॥ आगरकरांचा शेतीविचार ॥
शेतमालाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित काढला आणि उत्पादन खर्चात त्याची मजुरी, बैलांची मजुरी आणि गुंतलेल्या भांडवलाचे व्याज गृहीत धरले तर शेती हा कसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे ते आगरकर फारच नीट पटवून देतात. १४० वर्षांपूर्वी आगरकरांनी दाखवलेला मार्ग आणि पुढं शरद जोशी यांनी त्याला दिलेलं निखळ अर्थशास्त्रीय परिमाण आणि लोकांदोलनाची जोड इतकं सगळं होऊनही शेतकरी अजूनही जागच्या जागीच का ? ते मात्र कळत नाही.
इंद्रजीत भालेराव
गोपाळ गणेश आगरकर हे एकोणिसाव्या शतकातलं महाराष्ट्रातलं एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व. त्यांच्या सुधारकी विचारांमुळे आणि त्यांनी सुरू केलेल्या सुधारक या नियतकालिकामुळे त्यांना ‘सुधारककर्ते’ अशी उपाधीच मिळालेली होती. रूढी, परंपरा व धर्म विचारांशी चिकित्सक दृष्टिकोन ठेवून व्यक्तीस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य यांच्या कसोट्यांवर सामाजिक व्यवहार व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती. जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ‘इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल तेच करणार’ ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. वि. स. खांडेकर यांनी त्यांचं वर्णन ‘देव न मानणारा देव माणूस’ असं केलेलं आहे.
लोकमान्य टिळक यांचं नाव केसरी या वृत्तपत्राशी इतकं जोडलं गेलेलं आहे की आपण त्यांनाच या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक समजत असतो. पण प्रत्यक्षात तसं नाही. आगरकर हेच स्थापनेपासून पहिली सात वर्ष केसरीचे संस्थापक, संपादक होते. त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे जेव्हा त्यांचे आणि टिळकांचे मतभेद व्हायला लागले, तेव्हा त्यांनी केसरीचं संपादक पद सोडलं आणि आपलं प्रखर सामाजिक विचार मांडणारं ‘सुधारक’ हे नियतकालिक सुरू केलं. आगरकर जितके दिवस केसरीचे संपादक होते, त्या सात वर्षेत केसरीत लिहिलेल्या निवडक निबंधांचं एक संकलन उपलब्ध आहे. त्यात त्यांचे सुधारणावादी विचार तर आहेतच शिवाय इतर इतक्या विविध विषयावर त्यांनी लिहिलेलं आहे की, ते लेख वाचून आपणाला आश्चर्य वाटतं. हे सर्व लेखन केलं तेव्हा त्यांचं वय तिशीच्या आसपासच होतं, हे पाहिल्यावर तर आणखीच आश्चर्य वाटतं. एरवी आगरकरांना आयुष्य लाभलं ते उणं-पुरं अवघं चाळीस वर्षांचं. त्यात आगरकरांनी जे विविध विषयावरचं लेखन केलेलं आहे, त्या लेखनात त्यांनी नेहमीच सामान्य माणसाची बाजू घेतलेली आहे.
उदाहरणार्थ ते प्रतापगडावर जातात तेव्हा श्रीमंतांना त्या डोंगरदर्यातून अवघड रस्त्याने डोलीतून नेणारे लोक, हे शिवाजीच्या शूरवीर मावळ्यांचे आणि शत्रूला सळोकी पळोचा पराक्रम करून दाखवणारांचे नातेवाईक आहेत, वंशज आहेत आणि आज पोटासाठी ते ही ढोरमेहनत करत आहेत, हे पाहून आगरकरांच्या अंतकरणातला कळवळा दाटून येतो.
झोपेवर निबंध लिहिताना आगरकर छान विधान करतात, श्रीमंतांना जी श्रीमंती प्रसन्न झालेली असते त्यांना झोप मात्र कधीच प्रसन्न होत नाही. उलट श्रीमंती ज्यांच्यावर रुष्ट झालेली आहे त्या सामान्य माणसाला मात्र झोप प्रसन्न झालेली असते. कष्ट करून आणि कष्टांच्या समाधानाचं खाऊन तो रात्री गाढ झोपत असतो.
सामान्यांची बाजू घेणारे असे कितीतरी तपशील या निबंधांमधून आपणाला पहायला मिळतात. जागतिक पातळीवर जे चाललेलं होतं ते सगळं नीट समजून घेऊन मराठी माणसांना मराठीत समजून सांगण्याचा पूर्ण आटापिटा आगरकर या लेखनातून करतात. केसरीतील निवडक निबंध या संकलनात मला आगरकरांचा ‘ऊस आणि साखर’ या नावाचा एक आगळा-वेगळा निबंध पाहायला मिळाला. या लेखात आगरकरांनी १४० वर्षांपूर्वीची जी माहिती दिलेली आहे, ती आजही मोठी रंजक आणि उपयुक्त आहे. पुढं शरद जोशींनी उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाचा भाव काढण्याचं जे शेतीचं अर्थशास्त्र विकसित केलेलं आहे, त्याच सूत्रबद्ध पद्धतीनं आगरकरांनी उसाचा आणि साखरेचा भाव काढून शेतकरी कसा लुटला जातो ते दाखवलेलं आहे. त्याआधी त्यांनी साखरेचा इतिहास आणि वर्तमानही मांडून दाखवलेलं आहे. ते मोठं रंजक आहे.
ते लिहितात, ” आपल्या अन्नात साखर अगदी आवश्यक आहे, असा समज हल्ली प्रत्येक देशात झाला आहे. ज्या देशात गेल्या शंभर दीडशे वर्षांपूर्वी साखर हा केवळ औषधी पदार्थ मानला जात असे, तेथे सध्या हजारो खंडी साखर खपते. जगात एकंदर जी साखर वर्षाला खपते ती एकत्र जमा करून तिचा शंकू सारखा ढीग केला तर, त्याची उंची २८०० फूट होईल व पायाच्या वर्तुळाचा व्यास ६६९ फूट होईल. निरनिराळ्या देशांची संपत्ती व सुधारणा यांची तुलना करणे झाल्यास, काही एक प्रकारचा जिन्नस त्यात किती खपतो, हे पाहतात. तेच अनुमान धरून आपण चाललो तर, अमेरिकेतील लोकसत्ताक राज्य पहिले येते, ते कागदाच्या वापराच्या संदर्भात. पण साखरेवरून जर देशाच्या संपत्तीचा अंदाज केला तर इंग्लंड देशाचा नंबर पहिला येतो. येथे दरवर्षी मानसी ७२ पोंड म्हणजे ३६ शेर साखर लागते. दुसरे अमेरिकेतील युनायटेड स्टेटस हे राष्ट्र येते. येथे मानसी ४४ म्हणजे २२ शेर साखर खपते. तिसरा फ्रान्स देश मानसी २४ पौंड म्हणजे १२ शेर व चौथा जर्मनी देश. येथे मानसी अवघी १५ पौंड म्हणजे ७॥ शेर साखर लागते. “
साखरेची जगातली ही स्थिती १४० वर्षांपूर्वीची आहे. आज जगभर खपणाऱ्या साखरेचा आगरकर सांगतात तसा ढीग केला तर तो नक्कीच आभाळाला भिडेल. आता कोणत्याही देशात, कितीही खालच्या आर्थिक स्थरात, साखर औषधासारखी समजली जात नाही. साखर आणि चहा आता सर्वांना अत्यंत आवश्यक गोष्ट वाटते. आगरकरांनी जी आकडेवारी दिलेली आहे ती कुठल्यातरी जागतिक सर्वेक्षणाच्या पुस्तकातून दिलेली असावी. १४० वर्षांपूर्वीच्या या साखरेच्या आकडेवारीत आपला देश कुठंही गणतीत नाही, हे विशेष. तरीही आगरकर साखरेचा इतिहास सांगताना असं सांगतात की साखरेच्या निर्मितीचे तंत्र मात्र भारतातच विकसित झालेले होते.
त्या संदर्भात आगरकर लिहितात, ” जगात जी साखर खपते ती सारी उसाचीच करतात असे नाही. एकंदर पाच-सहा झाडापासून ती काढतात. पण मुख्यत्वे ऊस व बीट यापासून साखर काढण्याचे कारखाने फार आहेत. सर्व देशात एकंदर आदमासे जी १०,६२,६०,००,००० पौंड साखर खपते त्यापैकी उसापासून ५,०३,८०,००,००० पौंड व बीट झाडापासून ५,५८,८०,००,००० पौंड साखर काढतात. पूर्वी हिंदुस्थान व चीन देश यातच उसाची लागवड करून साखर काढण्याची चाल असे. या देशात दोन हजार वर्षांपूर्वी तरी साखरेची माहिती लोकास होती, असे म्हणण्यास हरकत नाही. युरोप खंडातील लोकात इकडील ज्या वस्तूंची माहिती झाली, त्यातील साखर ही पहिली होय. ग्रीक वैद्यास प्रथम इकडील साखर पाहण्यास मिळाली व ते साखरेस हिंदी मीठ म्हणत असत. तेराव्या शतकात जेव्हा इकडील व्यापाऱ्यांनी अरबस्थानाशी व्यापार सुरू केला तेव्हा साखर पहिल्याने तिकडे जाऊ लागली. तेव्हा तेथील लोकास हा काही विलक्षण पदार्थ आहे, असे वाटले. इकडील व्यापारी त्यास अर्थातच साखर कशापासून व कशी काढतात ते सांगेनात. तेथील काही लोकांनी तर्क केला की हा एक प्रकारचा मध असावा. कोण म्हणाले की, गारांचा वर्षाव होतो किंवा झाडांचे पानावर दव साचते त्याप्रमाणे याची उत्पत्ती असावी व कोणी तर असे म्हणाले की हा एखाद्या झाडाचा डिंक असावा.”
पुढे नेव्हीशियन लोक ही कला घेऊन युरोप खंडात गेले आणि नंतर युरोप भारताच्या किती पुढे गेला ते आपण पाहिलेही आणि अनुभवलेही. उगाचंच माझा देश मोठा म्हणून प्रत्येक गोष्टीचे मूळ इथंच शोधायचं या भ्रामक वृत्तीतून आगरकर हे सांगत नाहीत. ते एक ऐतिहासिक वस्तूस्थिती आपल्यासमोर मांडत आहेत. ही सर्व माहिती आगरकरांनी नक्कीच कुठल्यातरी ग्रंथाचा आधार घेऊन दिलेली असावी. परंतु या माहितीला पुढं आगरकरांनी जी अनुभवाची जोड दिली आहे, ती मला जास्त महत्त्वाची वाटते. तिकडं युरोपात जाऊन साखर उद्योग इतका प्रगत झाला तरी, आपण मात्र जुनाट साधनं वापरतो, आपली साखर बनवण्याची पद्धतीही जुनाटच आहे.
त्याविषयी आगरकर लिहितात,” इंग्लंड देशात साखरेचा कारखाना प्रथम इसवीसन १५४४ त सुरू झाला. यानंतर तिकडे पुष्कळ नवीन युक्त्या निघून हल्ली साखर कारखान्याची उत्तम यंत्रे व गिरण्या निघाल्या आहेत. पण इकडे व चीन देशात जी अत्यंत पूर्वी साखर किंवा गूळ करण्याची साधने होती ती तशीच आहेत. हल्लीहल्ली कुठे कुठे थोडी सुधारणा होत आहे. पूर्वीचा जो लाकडी चरक अतिशय बोजड, लवकर मोडणारा व मैल दीड मैलापासून ऐकू येणारा, तो सध्या पुण्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सोडीला आहे व त्याच्या ऐवजी ते लोखंडी चरक घेऊ लागले आहेत. हा चरक येथील बुद्धिमान कारागीर सुबराव रावजी यांनी केलेला आहे. यात घर्षणापासून नुकसान होऊ नये अशी तजवीज केली आहे व याचे तुकडे करून बैलाच्या गाडीतून नेऊन पुन्हा हा उभा करता येतो.”
यापुढे आगरकरांनी जी माहिती दिलेली आहे ती खूपच मजेशीर आणि महत्त्वाची आहे. शेतमालाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित काढला आणि उत्पादन खर्चात त्याची मजुरी, बैलांची मजुरी आणि गुंतलेल्या भांडवलाचे व्याज गृहीत धरले तर शेती हा कसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे ते आगरकर फारच नीट पटवून देतात. १४० वर्षांपूर्वी आगरकरांनी दाखवलेला मार्ग आणि पुढं शरद जोशी यांनी त्याला दिलेलं निखळ अर्थशास्त्रीय परिमाण आणि लोकांदोलनाची जोड इतकं सगळं होऊनही शेतकरी अजूनही जागच्या जागीच का ? ते मात्र कळत नाही.
आगरकरांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते कुठल्याही भाष्याशिवाय आपल्यासमोर ठेवतो, ” आमच्या शेतकऱ्याची दरीद्रता, जमिनीची दैना व सावकारांचा जुलूम यामुळे उसापासून हवे तितके उत्पन्न होत नाही. एक एकर उसास साधारणपणे १७ हजार ९२० गॅलन पाणी द्यावे लागते व ऊस कापणीस येईपर्यंत तीस वेळा पाणी द्यावे लागते. विहिरीची उंची अंदाजे २५ फूट धरून मोटेने २००० गॅलन पाणी काढण्याची मजुरी ०२ आणे धरली तर एकंदर खर्च ३३ रुपये ०९ आणे ०७ पैसे येतो. इरिगेशन खात्याकडून पाणी घेतले तर एक एकरास २५ रुपये पडतात. पण विहिरीच्या पाण्याच्या खर्चात जे ०८ रुपये ०९ आणे ०७ पैसे जास्त येतात त्यात बैल बिनमजुरी तिथल्या तेथे चरणीस असतात. एकूण कोणत्याही पाण्यास तितकाच खर्च येतो. याशिवाय पाणी फोडण्याची मजुरी एक एकरास २६ रुपये येते. जमीन नांगरणे, फाळणे वगैरे बद्दल २६ रुपये लागतात. यातच मातीची ढेकळे वगैरे फोडून जमीन तयार करण्याचा खर्च आपण धरू. खतास निदान १२० रुपये पडतात. साधारणतः लोक आता जे खत घेतात त्याचा हा खर्च लिहिला आहे. खतामध्ये हाडांचा उपयोग करावा का नाही ? त्यांना खर्च किती येईल ? तसेच माशाचे खत सध्या ३८ रुपये टनाप्रमाणे मिळते. त्याचा उपयोग केला तर किती खर्च येईल ? वगैरे गोष्टींचा विचार सध्या आपण करीत नाही. लागणीस जे उसाचे बेणे द्यावे लागतात त्याचा खर्च रुपये ३०, उसाची लागवड वगैरेची मजुरी रुपये १२, उसाच्या भोवती कुंपण करण्यास व राखणावर मिळून रुपये १० इतके रुपये आपल्या शेतकऱ्यास कर्जी काढावे लागतात. जमिनीचा फाळा २५ रुपये. अशी एकंदर उसाची लागवड करून ऊस कापणीस येईपर्यंत खर्च २९८ रुपये ०८ आणे लागतो. एकरभर उसाचे गुऱ्हाळ बहुतेक सोळा दिवस जाते. आता ऊस कापून फडातून गुऱ्हाळाकडे नेण्यास १० मनुष्यांची ०५ आणे प्रमाणे मजुरी रुपये ५०, उसाचा घाणा जर भाड्याने घेतला तर दिवसास ०१ रुपया प्रमाणे भाडे द्यावे लागते. शिवाय गुळी व जळी व गडी यांची मजुरी रुपये १०, बैलांच्या किमतीचे व्याज रुपये ०८ व किरकोळ खर्च कापड, दिवा, छप्पर वगैरे रुपये ०३. एकूण गुळ तयार करण्यास खर्च ८३ रुपये ०८ आणे व उसाच्या लागवडीबद्दल वगैरे खर्च रुपये २९८ रूपये ०८ आणे मिळून रुपये ३८२ लागतो. आता एका एकरात सरासरी ३०४८ शेर गूळ होतो. एक पल्ला म्हणजे १२० शेर व वाढाव्याबद्दल ०७ शेर पल्यावर जास्त द्यावे लागतात. म्हणजे शेतकऱ्यास एका एकरातील गुळास २४ पल्यांची किंमत येते. दर पल्यास १२ आणे दलाली वजा करून १६ रुपये चार आणे पल्याप्रमाणे गुळाची मिळकत ३९० व पालापाचोळा वगैरे मिळून एकंदर उत्पन्न ४०२ रुपये होते. व खर्च वर दाखविल्याप्रमाणे ३८२ होतो. म्हणजे शेतकऱ्यास सरासरी २० रुपये फायदा होतो. काटकसर बरीच केली तर पराकाष्ठा ३० रुपये प्राप्ती होईल. यावरून पहा की इतके श्रम करून व इतके जोखमीचे काम करून बिचाऱ्यास मिळकत अगदीच कमी. मेहनत कमी झाली किंवा कुठे कसूर झाली, अगर राखण्यास ढीलाई झाली तर जमाखर्च बरोबर व बिचारा कोरडा तो कोरडाच. किंबहुना एखादे वेळी आतबट्ट्यातच धंदा व्हावयाचा.”
आगरकरांनी हे सगळं लिहून आता १४० वर्षे उलटून गेलेली आहेत. देश स्वतंत्र झालेला आहे. महाराष्ट्रात कृषीउद्योगात क्रांती झालेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचे साखर कारखाने काढलेले आहेत. महाराष्ट्रात शंभरावर कारखाने आहेत. परंतु शेतीचा धंदा अजूनही आतबट्ट्याचाच होतो आहे. दरवर्षी उसाच्या भावासाठी आंदोलन करावं लागत आहे. हे केवढं दुर्दैव !
💐
संदर्भ :
१. केसरीतील निवडक निबंध व विविध लेख संग्रह – गोपाळ गणेश आगरकर, समन्वय प्रकाशन (२०१२)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.