December 5, 2024
Mahatma Phule Agriculture Concept article by Indrajeet Bhalerao
Home » महात्म्याचा शेतीविचार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महात्म्याचा शेतीविचार

॥ महात्म्याचा शेतीविचार ॥

महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या. त्या सभांना हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यातून महात्मा फुले यांना आणखीच प्रेरणा मिळत गेली. जुन्नर परिसरात तर मोठाच असंतोष पसरला. त्याचा उपयोग करून महात्मा फुले यांनी सरकारला मोर्चा काढून निवेदन दिले की, भट, सावकार आणि सरकारी नोकरांच्या शोषणातून आमची मुक्ती करा.

इंद्रजीत भालेराव

मागच्या लेखात आपण इंग्रज इथं आले तेव्हा शेतीविषयक काय घडत होतं, ते पाहिलं. आता आपण त्याच काळात ज्यांनी शेतकऱ्याचा जीव की प्राण होऊन शेतकऱ्यांची बाजू तळमळीनं मांडली आणि त्या काळात जे शेतकऱ्यांचा एकमेव वाली होते, अशा महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी आणि त्यांच्या शेतीविषयक धारणांविषयी आपण पाहणार आहोत. महात्मा फुले यांनी कितीही तळमळीनं शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मांडली तरी त्यांना अर्थशास्त्रज्ञ समजलं जात नाही. कारण त्यांनी आपले विचार अर्थशास्त्राच्या चौकटीत राहून मांडलेले नाहीत. पण अर्थशास्त्रज्ञांपेक्षा हजारपट तळमळ महात्मा फुले यांच्या लेखनात आहे. जे दिसलं जे सुचलं ते फुले यांनी लिहिलं. त्यांच्या लेखनाला शास्त्रप्रामाण्य नसलं तरी अनुभवप्रामाण्य आहे. त्यामुळे कुणाच अर्थशास्त्रज्ञाच्या लक्षात न आलेली धर्माची शोषक बाजू त्यांच्या लक्षात आली. म्हणूनच त्या काळातल्या अर्थशास्त्रज्ञांपेक्षा शेतकऱ्यांच्या दुर्दशेची वेगळी कारणं त्यांनी सांगितली.

महात्मा फुले यांनी पुराणातल्या बळीराजाला दिलेला नवा अन्वयार्थही आता रूढ आणि सर्वमान्य झालेला आहे. बळीराजा हा लोकशाही मानणारा न्यायप्रिय शेतकरी राजा होता, पण फसवून त्याचा पराभव करण्यात आला. भारतातली सामान्य प्रजा अजूनही त्या न्यायी राजाची वाट पाहते व `इडापिढा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ अशी अपेक्षा करते. त्या बळीच्या वंशजांनी पुन्हा एकत्र यावं आणि नवं न्यायोचीत लोकशाही राज्य स्थापावं अशी प्रेरणा या मिथकाच्या नव्या अन्वयातून इथल्या शुद्रातीशुद्रांना महात्मा फुले यांनी दिली. महार, मांग, माळी, धनगर, कुणबी हे सर्वच बळीचे वंशज आहेत, अशी विशाल भूमिका महात्मा फुले यांनी घेतली. गुलामगिरी या ग्रंथात त्यांनी आपल्या या भूमिकेची सविस्तर मांडणी केली. केवळ बळीच नव्हे तर सगळ्याच इतिहासाला आणि दशावतारांना नवा अन्वयार्थ देण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं.

‘शेतकऱ्याचा आसूड’ हा महात्मा फुले यांनी १८८३ साली, म्हणजे आज पासून १४० वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात त्याआधीच्या पंधरा-वीस वर्षातला शेतकरी आलेला आहे, असं गृहीत धरलं तर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले शेतीवास्तव काय होतं ते या ग्रंथातून आपणाला समजतं. ते वास्तव एवढं भयानक आणि वस्तुस्थितीदर्शक आहे की, त्याविषयी कुणाला काही शंका असेल त्याला त्या वस्तुस्थितीचं प्रत्यक्ष दर्शन घडवण्याची तेव्हा महात्मा फुले यांची तयारी होती. शिवाय आपण पुणे, मुंबई, जुन्नर सारख्या गावात प्रत्यक्ष लोकांसमोर त्याचं वाचन करून लोकांकडून खात्री करून घेतल्याचंही महात्मा फुले लिहून ठेवतात. बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांनीही हा ग्रंथ प्रत्यक्ष फुले यांच्या तोंडून खास वेळ काढून ऐकला, त्याचं कौतुक केलं आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य देखील केल्याचं, फुले यांनी नोंदवून ठेवलेलं आहे.

हा ग्रंथ महात्मा फुले यांनी वयाच्या अशा अवस्थेत लिहिलेला आहे की फुले यांचे सर्व विचार तेव्हा परिपक्व अवस्थेला पोहोचलेले होते. महात्मा फुले यांच्या सर्व आयुष्यभराच्या विचारांचं सार या ग्रंथात सामावलेलं आहे. म्हणून या ग्रंथातून आलेला महात्मा फुले यांचा शेतीविचार प्रतिनिधिक समजून त्याचा परामर्श मी इथं घेत आहे.

शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात महात्मा फुले यांनी धर्मानं नाडलेला शेतकरी दाखवला आहे. धर्माच्या नावानं शेतकऱ्याला किती प्रकारे नाडवलं जातं त्याचा इतका तपशील महात्मा फुले आपल्यासमोर ठेवतात की, आपण चक्रावून जातो. प्रत्येक महिन्याच्या, प्रत्येक तिथीला कोणत्या व्रतवैकल्याचं निमित्त सांगून शेतकऱ्याला कसं नागवलं जातं, त्याचा पैसा आणि वेळ कसा वाया घालवला जातो आणि त्यामुळे त्याला आपल्या परिस्थितीतून वर उठण्याचं त्राणच कसं शिल्लक राहत नाही, तेही फुले दाखवतात. त्याची परिणती म्हणून त्याला आपल्या मुलांना शिकवणं शक्य होत नाही. शिवाय त्यांना शूद्र ठरवून शूद्रांना विद्येचा अधिकार नाही, अशी दहशत त्यांच्या मनावर ठसवली जाते. म्हणून शेतकरी हजारो वर्ष विद्येपासून दूर राहिला व त्याच्या आयुष्याचा नाश झाला. यादवकाळात हेमाद्री पंडितानं चतुर्वर्गचिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात शेकडो व्रते सांगितलेली होती. ती नेमकी कोणती असावीत ? असा प्रश्न मला पडला होता. कारण मूळ ग्रंथ माझ्या वाचनात आलेला नव्हता. पण महात्मा फुले यांच्या या पहिल्या प्रकरणातला तपशील पाहिल्यावर ही उत्सुकता बऱ्यापैकी पूर्ण झाल्यासारखं वाटलं. इतक्या व्रतांचा तपशील महात्मा फुले यांनी या प्रकरणात दिलेला आहे.

जेजुरी, पंढरपूर, आळंदी इथं भरणाऱ्या जत्रेतही शेतकऱ्यांना कसं नाडलं जातं त्याचा तपशील महात्मा फुले इथं देतात. दीडशे वर्षांपूर्वी या जत्रेला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्याही महात्मा फुले नोंदवून ठेवतात. पंढरपूर एक लाख आणि जेजुरी, आळंदी पाऊण लाख असा तो आकडा आहे. या तीनही यात्रा महात्मा फुले यांनी स्वतः पाहूनच हा वृत्तांत लिहिलेला असावा यात शंका नाही.

पहिल्या प्रकरणाच्या शेवटी महात्मा फुले यांनी भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासाचा जो थोडक्यात अन्वय मांडला आहे तो तो एकदम नवा आहे. हा सगळा इतिहास शेतकरी आणि त्याचा शोषक आर्यभट ब्राह्मण यांच्या संघर्षाचाच इतिहास आहे, असं महात्मा फुले यांनी ठासून सांगितलेलं आहे. शेतकऱ्याला या नाडणूकीतून सोडवणारा महात्मा बुद्ध हा पहिला माणूस असल्याचा उल्लेखही महात्मा फुले आपल्या या प्रकरणाच्या शेवटी करतात.

शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणात राजेरजवाडे यांच्या पदरी सैन्यात आणि इतरत्र रोजगारात गुंतलेले लोक इंग्रज राजवटीत रिकामे झाल्यामुळे तो बोजा शेतीवर पडला याची नोंद फुले करतात. त्यांची संख्या फुले पंचवीस लाख नोंदवतात. तेव्हाच्या शेतीवरच्या वाढत्या बोजाची नेमकी कल्पना महात्मा फुले यांना आलेली होती. निरुद्योगी लोकांची लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचे होणारे तुकडे हेही शेती नुकसानग्रस्त होण्यास कारणीभूत होतात, याचीही नोंद फुले करतात. जंगल उत्पादनाचा व्यवसाय करून आणि जंगलात शेळ्या, म्हशी चारून जगणाऱ्या लोकांचाही बोजा जंगल खात्याच्या मालकीमुळे आता शेतीवरच पडतो आहे, याचीही नोंद महात्मा फुले करतात. शेतकरी बलुतेदारांच्या हाताखाली राबेल म्हणावे तर तेही आता इंग्रजी उत्पादनामुळे देशोधडीला लागलेले आहेत. पाय पुसण्यापासून सगळ्या गोष्टी यंत्रातून येऊ लागल्यामुळे गाव पातळीवरच्या कारागिरांचा रोजगार हिसकावला गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली, असे निरीक्षण महात्मा फुले यांनी या प्रकरणात नोंदवलेले आहे. या प्रकरणाच्या शेवटी न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था आणि कारकून शेतकऱ्याला कसं फसवतात याचं इतकं तपशीलवार वर्णन दहा पानातून आलेलं आहे की त्यात पात्रांची नावं टाकली तर ती एक उत्तम कथाच होऊन जाईल, असा या सगळ्या लेखनाचा बाज आहे. महात्मा फुले यांच्यात दडलेल्या एका सच्चा ललित लेखकाचा प्रत्येय हा मजकूर वाचताना आल्याशिवाय राहत नाही

शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाच्या तिसऱ्या प्रकरणात महात्मा फुले यांनी आदिमानवापासून आजच्या भारतीय शेतकऱ्यांपर्यंत सृष्टीचा विकास कसा झाला याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. एका अर्थानं ही मानवाची कहाणीच आहे. मानवाच्या कहानीचा शोध घेणारी अनेक पुस्तक अलीकडं उपलब्ध झाली आहेत. पण १४० वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी लिहिलेली ही कहाणी पुष्कळ संदर्भग्रंथ वाचून आणि तर्काला ताण देऊन लिहिली असावी. अशा काही पुस्तकांचे तळतीपात दिलेले संदर्भ पाहिले की महात्मा फुले यांचं वाचन किती अफाट आणि मूलभूत स्वरूपाचं होतं, ते आपल्या लक्षात येतं. शिवाय इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याची त्यांची स्वतंत्र पद्धतीही लक्षात येते. दशावतारांचा त्यांनी लावलेला अन्वय आजही विचार करण्यासारखाच आहे. प्रकरणाच्या शेवटी महात्मा फुले यांनी जी काही विधानं केलेली आहेत, ती आजही जशाला तशी लागू होणारी आहेत. अजूनही आपले कळीचे प्रश्न तसेच आहेत, हे ती विधानं वाचल्यावर आपल्या लक्षात येतं.

धरणाच्या पाणी वाटपाविषयीची व्यवस्था नोंदवताना महात्मा फुले तोट्या लावून मोजून पाणी द्यावं असं तेव्हा सांगतात. धरणातल्या पाण्याचं नीट नियोजन करून जितक्या जमिनीला पुरेल तितकीच लागवड करण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी म्हणजे त्यांची पिकं नंतर वाळणार नाहीत आणि पाण्यासाठी शेतकरी संघर्ष करणार नाहीत, हेही ते नोंदवतात. पाणी वाटपाचे आजचे तंटे पाहिले की महात्मा फुले यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. शेवटी निष्कर्ष काढताना फुले म्हणतात, “सारांश या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहणे मारामारी पडते. तेव्हा ते मारवाड्यापासून कर्ज काढून सरकारी पट्टी देतात”

शेतकऱ्याची आणि गोऱ्या सोजीराची कष्ट करण्याची आणि जगण्यातली तफावत काशी-रामेश्वराइतकी असल्याचं फुले तुलना करून सिद्ध करतात. सरकारी नोकरांचे पगार कमी करून तो पैसा शेतीला पाणी आणि शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण देण्यासाठी वापरावा, असं फुले सुचवतात, तेव्हा वेतन आयोगाला विरोध करणारे शरद जोशी आठवल्याशिवाय राहत नाहीत.

शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातले चौथे प्रकरण म्हणजे एक उत्तम ललित लेख आहे. यात सामान्य शेतकऱ्यांच्या घराचे जे वर्णन महात्मा फुले करतात ते इतके तपशीलवार व इतके उत्कट आहे की, कुणाही आस्था असलेल्या माणसाला हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत थांबवत नाही. दीडशे वर्ष झाली, महात्मा फुले यांनी केलेल्या या गरीब शेतकऱ्याच्या वर्णनाला. इंग्रज जाऊन स्वकीय सरकार आले, या एवढ्या एका बदलाशिवाय परिस्थितीत काहीही बदल झालेला जाणवत नाही. मला तर हे वर्णन मी लहानपणी ज्या घरात वाढलो त्याच घराचं वाटतं. ते तपशील इतके जिवंत आणि माझ्या लहानपणच्या घराशी इतके मिळते-जुळते आहेत की, मी माझ्याच घराचं व माझंच वर्णन वाचतोय, असं वाटत होतं. महात्मा फुल्यांना वेळ असता तर त्यांनी नक्कीच शेतकऱ्याच्या जीवनावर कादंबरी लिहिली असती, इतके वाङ्मयीन गुण मला या लेखनात दिसले. दीडशे वर्षानंतर लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात शेतकऱ्यांच्या जीवनाचं आणि घराचं इतकं वस्तुस्थितीदर्शक तरीही सुंदर वर्णन अन्य कुणीही केलेलं आढळत नाही. त्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं इंग्रज सरकारनं शेती आणि शेतकऱ्यांचे पाहणी अहवाल तयार केले असावेत. पाहणी करणाराला शेतकऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्यामुळे ते अहवाल तद्दन खोटे असावेत. ते महात्मा फुले यांच्या पाहण्यात आलेले असावेत. ते खोटे अहवाल वाचून फुले यांना तिडीक आली असावी आणि त्या तिडीकीतच फुले यांनी शेती आणि शेतकऱ्यांचा हा खराखुरा अहवाल शेतकऱ्याच्या आसूड मध्ये लिहिला असावा. असं या चौथ्या प्रकरणाच्या शेवटी आलेल्या संदर्भावरून वाटतं.

या शेतकऱ्याचा आसूड पुस्तकाच्या शेवटच्या आणि पाचव्या प्रकरणात महात्मा फुले यांनी शेती समस्येवरचे उपाय सुचवले आहेत. दहा पानांच्या या प्रकरणात पहिली पाच पानं सरकार आणि शेतकरी यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणारे ब्राह्मण नोकरदार शेतकऱ्यांचे कधीच भलं करू शकणार नाहीत, हे महात्मा फुले पटवून देतात. फुले म्हणतात, गेल्या हजारो वर्षापासून या समाजाने शेतकरी समाजाला पद्धतशीर अडाणी ठेवून नाडलेलं आहे. त्यांच्यावर भरवसा ठेवून जर सरकार शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवणार असेल तर त्या कधीच शेतकऱ्यांच्या भल्याच्या होणार नाहीत. कारण हजारो वर्षांपासून त्यांची तशी मानसिकता कधीच नव्हती आणि आजही नाही. हे परोपरीनं फुले पटवून देतात.

परोपरिचे युक्तिवाद करून फुले सांगतात की इंग्रज मायबाप सरकारनं शुद्ध शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवून त्यांना मोक्याच्या सरकारी जागेवर नेमावे म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

शेवटच्या प्रकरणातल्या उरलेल्या अर्ध्या मजकुरात फुले यांनी शेती प्रश्नावर उपाय सुचवले आहेत. यात शेतकऱ्यांचे दोषही फुले दाखवतात. ते म्हणतात, चोऱ्या, छिनाल्या करणाऱ्या नीच शेतकऱ्यास नीतिमान करण्यासाठी सरकारने कडक कायदे करावेत. शुद्ध शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त बायका करू देऊ नयेत. बालविवाहाला कडक बंदी घालावी. कारण त्यामुळेच ही बायको आता मला आवडत नाही म्हणून दुसरी बायको करण्याची संधी त्यांना प्रौढपणी मिळते. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सरकारी नोकरीत जागा राखीव ठेवाव्यात. त्या जागी ब्राह्मणांची भरती करू नये, असाही उपाय फुले सुचवतात. शिवाय शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकावं म्हणून सक्तीचा कायदा करावा. ग्रामीण भागातील शाळेतल्या शिक्षकांना पाभरी, कोळपी, नांगर हकता येणं आवश्यक करावं. शेतकऱ्यांच्या प्रथमच शिकणाऱ्या मुलांसाठी सुरुवातीला अभ्यासक्रम सोपे करावेत. गावच्या पाटलाला शैक्षणिक गुणवत्ता आवश्यक करावी म्हणजे त्यानिमित्तानं शिकण्याची चढाओढ लागेल. गावचा कारभारी सुशिक्षित झाला तर कारकून गावाला लुटणार नाहीत. असे कितीतरी मूलभूत उपाय फुले सुचवतात.

शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा महात्मा फुले यांनी किती ध्यास घेतला आणि किती सूक्ष्म अभ्यास केला होता, ते या प्रकरणावरून आपल्या सहज लक्षात येईल. ‘शेतकऱ्याचा आसूड’ चं मर्म डॉक्टर भा. ल. भोळे यांच्या भाषेत मुद्दाम देत आहे. भोळे म्हणतात, “भारत हा शेतीप्रधान देश असल्याची चर्चा इथे पूर्वापार सुरू असली तरी शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना मध्यवर्ती ठेवून त्याविषयी प्रत्यक्ष निरीक्षण, अभ्यास आणि चिंतन, समग्र व सुसंगत मांडणी करण्याचा पहिला मान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात जोतिरावांनाच द्यावा लागतो.”

महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या. त्या सभांना हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यातून महात्मा फुले यांना आणखीच प्रेरणा मिळत गेली. जुन्नर परिसरात तर मोठाच असंतोष पसरला. त्याचा उपयोग करून महात्मा फुले यांनी सरकारला मोर्चा काढून निवेदन दिले की, भट, सावकार आणि सरकारी नोकरांच्या शोषणातून आमची मुक्ती करा. याच काळात पुण्यात आलेल्या ड्युक ऑफ कॅनॉटला भेटण्याची संधी आली तेव्हा महात्मा फुले त्यांना भेटण्यासाठी मुद्दाम शेतकरी वेशात गेले. त्याच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजून सांगितले. इतकंच नाही तर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनाही त्यांनी निवेदन दिलं की, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आता तुम्ही तारणहार झाले पाहिजे. सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानात शेतकऱ्यांसाठी पुष्कळ गोष्टी केल्या, त्याची प्रेरणा कदाचित महात्मा फुलेच असावेत.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न हर प्रकारे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी भाषणं केली, सभा घेतल्या, मोर्चे काढले, पुस्तकं लिहिली, निवेदनं दिली, व्यंगचित्रं काढली आणि कविताही लिहिल्या. महात्मा फुले शेतकरी प्रश्नाला असे सर्व अंगानं भिडले. त्यांनी कुठलेच अंग शिल्लक ठेवले नाही. लोकांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी कवितेचा फार प्रभावी उपयोग केला. त्यांच्या कवितांपैकी एक कविता इथं मुद्दाम देत आहे.
कायेपुरती लंगोटी । फिरती नांगराच्या पाठी
एका घोंगड्या वाचूनी । स्त्रीस नसे दुजे शयनी
ढोरामागे सर्व काळ । पोरे फिरती रानोमाळ
ताक कण्या पोटभरी । धन्य म्हणे तो संसारी
असे वस्त्राची कमती । एकमेका चिकटती
सरकारी पट्टी नेट । पडे तीन शेंड्या गाठ
कर्जरोखे लिहिणे आट । निर्दय मारवाडी काट
आज्ञानाने समजत नाही । कुलकर्ण्याने लिहिले काही
वकिलाची महागाई । न्यायाधीशा दया नाही
पाप पुण्य जेथे नाही । पैशापुरते दादाभाई
नित्य जमती एके ठाई । शुद्राची तर दादच नाही
राजे धर्मशील म्हणवती । आता कारे मागे घेती
विद्या द्यावी पट्टीपुरती । धिःक्कारुन सांगे जोती
या कवितेतून महात्मा फुले यांची थेट शैली आणि आतून आलेला कळवळा पाहायला मिळतो. म्हणूनच कुठलीही अलंकारिकता नसताना आणि कोणतेही शैलीचे अवडंबर नसताना, ही कविता थेट काळजाला भिडते. जेव्हा ही कविता लोकांसमोर सादर होत असेल तेव्हा ती नक्कीच लोकांवर परिणाम करीत असेल, यात शंकाच नाही.

संदर्भ :
१. शेतकऱ्यांचा आसूड – जोतीराव गोविंदराव फुले, सं. भास्कर लक्ष्मण भोळे, साकेत प्रकाशन (२०१०)
२. जोती म्हणे – भास्कर चंदनशिव, साकेत प्रकाशन (२००७)
३. महात्मा ज्योतिराव फुले : वसा आणि वारसा – भास्कर लक्ष्मण भोळे, साकेत प्रकाशन (२००९)
४. महात्मा ज्योतिबा फुले – भास्कर लक्ष्मण भोळे, साहित्य अकादमी (१९९६)
५. महात्मा ज्योतिराव फुले आणि शेतकरी चळवळ – डॉ. अशोक चौसाळकर, लोकवाङ्मय गृह (१९९०)
६. महात्मा ज्योतिराव फुले : शोधाच्या नव्या वाटा – सं. हरी नरके, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (२००७)
७. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक – महात्मा जोतिराव फुले, नागनालंदा प्रकाशन (२०११)
८. महात्मा फुले यांच्या दुर्मिळ पुस्तिका – महात्मा फुले, नागनालंदा प्रकाशन (२०११)
९. ज्योति चरित्र – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नॅशनल बुक ट्रस्ट (१९९२)
१०. महात्मा ज्योतिराव फुले : आमच्या समाज क्रांतीचे जनक – धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन (१९६८)
११. महात्मा फुले समग्र वाङ्मय – सं. प्रा. हरि नरके, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई (२०१३)
१२. महात्मा फुले गौरव ग्रंथ – सं. हरी नरके, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई (२०१८)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading