविरुद्ध उगारलेलं असहकाराचे भेदक अहिंसक हत्यार, जालियनवाला बाग हत्याकांड, अस्पृश्यता निवारण्याचे प्रयत्न, आंतरजातीय आणि आंतरप्रांतीय विवाहासंदर्भातील कार्य, हृदय परिवर्तनावरील विश्वास, मातृभाषेची महती, नई तालीम-हिंद स्वराज्यसारखे प्रयत्न, गांधींचा आश्रम आश्रमातील शिस्त, कस्तुरबा आणि मुलांशी असलेले नातेसंबंध, टिळक-गोखले – डॉ. आंबेडकर – सरदार वल्लभभाई पटेल-जवाहलाल नेहरू- विनोबा – रवींद्रनाथ टागोर – टॉलस्टॉय विद्यावंतांशी केलेली वैचारिक देवघेव गांधींनी देशांतर्गत आणि परदेशात केलेला प्रवास, असे अनंत पैलू या एकाच व्यक्तिमत्वात सौजन्याने आणि सलोख्याने नांदत होते. म.गांधीजी वकिली व्यवसायाशी संबंधित असल्याने ते चर्चा, विचारविनिमय आणि खंडणमंडण करण्यातही माहीर होते. नरहर कुरुंदकर यांनी म. गांधी यांचा उल्लेख, ते केवळ महात्मा गांधी नव्हते तर बॅरिस्टर गांधी होते.’ असा केला आहे.

म. गांधीचे विचार आणि कार्य हे सारे तसे पाहिले तर महाकाव्याचा महाकादंबरीचा महानाट्याच्या विषय नाटकाच्या विषयाला आणि नाट्याच्या आविष्काराला मर्यादा नसल्या तरी नाटकाच्या माध्यमातून ही विचारसरणी अथवा गांधी ही व्यक्ती आणि तिथे समग्र व्यक्तिमत्व नाटकात सामावणे तशी अशक्यप्राय गोष्ट असली तरी कष्टप्रद बाब असली पाहिजे. गांधीजींना समजून घेणे आणि त्याबरहुकूम कृती करणे, गांधीच्या विचारांचे आचरण करणे ही एकप्रकारची जोखीम आहे. भौतिक गोष्टींच्या जंजाळात आणि स्वार्थकेंद्रित समाज व्यवस्थेत ही विचारसरणी अंगवळणी पडणे तसे कष्टपद. आपला समाज आपल्या पूर्वसुरींच्या विचारांप्रमाणे मार्गाधारे वर्तला गेला नाही. ती जोखीम आपल्या समाजाने पत्करली नाही. कारण त्यासाठी व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरही मोठी किंमत मोजावी लागते. ती मोजण्याची मानसिकता आपल्या समाजात अद्यापही तयार झालेली नाही. वर्तमान वास्तवात तर ती कोसो दूर आहे. बुद्ध, चार्वाक, कबीर, तुकाराम इत्यादींच्या विचारापेक्षा या महापुरूषांना आपण देवत्व बहाल केले आणि स्वतःची तात्पुरती सोडवणूक करून घेतली. तीच गत म. गांधींचीही झाल्याचे चित्र आहे. गांधींना मुळातून आपण समजून घेण्यात कमी पडलो आणि त्यांचा समाजधार्जिणा मूलगामी विचार आपण आपल्या कला, साहित्य, संस्कृतीत गांभिर्याने आविष्कृत करण्यात असमर्थ ठरलो हे मान्य केले पाहिजे.

मराठी नाटकांमध्येच नव्हे तर मराठी साहित्यकारांमध्ये वैचारिक साहित्याचा अपवाद वगळता गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब अत्यंत अभावाने पडलेले आहे. असे असले तरीही म. गांधी पर्यायाने गांधीवादी विचारसरणी ही अंत पावणारी गोष्ट नाही. कारण ती माणसातल्या चांगुलपणावर मानवी मूल्यांवर सत्तालोलुप राजकारणाच्या विरोधात धर्माचे स्तोम माजवून समाज शतखंडित करणाऱ्यांच्या विरोधात भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात उभी आहे. शांती, समाधान, सदाचार, समानता, बंधुभाव, प्रेम, न्याय अशा शाश्वत यांवर उभी आहे. जोवर या पृथ्वीतलावर माणूस अस्तित्वात आहे; तोवर ही मूल्ये अस्तंगत पावणारी नाहीत. आज केवळ देशभरातच नाही तर जगाच्या बहुतांश भागात भांडवलशाही व्यवस्थेचे, अस्थितरतेचे, युद्धखोरतेचे, सत्तालोलुपतेचे, धर्मांधतेचे, जीवघेण्या स्पर्धेचे, गरीबीचे, भुके कंगालतेचे- भूकबळींचे, अनारोग्याचे, शेतीचे, बेरोजगारीचे असे असंख्य प्रश्न आपल्या समाजव्यवस्थेत आहेत. शिवाय भौतिक सुखाच्या मागे आपण आंधळेपणाने धावतो आहोत. निसर्गाचा नैसगिक साधनसंपत्तीचा विध्वंस सरेआम करतो आहोत. माणूस, समाज, निसर्ग यांच्या वाचनाला योग्य ती दिशा मिळेनाशी झाली आहे. आभासी वास्तव हे खरे वास्तव आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे गांधीवादाच्या जीवनदायी विचारापासून उत्तरोत्तरातून तुटून वेगळे पडलो आहोत. सबब गांधीवादाची वाटचाल करण्याची शक्यता धूसर आहे; हे मान्य करूनही स्थळ-काळ-वेळ-अवकाश विज्ञान-तंत्रज्ञान या गोष्टी गृहित धरून या विचाराल विवेकाची पर्यायाने गांधीविचारांची जोड देऊन माणसाचा सर्वागीण विकास साधणे याबद्दल कुणाचेही दुमत होऊ नये. साधावयाचे असेल तर गांधी विचारांना पर्याय नाही. आणि तो आपल्या समाजमानसात आणावयाचा असेल; तर याला आपल्या कलेत, आपल्या साहित्यात पर्यायाने आपल्या नाटकांमध्येही अधिकाधिक प्राधान्य दिले पाहिजे.

रमेश साळुंखे

संदर्भ :-
१. लोकमान्य ते महात्मा, डॉ. सदानंद मोरे राजहंस प्रकाशन, पुणे. प.आ. २००७ पृष्ठ क्र. १७४.
२. रसाळ सुधीर गांधीवाद आणि आधुनिक मराठी नाटक, संपादक दत्तात्रय पुंडे, प्रतिमा प्रकाशन पुणे प.आ.१९९५ पृष्ठ १२८.
३. लोकमान्य ते महात्मा, डॉ. सदानंद मोरे राजहंस प्रकाशन, पुणे. प.आ. २००७ पृ ५९९.
४. लोकमान्य ते महात्मा, डॉ. सदानंद मोरे राजहंस प्रकाशन, पुणे. प. आ. २००७ पृष्ठ क्र ६००.
५. गांधीवाद आणि आधुनिक मराठी नाटक, गो. म. कुलकर्णी संपादक दत्तात्रय पुंडे, प्रतिमा प्रकाशन पुणे. प. आ. १९९५ ३६.
८. देशपांडे गो.पु. नाटक निबंध-रहिमतपूरकरांची निबंधमाला भाग, लोकगृह, मुंबई १९९५ पू. १३.
७. फाटक न… याचा कृ. प्र. खाडिलकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९७३, पृ. ८५.

Related posts

महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

ग्रामीण भागातील स्त्री जीवन एक प्रकारची वेठबिगारीच…

सुंदर ते ध्यान

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406