महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळी संस्कृती पहायला मिळते. तशीच संस्कृती पूर्व विदर्भात आपल्याला दिसून येते. दंडार हा त्यापैकीच एक लोककलेचा प्रकार होय. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दंडार हे मनोरंजनाचे साधन आहे. नागरिकांच्या मनाला सुखद अनुभव देण्याचे काम दंडार करीत आहे.
बंडोपंत बोढेकर,
चंद्रपूर मो. ९९७५३२१६८२
बालपणी मी पेलोरा या माझ्या जन्मगावी असताना दिवाळी आली की ,आम्हाला आठवण येई ते दंडारीची. घरी आलेल्यांचा पाहुणचार झाला की, गावात हनुमानाच्या देवळाजवळ उभारलेल्या उंचवट्यावर रात्री ९ च्या पुढे दंडार सुरू होत असे. फार काही सजावट नाही. मागे फक्त एक कापडी पडदा लावलेला असायचा. दंडार गावाची असायची. सर्व जातीधर्माचे लोक आवडीने सहभागी होत असे. लुगडे – साड्या जश्या असेल तश्या परिधान करून पुरूषच स्त्री पात्र वठवित असे. लहान मुले आणि म्हाता-या आजी तर बोत-या पकडून स्टेजजवळच्या जागा आरक्षित करून ठेवत असे.
शेतात कष्ट करणाऱ्या मानवाने आपल्या परिश्रमाचा परिहार करण्याकरता विविध लोककलांचा अविष्कार केला. त्यातली दंडार ही लोककला आजही गाव खेड्यात आपले अस्तित्व टिकवून आहे. अनेक पिढ्यांपासून जोपासना झालेल्या या कला प्रकारांमध्ये काही फ्रेंच रंजनात्मक बदल घडून आले. तरी मनोरंजनातून प्रबोधन हा दंडारीचा गाभा मात्र कायम आहे. मनाला सुखद ओलावा देण्याचे काम आजवर दंडारीने केले आहे.
वणी, राजुरा , गोंडपिपरी, चंद्रपूर, आंध्र बार्डर भागात होणा-या दंडारीपेक्षा भंडारा गोंदिया भागातील दंडार ही वेगळी भासते . झाडीबोलीत दंड हा शब्द प्रचलित आहे . दंड, डंड म्हणजे धानाचे शेत. दंडातील भरल्या धानाचे पिक पाहून शेतमालकाला आनंद व्हावा आणि आनंदाने त्यांने धु-यावरील डहाळ्या तोडून सोबत्यां सोबत मनमुराद नृत्य करावे , यातून ही लोककला पुढे आली असावी, असे जाणकार सांगतात. दंडारीतला नाच्या हातात जी काठी वापरतो ती म्हणजे टहारा होय. हातभर लांबीची ही काठी एकाने दुसऱ्यांच्या टहार्यावर आघात करायचे आणि त्या तालावर नृत्य करायचे. अर्थात टाहा-याची दंडार फार पूर्वीपासून जनमानसांमध्ये प्रिय आहे .टाहारा म्हणजे डहाळी अर्थात फांदीचा तुकडा असा शब्द ग्रामीण भागात प्रचलित आहे.
‘दिवाळीच्या वेळेस गोंड व इतर जाती दंडार करतात. हे एक दंडनृत्य असून प्रत्येक माणूस हातात दोन दंड घेऊन वेगवेगळा नाचत असतो’ ,असा उल्लेख भंडारा जिल्हा गॅझेटिअर मध्ये दिसून येतो.
मंडईच्या निमित्ताने होणाऱ्या दंडारीत नर्तकाच्या हातात केवळ एकच टाहारा असतो. पायात घागऱ्या आणि हातात टाहारा घेऊन केलेले हे नृत्य असते. ढोलकी, झांज ,तुनतूना वाजवणारे कलाकार आणि गायन करणारा शाहीर अशी झिलकारी मंडळी दंडारीचा मागील भाग सांभाळतात. शाहीर तार स्वरात गायन सुरू करताच सोबतच्या वाद्यांचा आवाज वाजायला लागताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार पायात घुंगरू बांधून आणि हातात टाहारा हलवत नाचत एक एक करत स्टेजवर येतात . तमाशाच्या फडाप्रमाणे या दंडारीचे स्वरूप दिसत असले तरी दंडार अजूनही व्यावसायिक झालेली नाही. एखादा विषय घेऊन त्यावर रंजन केले जाते. अजूनतरी दंडारीत पुरुषांची मक्तेदारी आहे . स्त्रीयांचे पात्रं पुरूषच वठवितात. रात्री दहा वाजता सुरू होणारी दंडार सकाळ पर्यंत चालते. मंडई च्या निमित्ताने झाडीपट्टीत होणारा दंडारोत्सव गावागावी संपन्न होतो. विनोदी हावभाव आणि छोटे मोठ्या चेष्टा करत दंडारीचे कलाकार प्रेक्षकांना हसवतात. भाऊबीजेला माहेरी आलेल्या मुली दंडार पाहून खूप हसतात आणि सासुरवासाचे सारे दुःख विसरून नव्या उभारीने पूर्ववत कामाला लागतात.
दंडारीतला तंट्या लहान मुलांचे विशेष आकर्षण असते. हातापायांना तलवारी बांधलेला तंट्या पाहून लहान मुले दंडार पाहताना घाबरतात आणि खोडकर मुलांना आई मग वर्षभर त्या तंट्याची भिती दाखवत असते.
चंद्रपूर वणी भागामध्ये मात्र होणारी दंडार पौराणिक विषयावर आधारीत असते. रामायण, पांडव प्रताप ,हरिविजय गाथा यासारख्या लोकप्रिय साहित्य संपदेतील एखादे कथानक घेऊन दंडार सादर केली जातात. गंगासागर राणीचा वनवास ही दंडार फार प्रसिद्ध आहे. एक न्यायप्रिय राजा राज्य करीत असतो. पण पुढे राजाच्या निधनानंतर दिवाण राज्य आपल्या हाती घेतो आणि राणी – राजपुत्रांचा वनवास सुरू होतो. ह्या दंडार कथेचे लेखन , पार्श्वगायन, सादरीकरण करणारे गावातीलच असतात. अशा दंडारीची संहिता पुस्तक स्वरूपात आज उपलब्ध नाही. पण गावोगावी मात्र दंडारीच्या वह्या पाहायला मिळतात.
‘नमन तुझे गणराया,
रामराया, राघोबाजी !
येकदंत चक्रभुजा
सवे घेवोनी सारजा !!’
नाटकाप्रमाणे गणांचे गाऊनच दंडारीचा प्रारंभ होतो आणि सगळे कलाकार स्टेजवर येऊन उभी राहतात.
रामचंद्र गेले वनवासा सीता घेऊन !
वनात बांधिला गुफा
लक्षुमनानं !!
यासारख्या दंडारीतील लावण्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या आहेत. या संदर्भात दंडार ही मराठी नाटकाचा उष:काल आहे,असे मत संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नोंदविलेले आहे. इतरांनी दुर्लक्षित केलेल्या दंडारीस राजमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच भूषणावह आहे. दंडारी संदर्भात डॉ. हरिश्चंद्र बोरकर(साकोली) यांचा झाडीपट्टीची लोकरंगभूमी हा ग्रंथ आणि हिरामण लांजे(बुधेवाडा) यांचा महाराष्ट्राची लोकनृत्यधारा नाट्यधारा हा ग्रंथ वाचनीय असा आहे. दंडारी बाबत अचूक वर्णन करणा-या अरूण झगडकर (गोंडपिपरी) आणि सुनील पोटे (दिघोरी) यांच्या कविता खूप काही सांगून जातात.
कवी एकनाथ बुध्दे यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास,
‘झाडीतल्या गमती, मोठ्याच किमती ,
सर नाही येयेल शहराले!
शहराचे बाबू नकली ढब्बु, दंडारीची गंमत,
भूषण खेड्याले !!’
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.