बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही. त्यामुळे बाईने स्वयंसिद्धा बनावे, ही तळमळ अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेत दिसते.
मनीषा पाटील हरोलीकर
देशिंग हरोली, मो.९७३०४८३०३२
सांगली जिल्ह्यातील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा दुसरा कवितासंग्रह आहे. ‘शब्दगंध’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह २०१९ ला प्रकाशित झाला होता. अश्विनी कुलकर्णी यांची आश्वासक कविता या संग्रहात वाचायला मिळते.या संग्रहातील त्यांची कविता चिंतनशील आहे.
बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही. त्यामुळे बाईने स्वयंसिद्धा बनावे, ही तळमळ अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेत दिसते.
‘ओझोन’ कवितेत म्हणतात ,
खडतर प्रयत्नांनी
तिने शोधलाय…
स्वतःचा स्वतंत्र आॕक्सीजन !
आणि आता तिला व्हायचंय
‘ओझोनचा थर’ !
किंवा
‘परिपक्व मन’ या कवितेत त्या म्हणतात ,
तो, ती, ते असे वागतात
आणि तसे वागतात
त्यांनी कसं वागावं
हे ठरवणारे आपण कोण ?
किंवा ‘नको विशेषण आता निर्भया’ कवितेत त्या म्हणतात ,
निर्भया हे बेगडी झालेलं विशेषण न लावता
तू चंडिका हो, नवदुर्गा हो,
जिजाऊ हो, झाशीची राणी हो,
नराधम असुरांचा कर्दनकाळ हो,
‘तू सज्ज हो!’
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे.पण या शिक्षणाने सजगता,सक्षमता आपल्याकडे येत नसेल तर त्याचा काय उपयोग ? महिलांनी अबला नव्हे तर सबला बनावे, हा स्त्री अस्मितेचा हुंकार त्यांची कविता देते.
कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांची देवावरील निस्सीम भक्ती त्यांच्या काही कवितांमधून दिसून येते. त्यांचा हा कवितासंग्रह ही त्यांनी भगवान कृष्णाच्या चरणी अर्पण केला आहे. अर्पणपत्रिका अत्यंत बोलकी आहे. ‘शोध कृष्णाचा’ या कवितेत त्या म्हणतात,
काही वास्तवं,
न बदलणारी…
जेव्हा सहज
स्वीकारणंही नाही जमत
तेव्हा निर्माण होतं,
कुरुक्षेत्र!
आणि शोध सुरु होतो,
‘माझ्या कृष्णाचा!’
कवयित्री स्वतः मानसोपचार तज्ञ आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संकल्पना त्यांना ज्ञात आहेत.त्यामुळे त्याचे संदर्भ नव्या प्रतिमा म्हणून आपल्याला त्यांच्या कवितेत भेटतात.’आपलीच लाळ’ या कवितेत येणाऱ्या ओळी….
आपलीच लाळ
हेही औषध असतं!
स्वतःच….स्वतःसाठी
आशयाच्या गरजेनुसार आर्ट थेरपी, ईसीजी, कॕरेट, इनसाईट, पॕलेट, इगो, ओझोन, कॕनव्हास, सोनोग्राफी, सायरन, अॕम्ब्युलन्स असे इंग्रजी शब्द सहजतेने आले आहेत. हा कवितासंग्रह वाचताना आशयसंपन्न कविता वाचल्याचा आनंद मिळतो. या कविता आशावाद देतात.’ हरितद्रव्य’ या कवितेचा शेवट मनाला स्पर्शून जातो. त्या म्हणतात ,
‘किती दिवस समोरचा सूर्य बघून तू उजळणार ?’
आणि त्याच्या किरणांनी प्रसन्न होणार ?
आपणच आपला सूर्य शोधावा
आणि आपणच बनावे
एखाद्याच्या मनाचे हरितद्रव्य !’
संग्रहाला समृद्ध प्रस्तावना लाभली आहे. ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात ,’आजच्या कवितेच्या गर्दीत ही कविता अनोखी आणि म्हणूनच अनुपम वाटणारी अशीच आहे. स्वतः अश्विनी कुलकर्णी यांना अशा कवितेच्या गावाचा शोध सतत खुणावतो आहे आणि माझ्या मताप्रमाणे त्यांना त्यांच्या कवितेचा गंध भारला गाव, सानंद सापडलेला आहे.’ ज्येष्ठ कवी आनंदहरी यांनी पाठराखण केली आहे. ते म्हणतात ,’अंधाराकडून प्रकाशाकडे’ जाण्याचा आणि नेण्याचा वसा कवयित्रीने घेतल्याने त्यांच्या कविता प्रकाशशलाका होऊन येतात, हे या संग्रहाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.’
प्रतिभा पब्लिकेशनच्या धर्मवीर पाटील यांनी कवितासंग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा मुलगा युवा चित्रकार सुमेध कुलकर्णी यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ संग्रहास लाभले आहे. एकूण ८७ कविता या संग्रहात आहेत.आवर्जून वाचायलाच हवा असा हा संग्रह आहे.अश्विनी कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन आणि भावी लेखनास लाख लाख शुभेच्छा. शेवटी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर….
मीही आता
माफ केलंय अंधाराला
कारण ती बुद्धीही भंगवंतानेच दिलीय मला…
कवितासंग्रहः विशाल होत चाललाय माझा सूर्य
कवयित्रीः अश्विनी कुलकर्णी
प्रकाशनः प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर
पृष्ठसंख्याः १३२
मूल्यः २२०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
सुंदर समीक्षण..मनःपूर्वक धन्यवाद.