September 8, 2024
A writer who rediscovers human relationships Sunita Ogale
Home » मानवी नात्यांचा नव्याने शोध घेणारी लेखिका
मुक्त संवाद

मानवी नात्यांचा नव्याने शोध घेणारी लेखिका

सोलमेट हा सुनिता ओगले यांचा हा दुसरा कथासंग्रह आहे, ज्यांनी पहिला संग्रह वाचला आहे, त्यांच्यामनात वाचण्यापूर्वी या दुसऱ्या संग्रहाबद्दल लेखिकेबाबत अधिक अपेक्षा निर्माण करतो. विशेष म्हणजे बऱ्याच अंशी लेखिका त्या पूर्णही करतात. एखाद्या कसलेल्या मानसशास्त्रीय समुपदेशाकासारख्या त्यांनी या संग्रहातील अनेक कथांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा विलक्षण अनुभव देणाऱ्या केसेसमधून त्यातील नाट्यात्मक उत्कटता व हृद्यता कायम ठेवत लीलया ती कलात्मकतेने उलगडून दाखवली आहे. हे करत असताना लेखिका म्हणून त्या प्रत्येक कथेत घडलेल्या घटनेचे वा व्यक्तीचे, वेगळे स्वतंत्र असे मानसिक विश्लेषण न करता, सहजपणे कथासूत्रातून परिणामकारकपणे निष्कर्षांसह वाचकापुढे आणतात. त्यांनी निवडलेल्या कथाविषयातील वेगळेपणा, त्यातील अनपेक्षितपणे पुढे आलेले नाट्यमय वळण क्वचितच क्षोभनाट्य किंवा मेलोड्रामाकडे जाते. अन्यथा, त्यातला सहजसुलभ वाटणारा घटनात्मक मेळ तर्कनिष्ठ पद्धतीने कथेतील उत्कर्षबिंदूकडे झेपावतो.

सोलमेट हे सुनीता ओगले यांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/3zcLoaM

सुनिता ओगले यांच्या कथेतील मानवी मनाची गुंतागुंत, विशेषत: त्यामागील अलौकिक भाव-भावनांचा गहिरेपण त्या नेमकेपणाने चिमटीत पकडून वाचकाच्या तळहातावर ठेवतात. त्यांची ही किमया दाद देण्यासारखी आहे ! त्यातील अनेक कथांचे शेवट हे अनपेक्षित व धक्कादायक आणि भावना हेलावून सोडणारे आहेत. वरवर पांढरपेशा समाजातील वाटणाऱ्या या सर्व कथा असल्या तरी त्यातील भावविवशता आणि ओघाने येणारी वैचारिक गुंतागुंत वाचकाला अंतर्मुख करते. कथा वाचल्यानंतरही वाचकाच्या मनात त्याचे चित्रमय भावनिक पडसाद बराच काळ रेंगाळत राहातात.

या संग्रहातील त्यातील सोलमेट ही कथा लेखिकेच्या स्वानुभवासारखी सादर होत एक वेगळाच ठसा वाचकाच्या मनावर ठसवते. सोलमेट हा शब्द यातील सर्व कथांचे स्थूलमानाने एक प्रातिनिधीक प्रतिक आहे. संवेदनशील मानवी अंतरात्म्यापर्यंत सोलमेट या शब्दामागची ओढ व त्यातली उत्कटता जाऊन भिडते. याची अनुभूती काही प्रमाणात वाचकही त्याच्या तर्कनिष्ठ व आस्वादक स्वानुभवाच्या आधारे घेतो. सोलमेट या शब्दात केवळ एक अनावर अशी भावनिक हुरहूर नाही, तर तो प्रवास शोधण्याचा लेखिकेचा अंत:करणपूर्वक केलेला प्रयास आहे.

यातील अनेक कथांमागील कल्पना युटोपियन (काल्पनीक वाटाव्यात अशा वा कधीही प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत अशा अशक्यप्राय) असल्याचे वरवर जाणवते. कथा सादर करताना लेखिका कोणताही फाफट पसारा न वाढवता या कथेतील मानवी नात्याचा नव्याने घेतलेला शोध व एका अनाम आदर्शवादाकडे नेते. लेखिकेने अट्टहासाने केलेला हा भावनिक प्रवासाचा अनुभव यातील प्रत्येक कथा कमी-अधिक प्रमाणात देते; तर काही कथांमध्ये त्यातील भावनिक व वैचारिकता उत्तुंग अशी विलक्षण अनुभूती देते !

मध्यमवर्गाय जगण्यातील मानवी भाव, इच्छा, आकांक्षा व वासनांबरोबर येणाऱ्या अडचणींकडे बघण्याची निर्भिड, थेट (बोल्ड नव्हे) अशी संवेदनशील दृष्टी देत या कथा वाचकाला समृद्ध करतात. एक स्त्री लेखिका म्हणून स्त्रीवादीपणाचा कोणताही मुखवटा न लावता लेखिका सुनिता ओगले यांचे लेखन सुस्पष्ट मानवतावादी भूमिका घेत केलेले विवेकनिष्ठ असे जोरकस व प्रभावी झाले आहे.

त्यांच्या या भावनिक व वैचारिक भूमिकेतून मधूनच त्या मानवी नातेसंबंधातील नवनवे मार्ग व आयाम शोधण्याचा प्रगल्भपणे प्रयत्न करतात. त्यांनी नव्याने शोधलेल्या नात्याचा अर्थ, त्यातील खोली व त्यामागची मानवी प्रेरणा त्या तितक्याच ताकदीने व कथात्म सुसंगतीने शेवटापर्यंत नेताना जाणवतात. मानवी नात्यातील हे उदात्त व अत्यंत हवेहवेसे वाटणारे पण लपून राहिलेले व्यक्तीमत्त्वच त्या त्यातील बारकाव्यानिशी उलगडताना दिसतात. काही कथांमधून त्या अशा आदर्शवादी व दूरवर क्षितिजावर अवतीर्ण झालेल्या नेहमीच्या मानवी आवाक्यापलिकडच्या व्यक्तीमत्त्वांचे दर्शन त्या घडवतात. किंबहुना, माणसे अशी नाती का व कशी निर्माण करतात याचा वेधही यातील काही कथातून त्या घेतात. लेखिकेला सापडलेली त्याची उत्तरं कधीकधी अत्यंत कणखर, तर कधी तितकीच तरल पातळीवरची असून त्यामागच्या मानवी प्रेरणांचा तो एक जाणीवपूर्वक घेतलेला मागोवा आहे. यातील बहुतेक साऱ्या कथांचा शेवट अर्थातच सकारात्मक अशा कृतार्थतेत झाला आहे.

सोलमेट हे सुनीता ओगले यांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/3zcLoaM

यातल्या अनेक कथा या कर्तृत्त्ववान मुली व स्त्रियांच्या वैचारिक व भावनिक जडणघडणीचा मानसिक पातळीवर सूक्ष्म वेध घेणाऱ्या असून, लेखिका त्यातून समोर येणाऱ्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण अमूर्त गोष्टी व भावनांचा प्रभावी उलगडा तितक्याच तर्कनिष्ठ ठामपणाने करतात. या कथांमधील अवघड आव्हानांचा तितक्याच शांत व संयमी विचारांनी त्यातील नायिका यशस्वी मुकाबला करतात. लेखिकेचे हे निश्चितच एक मोठे बलस्थान आहे. मग त्यातून स्त्रीची ही सशक्त प्रतिमा सापडल्याचा आनंद लेखिकेइतकाच वाचकालाही होतो. मानवी कुवतीपलीकडचे स्त्रीने उलगडून दाखवलेले हे अद्वितीय रूप थक्क करणारे आहे. एरव्ही त्याचा अनाकलनीय वाटावा असा हा नेहमीपेक्षा वेगळा आकृतीबंध समजावून घेण्यातही एक गंमत येते ! वाचक त्यामधील याच विलक्षण अनुभूतीत बुडून जातो. म्हणूनच सोलमेटमधील सर्वच कथांचे वेगळेपण एक वाचक म्हणून थोडी विस्ताराने सांगतानाही ती मजा मी मनापासून अनुभवू शकलो.

सोलमेटमधली पहिली कथा ही सरोगसी म्हणजे दुसऱ्या जोडप्याचे बाळ स्वत:च्या गर्भाशयात वाढू देणे, हा विषय घेऊन यशोदेचे सुख ही कथेतून मांडला आहे. विषय वेगळा असून मोलकरीण असणारी संगीता ही परदेशी जोडपे मरिया आणि जॅक यांचे मूल पोटात नऊ महिने वाढवते. तिला त्या बाळाबद्दल वाटणारे ममत्व व आकर्षणाची सांगड लेखिकेने यशोदा व कृष्णाशी जोडले आहे. देवकीने कृष्णाला फक्त जन्म दिला आहे त्याला वाढवणारी आई दुसरीच आहे, याची आठवण या कथेतून दिली जाते. मातृत्वाच्या या अत्यंत उत्कट अनुभवात संगीता यशोदेप्रमाणे आपल्याला मातृत्त्व दिलेल्या अनोळख्या बाळापासून त्याच्या जन्मानंतर लांब रहाण्याचा धाडसी निर्णय अत्यंत जड अंत:करणाने घेते ही पहिलीच कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते.

अंध व्यक्तीबरोबर डोळस माणूस सहवासात येत असेल तर आधी अंध माणसाची विचार करण्याची किंवा तर्क करण्याची पद्धत समजावून घ्यायला हवी. तसेच अंधाला पडणाऱ्या दृश्य स्वरूपाच्या प्रश्नांना त्यांना समजेल अशा रीतीने उत्तरे द्यावी लागणे अवघड असते, हेही लक्षात ठेवायला हवे. अशा अनेक सूक्ष्म निरीक्षणांसह लिहिलेली ओगले यांची दुसरी कथा एक डोळस अफलातून तसेच थरारकही झाली आहे. डोळस माणसापेक्षा अधिक प्रॅक्टिकल किंवा व्यवहारी असणारा अंध दुसरीकडे तितकाच संवेदनशीलही असतो. त्यामुळे आमच्या अंधाऱ्या विश्वात चुकीला क्षमा नसते, असतो तो कपाळमोक्ष या अंध असणाऱ्या या सर्वेशचे जीवन तत्त्वज्ञान तो या कथेत खरे करून दाखवतो ते त्याच्या स्वत:ची पत्नी मंगलच्या बाबत. आपल्या अंधळेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या व्यंगाचा जो अपमान तिने केला आहे, त्याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. त्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही, असे मन घट्ट करणारे विचार करणारा सर्वेश या कथेत दिसतो. अंधांना कोरडी सहानुभूती दाखवणाऱ्या डोळस माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा वाचकाला अंतर्मुख करते.

कमनशिबी की नशीबवान ही यातली तिसरी कथा सरळसोट सुरू होते आणि त्यातला भावनिक गुंता शेवटापर्यंत वाढवत नेते. भावनावेगातील तिचा नूर वेगवान असूनही एका तार्किक सुसंगतीपाशी ही कथा सूचकतेने थांबते. अनाथ सायलीच्या दत्तक जाण्यापासून ही कथा सुरू होत तिच्या अनाथपणाच्या प्रश्नांचा उत्तरे सोडवत ती कथा तिच्या स्वत:च्या शोध घेण्यापर्यंत येऊन थांबते. त्यात तिला मदत करणारे पालक स्नेहा आणि शशांक, भाऊ साकार आणि नंतर जीवनसाथी म्हणून येणारा निमिषपर्यंत अनेक व्यक्तीमत्त्वे तिच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात कशी मदत करतात याची ही हृद्य कथा असून तिचा शेवटही मनाला चटका लावणारा झाला आहे. सायलीच्या बालपणापासून ते तारूण्यावस्थेपर्यंतचा दीर्घ प्रवास या कथेत असला तरी तिचे बदलत गेलेले व्यक्तीमत्त्व शेवटच्या उत्कट क्षणी स्थिरावते. सायलीचा ही एक केस स्टडी आहे, असा आभास त्यातून निर्माण होतो. कथा अप्रतिम आहे !

पुरुषांचं हेकेखोर व स्वार्थी वर्चस्व असणाऱ्या एका पांढरपेशा कुटुंबात सून म्हणून आलेली समतेच्या विचारात वाढलेली ऋचा तिच्या पद्धतीने स्वाभिमानासाठी बंड करून घराबाहेर पडते. हे करत असताना तिला पाठिंबा देणाऱ्या सासू – माईंबाबतही ती काही ठाम भूमिका घेते. तिला बळ देणारे माई त्यांच्या हातातले सोन्याचे गोठ ऋचाच्या हातात घालतात. एक प्रकारे हा त्यांनी ऋचाला दिलेला प्रतिकात्मक पाठिंबा असतो. त्यातून त्या दोघीही त्या दबलेल्या वातावरणात आत्मनिर्भर होण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतात. कोणताही भावनिक बडेजाव न करता शांत व भक्कम वैचारिक पायावर ऋचाची ही आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करणारी गोठ ही कथा वाचकाला थेट भिडते. स्त्रीच्या स्वाभिमानाचे दर्शन घडवणारी ही एक अत्यंत सुखद व प्रभावी कथा आहे.

लेखिका ओगले यांची चूक की बरोबर ही कथा जबरदस्त शेवट असणारी झाली आहे. शरीरसौंदर्य दाखवणारे तोकडे कपडे घालणाऱ्या किशोरवयीन श्वेताला विरोध करणारी तिची आई मीना यांच्यातला भावनिक वाद. बराच काळ बाहेर राहिलेले तिचे सावत्र वडील शेखर यांच्या मनात श्वेताला आपण पुरेसा आधार देऊ शकले नाही त्याबद्दल वाटणारी खंत. तिच्या तोकड्या कपड्यांबाबत तिला नेमके काय बोलावे याबाबत शेखरचा उडालेला वैचारिक गोंधळ. अशा पोशाखात असलेल्या श्वेताचा तिच्या राजसकाकांनी गैरफायदा घेण्याचा केलेला प्रयत्न. या साऱ्यात मुलींना मुलांपेक्षा वेगळे नियम का ? तसेच कपड्यांबद्दल फक्त मुलींनाच का बंधनं ? असे कपडे घातले म्हणजे आपण उपलब्ध आहोत असा चुकीचा अर्थ का घेतला जातो ? या साऱ्याच अनुत्तरित प्रश्नांना श्वेताचा धाकटा भाऊ स्वराज विचारपूर्वक उत्तर देतो ते राजसकाकाला जोरदार थोबाडीत मारून व सज्जड दम देऊन. श्वेताच्या मनातली ही कोंडी त्यातून ज्या उत्कट अशा भावनिक आनंदातिरेकाने फुटते आणि कुटुंबातील सगळ्यांना नव्याने एकत्र आणते. हे सारेच शब्दचित्र वाचकालाही अनपेक्षित धक्का देते व भावनाविवश करते.

छकुली या कथेत हुशार व कर्तुत्त्ववान असणाऱ्या मध्यमवर्गीय ऋचाचा अमेरिकेत शिकताना झालेल्या अपघातात मृत्यू अटळ असल्याचे निष्पन्न होते. मनाने कुमकुवत असणारे तिचे वडील कोणताही निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसल्याचे जाणून आई रेवतीबाई ऋचाला लावलेली लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्याचा खंबीर निर्णय डॉक्टरांना कळवते व त्याच सुमारास स्वत:ही या जगाचा निरोप घेते. ऋचाची लाडकी बाहुली छकुलीसोबत रेवतीबाई झोपेत हृदयक्रिया बंद पडून मृत्यूला सामोऱ्या जातात की त्यांची जगण्याची इच्छाच संपते हे लेखिका ओगले यांनी धूसर ठेवले आहे. रेवतीबाई जणू आपल्या मुलीला भेटायला परलोकात जात आहेत, असा आशावाद ठेवत ही कथा संपते.

सोलमेट हे सुनीता ओगले यांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/3zcLoaM

तिची गोष्ट ही या संग्रहातली एक उत्तम कथा आहे. वरवर कर्मठ व हटवादी वाटणारी पारंपरिक वळणाच्या सासू वरदाबाई आणि त्यांची पडखाऊ स्वभावाची सून मीहिका यांच्यतल्या संबंधाची ही कहाणी. आईकडचा कर्मठपणा घेतलेला मीहिकाचा पती आशिष. मीहिकाच्या कॉलेजमधील 12 वर्षांपूर्वी भेटलेल्या मित्रमैत्रिणींच्या सहलीत ती एक रात्र तिचा कॉलेजमधील ऐकेकाळचा जवळचा मित्र सुजयबरोबर अपरिहार्य कारणाने घालवते. मोकळेपणाने ती ही गोष्ट पती आशिषला सांगते. संशयी स्वभावामुळे त्यावर त्याची तीव्र प्रतिक्रियाही उमटते. प्रत्यक्षात त्या रात्री मीहिका सुजयजवळ जाऊनही तिला त्या नात्यातला फोलपणा कळतो आणि तिच्या गेल्या 12 वर्षे मनात साचून राहिलेल्या संमिश्र भावनांचे आपोआप विरेचन होते. अशा वेळेस आशिषला स्पष्ट विरोध करत सासू वरदाबाई मीहिकाची भक्कमपणे बाजू घेतात. एरव्ही कर्मठ वाटणाऱ्या वरदाबाईंचे स्त्रीच्या चारित्र्याबद्दलचे समंजस व पुढारलेले विचार ऐकून मीहिकाला सुखद धक्का बसतो. आपल्यावर संशय घेणाऱ्या पतीसमोर असे काही अनपेक्षित मोठे व महत्त्वाचे घडते हे पाहून तिचा बांध फुटतो. तिच्या मनातला तणाव आपोआप दूर होतो, हा सकारात्मक शेवट असणारी ही परिणामकारक कथा वाचकाला अंतर्मुख करते.

संत ज्ञानेश्वरांच्या मोगरा फुलला या रचनेतील आलेला शब्द म्हणजे मनाचिये गुंथी. त्या ओळीचा अर्थ आहे, मनातली गुंतागुंत विणून त्याचा विणलेला शेला श्रीविठ्ठलाला अर्पण केला. मनातल्या अनाकलनीय गुंत्याला काही सकारात्मक सर्जनशील आकार दिला, असा त्याचा ढोबळ अर्थ निघतो. या संग्रहातील मनाचिये गुंती ही कथा मानवी मनातला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करते, ती तात्पुरत्या मलमपट्टीसारखा. बालपणीच्या कटू व भीतीदायक अशा एकटेपणातून, निराधारपणातून मनात निर्माण होणारी असुरक्षितेच्या भावनेवर उपाय म्हणून त्या अबोध भावनांचे विरेचन पबमधील बेधुंद नाचण्याने पूर्ण करणारी मोठी झालेली रिया. हेच त्यामागचे कारण सापडल्याचे व ते मान्य करणारा तिचा पती ऋषभ आणि त्याचा मानसोपचार तज्ज्ञ मित्र वैभव. कथाबीज मुळात फार लहान असल्यामुळे ही कथा म्हणावी तशी फुलू शकलेली नाही. रियाच्या बेधुंद नाचण्याचे कारण समजण्यापुरतीच ही कथा आहे. त्यामुळे ती अधांतरी सोडून दिल्यासारखी असून त्यात रियात काही सकारात्मक बदल घडेल असा आशावाद त्यातून व्यक्त होतो.

वर्तुळ ही कथा स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर आधारित असून त्या नात्यातील अप्रिय अशा ताटातुटीनंतरही त्याच नात्याचा पुन्हा एकदा खिलाडूवृत्तीने स्वीकार करण्यावर भाष्य करते. असे असले तरी या कथेतला पुरुष त्यातल्या स्त्रीला मोठ्या मनाने माफ करतो, असा त्यागावर आधारित असणाऱ्या खास बंगाली फॉम्यूला यात नाही. हेच या कथेचे वेगळेपण व वैशिष्ट्य आहे. विवाहानंतर दोन मुलं झालेली शमा, तिच्या आयुष्यात आलेल्या विवाहित परागकडे आकर्षित होते. शमाचा पती राहूल तिचा हा निर्णय घट्ट मनाने स्वीकारतो व 18 वर्षे तिच्याशिवाय संसार करतो. पुढे परागच्या निधनाने शमा एकटी पडते. परागची पत्नी तिला घराबाहेर काढते. तेव्हा तिला पुन्हा राहूल आधार देतो ते ती त्याच्या दोन्ही मुलांची आई म्हणून तसेच त्यालाही आलेला एकटेपणा कमी व्हावा म्हणून. परीपक्व विचारांच्या समंजस पुरुषीपणावर ही कथा असल्यामुळे तिचा शेवट काहीसा अपेक्षित असून तो वरवर कृत्रीम व आदर्शवादी वाटला तरी तर्कशुद्ध व पटणारा वाटतो. ही कथा छान जमली आहे !

सन्मान ही कथा विलक्षण अनुभव देणारी असून तिचा शेवट ती वाचकांना कदाचित अतिरेकी व अविश्वसनीय वाटेल अशी आहे. प्रकाशच्या मेंदूची गाठ कापण्याच्या ऑपरेशनचा खर्च देण्यासाठी त्याची पत्नी तेजूशी तिच्याबरोबर एक रात्र घालवण्याची अट घालणारा मदनभाऊ. कोणासही सांगता न येणारा हा सौदा ऐकून तेजूची झालेली घुसमट. शेवटी हा तेजूच्या स्त्रीत्वाचा व स्वाभिमानाचा प्रश्न पाहून प्रकाशचे डॉ. देशपांडे यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करून तिची अब्रू नकळत वाचवतात. साधी सरळ असणारी ही कथा व देवासारखे धावून आलेले डॉ. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीमुळे प्रकाशचे ऑपरेशन शक्य होते. मनाची कोंडी झालेल्या तेजूची ही अवस्था व त्यातून निघालेला अनपेक्षित मार्ग निघालेली ही सरळसोट कथा आहे.

सोलमेट ही कथा असून ती लेखिका ओगले यांच्या स्वानुभवाच्या स्वरूपात प्रकट झाली आहे. ही कथा लेखिकेच्या स्वप्नातल्या घराबद्दल असली तरी प्रत्यक्षात दिसलेल्या अशा घराबरोबर त्याचा मालक कारस्टनचे व्यक्तीमत्त्व वर्णन करणारी आहे. एकेकाळचा कोट्याधीश असणारा कारस्टन दिवाळखोरीत सर्वस्व गमावून पुन्हा एकदा राखेतून भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे लेखिकेला उच्च अभिरूची, जगण्यातला खंबीरपणा परदेशात आत्मविश्वासाने वावरण्याची प्रेरणा देणारा आहे. अशा माणसाचे बॉर्नहॉम बेटावरचे वरवर साधे वाटणारे व आतून आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असणारे प्रथमदर्शनीच प्रेमात पाडणारे बिनकुलपाचे घर आणि त्यामागे कारस्टनच्या मालकीचे जंगल. यातून अनेक सुंदर आठवणींचा खजिना लेखिकेच्या मनात जमा झालाय. खऱ्या अर्थाने स्त्रीच्या मताला किंमत देणारा, बिझिनेसमन असून स्त्री-पुरुष याच्या पलिकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून विश्वास टाकणारा कारस्टन निरपेक्ष जीव लावणारा सोलमेट एक अत्यंत प्रिय व्यक्ती बनतो. आपल्यावर निस्सीम प्रेम करणारे त्याचे घर हा श्रीमंत करणारा अनुभव लेखिका येथे तितक्याच उत्कटतेने व नेमकेपणाने मांडायचा प्रयत्न करते. अनुभवातील ह्या वैयक्तीक पातळीवरील स्वप्नवत पण खऱ्या ठरलेल्या अनुभवामुळे ही कथा वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.

त्या चौघी ही लेखिका ओगले यांची कथा त्यांच्या स्वत:च्या कथनशैलीचा एक उत्तम नमुना आहे. ही दीर्घकथा उत्कृष्ठ आहे ! नेहमीच्या कथांपेक्षा थोडी जास्त लांबीची ही कथा हळुहळू वातावरणनिर्मिती करत परमोच्च बिंदूपर्यंत प्रभावीपणे पोचते.

रिमा, तिची मुलगी रिधिमा, शलाका व तिची मुलगी प्रीती या दोघा मायलेकींवरील हे गुंतागुंतीचे कथानक कथेच्या तार्किक अंगाने पुढे जात राहते. रिमाचा विक्षिप्त व मनोविकृत बनत गेलेला पती रितेशकडून तिचा सातत्याने होणारा शारीरिक व मानसिक छळ, त्याचे वाढते दारूचे व्यसन, त्यातून रिमाची होणारी मानसिक कोंडी फोडण्यासाठी तिला भेटलेला तिचा बालमित्र व आता कुटुंबमित्र बनलेला प्रकाश. आपली पत्नी शलाकाच्या संशयी व गलथानपणाला वैतागल्याने प्रकाशही रिमाकडे मानसिक व शारीरिक पातळीवर आकर्षित होतो व तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतो. दरम्यान, एका अपघातात शलाका अनपेक्षितपणे दगावते. त्यानंतर रिमा-प्रकाशच्या विवाहाचा निर्णय घेण्यास भाग पाडणारी रिमाची 18 वर्षाची मुलगी रिधिमा प्रगल्भपणे प्रकाशची मुलगी प्रीती व आजीच्या संमतीने हा घाट घालते. रितेशने केलेल्या मारहाणीचे शरीरावरील वळ दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्याची या विवाहातील आडकाठी दूर केली जाते.

प्रकाश रिमाचा विवाह झाला तरी त्यांचे ससारिक जीवन सुरळीत होण्यासाठी येणाऱ्या अडचणीना समंजस व ठामपणे तोंड देणारी रिमाचे एक अजोड दर्शन यातून घडते. रिमाला प्रकाशची मोठी मुलगी केतकीच्या विवाहास जाता येत नाही, त्याबरोबरच स्वत:ची मुलगी रिधीमा हिच्या लग्नासाठीही तिला आडवले जाते. हे सारे मूकपणे सोसणाऱ्या रिमाला अखेर काव्यात्म न्याय मिळतो, तो तिची रिधिमा पतीसह तिला लग्नाच्याच दिवशी गुपचूप आशिर्वाद घेण्यासाठी घरी येते तेव्हा. आपल्याला होणारा अवर्णनीय परमोच्च आनंद संयमाने थोपवत ती नवदांपत्याच पाठवणी करते, अशा अत्यंत भावनोत्कट व सकारात्मक शेवटाने कथा संपते.

स्त्रीपुरूष नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही प्रभावी कथा स्त्रीवरील अन्यायाचे वर्णन करतानाही संयमित तटस्थपणा दाखवते. त्याची परिणिती कशात होते हे सांगत त्यातील स्त्रीची होणारी घुसमट तिची न्याय्य बाजू घेत विवेकबुद्धीने मांडते. त्यामुळे यातील स्त्री-पुरुष संबंधाला केवळ धीटपणा येत नाही, तर भौतिक पातळीवरील ती एक भावनिक गरज बनते. हे समजून घेणारी इतर परिपक्व पात्र या कथेत दाखवल्यामुळे ती कथा भावनिक व वैचारिक पातळीवरही एक विलक्षण उंची गाठते.

विवाहबंधनात पोळून निघालेली रिमा व प्रकाश या समदु:खी स्त्री-पुरुषाची ही कथा केवळ रहात नाही. तर त्यामागे मानवी नात्यासंबंधीचा जिव्हाळा, मूळ स्त्रीजाणीवेबद्दल असणारी संवेदनशीलता, आस्था व प्रतिकुल परिस्थितीतून काढण्यात येणारा समंजस जाणीवपूर्वक मार्ग यामुळे ही कथा आजच्या उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबसंस्थेतील तणावग्रस्त उलथापालथी अत्यंत संयमाने हाताळताना दिसते. हे कथानक कुठेही विनाकारण भावूक, भाबडेपणा वा क्षोभनाट्याकडे (मेलोड्रामा) जात नाही, किंवा त्यातील बोल्ड स्त्री-पुरुष नात्याचा अकारण बाऊही करत नाही. स्त्री ही किती अन्यायग्रस्त आहे, अशा कोणत्याही स्त्रीवादी अभिनिवेशाचा तर या कथेला पुसटसाही स्पर्श झालेला नाही.

लेखिका ओगले मुळात स्त्रीपुढील विचित्र किंवा अमूर्त आव्हानात्मक अशा विलक्षण विषयांचीच निवड त्यांच्या कथेसाठी जाणीवपूर्वक करताना दिसतात. त्यातून त्यातील नायिका ही भावनिकतेबरोबर वैचारिक व विवेकनिष्ठ मार्ग विचाराने व तर्काला पटेल अशा पद्धतीने स्वीकारत जाते. हे करताना तिचे व्यक्तीमत्त्व उत्तुंग बनत जाते. स्त्रीमधील ही अव्यक्त असणारी खरी ताकद हाच ओगले यांच्या अनेक कथांमधील मुख्य सूत्र आहे. त्याचा कथात्मक विस्तारही त्या तितक्याच कल्पकतेने आणि अत्यंत नेमकेपणाने करतात. त्या चौघी या कथेत स्त्रीमधील ही विलक्षण ताकद, तिच्यातली सोशिकता, संयम व प्रसंगी बंडखोर बनण्याकडे होणारी वाटचालही लेखिका तितक्याच तर्कनिष्ठ विवेकाने व संयमाने दाखवतात. त्यामुळेच त्या कथेला भावनिकतेबरोबरच एक तरल अशी वैचारिक उंची प्राप्त होते. कथाकार म्हणून लेखिकेची सर्जनशीलता इथे प्रकर्शाने जाणवते.

व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या लेखिका ओगले यांचे व्यक्तीमत्त्व कथेत कुठे सापडते का याचा शोध घेताना, त्यातील पात्रांचे नीटस आणि आवश्यकतेनुसार झालेले जेवढ्यास तेवढे असे पुरेसे चित्रण. तसेच कथानक मांडताना त्यातील नेटकेपणाही प्रामुख्याने जाणवतो. त्यातील विश्लेषण आणि काढलेला निष्कर्ष हा कथाबीजाचाचा एक अविभाज्य भाग कथारुपातच पुढे येतो, ही कथालेखिका म्हणून ओगले यांची मोठी जमेची बाजू आहे. कथानक मांडताना त्यातील निर्माण होणारे प्रश्न त्याची संवेदनशीलतेने घेतलेली दखल व त्यातून हळुहळू पण ठामपणे काढलेला मार्ग ही त्यातली भक्कम अशी सौंदर्यस्थळे आहेत. त्यामुळे त्या चौघी व त्यांच्या अनेक कथा कधी एखाद्या कवितेप्रमाणे आवश्यक तेवढ्याच फुललेल्या असल्यासारख्या लोभस वाटतात.

मुळात कथेसाठी सुनिता ओगले यांनी निवडलेले विषय हेच अत्यंत आव्हानात्मक असतात. त्या आव्हानाला तोड देताना कथाकार म्हणून त्यांची कुठेही दमछाक होताना दिसत नाही. किंबहुना, त्यातील त्यांना जाणवणारे कथात्म आव्हान त्या लीलया पेलून त्यातील अडथळे पार करताना या कथात्म निवेदनातील सौंदर्य व नजाकत हे दोन्हीही तितक्याच प्रभावीपणाने अधोरेखित करतात.

कथाकार म्हणून कोणतीही घाई न करता आपल्याला सुचलेली वन लाईन थीम स्वत:मध्ये शांतपणे व पूर्णांशाने मुरवल्यानंतर मगच त्या लेखनाला सुरुवात करत असाव्यात, असे वाटते. तसेच मनासारखी कथा उतरेपर्यंत त्या वाट पहात असाव्यात, असेही जाणवते. कथा कथनाची ही सर्जक प्रक्रिया शब्दांकीत करताना त्या यासाठी स्वत:चे समाधान होईपर्यंत त्या पुरेसा वेळ देतात, हे सर्वात महत्त्वाचे आहे.

वाचक म्हणून प्रश्न पडतो की, सुनिता ओगले यांच्या कथानिर्मितीमागची प्रक्रिया काही प्रमाणात समजून घेता आली तरी ती या कथा नेमक्या कशाची फलनिष्पत्ती आहेत ? त्यामागे कोणती परिस्थिती कारणीभूत आहे ? अगदी वेगळ्या वाटेच्या कथांमध्येही सुनिता ओगले यांची कथा बसत नाही. शेवटी एकच निष्कर्ष निघतो. तो म्हणजे त्यांनी स्वत:च्या लेखनाची वाट स्वत: चोखाळली आहे. कथाकारांच्या कथनातील प्रगल्भता लेखिकेच्या कथनशैलीत स्वतंत्रपणे आलेली दिसते.

विवेक सबनीस

पुस्तकाचे नाव – सोलमेट
लेखिका – सुनीता ओगले
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन,
किंमत – २६० रुपये

सोलमेट हे सुनीता ओगले यांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/3zcLoaM


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर

जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading