July 27, 2024
Self-knowledge is the right justice for the people
Home » आत्मज्ञानामुळेच जनतेला योग्य न्याय
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानामुळेच जनतेला योग्य न्याय

तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा ।
हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ।। १३३८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण माझें मन चांगले जाणत आहांत आणि माझ्या मनाला जाणतां असें जर म्हणावें तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी जाणत आहे काय ?

सद्गुरु आत्मज्ञानाने शिष्याच्या मनातील गोष्टी जाणतात. मनातील दोष सद्गुरु दूर करण्याचा प्रयत्न करतात. अनेक गोष्टीत ते आपणाला सावध करतात. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे जीवनातील अनेक गोष्टीत सहजता येते. अवघड वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्या मार्गदर्शनामुळे सोप्या होत असतात. हे त्यांचे मार्गदर्शन शिष्याच्या भक्तीपोटी असते. इतकेच नव्हेतर ते शिष्याला आपल्याप्रमाणे आत्मज्ञानी करण्यासाठी असते.

विधिलिखित आहे ते आपणास बदलता येत नाही. नैसर्गिक आपत्ती येतच राहातात. अनेक संकटे आपल्यावर कोसळत असतात. पण संकटावर मात करत आपण जीवन जगत असतो. या संकटाबद्दल सद्गुरु आधिच सावध करतात. यावर मात करण्यासाठी आधिच नियोजन करण्याचेही उपाय ते सुचवितात. अशा या त्यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने साहिजिकच आपणास होणारा त्रास कमी होतो. आत्मज्ञानाने ते सतत शिष्याला अनुभुतीतून मदत करत असतात.

शिष्य गुरुंच्यापासून दूर असला तरी गुरुंचे मार्गदर्शन हे शिष्याला लाभत असते. मात्र तशी भक्ती, विश्वास शिष्याजवळ असायला हवा. दुःखात जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. सद्गुरु हे खरे मित्र, सखे असतात. जे सुख-दुःखात शिष्याला आधार देत असतात. अशा आत्मज्ञानी संतांचा सहवास लाभावा असे मनोमन वाटत असते. ही इच्छाच अशा सद्गुरुंची भेट घडवून आणते.

भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक गुरु-शिष्य परंपरा आढळतात. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. विविध जाती धर्माचे लोक येथे राहातात. या सर्वांमध्ये अशा गुरू-शिष्य परंपरा पाहायला मिळतात. विविध भाषेत हे आध्यात्मिक साहित्य मांडले गेले आहे. पण या सर्वांचा विचार एकच असल्याने या परंपरा देशाला एकसंघ बांधण्याचे काम करतात. यामुळेच विविधतेमध्येही राष्ट्रीय एकात्मता येथे दिसून येते. हे एकसंघ बांधण्याचे काम काही राजांनी केले म्हणूनच ते राजाधिराज, छत्रपती या नावाने ओळखले जातात. कारण त्यांच्या या कार्याचा गौरव या योगी परंपरांनी केला आहे.

कितीही परकिय आक्रमणे आली आणि गेली, पण या आध्यात्मिक संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये कधी खंड पडला नाही. उलट या आक्रमणांनी या परंपरेची नव्याने उभारणी झाल्याचे स्पष्ट होते. ही भक्तीची, विचारांची परंपरा आहे. तिचा विस्तार परकिय आक्रमणातही होत राहीला. राजवटी आल्या आणि गेल्या पण मानवता वादाचे हे विचार, मानव धर्माचा हा विचार कायम राहीला. कारण हा विचार प्रत्येक मानवाशी संबंधीत आहे. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो हे मानवाचे शास्त्र आहे.

ही विश्वाचा उद्धार करणारी परंपरा आहे. या संस्कृतीने, या विचाराने, या तत्त्वज्ञानाने अनेक परकिय लोकही भारावून गेले. या तत्वज्ञानासमोर ते नतमस्तक झाले. असे हे तत्वज्ञान जबरदस्तीने शिकताही येत नाही अन् शिकवताही येत नाही. हे तत्वज्ञान हे अनुभवशास्त्र आहे. अनुभवातून हे आत्मसात होते. हे शास्त्र समस्त मानवासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच ते परकीय आक्रमणातही विकसित होत राहीले.

अनादी कालापासूनचही गुरू-शिष्य परंपरा आहे. राजदरबारामध्येही या योगी परंपरेला स्थान होते. कारण न्यायनिवडे करताना आत्मज्ञानाचा योग्य तो वापर येथे होत असे. राजेही स्वयंभु अन् आत्मज्ञानी होते. म्हणूनच त्यांना श्रीमान योगी, जाणते राजे असे म्हटले जात होते. आत्मज्ञानामुळे जनतेला योग्य न्याय मिळत असे. तसेच राज्याच्या रक्षणासाठीही या ज्ञानाचा योग्य तो उपयोग होत असे. अशा या परंपरेमुळेच सुराज्य, सुशासन, सुरक्षितेची हमी देणारा राज्यकारभार उभा राहीला जात असे. असे राज्यकारभार करणारे राजेच अमर झाले. आजही अशा राजांचा जयजयकार होत राहातो. राजवैभवापेक्षा न्यायाचे राज्य उभे राहाणे महत्त्वाचे असते. ते अशा योगी राजाकडून उभे राहात होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शास्त्राला अनुसरूनच कर्म करण्याची गरज

दुष्काळमुक्त मराठवाडा भावी दिशा

राजा अन् नवाब फुलपाखरे…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading