December 14, 2024
Poems of realist thought Book Review by Suhas Pandit
Home » विशाल होत चाललाय माझा सूर्य…वास्तववादी विचारांच्या काव्यरश्मी
मुक्त संवाद

विशाल होत चाललाय माझा सूर्य…वास्तववादी विचारांच्या काव्यरश्मी

का लिहायची कविता ? कुणाशीतरी बरोबरी करावी, स्पर्धा करावी म्हणून ? नक्कीच नाही. कीर्ती मिळावी, प्रसिद्धी मिळावी म्हणून कविता लिहायची नसतेच मुळी. आणि ज्याच्या अक्षरांच्या काळ्या ठिपक्यांमध्ये स्वतः चमकण्याचे तेज आहे त्याला या सर्वांची आवश्यकताही नसते. खर सांगायच तर कविता लिहीली जात नाही. ती होते आपोआप. संवेदनांचे मेघ मनात दाटू लागले की मनाच्या होणाऱ्या घुसळणीतून भाव भावना बरसू लागतात कवितेच्या रुपात. ती कविता ‘ कुणासाठी तरी ‘ म्हणून नसतेच. शब्दांच्या वाटेनं मन असं रितं होत गेल की लेखणी कधी दिलदार होऊन जाते तर कधी जाणकार होऊन जाते. कवयित्रिचे शब्द झेलत, तिच्या आठवांना आणि आसवांना पेलत, कवयित्रीच्या मनाला समजून घेत शब्दांचे गंठण घडवित जाते. मग कवयित्रिही मनातून पाझरणाऱ्या शब्दांना मुक्तपणे वाट मोकळी करून देते. कुठलिही मर्यादा न ठेवता मनातील भावनांची उत्कटता काव्यात उतरत जाते. बंदिस्तपणाची बंधनं तोडून शब्दांना फुलू दिलं की मनात फुलणारी कविता अलगदपणे शाईच्या पाझरातून कागदावर उतरते. काय नसतं मनाच्या डोहात ? जे जे काही असतं ते सगळं उतरतच कवितेत. पानं, फुलं, प्रेम, विरह हे तर आहेच. पण जगण्याच्या सर्व जाणीवा सर्वांगानं फुलून येतात आणि कवितेत प्रतिबिंबित होतात. मग ती कविता कधी अथांगाचा वेध घेते तर कधी क्षितिजाला स्पर्श करु पाहते. कधी भूगर्भात शिरून हालचाली शोधते तर कधी भूकंपाच्या केंद्रबिंदूलाच हात घालते. व्यापक भूमिकेतून ठामपणे उभी असणारी कविता कवयित्रीला उर्जा प्रदान करते आणि चिंतनशिलतेतून उगवणारा सूर्य अधिक विशाल होत जातो.

या विशाल सूर्याच्या शलाका मग काव्य रूपानं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. या विशाल सूर्याची उर्जाच कवयित्रीला सकारात्मकता देते. नैराश्याची कितीही आवर्तने आली तरी भगवंतावरील गाढ श्रद्धेमुळे त्यावर मात करुन आयुष्याशी सकारात्मकतेने झुंज देणे शक्य होते आणि त्या बळावरच अंधाराला माफ करण्याचं नैतिक बळ अंगी संचारते. मग मावळत्या सूर्यातही उद्याच्या सूर्योदयाची किरणं दिसू लागतात, कारण कवयित्रिचा सूर्य आता विशाल होत चालला आहे.

निसर्गाशिवाय माणूस हे कल्पनेत सुद्धा शक्य नाही. त्यातून तो जर कलावंत असेल तर मग हे नात अधिक दृढ होत जातं. आणि तो कवीही असेल आणि चित्रकारही असेल तर ? कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या बाबतीत हेच घडले आहे. जितके कसदार शब्द त्यांच्या लेखणीतून उतरतात तितकेच दमदार फटकारे त्यांच्या ब्रशमधून कॅनव्हासवर उमटत असतात. कल्पनेचा कुंचला रंगात बुडाला आहे की रंगाच्या कुंचल्यातून शब्द बाहेर पडले आहेत हेच समजेनास होतं. त्यांच्या निसर्ग कविता वाचताना त्यांच्या मनातील चित्रकार जागा झाला आहे हे स्पष्टपणे जाणवते. खरे तर निसर्गाचे शब्दचित्र त्यांच्या लेखणीतून साकारत असते. निसर्गातील रंगांचा परस्परांशी होणारा संग मनावर जे तरंग उठवतात तेच तर वर्तमानात जगण्याचं बळ देतात. अगदी सहजपणे मनातील अल्लडपणाचा कप्पा उघडला जातो आणि चंदेरी थेंबांच चांदण झेलायला उत्सुक असणार प्रौढपण बालकांत कधी रमून जातं समजतही नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं त्या अद्भुत चित्रकाराच जो क्षणाक्षणाला अगदी लिलया रंगपट बदलत असतो. कुंचल्याचा चमत्कार लेखणी करून दाखवते आणि मनाचा आणखी एक कप्पा निसर्गानं भरून,नव्हे, बहरून जातो. पण हे बहरणं पूर्ण समाधान मिळू देत नाही. कारण पर्यावरणाचा विचार कवयित्रीला स्वस्थ बसू देत नाही.

निसर्गाचा समतोल उद्ध्वस्त करुन भौतिक सुखासिनतेच्या हव्यासापोटी आपण आपलेच नव्हे तर पुढच्या पिढ्यांचेही नुकसान करत आहोत याचे भानही माणसाला उरलेले नाही. उलट निसर्गच बिघडला आहे असा कांगावा करुन तो कसा बिघडला आहे हे सांगण्यासाठी निसर्गाचा ईसीजी काढला जातोय. ऋतूंतील बदलाला जबाबदार कोण ? चार दिवस कोसळणारा आषाढ आणि एकदा तोंड फिरवून निघून गेल्यावर कोरडा पडणारा श्रावणमास ! श्रावणसरी तर नाहीतच. हिरवेपण नाही. कशी येईल तकाकी वसुंधरेला ? याला जबाबदार कोण ? याचा विचार तर दूरच. उलट गगनचुंबी इमारतीत कृत्रिम प्राणवायूचा मारा करुन निसर्गाचा प्राणच काढून घेतला जातोय अगदी निर्विकारपणे. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय याची जाणीवच शून्य होत चालली आहे.

प्रेम, माणसामाणसातील संबंध, जीवन याविषयी भाष्य करायला कवितेइतके सुंदर दुसरे माध्यम कोणते असणार ? त्यामुळे कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांनीही कवितेतून आपल्या याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना माहित आहे की भावना या कायमच जीवंत असतात आणि त्या कोरड्या पाडूनही चालत नाही. या भावना परस्परांना बांधून ठेवणाऱ्या असतात अगदी जन्मभर. त्यामुळे सुखदुःखाच्या वाटा पार करत परस्परांना ऊब देत वाटचाल करत असताना प्रेमाचे प्रदर्शन करण्यासाठी वेगळ्या व्हॅलेंटाईनची आवश्यक भासत नाही. पाण्यात विरघळत जाणाऱ्या सूर्यास्ताचे रंग नेहमीचेच असतात. पण तिला समजून घेत असताना त्यावेळची शांतता मात्र वेगळेच काही बोलून जाते..मग तिलाही चंद्र हजारो योजने दूर असण्याचे दुःख नसते. कारण मनाने एक होण्यासाठी तिचा चंद्र अगदी समीप असतो. कोजागिरीच्या रुपेरी मांडवाखाली चमचमते साज लेऊन ती येते आणि नक्षत्र बनून सर्वस्व अर्पण करते. विरहाची कल्पनाही मनाला सहन होत नाही. पण विरह झालाच तर विरहाच्या वेदना शमवण्यासाठी ओल्या मिठीला पर्याय नसतो आणि मग त्याला पाऊस होऊन यावच लागतं.प्रेमाचा असा वर्षाव होत असतानाच मनाला कधीतरी प्रश्न पडतो, खरं जीवन हेच आहे का ? नक्कीच नाही. सुख, दुःख, भोग, नशीब या सर्व कल्पनांच्या पलीकडे जाऊन प्रारब्ध हसत स्विकारता आलं आणि जगण्याविषयीच्या तक्रारी नाहिशी झाल्या की मगच खरं जगणं समजू लागतं, खरं जीवन सुरू होतं. मग ऋतूंचे अर्थ समजून लागतात. प्रत्येक ऋतूच्या बहरण्याबरोबर मनंही बहरत जातात आणि हृदयातील शब्दांचे कारंजे ऋतूरंगातून न्हाऊन निघतात.

मानसशास्त्रज्ञ असलेल्या कवयित्री मनाचे सारे खेळ फक्त दुरूनच पाहतील हे कसे शक्य आहे ? म्हणूनच जिथे जिथे संभ्रम निर्माण होतो तिथे तिथे त्यांच्या मनात द्वंद्व सुरु होते. वास्तवाच्या विस्तवाने पोळत असताना परिस्थितीच्या कुरुक्षेत्रावर समर्थपणे लढण्यासाठी अशा कृष्णाचा शोध सुरू होतो जो फक्त आपला असतो. तर कधी संयमाचे बांध फोडावे आणि फक्त स्वतःसाठी आनंदानं जगावं असं वाटू लागतं. व्यक्त झाल्याशिवाय मन मोकळं होणार नाही याची खात्री असल्यामुळे जमेल तसे उमटवावेत रंग आणि मन हलक करुन घ्यावं एका नव्या ‘आर्ट थेरपी’ ने. चित्र चांगले की वाईट हा प्रश्नच नसतो. संध्याकाळच्या रंगात मनातील भावनांचे रंग मिसळून जातात आणि शब्दांच्या चित्रातून मन व्यक्त होत जातं. कधी कधी वाटतं मनाचा शुष्कपणा संपावा आणि मिळावी थोडीशी ओल बीजाला मिळते तशी. बीज असतच की कुठेतरी पडलेलं. पण त्याचं अस्तित्व जाणवतं त्याला ओल मिळाल्यावरच. ओल मिळाल्यावरच ते रुजतं , फुलतं आणि सहस्र दाणे पोटाशी धरुन कणसाच्या रुपानं बहरून येतं. मनही तसच नाही का ? तिथं काही रुजावं लागतं, तरच फुलून येत. असं रुजण्यासाठी मग लागते ओढ ओलीची…ओल, कधी प्रेमाची तर कधी भावनांची. मनात असं काही रुजत असतं म्हणून तर मनाला होणाऱ्या अदृश्य जखमांतूनही भावनाच भळभळत वहात असतात. पण त्याच वेळी कवयित्रीला याचीही जाणीव आहे की असं भावनाना कवटाळून बसणं म्हणजे जगणं नव्हे. तर मन सशक्त करून, सत्याला सामोरे जाऊन मनातले कुविचारांचे, दौर्बल्याचे विषाणू काढून टाकले पाहिजेत. मनाच्या कोतेपणाला मूठमाती देऊन आपलं विश्व घडवणाऱ्या सगळ्यांनाच मनात जागा करुन दिली पाहिजे. कारण आता कवयत्रिच्या शब्दसूर्यामुळे कोणताच विषाणू आता मनावर मात करू शकत नाही. ही नवी मनशक्ती एवढा विश्वास निर्माण करते की काळजाने काळजाच्या गुहेत कोरलेली भावनांची सुंदर रेखीव लेणी नक्कीच ऐतिहासिक होतील याविषयी पूर्ण खात्री पटलेली असते.

पण शेवटी मनच ते ! त्याच्या बदलत जाणाऱ्या अवस्थेबद्दल काय बोलावं ? त्यालाही वाटतं कधी कशातच गुंतून नये, उलट अलिप्त रहावं सगळ्यापासून. अपेक्षांचे डोहाळे हे न संपणारे आहेत. पण ते पूर्ण करताना गोतावळे खाणाऱ्या मनाला सांभाळणही तितकच महत्वाचं, नाही का ?

कवयित्रीच्या हातून लिहील्या गेलेल्या चिंतनात्मक कवितांचा विचार करताना त्यांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाची खात्री पटते. मनाशी साधलेले ‘स्वगत’ असले तरी शब्दांच्या रुपाने ते कागदावर उमटले असल्यामुळे ते स्वगत न रहाता एक मुक्त चिंतन झाले आहे. प्रश्न प्रत्येकालाच पडत असतात. त्यातून सुटका कुणाचीच नाही. अशावेळी त्या प्रश्नांपासून, संकटापासून पळ काढण्यापेक्षा जाणीवपूर्वक विचार करुन उत्तरे शोधणे शहाणपणाचे नाही काय ? धुक्यात वाट हरवली तरीही पावलांनी मार्ग शोधणं थांबवायचं नसतं. कारण अंदाज येऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर विचारांचा मारा केला तर हे संभ्रमावस्थेचं धुकं नाहीसं होणार आहे आणि नजर भविष्य काळाला भिडणार आहे.

कवयित्रिला अशीही माणसं दिसतात की ज्यांच्यातील अहंभाव इतक्या पराकोटीला पोहोचलेला असतो की आपल्याला आलेल्या जडत्वाचं त्यांना कारणही समजत नाही.नाही वाटत त्यांना मेंदू करावा स्वच्छ, सोडावा सगळा ‘मी’ पणा आणि व्हावं अगदी हलकं हलकं, उडणाऱ्या म्हातारीसारखं. मग आपणच मनाची समजूत घालावी लागते. कारण कुणी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. उलट स्वतःचं मन परिपक्व करुन दुसऱ्याला ओळखता आलं पाहिजे. असं परिपक्व मन स्वतःच परीक्षक बनतं आणि आपल्या धिटाईच्या जोरावर सूर्याशी स्पर्धा करायला मागेपुढे पहात नाही.

कधी कधी अशा चिंतनशील मनाला असाही प्रश्न पडतो की ‘आम्ही कोण ‘ ? हा प्रश्न थेट पांडुरंगालाच विचारला जातो. त्याची मूर्ती साकारणारा माणूस हे विसरुन जातो की आपण मूर्ती घडवतोय. कितीही भाव ओतले तरी ती एक निर्जीव मूर्तीच. पण त्यानं तर आपल्याला घडवलय, एक सजीव देह देऊन ! आणि जरी याची जाणीव झाली तरी समाज आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आपली कोणती प्रतिमा समाजाला दिसते हा प्रश्न उरतोच. कारण आपल्याला कोणते गुणदोष चिकटवायचे हे त्यांच्याच हातात असतं. हीच वेळ असते आपला खरा धर्म ओळखून आपले विचार व्यक्त करण्याची. आपली वर्तणुक आणि विचारच आपली खरी प्रतिमा निर्माण करत असतात. आपलं व्यक्तिमत्व उजळणं आपल्याच हातात असत. आपलं हे खरं रूप दाखवायच काम शब्दच करतात.मनात उठणारी वैचारिक वादळं धाडसी विचारांना जन्म देतात आणि आत्मविश्वास वाढवतात. हा आत्मविश्वास परावलंबित्व कमी करतो आणि स्वतःचा सूर्य स्वतः शोधू लागतो. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विचारांचे पोषक हरितद्रव्य स्वतःच बनवू लागतो, अत्यंत समजूतदारपणे.

कवयित्रीच्या सुसंस्कारित मनाचे विवेकशील विचारांशी असणारं नात कवयित्रीला सामाजिक जाणीवांशी बांधून ठेवतात. वास्तवाचे भान असल्यामुळेच भवतालात घडणाऱ्या घटनांकडे त्या डोळेझाक करु शकत नाहीत. म्हणून तर त्यांना प्रश्न पडतो की मनाच्या जखमांना जबाबदार कोण ? त्यांच्या कवितेतून स्त्रीवरील अन्यायाविरुद्धची चीड व्यक्त होते ती यामुळेच. लबाड मुखवट्यांच्या अभद्र दर्शनाची त्यांना चीड येते आणि फसवेपणा आणि भोंदुगिरीवर त्या भाष्य करुन जातात. दिवसेंदिवस संवेदनाहीन बनत चाललेल्या या समाजातील जाणीवांचा दुष्काळ पाहून त्या व्यथित होतात. विघातक विचारांनी ज्यांची मने भरली आहेत अशा भ्रष्ट जनांना त्या वेळीच सावध करत आहेत आणि त्यांच्या ढोंगीपणाला जाबही विचारत आहेत. तरीही कुणाला कशाचे काहीही वाटत नाही याची त्यांना खंत आहे. जो तो आपल्याच धुंदीत आहे. तरीही संयमाची रात्र संपल्यावर येणारी पहाट ही खंत दूर करणारी असेल असा विश्वास त्यांना वाटतो.

स्त्रियांचे प्रश्न मांडताना त्या कधी भावूक होतात तर कधी त्यांची लेखणी धारदार बनते. परस्पर संबंधांच्या अगणित पारंब्या मनात घट्ट रुतलेल्या असताना वडाला सात फेऱ्या मारत बसणं त्यांना मान्य नाही. त्यांच्यातील ‘सावित्री’ ही आधुनिक विचारांची आहे. अत्याचाराच्या अग्नीत होरपळून गेलेली स्त्री आता अन्यायाविरुद्ध पेटून उठली आहे. पण केवळ स्वतःसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी. सर्वांना संरक्षण देणारा ओझोनचा थर बनून निखळ शुद्धता तिला पुरवायचे आहे. स्त्रीचा अन्यायाविरुद्धचा लढा आणि वसुंधरेचा प्रदुषणाविरुद्धचा लढा असे दोन्ही अर्थ ध्वनीत करणारी ‘ओझोन’ ही कविता लक्ष वेधून घेते. बाईच आयुष्य कसं असतं हे सांगताना संसारातील रोज अनुभवलेल्या प्रसंगांचे दाखले देऊन शेवटी गुलमोहोरासारखं बहरायलाही सांगितलं आहे. स्त्रीच्या सहनशक्तीचे काव्यात्म दर्शन घडवताना दिलेले दाखले नाविन्यपूर्ण आहेत. पण हे सहन करण आता थांबलं पाहिजे आणि निर्भया हे विशेषणच नामशेष व्हायला होण्यासाठी असुरांचा कर्दनकाळ होऊन सज्ज झालं पाहिजे असा इशाराही त्या देतात. त्यांचा विश्वास आहे की गैरसमजाच्या गाठी थोड्या सैल केल्या तर हळुहळू त्या सुटूनच जातील आणि मनांना जोडणारा एक दोरखंडच तयार होईल, सगळ्या समाजाला एकत्र बांधून ठेवणारा. मनाची कवाडे उघडी केली तर विश्वासाचे विश्व निर्माण होऊ शकेल.

कवीमनाच्या सर्व अवस्थांच्या छटा दाखवणाऱ्या कविता आपल्याला या संग्रहात वाचावयास मिळतात. फुलांच गाव शोधणारं, सोनपिवळा स्वर्ग पाहणारं, तेजस्वी सूर्याची ओढ असणारं त्याचं मन इथे अनुभवायला मिळतं. आसमंत स्पर्शणाऱ्या झाडाच्या रुपकातून कर्तृत्ववान व्यक्तीचे जीवनदर्शन त्या आपल्याला घडवतात. गिरीधराशी समर्पण होण्याची इच्छा व्यक्त करताना त्यांच्या सश्रद्ध मनाची खात्री पटते. मोहाच्या वाटांशी फारकत घेऊन कपटी वळणांचा अंदाज घेणारं त्यांच मन स्वतःसकट सर्वांनाच सावधानतेचा इशारा देतं. तर कधी आठवणींच्या लहरी उधळणारा वारा त्यांच्या मनात घोंगावत असतो.

विशाल होत जाणाऱ्या सूर्याच्या प्रकाशातील सर्व समावेशक अशा कवितांचा हा संग्रह. केवळ कविताच नव्हे तर कवितांची काही शिर्षकेही लक्ष वेधून घेणारी आहेत. निसर्गाचा ईसीजी, तुडुंब ओळी, आर्ट थेरेपी, उडणारी म्हातारी, स्पेस, हरितद्रव्य, तुझ्या अस्थिंची पालखी यासारखी शिर्षके कवितेविषयी उत्सुकता वाढवतात. भविष्याचा वेध घेणारा विशाल सूर्य अमूर्त चित्र पद्धतीत चित्रीत करणारे मुखपृष्ठ व चित्रकार सुमेध कुलकर्णी यांनी त्यामागची स्पष्ट केलेली भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.

हा सर्व मेळ जमून आला आहे याचं कारण एकच आहे. ते म्हणजे, ‘कविता होऊन जगायचं’ हे त्यांच पक्क ठरलेलं आहे. आयुष्यात येणारे सगळे अनुभव कवितेतून उपभोगायचे, नव्हे सारं जगणंच कविता होऊ द्यायचं. हे एकदा ठरल्यानंतर मनसूर्याला विशाल व्हायला कितीसा वेळ लागणार ? त्यांची कविता संपन्न शब्दकळेतून वास्तवाशी नातं जोडणारी आहे. अलंकारीक भाषेपेक्षा व्यावहारीक शब्दांतून आपल्या मनातील विचार त्यांनी आपल्या काव्यातून उतरवले आहेत. सहस्ररश्मींनी सूर्य तेजाळत असतो त्याप्रमाणे अश्विनी कुलकर्णी यांच्या लेखणीतून शब्द, भावना आणि प्रतिभा यांनी तळपणाऱ्या काव्यशलाका प्रकाशत जाव्यात हीच यावेळी सदिच्छा !

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.

काव्यसंग्रह : विशाल होत चाललाय माझा सूर्य…..
कवयित्री : अश्विनी कुलकर्णी.
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर
मूल्य : रु.१३२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading